Leading International Marathi News Daily

बुधवार, २५ फेब्रुवारी २००९

नाशिक येथील आदिवासी विकास विभागाच्या मुख्यालयात शिरण्याच्या प्रयत्नात असणारे भारतीय विद्यार्थी सेनेचे कार्यकर्ते.

आदिवासी विकास विभागाला विद्यार्थी सेनेकडून टाळे
प्रतिनिधी / नाशिक

आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कोटय़वधी रूपयांचा निधी येत असला तरी तो खर्च न झाल्यामुळे परत जातो आणि दुसरीकडे राज्यातील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची भोजनाची गरज भागवली जात नाही, या सर्व प्रकारांना आदिवासी विकास विभागाचे प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करीत मंगळवारी भारतीय विद्यार्थी सेनेतर्फे या कार्यालयास टाळे ठोकण्याचा प्रयत्न झाला.

राष्ट्रवादीचे अधिवेशन, भाजपची सभा अन् मनसेचा मराठीदिन
राजकीय पटलावरील घडामोडींना वेग

प्रतिनिधी / नाशिक

आगामी लोकसभा निवडणुकीचे वेध लागलेल्या राजकीय पक्षांनी आपली शक्तीस्थळे मजबूत करण्यासाठी पावले टाकण्यास सुरूवात केली असून पुढील काही दिवसात नाशिक येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसचे महाअधिवेशन, भाजपतर्फे होऊ घातलेली गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आणि मराठी भाषा दिनाला मनसेतर्फे होणारे विविध उपक्रम हा त्याचाच एक भाग असल्याचे स्पष्ट होत आहे.

वनअधिकार कायद्यान्वये दावे निकाली काढावे
वनजमीन अतिक्रमण हा विषय सध्या ऐरणीवर असून त्याच प्रश्नाच्या अनुषंगाने सध्या ठिकठिकाणी मोर्चे व घेराव इत्यादी आंदोलनात्मक कार्यक्रम सुरू आहेत. खरे तर या कायद्याने सर्वाधिकार ग्रामसभेला असताना केवळ जाहिरात बाजीसाठीच हा प्रकार सुरू आहे ना अशी शंका येते. तसेच हा प्रश्न अधिकच जटील होत असल्याचे वातावरण तयार होत आहे.

बांधकाम पूर्णत्वाच्या दाखल्यावरून अवास्तव वीज आकारणी अयोग्य
वीज गाऱ्हाणे मंचचा निकाल

नाशिक / प्रतिनिधी

घराच्या बांधकामास पूर्णत्वाचा दाखला मिळण्यापूर्वी रहावयास गेलेल्या ग्राहकाने वीज वापर सुरू केल्यास त्याच्या बिलाची आकारणी बांधकामासाठीच्या व्यावसायिक दराने नव्हे तर घरगुती दरानेच झाली पाहिजे, असा नियम असताना वीज वितरण कंपनीमार्फत जादा दराने केली जाणारी वसुली बेकायदेशीर असल्याचा निकाल वीज गाऱ्हाणे मंचने दिला आहे. एका प्रकरणात वीज कंपनीने ग्राहकाकडून अशा प्रकारे वसूल केलेले ६१ हजार ४८० रूपये परत करावेत, असा निकाल मंचाने दिला आहे.

राष्ट्रवादी महामेळाव्यात महिलांनी सहभागी व्हावे - निमसे
नाशिक / प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे हात बळकट करण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा तसेच राष्ट्रवादीच्या महामेळाव्यात महिलांनी मोठय़ा प्रमाणात सहभाग नोंदवावा, असे आवाहन महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा सुनिता निमसे यांनी केले. बचत गटाच्या माध्यमातून खा. सुप्रिया सुळे यांनी महिला सक्षमीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यातून महिला सक्षम होण्यास मदत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महामेळावा नाशकात होत असून त्यामध्ये महिलांनी जास्तीतजास्त सहभाग नोंदवून पक्षाची ध्येयधोरणे समजून घ्यावित असे आवाहनही त्यांनी केले आहे. पंचवटीतील चरणपादुका मंदीर परिसर व हिरावाडी सीताराम बाप्पा मंदीर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महामेळवा नियोजनाच्या पाश्र्वभूमीवर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकींचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस प्रदेश सरचिटणीस नंदिनी पगार, शहर सरचिटणीस मंगला भास्कर, मिनाक्षी पगार, अनिता दामले, लिला शेवाळे, वंदना बागडेआदी मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.

करंजी आश्रमशाळेतील बेपत्ता विद्यार्थिनी सुखरूप
वणी / वार्ताहर

दिंडोरी तालुक्यातील करंजी येथील गुरूदत्त शिक्षण प्रसारक संस्था संचलित आश्रमशाळेतून बेपत्ता झालेल्या दोन विद्यार्थिनी सप्तशृंग गडावर सुखरुप सापडल्या. पाचवीच्या वर्गात शिकत असलेल्या सुनीता दौलत खिल्लारी (११) रा. अहिवंतवाडी व दुसरीच्या वर्गात शिकणारी वंदना भास्कर गायकवाड (८) रा. पोहोळ, ता. सुरगाणा या विद्यार्थिनी १९ फेब्रुवारी पासून शाळेच्या आवारातून बेपत्ता होत्या, आश्रमशाळेचे अधीक्षक ज्ञानेश्वर टोपे यांनी वणी पोलिसात याविषयी तक्रार दाखल केली होती. मुली सप्तशृंग गडावरील शिवालय तलावालगतच्या शेडमध्ये मंहताना आढळल्या त्यांनी गडावरील पोलिसांना याबाबत कळवले. वणी पोलिसांनी विद्यार्थिनी पालकांच्या स्वाधीन केल्या. यातील सुनीता गायकवाड या
विद्यार्थिनीची शिक्षणाबाबत असलेली उदासीनता, दिलेला अभ्यास न करणे यासह अन्य बाबी असमाधानकारक असल्याने तिच्या पालकांना महिन्यापूर्वीच माहिती देण्यात आली होती.

प्रताप परदेशी यांचे निधन
मनमाड / वार्ताहर

येथील ज्येष्ठ कवी प्रताप परदेशी (७०) यांचे अल्प आजाराने येथे सोमवारी निधन झाले. त्यांचा ‘चंद्रभास’ हा काव्यसंग्रह चांगलाच गाजला होता. चंद्रभास काव्यसंग्रहाचे प्रकाशन कुसुमाग्रजांच्या हस्ते झाले होते. परदेशी हे मूळचे धोंडगव्हाण (ता. चांदवड) येथील होते. मध्य रेल्वेत ३५ वर्षांची तिकीट तपासणीसाची सेवा केल्यानंतर ते निवृत्त झाले. मात्र रेल्वेच्या प्रदीर्घ तिकीट तपासणीस म्हणून झालेल्या प्रवासातून ‘चंद्रभास’ काव्यसंग्रह साकारला. परदेशींच्या पुढाकाराने मनमाड शहरातही काव्यचळवळ उभी राहिली. येथील कलावंत, छायाचित्रकार कुलदीप परदेशी यांचे ते वडील होत