Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

खासगी दूध उद्योग खरेदी बंद करणार
पुणे, २४ फेब्रुवारी/प्रतिनिधी

परदेशातून येणाऱ्या अत्यंत स्वस्त दरातील दुग्ध उत्पादनांनी भारतीय बाजारपेठेत पाय पसरल्याने देशातील

 

दुग्ध उत्पादने निर्मिती उद्योग (डेअरी इंडस्ट्री) अडचणीत आले आहेत. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी वारंवार विनंत्या करूनही केंद्र सरकार मदत करत नसल्याने अखेर नाईलाजास्तव या उद्योगांनी येत्या २५ फेब्रुवारीपासून दूध खरेदी संपूर्णपणे थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. तसे झाल्यास दूध उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
डेअरी इंडस्ट्री एक्सोर्ट ऑर्गनयझेशनचे अध्यक्ष कॅप्टन अमिताभ रे म्हणाले की, केंद्र सरकारने गेल्या वर्षी ग्राहकांच्या हितासाठी देशातून दुग्ध उत्पादनांच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय वास्तवात शेतकऱ्यांच्या हिताविरुद्ध होता. तरीही शेतकरीवर्ग ग्राहकांच्या बाजूने उभा राहिला व त्याने सरकारच्या या धोरणाला पाठिंबाच दिला. सध्या मात्र दूध पुरवठा करणारे शेतकरी व देशातील दुग्ध उत्पादन उद्योगांपुढे नवे संकट उभे राहिले आहे. अमेरिका, युरोप, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया यासारखे देश आपल्या दुग्ध उत्पादने उद्योगांना अनुदाने देत असल्याने जगभर या उत्पादनांच्या किमती घसरल्या आहेत.
भारतीय शेतकरी पुरवत असलेल्या दुधाला जो भाव मिळतो त्याहीपेक्षा अत्यंत स्वस्त दराने ही उत्पादने विकली जात आहेत. केंद्र सरकारने हा स्वस्त दुग्ध उत्पादनांचा लोंढा वेळीच थोपवला नाही तर आपल्या शेतकऱ्यांनाही त्यांचे उत्पादन मातीमोल भावाने विकावे लागून प्रचंड नुकसान सहन करावे लागेल.
केंद्रीय दुग्धोत्पादन, पशुसंवर्धन व मत्स्यसंवर्धन मंत्रालयाला एक पत्रही पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व तामिळनाडूतील दुग्ध उत्पादने उद्योग रोज ३० लाख लिटर दुधावर प्रक्रिया करत असून या राज्यांतील अडीच ते तीन लाख शेतकऱ्यांचा रोजचा निर्वाह या दुधाच्या विक्रीवर होतो. परदेशातील प्रचंड अनुदानांमुळे तेथील दुग्ध उत्पादने भारतातील काही कंपन्याच स्वस्त दरात आयात करत आहेत. परिणामी भारतातील दुग्ध उत्पादने उद्योगांच्या गोदामात तयार माल विक्रीअभावी पडून आहे. या स्थितीत दुधावर प्रक्रिया करणे अशक्य असल्याने नाईलाजाने शेतकऱ्यांच्या दूध पुरवठय़ास नकार देण्याची वेळ आली आहे. सध्याच्या जागतिक मंदीच्या स्थितीत भारतीय दुग्ध उत्पादने निर्यातही करू शकत नाहीत. येत्या २५ फेब्रुवारीपासून दूध खरेदी थांबल्यास त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल. यासाठी सरकारने परदेशातील स्वस्त दुग्ध उत्पादनांच्या आयातीवर र्निबध घालावेत, अशी मागणी प्रसिद्धीपत्रकात केली आहे.