Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

कलानुभव अन् संगीत संवादाला रसिकांची दाद
पुणे, २४ फेब्रुवारी/प्रतिनिधी

प्रसिद्ध लघुपट निर्माते व लेखक प्रभाकर पेंढारकर यांनी त्यांच्या ‘बॉर्डर रोड’ लघुपटाच्या निर्मितीबाबत सांगितलेले अनुभव व त्याविषयी लिहिलेल्या कादंबरीबाबत उलगडलेले अंतरंग.. तसेच शास्त्रीय संगीत गायक सत्यशील देशपांडे यांनी साधलेला संगीत संवाद.. अक्षरस्पर्श ग्रंथालयाच्या दशवार्षिक उत्सवाच्या समारोपानिमित्त आज आयोजित करण्यात आलेल्या या दोन वेगवेगळ्या विषयांवरील कार्यक्रमांना

 

रसिकांनी भरभरून दाद दिली.
कलारसिक व नारी समता मंच यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सुरुवातीला पेंढारकर यांनी त्यांच्या कलानुभवाबद्दल सांगितले. ‘बॉर्डर रोड’ या लघुपटाच्या निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया त्यांनी उलगडून दाखविली. खडा डोंगर फोडून हिमालयात कशा पद्धतीने रस्ता व पूल तयार झाला, हे या लघुपटातून दाखविण्यात आले आहे.
मात्र लघुपट काढताना आलेले अनुभव व तेथील एकूण परिस्थितीतून पेंढारकर यांनी पुढे याच विषयावर शारंगढांग ही कादंबरी लिहिली. त्याबाबत ते म्हणाले, ‘माहितीपटाचे चित्रीकरण करताना अनेक अडचणी आल्या. त्या भागात रस्ता करणेच नव्हे, तर राहणेही अवघड होते. अशा परिस्थितीत त्या विषयावर तेव्हा कादंबरीचा विचार नव्हता. घरी आल्यानंतर तो मनात आला. कॅमेऱ्याची चौकट लहान असते. त्या चौकटीबाहेरही बरेच नाटय़ घडत असते. ते पकडायचे असेल, तर शब्दांचा आधार घ्यावा लागतो. त्यातून कादंबरीची निर्मिती झाली.’ पेंढारकर यांच्याशी वंदना बोकील-कुलकर्णी यांनी संवाद साधला.
संगीत संवादाच्या कार्यक्रमात सत्यशील देशपांडे यांनी शास्त्रीय संगीताच्या सुरुवातीच्या काळापासून सध्याच्या परिस्थितीबाबतचा आढावा घेतला. वेगवेगळ्या बंदिशीही त्यांनी गाऊन दाखविल्या. संगीताबाबत ते म्हणाले, ‘वैदिक संगीतापासून सुरू झालेला प्रवास ख्याल गायकीवर स्थिरावला. राजामहाराजांच्या दरबारात गायक पोहोचले त्यावेळी संगीतातील काव्याचा विषय बदलला. राजाश्रय गेल्यानंतर लोकाश्रयासाठी गायन सुरू झाले. पण त्यातील काव्य बदलले नव्हते. मात्र ख्याल गायक हे मनोरंजनासाठी नाही, तर स्वतच्या समाधानासाठी गातात, हा विचार पुढे आला व काव्याचे विषय बदलत गेले.’
बंदिशींबाबत ते म्हणाले, ‘शास्त्रीय संगीताच्या शिक्षणामध्ये भाषेला महत्त्व दिलेले नाही. भाषेची उपेक्षा झाली असल्याने ख्याल गायकीतील अघात लोप पावतात, तर स्वाभाविक भाव प्रगट होत नाहीत. अनेक बंदिशींतील शब्द चुकीच्या पद्धतीने गायले जातात. त्यामुळे शास्त्रीय संगीताच्या शिक्षणात भाषेलाही महत्त्व देणे गरजेचे आहे.’