Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

महिलेच्या खुनाबद्दल जन्मठेप
पुणे, २४ फेब्रुवारी / प्रतिनिधी

चारित्र्याच्या संशयावरून अनैतिक संबंध ठेवलेल्या महिलेच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून देणाऱ्या सोमनाथ धनंजय गवळी (वय ४१) याला जन्मठेपेची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश डॉ. शालिनी फणसाळकर-जोशी यांनी ठोठावली आहे. याबाबत शारदा (वय ३५) यांनी ही मृत्यूपूर्वी तक्रार

 

दिली होती.
गवळी याचा पूर्वी एक विवाह झाला होता. तसेच त्याचे शारदा या एका विधवा महिलेशी अनैतिक संबंध निर्माण झाले होते.
गवळीला दारूचे व्यसन होते. या विधवा महिलेस तिच्या पहिल्या नवऱ्याकडून एक मुलगा झाला होता. अनैतिक संबंध प्रस्थापित झाल्यानंतर ही विधवा मात्र त्याचे नाव स्वत:ला लावून घेत असे. ते दोघेही एकत्रच राहात असतानाही गवळी तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यावरून दारू पिऊन तो तिला शिवीगाळ, मारहाण करीत असे. तसेच जीवे मारण्याची धमकीही देत होता.
घटनेच्या दिवशी १५ सप्टेंबर २००७ रोजी रात्री दहा वाजता तो दारू पिऊन त्या महिलेकडे आला. तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला त्याने पेटवून दिले. ती जळत असल्याचे पाहून तिच्या मुलाने आग विझविली. महिलेने एका समाजसेविकेकडे मृत्युपूर्व जबाबात गवळी विरोधात जबाब दिला. तसेच तिला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिचा २० सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. अतिरिक्त सरकारी वकील अ‍ॅड. हीरा बारी यांनी सात साक्षीदार तपासले. मुलगा, समाजसेविका यांची साक्ष महत्त्वाची ठरली असून वैद्यकीय पुरावाही न्यायालयाने ग्राह्य़ धरला. जन्मठेपेच्या शिक्षेसह पाचशे रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास एक महिन्याची साधी कैदेची शिक्षा भोगण्याचे आदेश दिले.