Leading International Marathi News Daily

बुधवार, २५ फेब्रुवारी २००९

कोपरखैरणे येथील तीन टाकी विभागात नवी मुंबई पालिकेतर्फे मोरबे धरणाच्या जलवाहिनीचे काम सुरू असल्याने मंगळवारी वाहतुकीचा असा खोळंबा झाला होता.

नव्या कोऱ्या मुख्यालयाची मंजुरी स्थायी समितीच्या कोर्टात
नवी मुंबई/प्रतिनिधी

बेलापूर येथील आठ मजल्यांच्या भाडय़ाच्या इमारतीमधून ‘पामबीच’ मार्गावर अद्ययावत अशा नव्या कोऱ्या मुख्यालयात संसार थाटण्याचे नवी मुंबई महापालिकेचे स्वप्न अखेर साकार होण्याचे चिन्ह दिसू लागले आहे. या कामासाठी सुमारे ८९ कोटी ९९ लाख रुपयांचे नवे कंत्राट स्थायी समितीच्या मंजुरीसाठी आयुक्त विजय नाहटा यांनी आज रवाना केले. या कंत्राटावर स्थायी समितीची मोहर उमटताच मुख्यालयाचे काम लवकर सुरू करणे शक्य होणार आहे.

सहाव्या आयोगाने केली वैद्यकीय अधिकाऱ्यांची निराशा!
प्रतिनिधी :
राज्य शासनाच्या सेवेत सतत १५ वर्षे ‘टेम्पररी’चा डोस घेऊन हैराण झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना कायम करण्याची प्रक्रिया एकीकडे सुरू असली, तरी बहुप्रतीक्षित सहाव्या वेतन आयोगाने राज्यभरातील आठ हजार वैद्यकीय अधिकाऱ्यांना अपेक्षेपेक्षा कनिष्ठ वेतनश्रेणी दिल्याने ते पुन्हा अस्वस्थ बनले आहेत.

वाहतूक खोळंबा, रांगेतच थांबा!
पनवेल/प्रतिनिधी :
सोमवारी साजऱ्या झालेल्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने पनवेलमधील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा पुन्हा एकदा सिद्ध झाला. येथील श्री विरुपाक्षमंदिरात दर्शनासाठी आलेल्या भक्तांच्या गर्दीमुळे सकाळी व रात्री छत्रपती शिवाजी पथावर प्रचंड प्रमाणात वाहतूक खोळंबा झाला. भक्तांची ही गर्दी अपेक्षित असूनही आरटीओ, पोलीस व पनवेल नगरपालिका यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे या परिसरात दरवर्षी होणारी वाहतूक कोंडी पनवेलकरांनी पुन्हा अनुभवली.

पनवेल पालिकेच्या शिलकी अर्थसंकल्पास मंजुरी
पनवेल/प्रतिनिधी :
पनवेल नगरपालिकेचा २००९-२०१० या आर्थिक वर्षांसाठीचा ३४ लाख ४९ हजार ४६८ रुपयांची शिल्लक दर्शविणारा अर्थसंकल्प आज झालेल्या सभेत मंजूर करण्यात आला. हा अर्थसंकल्प ७० कोटी १८ लाख ३५ हजार ४६८ रुपयांचा असून, तो कोणत्याही दुरुस्तीशिवाय सर्वानुमते मंजूर झाला.

‘बेस्ट कामगार संघटनेची निवडणूक घेतल्यास सेनाच जिंकेल’
बेलापूर/वार्ताहर :
उचलेगिरी करणाऱ्यांचा शिवसेनेने बीमोड केला असल्याने बेस्ट कामगार संघटनेची केव्हाही निवडणूक घेतली तरी बेस्ट कामगार सेनाच विजयी होईल, असा विश्वास शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी वाशी येथे व्यक्त केला. नवी मुंबई शिवसेनेच्या वतीने आयोजित नवी मुंबईतील बेस्ट कामगारांच्या स्नेहमेळाव्यात देसाई बोलत होते. ते पुढे म्हणाले की, गुंड नाऱ्या टोळी घेऊन उचलेगिरी करण्यासाठी आला होता; मात्र शिवसेनेने त्याला धडा शिकवला. सध्या त्याला लेखी माफी मागण्याची नामुष्की आली. जे शिवसेनेच्या वाटय़ाला जातील त्याची अशीच स्थिती होईल, असे देसाई म्हणाले. नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी उपस्थितांना लोकसभा व विधानसभेसाठी शिवसेनेच्या मागे राहण्याचे सांगून, त्यानंतर पालिकेत एकहाती सत्ता मिळवण्याचे आश्वासन दिले. गणेश नाईकांचा नामोल्लेख टाळत ज्यांच्यावर श्रद्धा ठेवली, त्यांनीच पाठीत खंजीर खुपसल्याचे ते म्हणाले. त्यानंतर बाळासाहेबांच्या आदेशानुसार भगवा खांद्यावर घेऊन नवी मुंबईतील प्रत्येक घरातील शिवसैनिकाला नीडरपणे बाहेर काढणार असल्याचे चौगुले म्हणाले. नवी मुंबईही स्वत:च्या वाडवडिलांची जहागिरदारी असल्याचा समज झालेल्यांनी लाखाच्या लीडच्या बाता मारल्या होत्या. त्यांना मतदारांनी त्यांची जागा दाखवून चारी मुंडय़ा चित केले आहे. आता येत्या निवडणुकीतही मतदारांनी शिवसेनेस असाच पाठिंबा द्यावा, असे आवाहन शहरप्रमुख डॉ. राजेश पाटील यांनी केले. बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी कामगार सेनेने कर्मचाऱ्यांसाठी विविध योजना लागू केल्याचे सांगितले. तसेच कामगारांच्या न्याय्यहक्कांसाठी सेना सदैव आपल्या पाठीशी राहील, असे अभिवचन दिले.

रापुरी बेटावरही गर्दी
उरण/वार्ताहर :
उरण तालुक्यात ठिकठिकाणी महाशिवरात्री मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. तालुक्यातील खोपटे, वशेणी, आवरे, जासई, पिरकोन येथील शिवमंदिरात हजारो शिवभक्तांनी दर्शन घेतले. दरवर्षी महाशिवरात्रीच्या निमित्ताने घारापुरी येथे लाखो भाविकांची गर्दी जमते. यावर्षीही उरण, मोरा, जेएनपीटी, गेटवे ऑफ इंडिया, न्हावा, वाशी, बेलापूर, माहूल, रेवस, मांडवा येथून समुद्रमार्गे येणाऱ्या भाविकांची रीघ लागली होती. घारापुरी बेटावर पोहोचण्यासाठी मोरा येथे भाविकांच्या मोठय़ा रांगा लागल्या होत्या. घारापुरी बेटावर तर सकाळपासूनच शिवभक्तांची गर्दी उसळली होती. उरण शहरातही शिवरात्र मोठय़ा उत्साहात पार पडली. उरण शहरातील देऊळवाडी शिवमंदिरात जाऊन हजारो शिवभक्तांनी शंकराचे दर्शन घेतले. शिवरात्रीनिमित्त रात्रौ मनोरंजनार्थ बुगी-बुगी कार्यक्रमही ठेवण्यात आला होता. या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा आनंदही अनेकांनी लुटला.

रोटरी क्लबसाठी अभय योजना?
पनवेल/प्रतिनिधी :
‘पनवेल फेस्टिव्हल’च्या आयोजनासाठी आपल्या ताब्यातील भूखंड नाममात्र भाडे आकारून सरकारचे आर्थिक नुकसान करणाऱ्या पनवेल ग्रामीण रुग्णालयाने या क्लबसाठी ‘अभय योजना’ सुरू केली आहे का, असा प्रश्न शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे उपप्रमुख चंद्रशेखर सोमण यांनी उपस्थित केला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या ताब्यातील भूखंडावर ग्रामीण रुग्णालय बांधण्यात येणार असून, त्या मोकळ्या भूखंडावर या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजनासाठी रोटरी क्लबकडून अत्यल्प भाडे आकारल्याचे लक्षात आल्यानंतर शिवसेना ग्राहक संरक्षक कक्षाने वैद्यकीय अधीक्षकांशी पत्रव्यवहार केला होता. त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार करून हे भाडे ठरविले जाईल व त्यानुसार भाडे आकारणी करण्यात येईल, असे लेखी उत्तर वैद्यकीय अधीक्षकांनी यावर दिले होते, परंतु या पत्राला ४५ दिवस उलटल्यानंतरही याबाबत काहीच कारवाई न झाल्याने रोटरी क्लबला झुकते माप देण्यात येत आहे का, अशी विचारणा सोमण यांनी केली आहे. यानंतरही यावर खुलासा न झाल्यास आपल्या वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधण्यात येईल, असा इशारा त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिला आहे.

सावरकर सेवा केंद्र
प्रतिनिधी

२२ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या लोकसत्ता - ‘रविवार वृत्तान्त’मध्ये ‘स्वा. सावरकरांच्या ऐतिहासिक उडीच्या शताब्दीनिमित्त युरोप सहल’ या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्तात अश्विनी मयेकर आणि त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक प्रसिद्ध करण्यात आला होता. मात्र मयेकर यांचा या वृत्ताशी काहीही संबंध नसून नजरचुकीमुळे त्यांचे नाव व भ्रमणध्वनी क्रमांक रविवारच्या अंकात प्रसिद्ध झाला आहे. या वृत्तासंदर्भात स्वा. सावरकर सेवा केंद्र, विलेपार्लेचे निरीक्षक सुरेश बर्वे यांच्याशी भ्रमणध्वनी क्रमांक ९८१९०९९९६० वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.