Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

गुबगुबीत कुत्री आणून मनसेचे ‘तीव्र आंदोलन’!
शहरातील मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा प्रश्न अखेर अनिर्णितच
पुणे, २४ फेब्रुवारी/प्रतिनिधी

सर्वसाधारण सभेत कुत्री आणून मोकाट कुत्र्यांचा प्रश्न मनसेचे नगरसेवक मांडणार असल्याचे निरोप आज दुपारी आले. मग लगेच प्रसिद्धिमाध्यमांच्या प्रतिनिधींचींही गर्दी झाली. महापालिकेतील बंदोबस्तही कडक झाला..नगरसेवक व पत्रकारांशिवाय सर्वाना सभेत जायला मज्जाव करण्यात आला.. सभा सुरू झाली..आणि मोठाच भ्रमनिरास झाला. कारण सभेत मनसेचे नगरसेवक आले ते हातात शोभेची कुत्री

 

घेऊन!
मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक कुत्री घेऊन येणार असल्याची बातमी सभेपूर्वीच ‘फोडण्यात’ आली होती. त्यामुळे वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी आधीपासूनच तयारीत होते. या बातमीमुळे सुरक्षाव्यवस्थाही अतिशय कडक करण्यात आली होती. सर्वसामान्य नागरिकांना प्रेक्षागृह बंद करण्यात आले होते. सभा सुरू होताच सुनील बिबवे यांनी मोकाट कुत्र्यांचा प्रश्न सभेत उपस्थित केला. त्यांचे भाषण सुरू असतानाच मनसेचे सहा नगरसेवक हातात फलक घेऊन प्रशासनाचा निषेध करत महापौरांच्या आसनासमोर येऊन घोषणा देऊ लागले.
हे नगरसेवक कुत्री आणणार होते, अशी बातमी होती. प्रत्यक्षात ते कापसापासून तयार केलेली, शोभेची, मऊ, गुबगुबीत तीनचार कुत्री घेऊन सभागृहात आले. ही कुत्री पाहताच ‘कुत्री येणार, कुत्री येणार’ म्हणून ‘सावधान’ झालेल्या सुरक्षारक्षकांनीही मग सुस्कारा सोडला. आम्हाला आज कोणतेही आश्वासन नको. हा प्रश्न सोडवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आमचे आंदोलन थांबणार नाही, असे भाषण राजाभाऊ गोरडे, किशोर शिंदे या वेळी करत होते. गटनेते रवींद्र धंगेकर, तसेच बाबू वागसकर, राजेंद्र एंडल, वसंत मोरे अशा सर्वानी कुत्र्यांच्या प्रश्नावर ठोस कृतीची मागणी या वेळी केली.
हा गोंधळ दहा मिनिटे चालला. मग पुन्हा बिबवे आणि उज्ज्वल केसकर यांची भाषणे झाली. केसकर यांचे भाषण सुरू असतानाच दिलीप बराटे उठले आणि ‘या सर्वाचे फोटो काढून झाले असतील, तर यांना आता जागेवर बसायला सांगा’ अशी विनंती त्यांनी महापौरांना केली. त्यांच्या या विधानावरून सभेत चांगलाच गोंधळ झाला. अखेर या गोंधळात हस्तक्षेप करून सभागृहनेते अनिल भोसले यांनी भाषण सुरू केले.
या प्रश्नातून योग्य पद्धतीने प्रशासनाने मार्ग काढावा. त्यासाठी आगामी अंदाजत्रकात योग्य तेवढी तरतूद केली जाईल, असे ते म्हणाले. मनसेच्या नगरसेवकांना आंदोलन मागे घेण्याचीही त्यांनी विनंती केली आणि नगरसेवकही मग लगेच जागेवर जाऊन बसले.
पंधरा मिनिटांच्या या गोंधळात कुत्र्यांच्या प्रश्नाबाबत प्रशासन काय कृती करणार, त्याचे उत्तर अखेपर्यंत सभेला मिळालेच नाही. तीन वर्षांपूर्वी कुत्र्यांच्या प्रश्नाबाबत संगीता देवकर यांनी सभागृहात पाचसहा खरी कुत्री आणली होती. त्याची आठवण अनेक नगरसेवकांना आवर्जून झाली.