Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

कॉपी रोखण्यासाठी भरारी पथके सज्ज
बारावीला ११ लाख विद्यार्थी
पुणे, २४ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी

बारावी परीक्षेला येत्या गुरुवारपासून (दि. २६) प्रारंभ होत असून, यंदा राज्यात एकूण ११ लाख ८४ हजार २२६ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. कॉपी रोखण्यासाठी ‘बंदोबस्त’ करण्यावर राज्य माध्यमिक

 

व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विशेष भर दिला असून, प्रत्येक जिल्ह्य़ासाठी सात अशा एकूण २४५ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंडळाच्या अध्यक्षा विजयशीला सरदेसाई आणि सचिव टी. एन. सुपे यांनी बारावी परीक्षेबाबत माहिती दिली. गेल्या वर्षीपासून दहावी-बारावी परीक्षा ही ‘सीईटी’प्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली घेण्यात येत आहे. त्यानुसार पुणे जिल्ह्य़ातील सर्व ७९ परीक्षा केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कॉपीला आळा घालण्यासाठी मंडळाबरोबरच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी यांनी दिली.
बारावीच्या परीक्षेला राज्यात कला शाखेसाठी सर्वाधिक पाच लाख १६ हजार ८७६ विद्यार्थी, तर विज्ञान शाखेसाठी तीन लाख १० हजार ९२८ विद्यार्थी बसले आहेत. वाणिज्य शाखेसाठी दोन लाख ९३ हजार ८५ विद्यार्थी बसले आहेत. किमान कौशल्यावर आधारित व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी (एमसीव्हीसी) ६३ हजार ३३७ विद्यार्थी बसले आहेत. राज्यातील पाच हजार ३०१ कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचा त्यामध्ये समावेश असून, एक हजार ८३० केंद्रांवर परीक्षा होणार आहे.माहिती-तंत्रज्ञान या विषयासाठी ५६ हजार ८२३ विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली आहे.
आप्तकालीन परिस्थिीती उद्भवल्यास मूळ परीक्षाकेंद्राएवजी पर्यायी केंद्रावर जाऊन परीक्षा देण्याची मुभा मंडळाने गेल्या वर्षीपासून देऊ केली आहे. या वर्षीही ही सुविधा काय ठेवण्यात आली आहे.