Leading International Marathi News Daily

बुधवार, २५ फेब्रुवारी २००९

काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांवर जबाबदारी पक्षांतर्गत कलह शमविण्याची!
वार्ताहर / जळगाव

विरोधकांशी लढण्याऐवजी स्वकीयांशी दोन हात करण्यातच आपली बरिचशी शक्ती खर्ची घालणाऱ्या जिल्हा काँग्रेसमधील गटातटाचे राजकारण संपविण्याचे आव्हान आता जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदावर नव्याने आरूढ झालेल्या माजी आमदार पारूताई वाघ यांच्यासमोर उभे आहे. काँग्रेसच्या इतिहासात प्रथमच जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी एका महिलेच्या हाती सोपविण्यात आली असून आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर नूतन अध्यक्षा काँग्रेसमधील दुफळी शमविण्यास यशस्वी होतात की पक्षाचा तारू पुन्हा एकदा भरकटू लागतो याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

धुळे दंगल चौकशी समितीची कार्यकक्षा मर्यादित
मानव अधिकार कृती गटाची तक्रार

धुळे / वार्ताहर

शहरात ऑक्टोबर २००८ मध्ये उसळलेल्या जातीय दंगलीच्या चौकशीसाठी नेमलेली प्रांताधिकाऱ्यांच्या अधिपत्याखालील प्रशासकीय चौकशी समितीची कार्यकक्षा अतिशय मर्यादित स्वरूपाची असल्याची तक्रार मानव अधिकार कृती गटाने केली असून कनिष्ठ स्तरीय दुय्यम अधिकारी वरिष्ठांची चौकशी कशी करणार, असा सवाल कृती गटाचे अ‍ॅड. निर्मलकुमार सूर्यवंशी, अ‍ॅड. जे. जी. खैरनार व अविनाश पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकात उपस्थित केला आहे.

रामराव पाटील यांचा भाकपमध्ये प्रवेश
वार्ताहर / धुळे

अजय घोष यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मालूर (ता. साक्री) येथे झालेल्या कार्यक्रमात रामराव सीताराम पाटील यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला. भाकपचे राष्ट्रीय सदस्य गोविंद पानसरे आणि धुळे जिल्ह्य़ातील माकपचे पदाधिकारी तसेच रामराव पाटील यांचे समर्थक यावेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. शहीद भगतसिंग यांचे सहकारी अजय घोष यांच्या जन्मशताब्दी निमित्त अजय छात्रालयात झालेल्या या कार्यक्रमास पानसरे यांच्यासह छात्रालयाचे प्राचार्य शिरीष भावसार, माकपचे राज्य कौन्सिल सदस्य श्रावण शिंदे व मनोहर पाटील उपस्थित होते. डाव्या विचारसरणीशी अतूट नाळ जोडली गेल्याने रामराव पाटील यांनी जिल्हा बँक, साखर कारखान्यावर सत्तेत असताना सागळ्यांच्या अडीअडचणींची जाण ठेवली. परंतु, काँग्रेसच्या प्रस्थापितांना हे पचले नाही. पाटील यांच्या विचारांचा कोंडमारा झाल्याने त्यांनी भाकपमध्ये प्रवेश केल्याचे पानसरे यांनी यावेळी स्पष्ट केले. आपण कम्युनिस्ट होतो, कम्युनिस्ट आहोत आणि कम्युनिस्ट राहणार असे यावेळी पाटील यांनी सांगितले. पानसरे यांनी पाटील यांचे स्वागत केले. अ‍ॅड. मदन परदेशी, साहेबराव पाटील, वसंत पाटील, अभिजीत मोहीते यांच्यासह परिसरातील मालपूर, कसारे, छाईल, भांडणे, कावठे, निजामपूर, गणेशपूर, बेहेर, छडवेल, जैताणे, दारखेल, विराई, नाडसे, सायणे, धामणार येथील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

मोलकरणी संघातर्फे आज शिरपूर येथे धरणे
वार्ताहर / धुळे

शिरपूर तालुक्यातील महाराष्ट्र राज्य मोलकरणी संघातर्फे बुधवारी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. माथाडी कामगार सदृश कायद्याची अंमलबजावणी करावी ही प्रमुख मागणी यावेळी करण्यात येणार आहे. विधीमंडळाच्या नागपूर अधिवेशनात माथाडी कामगार सदृश कल्याणकारी कायद्याला मंजुरी मिळाली आहे. मोलकरणींसाठीही हा कायदा लागू केल्याचा शासनाने निर्णय द्यावा, वृद्धपकाळी निवृत्तीवेतन द्यावे, दारिद्रय़ रेषेखालील शिधापत्रिका मिळाव्यात, साप्ताहिक सुटी मिळावी, गावी जाण्यासाठी २१ दिवसांची भरपगारी रजा मिळावी आदी मागण्यांसाठी शिरपूर तहसीलदार कार्यालयासमोर २५ फेब्रुवारी रोजी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.