Leading International Marathi News Daily

बुधवार, २५ फेब्रुवारी २००९

निम्म्याहून अधिक रिक्षा अनधिकृत
सागर वैद्य, नगर, २४ फेब्रुवारी

सरकारी नियमांची पायमल्ली करीत आवश्यकतेपेक्षा जवळजवळ दुप्पट म्हणजे साडेपाच हजार रिक्षा सध्या नगर शहरात आहेत. प्रवासी वाहतुकीचा शहरात फिरण्यासाठीचा परवाना नसणाऱ्या सुमारे अडीच हजार रिक्षांचा यात समावेश आहे. या अतिरिक्त रिक्षांमुळे वाहतूक कोंडी व प्रदूषणाचा प्रश्न जटील होऊन शहराचे स्वास्थ्य बिघडले आहे. शिवाय परवानाधारक रिक्षाचालकांच्या रोजगारावरही या अनधिकृत रिक्षांमुळे टाच येत आहे.

मुंडेंची कन्या राजकीय आखाडय़ात
पाथर्डीत श्रीगणेशा

पाथर्डी, २४ फेब्रुवारी/वार्ताहर

(कै.) प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांच्यापाठोपाठ आता भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा पालवे (मुंडे) यासुद्धा राजकीय रिंगणात उतरल्या आहेत. आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात आज त्यांनी पाथर्डीत केली. आपले वडील बीडमधून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे सूतोवाच त्यांनी येथे केले.नगरपालिका व भाजप कार्यालयाला पंकजा पालवे यांनी भेट दिली. परळीला आई, तर पाथर्डीला मावशी मानणाऱ्या मुंडे यांनीच आपल्याला राजकीय कार्याचा प्रारंभ पाथर्डीत करण्याचा सल्ला दिला असल्याचे पंकजा यांनी आवर्जून सांगितले. पाथर्डीचा दौरा अनौपचारिक होता.

तीन अपक्षांच्या याचिकेवर १२ मार्चला खंडपीठात सुनावणी
नगर, २४ फेब्रुवारी/प्रतिनिधी

महापालिकेतील ३ अपक्षांच्या याचिकेला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सुनावणीसाठी १२ मार्च ही तारीख दिली. युतीसोबतच ग्राह्य़ धरण्याच्या नाशिक विभागीय आयुक्तांच्या निर्णयाला या अपक्षांनी न्यायालयात आव्हान दिले आहे. प्रथम शिवसेना-भाजप युतीबरोबर गेलेल्या व नंतर आघाडीला पाठिंबा दिलेल्या संजय गाडे, अनिल शेकटकर व इंदरकौर गंभीर या ३ अपक्षांच्या या न्यायालयीन लढाईमुळे मनपातील स्वीकृत सदस्य, स्थायी समिती व अन्य सर्वच निवडी आता अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडल्या आहेत.

जायकवाडी धरणग्रस्तांना प्रतीक्षा भरपाईची
शेवगाव, २४ फेब्रुवारी/वार्ताहर

जायकवाडी धरणाच्या पाण्यात बुडणाऱ्या व नव्याने संपादित केलेल्या सुमारे ११० शेतकऱ्यांच्या जमिनींचा मोबदला देण्यास सरकारी पातळीवरून टोलवाटोलवी व विलंब होत असल्याने तालुक्यातील धरणग्रस्त शेतकऱ्यांत संतप्त भावना व्यक्त होत आहेत. पैठणच्या जायकवाडी धरणाच्या पाण्याखाली तालुक्यातील २५ ते ३० गावे व त्यांच्या शिवारातील जमिनी गेल्या. जायकवाडी प्राधिकरण या प्रकाराबाबत उदासीन असल्याचेच चित्र आहे.

मोबाईल टॉवरवरील कारवाई पुन्हा सुरू
‘भारत संचार’चा टॉवरही अनधिकृत

नगर, २४ फेब्रुवारी/प्रतिनिधी

अनधिकृत मोबाईल टॉवरवरील थांबलेली कारवाई महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने आज पुन्हा सुरू केली. केडगावमधील टाटा इंडिकॉम व आयडिया या कंपन्यांचे, तर टिळक रस्त्यावरील बीएसएनएल (भारत संचार निगम) या सरकारी कंपनीचा टॉवरही आज बंद करण्यात आला.
अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख अभियंता सुरेश इथापे यांनी ही कारवाई केली. केडगावच्या भूषणनगर लिंक रोडवरील मेहेर बिल्डिंगवर असलेला टाटा इंडिकॉमचा अनधिकृत टॉवर प्रथम बंद करण्यात आला. त्यापाठोपाठ भूषणनगरच्या आतील रस्त्यावर असलेल्या सुंबे यांच्या इमारतीवरील आयडियाचा टॉवरवरही अशीच कारवाई करण्यात आली.काही खासगी तज्ज्ञांची यासाठी मदत घेण्यात येत आहे. या तज्ज्ञांकडून अनधिकृत टॉवरची सगळी यंत्रणाच बंद करण्यात येते. याशिवाय टॉवरचा वीजपुरवठाही बंद करण्यात येतो. त्यामुळे संबंधित कंपन्यांना या टॉवरवरून कोणतेही संदेश देता-घेता येत नाहीत. टॉवरवर अवलंबून असलेले सर्वच मोबाईल बंद पडतात.

पिसाळलेल्या लांडग्याची मिरजगाव भागात धास्ती!
मिरजगाव, २४ फेब्रुवारी/वार्ताहर

पिसाळलेल्या लांडग्याचा मिरजगाव परिसरात धुमाकूळ चालूच आहे. आज त्याने आणखी एकास चावा घेतला. त्यामुळे ग्रामस्थांमधील दहशत कायम आहे. या लांडग्याने आतापर्यंत चार व्यक्तींबरोबर १९ जनावरांना चावा घेतला. एवढे होऊनही वन खात्याचे अधिकारी ढिम्मच आहेत. चावा घेतलेली तीन-चार जनावरे दगावली आहेत, तरीही वन खाते जागे होण्यास तयार नाही. कर्जत-मिरजगाव रस्त्यावर आज ताराचंद लिपण्या भोसले यांना या लांडग्याने चावा घेतला. त्यामुळे भयभीत झालेल्या भोसले यांनी तातडीने कर्जतच्या ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. परंतु लस उपलब्ध नसल्याने त्यांना नगरच्या सरकारी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. या लांडग्याचा त्वरित बंदोबस्त न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा मिरजगावचे सरपंच डॉ. पी. व्ही. गोरे, संपतराव बावडकर, डॉ. सुभाष सूर्यवंशी, संजय पवार व लहु वतारे यांनी दिला आहे.

अवतार मेहेरबाबांच्या जन्मोत्सवास प्रारंभ
नगर, २४ फेब्रुवारी/प्रतिनिधी

अवतार मेहेरबाबांच्या ११५व्या जन्मोत्सवास आज दीपाली टॉकिजमागे असलेल्या मेहेर सेंटर येथे उत्साहात प्रारंभ झाला. या प्रसंगी देश-विदेशातील भाविकांसह नगरकर मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
भाऊसाहेब कलचुरी यांच्या हस्ते बाबांच्या प्रतिमेचे पूजन करून सप्तरंगाचा ध्वज फडकविण्यात आला. भक्तांनी भजने व झेंडय़ाचे गीत गायिले. रमाबाई कलचुरी यांनीही भजन म्हटले. प्रास्ताविक लक्ष्मीकांत भांडे यांनी केले. फडकवलेला हा सतरंगा जाती-धर्माबाहेरचा आहे व तो सर्वाना सामावून घेईल, असा आहे असे सांगून कलचुरी म्हणाले की, बाबा एकदा बसले असताना भक्तमंडळींनी आपला झेंडा असावा असे म्हटले. जो तो आपापल्या धर्माच्या झेंडय़ाच्या रंगाप्रमाणे झेंडा असावा असे म्हणू लागला. तेव्हा बाबा म्हणाले मी कुठल्याही धर्माचा नाही. सर्व धर्म माझ्यात आहेत. म्हणून इंद्रधनुष्याच्या रंगाशी सुसंगत असा सप्तरंगी ध्वज त्यांनी निवडला. दर वर्षीप्रमाणे दुपारी नारायण सेवा करण्यात आली. सर्व भाविकांना व गरीब लोकांना जेवण देण्यात आले. या वेळी मेहेरनाथ कलचुरी, रमेश जंगले, लक्ष्मीकांत थाडे, श्रीधर केळकर, जाल दस्तूर यांच्यासह असंख्य भाविक उपस्थित होते.

भाजप महिला आघाडीची आज ‘पंचवटी’त बैठक
नगर, २४ फेब्रुवारी/प्रतिनिधी

औरंगाबाद येथे ५ मार्च रोजी होणाऱ्या प्रदेश महिला भाजपच्या मेळाव्याच्या नियोजनासंबंधी उद्या (बुधवारी) भाजप महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक औरंगाबाद रस्त्यावरील हॉटेल पंचवटीमध्ये दुपारी साडेबारा वाजता होणार आहे, अशी माहिती आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सुरेखा विद्ये यांनी दिली. बैठकीत आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष कांता नलावडे, प्रदेश सहसंघटन मंत्री सुनील कर्जतकर, जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे, संघटन सरचिटणीस प्रा. भानुदास बेरड मार्गदर्शन करणार आहेत. पुणे, सोलापूर, पिंपरी-चिंचवड येथील आघाडीचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

मागील भांडणातून मारहाण;चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
नगर, २४ फेब्रुवारी/प्रतिनिधी

मागील भांडणाच्या कारणावरून दुकानात शिरून शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी एका महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. आज सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार येथील शनि चौकात घडला. सागर ईश्वर नहार (२८, शनि चौक) यांनी फिर्याद दिली आहे. नहार यांचे शनि चौकात दुकान आहे. तेथे चौघांजणांनी येऊन नहार यांना शिवीगाळ व मारहाण केली, तसेच दुकानात घुसून मोडतोड केली. पोलिसांनी जयदीप विलास लंके, विलास विश्वजीत लंके, विश्वास अच्युत लंके व नंदा विश्वास लंके या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

श्रमिक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सुरुडे
नगर, २४ फेब्रुवारी/प्रतिनिधी

श्रमिक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब सुरुडे यांची, तर जिल्हा सरचिटणीसपदी आनंदराव वायकर यांची एकमताने निवड करण्यात आली. संघटनेच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवड झाली. उर्वरित कार्यकारिणीत अनंत लोखंडे व उद्धव गायकवाड (उपाध्यक्ष), नंदू डहाणे व आर. जी. कुमार (सहचिटणीस), ज्ञानदेव पिंपळे (खजिनदार), ज्येष्ठ कामगार नेते भा. र. बावके (सल्लागार), अनिल तोडकर, जालिंधर चोभे, अनिल डेरे, सुभाष चिपाडे, देवीदास साळुंके आदी (सदस्य) यांचा समावेश आहे. संस्थापक अध्यक्ष मधुकर कात्रे यांच्या निधनाबद्दल सभेत शोक व्यक्त करण्यात आला. सुरुडे, वायकर, लोखंडे, बावके आदींची भाषणे झाली. संघटनेशी संबंधित असलेल्या जिल्ह्य़ातील विविध युनियनचे पदाधिकारी या वेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

दुकाननोंदणी व नूतनीकरणापोटी साडेनऊ लाखांचा महसूल जमा
कोपरगाव, २४ फेब्रुवारी/वार्ताहर

नगरपालिका हद्दीतून ५ हजार १८४ दुकाने, व्यापारी संस्था, हॉटेल्स, करमणूक संस्था यांच्या वतीने नोंदणी व नूतनीकरणापोटी २००८मध्ये ९ लाख ५० हजार ७२४ रुपयांचा महसूल मिळाल्याची माहिती शॉप इन्स्पेक्टर विशाल जोगी यांनी दिली. ते म्हणाले की, गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत अडीच लाख रुपये जादा महसूल मिळाला. नागरिकांनी आपल्या दुकानांची नावनोंदणी व नूतनीकरण करून घ्यावे; अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल. गतवर्षी ३ हजार ९९९ दुकाने, ९०१ व्यापारी संस्था, २७७ हॉटेल, ७ करमणूक, विश्रांतीस्थाने अशा एकूण ५ हजार १८४ दुकानांची नोंदणी व नूतनीकरण डिसेंबर २००८अखेर करण्यात आले. त्याद्वारे ९ लाख ५० हजार ७२४ रुपये महसुली उत्पन्न मिळाले. २९ पैकी २८ खटल्यांचा निकाल लागला असून, त्यापोटी ३० हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

विवाहितेच्या छळप्रकरणी दहाजणांविरुद्ध गुन्हा
कोपरगाव, २४ फेब्रुवारी/वार्ताहर

हुंडय़ाचे एक लाख रुपये माहेरहून आणावेत तसेच मोटारसायकल घेण्यासाठीही पैसे आणावेत या मागणीवरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी तिचा नवरा अमृत, सासरा बन्सीलाल, सासू सुधा, दीर सुरेंद्र व दीपक, नणंद माया, सुनीता डमाळे आदी दहाजणांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरती अमृत डमाळे हिने या प्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली. या संबंधी पुढील तपास हेड कान्स्टेबल अशोक भोईटे करीत आहेत.

चंद्रभागा हजारे यांचे निधन
नगर, २४ फेब्रुवारी/वार्ताहर

तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील चंद्रभागा भानुदास हजारे यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ७१ वर्षांच्या होत्या. त्यांच्यामागे एक मुलगा, तीन मुली, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. नगर तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक बाजीराव हजारे यांच्या त्या मातुश्री होत.

दगड टाकून रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा प्रयोग
श्रीगोंदे, २४ फेब्रुवारी/वार्ताहर

तालुक्यातील लिंपणगाव ते रेल्वे फाटक या दरम्यानच्या खराब झालेल्या रस्त्यावरील खड्डे बुजण्यासाठी संबंधितांनी त्या खड्डय़ांवर दगडांचे मोठे ढिगारे टाकून खड्डे बुजविण्याचा प्रयोग केला आहे. जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडे हा रस्ता आहे. लिंपणगाव ते रेल्वे फाटक या दोन कि. मी. अंतराच्या रस्त्यापैकी निम्म्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम झाले आहे. मात्र, उर्वरित रस्ता अत्यंत खराब आहे. रस्त्यावरील मोठय़ा खड्डय़ांमुळे वाहनचालकांची कसरत होते. याच रस्त्याच्या कामासाठी गेल्या आठवडय़ात लिंपणगाव येथे ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. एका छोटय़ा पुलावरील रस्ता व त्या पुलाची सिमेंटची मोरी तुटल्याने मोठे भगदाड पडले होते. हे रस्त्यावरील भगदाड बुजविताना संबंधितांनी मोठी शक्कल लढविली. त्या भगदाडावर दगडांचा डोंगर उभा केला. रस्त्यावरच हा डोंगर उभारल्याने आता तर वाहनचालकांची मोठी कसरत सुरू आहे.