Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

सदाशिव पेठेतील खुनाच्या सूत्रधारांना अटक
पुणे, २४ फेब्रुवारी / प्रतिनिधी

सदाशिव पेठेतील भावे हायस्कूल जवळ झालेल्या तरुणाच्या खून प्रकरणी तीन मुख्य सूत्रधारांना अटक करण्यात विश्रामबाग पोलिसांना यश आले आहे. या तिघांना येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत

 

ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी संजय यादव यांनी दिला आहे.
भावडय़ा उर्फ सुनील नामदेव कोंढाळकर (वय ३०, रा. सदाशिव पेठ), धनु पंडित उर्फ धनंजय शांताराम चांगण (वय २७, रा. कर्जत भांडेवाडी, नगर) आणि संतोष उर्फ संत्या दिलीप ठोंबरे (वय ३०, रा. नवी पेठ) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. स्वारगेट येथे सापळा रचून या तिघांना काल विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. यापूर्वी पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. त्यातील चार जणांना उद्यापर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. या आरोपींनी बलीराम ज्ञानदेव गायकवाड (वय २८, रा. नवी पेठ) यांचा खून केला. याबाबत नितीन पायगुडे यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ट पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी माहिती दिली. १९ सप्टेंबर २००८ रोजी गायकवाड यांच्यावर या आरोपींनी प्राणघातक हल्ला केला होता. त्यावेळी त्यांनी ही फिर्याद दिली होती. त्याचा राग मनात ठेऊन हा खून करण्यात आला आहे. कोंढाळकर आणि चांगण हे दोघेही स्वारगेट या ठिकाणी येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जाधव यांना मिळाली होती. संशयिताच्या मिळालेल्या वर्णनावरून या दोघांचे वर्णन मिळते जुळते असल्याने सापळा रचून त्यांना अटक केली. त्यानंतर हे खुनातील आरोपी असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन हीरो होंडा गाडय़ा, पल्सर, लोखंडी कोयता, मोबाईल हॅण्डसेट, सिमकार्ड आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे.
कोंढाळकर सह तिघांना पोलिसांनी न्यायालयात आज हजर केले. त्यावेळी हे तिघेही खुनाचे सूत्राधर असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडून हत्यारे जप्त करायची असून ते सराईत गुन्हेगार आहेत, असा युक्तिवाद सहायक सरकारी वकील अ‍ॅड. विनायक मुसळे यांनी सरकारतर्फे केला. न्यायालयाने २८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.