Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

तरुणाईला आकृष्ट केले मराठी पुस्तकांनी!
पुणे, २४ फेब्रुवारी/प्रतिनिधी

चरित्र, आत्मचरित्र, कथा, कादंबरी, पाककला, योगासने, पर्यटन यांच्याबरोबरच भाषांतरित पुस्तकांचे आगळेवेगळे प्रदर्शन आचार्य अत्रे सभागृहात सध्या सुरू आहे. या पुस्तकांच्या मेळय़ात वाचक हरवून गेले असून, मनोविकास प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या ‘बराक ओबामा : बदलत्या जगाचा सक्सेस

 

पासवर्ड’ या पुस्तकाला सर्वाधिक मागणी असल्याचे दिसत आहे.
या प्रदर्शनात प्रत्येक लेखकानुसार, वाङ्मय व निर्मिती प्रकारानुसार त्याची वेगवेगळी दालने असून, त्यामुळे वाचकांना आपल्या आवडीची पुस्तके पाहायला मिळत आहेत.
या पुस्तक प्रदर्शनात पु. ल. देशपांडे, व. पु. काळे, आचार्य अत्रे, सुधा मूर्ती, शंकर पाटील, वि. स. खांडेकर, विश्वास पाटील, अरुण साधू, कविता महाजन या जुन्या-नव्या लेखकांच्या पुस्तकांना मागणी असल्याचे दिसत आहे.
तरुण पिढी सध्या तरी बराक ओबामा यांच्याशी संबंधित पुस्तकांना जास्त पसंत करत असून, संजय आवटे यांचे मनोविकासने प्रसिद्ध केलेले ‘बराक ओबामा : बदलत्या जगाचा सक्सेस पासवर्ड’ हे सर्वाधिक खपाचे पुस्तक ठरले आहे. या पुस्तकाच्या दोन महिन्यांत दहा आवृत्त्या निघाल्याचे प्रकाशकांनी सांगितले.
पुस्तकाचा विषय, मांडणी, ‘कॅची’ शीर्षक आणि ९९ रुपये किंमत ही या विक्रमामागील कारणे ठरल्याचे मत संयोजकांनी व्यक्त केले. तरुण वाचक हे व्यक्तिमत्त्व विकास, करीअर डेव्हलपमेंट, राजकीय व्यक्तींची चरित्रे या पुस्तकांची खरेदी करत आहेत. ‘सक्सेस पासवर्ड’मध्ये या तिन्ही गोष्टी एकत्रित आहेत, असे एका वाचकाने सांगितले.
पाककला, योगासने, पॉकेट पुस्तके, आरोग्य, अध्यात्मिक, सौंदर्य पुस्तकांची खरेदी करण्याकडे महिलांचा मोठा कल आहे. या ‘शुभम साहित्य’च्या या प्रदर्शनात पुस्तक खरेदीनुसार सवलत ठेवण्यात आली आहे. शंभर रुपयांच्या खरेदीवर दहा टक्के, पाचशे रुपयांच्या खरेदीवर पंधरा टक्के व एक हजार रुपयांच्या खरेदीवर वीस टक्के सवलत देण्यात आली आहे. तसेच २५ टक्के सवलत असलेल्या पुस्तकांचे स्वतंत्र दालनही या प्रदर्शनात आहे
. यामध्ये मनोरमा, नवचैतन्य, पद्यगंधा, अनुबंध प्रकाशनाची पुस्तके ठेवली आहेत. याला वाचकांचा मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. तसेच जनआवृत्तीचेही स्वतंत्र दालन असून, यामध्ये कमी दरात पुस्तके मिळत असल्याने वाचकांचा यालाही मोठा प्रतिसाद मिळत आहे.
शनिवार, रविवार या सुटीच्या दिवशी व दररोज संध्याकाळी प्रदर्शनाला मोठी गर्दी होत असून, ज्येष्ठांबरोबरच तरुणही मोठय़ा संख्येने प्रदर्शनाला भेट देत आहेत. कथा, कादंबरीबरोबर ऐतिहासिक, पत्रकारिता, पर्यटनावरील पुस्तकांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. पं. भीमसेन जोशी यांना ‘भारतरत्न’ मिळाल्यानंतर ‘ख्यालिया’ या पुस्तकाची मागणी वाढली असून, ‘हा तेल नावाचा इतिहास आहे’, ‘टीचर’, ‘मंडालेचा राजबंदी’, ‘दूरदर्शी’, ‘बातमीदारी’ अशी अनेक वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके वाचक खरेदी करत आहेत. अध्यात्मातील आणि लहान मुलांशी संबंधित अनेक पुस्तके कमी दरात या प्रदर्शनात असून त्यांचीही खरेदी होत आहे. शैक्षणिक पुस्तकांनाही मोठी मागणी आहे.
या प्रदर्शनाबद्दल एक वाचक दीपक कुरुंद सांगतो, की अशा प्रदर्शनांमुळे बाजारामध्ये नवनवीन कोणती पुस्तके आली आहेत याची वाचकांना माहिती होते. प्रत्येकाला प्रदर्शनात स्वत:च्या आवडीची पुस्तके खरेदी करता येतात. अशी प्रदर्शने वाचकांची बौद्धिक भूक भागविण्याचे काम करत आहेत.
‘शुभम साहित्य’चे राजेंद्र ओंबासे म्हणाले, की प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच वाचकांचा चांगला प्रतिसाद असून वाचक मोठय़ा प्रमाणात पुस्तकांची खरेदी करत आहेत. ‘सक्सेस पासवर्ड’मुळे तर तरुणांना या प्रदर्शनाने आकृष्ट केले आहे. हा प्रतिसाद पाहून ‘वाचन संस्कृती’ कमी होत असल्याची सार्वत्रिक ओरड चुकीची असल्याचे सिद्ध होत असल्याचेही त्यांनी सांगितले. एप्रिलपर्यंत हे प्रदर्शन चालणार आहे.