Leading International Marathi News Daily

बुधवार, २५ फेब्रुवारी २००९

नवनीत

जी व न द र्श न
कठोपनिषद

 

कठोपनिषदात गुरुशिष्यांचा अकृत्रिम प्रेमसंवाद आहे. वाजश्रवसाने विश्वजित यज्ञ केला. त्यात सर्वस्व दिले. याचा मुलगा नचिकेता. तो हे पाहात होता. भाकड गाईंचे दान नचिकेत्याने पाहिले नि तो वडिलांना वाजश्रवसाला म्हणाला, ‘‘तुम्ही मला कुणाला दिलेत?’’ वाजश्रवसा संतापून म्हणाला, ‘‘यमाला दिला.’’ पित्याची आज्ञा शिरसावंद्य मानून नचिकेता यमाकडे गेला. यम तीन दिवस परगावी गेला होता. तो आल्यावर नचिकेत्याला म्हणाला, ‘‘तुला तीन वर देतो. माग.’’ नचिकेत्याने पहिला वर मागितला,‘‘माझ्या वडिलांचा क्रोध घालव.’’ यम म्हणाला,‘‘वर दिला.’’ नचिकेत्याने दुसरा वर मागितला,‘‘अग्नीची उपासना केल्याने स्वर्गलोक मिळतो. अग्नीचे ज्ञान मला दे.’’ यम म्हणाला, ‘‘दिले.’’ नचिकेत्याने तिसरा वर मागितला, ‘‘मृत्यूनंतर माणसाचे पुढे काय होते?’’ या प्रश्नाने यम हादरला. त्याने गुहय़ ज्ञान देण्याचे टाळले. नंतर त्याने नचिकेत्याला ज्ञान दिले. ते संक्षिप्त असे- ‘श्रेयात परमकल्याण असते. प्रेयात तात्पुरते कल्याण असते.’ आत्मज्ञान म्हणजे श्रेय. देहसुखाची वाढती लालसा म्हणजे प्रेय. इंद्रियांना दिसणाऱ्या दृश्य जगाच्या पलीकडे खरे अस्तित्व आहे, याचे ज्ञान यात आहे. शाश्वत आत्मा अनुभवायचा असल्यास अशाश्वतातले चित्र काढून घेण्याचे धैर्य हवे. यासाठी अनुसंधानाने आपल्या हृदयात आनंद अनुभवायचा. आत्मज्ञानाबद्दलची जिज्ञासा संवादातून वाढवायची, म्हणजे आत्म्याचा संकेत असलेल्या ‘ॐ’चे अर्थपूर्ण ज्ञान आपल्याला होते. कृपापात्राला आत्मा पुलकीत करतो. स्वत:च्या अंत:करणाची पूर्ण जाणीव असली की हे सारे कळते. उदा., आपले शरीर रथ आहे. आत्मा रथी म्हणजे रथाचा मालक आहे. बुद्धी सारथी आहे. इंद्रिये घोडे आहेत. बुद्धिरूप सारथी कुशल असला की रथ योग्य दिशेने जातो. इंद्रिय घोडय़ांना नीट वळवले की पुरे. या शरीररूपी रथावर विवेकयुक्त बुद्धी सारथ्य करते. ती मनाला लगाम घालते. परमपदास पोहोचविते. इंद्रियांपेक्षा विषय सूक्ष्म विषयांपेक्षा मन सूक्ष्म. मनापेक्षा बुद्धी सूक्ष्म, बुद्धीपेक्षा आत्मा (हिरण्यगर्भ) अधिक सूक्ष्म. असा हा आत्मतत्त्वाचा प्रवास सूक्ष्म आहे. यामुळे माणूस आतून कळतो. आत्म्याच्या एकतेचा शुद्ध अनुभव येतो. अशा स्वयंप्रकाशी आत्म्याचा विलास म्हणजे आपले विश्व होय. हे आज जरी ओळखता आले. तसे वागले. तरीही सारे कलह संपतील. त्यासाठी हा एवढा अभ्यास आज करणार कोण?
यशवंत पाठक

कु तू ह ल
लघुग्रहांचे अस्तित्व
लघुग्रह हे लघुग्रहांच्या पट्टय़ातच आढळतात की इतरत्रही?

मंगळ व गुरू या दोन ग्रहांच्या दरम्यान असणारा लघुग्रहांचा मुख्य पट्टा बनला तोच मुळी गुरू ग्रहाच्या प्रचंड गुरुत्वाकर्षण प्रभावामुळेच. सूर्यमालेच्या निर्मितीच्या वेळी या भागात असणाऱ्या द्रव्याचा एक ग्रह न बनता हे द्रव्य असंख्य तुकडय़ांमध्येच विभागलेले राहिले. गुरूच्या गुरुत्वाकर्षण प्रभावामुळे यातील लघुग्रहांचा वेग कमी-जास्त होत गेला व त्यामुळे ते एकमेकांवर आदळले वा इतरत्र भिरकावले गेले. या भिरकावलेल्या लघुग्रहांपैकी काही सूर्यमालेच्या आतल्या ग्रहांच्या दिशेने ओढले जाऊन त्यांच्यावर आदळले, तर काही प्रत्यक्ष सूर्यातच सामावले गेले. उरलेले जे लघुग्रह बाहेरच्या बाजूला फेकले गेले, त्यांनी शनि, युरेनस व नेपच्यून या ग्रहांच्याही पलीकडे आपला घरोबा केला व अशा प्रकारच्या लघुग्रहांचा एक पट्टा सूर्यमालेच्या बाहेरच्या बाजूस निर्माण झाला. या पट्टय़ात असणारे द्रव्य नेपच्यून ग्रहाच्या गुरुत्वाकर्षण प्रभावाखाली एकवटत गेल्याने तिथेच निर्माण झालेले लघुग्रह व गुरूकडून फेकले गेलेले लघुग्रह असा हा एकत्रित पट्टा आहे.
इ.स. १९५१ साली जेरार्ड क्युपर या खगोलशास्त्रज्ञाने सूर्यमालेच्या निर्मितीच्या वेळी मुख्य लघुग्रहांच्या पट्टय़ासारखाच असा एक पट्टा नेपच्यून पलीकडेही तयार झाला असण्याची शक्यता वर्तविली होती व म्हणूनच या पट्टय़ाला ‘क्युपरचा पट्टा’ या नावाने ओळखले जाते. मंगळ व गुरू या दरम्यानच्या लघुग्रहांच्या पट्टय़ापेक्षा हा पट्टा बराच रुंद आहे. काही शास्त्रज्ञांच्या मते प्लूटो हासुद्धा या क्युपरच्या पट्टय़ाचाच एक सभासद असावा.
महेश नाईक
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दि न वि शे ष
पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर

बुवांचा जन्म १८४९च्या सुमारास झाला. गाणे शिकण्यासाठी त्यांनी आपल्या चुलत्याशी भांडण केले. कारण चुलता म्हणे की, तू भिक्षुकी कर. वडिलांच्या हाताखाली गायनाचे धडे गिरवत असताना त्यांच्या वयाच्या १५व्या वर्षी वडिलांचे निधन झाले. आई तर अगोदरच वारली होती. वडिलांच्या मृत्यूनंतर अनेक गुरू केले, पण सर्वानी फसवले. मोठय़ा मुश्किलीने देवजी बाबूंसारखा गुरू त्यांना भेटला, पण देवजीबाबूची पत्नी मोठी खटय़ाळ. बुवाकडून घरातील सर्व कामे गुरासारखी करून घेत. ३००-४०० चिजा ते देवजीबाबूंकडून शिकले. पण एके दिवशी तिने बुवांना हाकलले. तेव्हा नव्या गुरूच्या शोधासाठी पुन्हा भटकंती सुरू झाली. ग्वाल्हेर येथील वासुदेवराव जोशी यांनी सुरुवातीला त्याना हकलून दिले. पण त्यांची जिद्द, चिकाटी पाहून त्यांना गाणे शिकवायला होकार दिला. मुंबईत त्यांनी गायनाची शाळा काढली. ‘संगीत दर्पण’ नावाचे पूर्णपणे संगीताला वाहिलेले मासिक सुरू केले. दम्याच्या आजाराने उचल खाल्ल्याने मिरजेला आले. मिरजेत पलुस्कर, अनंत मनोहर, वामनबुवा चाफेकर ही संगीतात पुढे नावारूपाला आलेली मंडळी त्यांच्याच तालमीत तयार होती. यानंतर इचलकरंजीच्या राजेसाहेबांनी त्यांना खूप आग्रह केल्याने तिथे राहायला गेले. एकुलत्या एक मुलाचा अकाली मृत्यू झाल्याने ते खचले. आपल्या आठ वर्षांच्या नातवाला गायन शिकवताना ते म्हणत, की मला फक्त आणखी दहा वर्षांचे आयुष्य मिळू दे. म्हणजे मी माझी सर्व विद्या माझ्या नातवाला देईन. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळे होते. तापाचे निमित्त होऊन २५ फेब्रुवारी १९२७ रोजी बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर यांचे इचलकरंजी येथेच निधन झाले.
संजय शा. वझरेकर

गो ष्ट डॉ ट कॉ म
आईने कमालच केली

मालविका आईवर फारच रागावली होती. तिचे गोबरे गाल आणि नाकाचा शेंडा लाल झाला होता. आईने अगदी कमालच केली होती. ‘‘हे काय गं आई’’, गाल फुगवून फणफणत ती म्हणाली. ‘‘किती वाट पाहायची मी? तू तीन वाजता येते म्हणाली होतीस ना? आत्ता बघ किती वाजलेत.’’ आईलाही राग आला होता, ‘‘अगं मालू, झाला उशीर तर बिघडलं कुठं? मी ठरल्याप्रमाणे तुला मैत्रिणीकडे घेऊन जातेय ना.’’ मालविकाचा राग आणखीनच वाढला, ‘‘आई, अगं तुला उशीर होणार होता तर फोन तरी करायचास. मी तयारी करून केव्हाची वाट पाहात बसले आहे. खुशीवरसुद्धा तुझ्यामुळे रागावले मी. (खुशी मालविकाची फार आवडती कुत्री होती.) इतका का उशीर झाला तुला? काम निघालं का काही ऑफिसचं.’’ उलटतपासणी चालू झाली. लेकीनं आपल्याला असा जाब विचारावा हे आईला मुळीच आवडलं नाही. ‘‘मी ब्युटीपार्लरमध्ये गेले होते.’’ तिनं थंड स्वरात सांगितलं. मग मात्र मालविकाचा रागाचा पारा एकदम चढला. म्हणजे आईची कमालच होती ही! चक्क फालतू गोष्ट करत राहिली मला वाट बघायला लावून! पार्लरमध्ये आताच जायचं कुठं नडलं होतं. कधीही जाता आलं असतं. हं, अगदी कामच महत्त्वाचं ऑफिसचं असतं तर ठीक होतं. पण हे म्हणजे अतीच झालं आईचं! नाकपुडय़ा फेंदारून ती गप्प बसून राहिली. ‘‘मुळीच येणार नाही मी आता.’’ लेकीचं वागणं आईलाही फार चुकीचं वाटलं. ती तणतणली, ‘‘फक्त तुझं आणि बाबांचं करत बसायचं का मी. माझं मला काही आयुष्य आहे की नाही. स्वत:चं म्हणून?’’ आईचा आवाज चढला. मालविकानं तिच्यावर आवाज चढवून किंचाळली, ‘‘आई, हे आत्तापर्यंत पाच-सहा वेळा झालंय. नेहमी तू मला वाट बघायला लावतेस. कंटाळा आलाय मला सगळय़ाचा. तू कधीच बदलणार नाहीस. मला कुठेही बाहेर जायचं नाही.’’ ती दाण्दिशी कोचावर बसली. आई मालविकाला जवळ घेऊन समजुतीच्या स्वरात म्हणाली, ‘‘अगं माल्या, सोन्या असं म्हणू नकोस. पुढच्या वेळी बघ मी तुला सांगितल्या वेळी येते की नाही. मुळीच वाट बघायला लावणार नाही मी माझ्या मालू राणीला.’’ आईचा उबदार स्पर्श झाला आणि मालविकाला वाटलं, चुकलंच आपलं. नाही तरी ‘खुशी’ होती आपल्याशी खेळायला. आईला वेळ झाला म्हणून एवढं काही अकांडतांडव करायची आपल्याला गरज नव्हती. आईला मिठी मारत ती हळूच म्हणाली, ‘‘आई, सॉरी गं.. माझं चुकलं. चल, निघायचं ना सोनलकडे.’’ दोघीजणी हातात हात घालून हसत घराबाहेर पडल्या.
जरा समजूतदारपणा दाखवला तर सारं काही बदलू शकतं. आपण नव्या गोष्टी शिकतो. नव्या नव्या लोकांना भेटतो. इतरांच्या कलानं थोडं घ्यायला हवं. सारं काही बदलत असतं.
आजचा संकल्प- मी स्वत:ला बदलेन. आयुष्यात येणाऱ्या बदलांचे स्वागत करेन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com