Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

पीएमपीच्या धडकेत सायकलस्वार ठार
हडपसर, २४ फेब्रुवारी / वार्ताहर

पीएमपीएल बसची दुचाकी, हातगाडी आणि सायकलस्वारास धडक बसून झालेल्या तिहेरी अपघातात सायकलस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. पुणे-सोलापूर रस्त्यावर जनसेवा बँकेसमोर आज सकाळी ११

 

च्या सुमारास ही घटना घडली.
या अपघातात विश्वास युवराज देसले (वय ३२, रा. तुकाईदर्शन, भेकराईनगर, गल्ली नं.१०, मूळ गाव धुळे) हा सायकलस्वार जागीच ठार झाला. बसचालक कल्याण अगतराव कांदे (वय ३०, रा. मोशी, ता. हवेली) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पीएमपीएलची हडपसर- मनपा हडपसर ही बस हडपसरहून पुण्याकडे निघाली होती. त्याच वेळी हडपसरहून सुटलेली आणखी एक बस त्याच रस्त्याने पुढे जात होती. काही अंतर पार केल्यानंतर या दोन्ही बस रस्त्यावरून समांतर धावू लागल्या.
या दोन्ही बसच्या चालकांमध्ये अघोषित शर्यतच लागली आहे की काय, असा संशय बसच्या मागे असलेल्या वाहनचालकांना येऊ लागला. एवढय़ात त्यातील एका बसने प्रथम एका दुचाकीस्वारास व भंगार गोळा करणाऱ्या हातगाडीचालकास धडक दिली. त्यानंतर या बसचा धक्का एका सायकलस्वाला लागला.
या धक्क्य़ाने तो सायकलसह खाली पडला. त्याची सायकल बसखाली अडकली व बसची मागचे चाक त्याच्या डोक्यावरून गेले.
या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. मगरपट्टा येथील ओटीस कंपनीत तो लिफ्ट फिटिंगंचे काम करीत होता.
बसचालकांच्या या जीवघेण्या शर्यतीमुळे अनेकांचा संताप अनावर झाला होता. अपघातानंतर मृतदेह अर्धा तास जागेवर पडून होता.
पोलिसांकडे व्हॅन नसल्याचे या वेळी सांगण्यात आले. हडपसर पथारी व्यावसायिक पंचायतचे शाखाप्रमुख मोहन चिंचकर यांनी बेडशीट आणून तातडीने मृतदेह झाकला. ऐन गर्दीच्या वेळी हा अपघात झाल्यामुळे वाहतुकीचा थोडा वेळ खोळंबा झाला.
हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी तातडीने आल्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यात आली. अपघात झाला त्या वेळी पथारीवाले आणि हातगाडीवाले उड्डाणपुलाखाली असल्याने मोठी दुर्घटना टळली असे नागरिकांनी सांगितले.
रस्तारुंदीकरण, उड्डाणपूल, दोन्ही बाजूला सायकल ट्रॅकचे काम, फुटपाथचे काम या साऱ्या प्रकारामध्ये वाहनचालकांना रोज मृत्यूशी सामना करावा लागत असल्याचे सांगून नागरिकांनी संताप व्यक्त केला.
आणखी किती बळी हवे आहेत म्हणजे या रस्त्याचे नियोजन करून वाहतूक सुरळीत केली जाईल, असे वाहनचालक आणि पादचाऱ्यांनी सांगितले. सोलापूर रस्त्यावरील वाहतुकीचे लवकरात लवकर नियोजन करावे, अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल, असे सामाजिक कार्यकर्ते सुभाष जंगले, वामन भुरे यांनी सांगितले. हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भीमराव गदरे, बाबासाहेब चव्हाण या घटनेचा तपास करीत आहेत.