Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

सर्व शिक्षण संस्थांच्या वतीने हुतात्म्यांना उद्या अभिवादन
पुणे, २४ फेब्रुवारी/प्रतिनिधी

दहशतवादी हल्ल्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी २६ फेब्रुवारी रोजी शहरातील संस्था

 

चालकांतर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमात सुमारे पन्नास हजार विद्यार्थी सहभागी होतील आणि दहशतवादाच्या विरोधात लढण्याची शपथ घेतील.
सिम्बायोसिस अभिमत विद्यापीठाच्या संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, भारती विद्यापीठाचे व्यवस्थापकीय संचालक विश्वजित कदम, एमआयटीचे संचालक राहुल कराड, डी. वाय. पाटील, अभिमत विद्यापीठाचे सोमनाथ पाटील, अथर्व एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका पंकजा पालवे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
या मेळाव्यात शहरातील सर्वच शिक्षण संस्थांचे विद्यार्थी, कर्मचारी, प्राध्यापक सहभागी होणार आहेत. तसेच हुतात्मा झालेल्या पोलीस अधिकारी आणि नागरिकांचे कुटुंबियदेखील या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. या प्रसंगी सर्व शिक्षण संस्थांचे विद्यार्थी ए वतन तेरे लिये हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत. तरुणांमधील नैराश्य दूर करण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून पुण्यातील सर्वच शिक्षण संस्थांतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे या वेळी सांगण्यात आले.