Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

‘प्रत्येकाचे अधिकारस्वातंत्र्य जपण्याची गरज’
पुणे, २४ फेब्रुवारी/प्रतिनिधी

दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेण्यालाच सुख प्राप्त करण्याचा कर्मयोग मानणाऱ्या मनुष्याचे संपूर्ण आयुष्य

 

या सुखाबरोबर येणाऱ्या भौतिक आणि मानसिक दु:खाची उत्तरे शोधण्यात खर्ची पडत आहे. त्यामुळे आगामी काळात व्यक्तीस्वातंत्र्य अबाधित राखण्याची जाणीव प्रत्येकाला करून देणे हेच मनुष्यजातीचे प्रधान कार्य आहे, असे मत दै. ‘लोकसत्ता’चे निवासी संपादक मुकुंद संगोराम यांनी आज व्यक्त केले.
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागातर्फे ‘कर्मसिद्धांत : विविध दृष्टिकोन’ या विषयावर निबंधवाचन आणि चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्राच्या समारोप प्रसंगी संगोराम बोलत होते. यावेळी प्रा. श्रीनिवास हेमाडे, प्रा. विजय कारेकर, प्रा. गौरी भागवत उपस्थित होते.संगोराम म्हणाले, की मूळ दाता आणि याचक या संकल्पनेतून समाजात शक्तिशाली व्यक्ती त्याच्यापेक्षा तुलनेने कमी शक्तिशाली व्यक्तीविषयी निर्णय घेत असते. अशावेळी अप्रत्यक्षपणे शक्तिशाली वर्गाकडून कमी शक्तिशाली व्यक्तीचे अधिकार स्वातंत्र्य हिरावून घेतले जातात. मात्र भगवद्गीतेत सुखाचे उत्तर कर्मयोग असल्याचे सांगितले आहे आणि ज्ञानप्राप्ती हे सुखाचे अंतिम ध्येय आहे, असे भारतीय तत्त्वज्ञान सांगते. आज या ज्ञानयोगाचा गैरवापर होत असल्याचे दिसते. बुद्धी वर्चस्वाच्या जोरावर मनुष्याने अण्वस्त्रनिर्मिती केली आणि ज्ञानयोगालाच आव्हान दिले आहे. त्यासाठी प्रत्येकाचे अधिकार स्वातंत्र्य जपण्याची जाणीव समाजातील सर्व घटकांना करून देण्याची गरज आहे. मनुष्याला तात्त्विक पातळीवर विचार करायला भाग पाडल्यास हा प्रश्न सुटू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रा. हेमाडे यांनी गीतेतील कर्मविचार आणि माहितीचा अधिकार या विषयावर विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलगुरू डॉ. दीपक टिळक यांनी केले. प्रा. सुषमा कर्वे यांनी आभार मानले.