Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

सेन यांना तुरुंगवास राज मात्र मुक्त - गुहा
पुणे, २४ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी

लोकशाहीमध्ये अन्यायाला वाचा फोडण्यासाठी प्रसंगी कायदा हातामध्ये घेण्याचे प्रकार होणारच. परंतु, त्याच्या जोरावर आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न झाल्यास तो कोणत्याही परिस्थितीत समर्थनीय ठरणार नाही. म्हणूनच, ओरिसा-बंगालमध्ये मानवतावादी चळवळींचे नेतृत्त्व करणाऱ्या विनायक सेन यांना जामीन नाकारला जातो आणि राज ठाकरे, प्रमोद मुतालिक हे मुक्तपणे कारवाया करीत आहेत, अशा शब्दांत इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक

 

डॉ. रामचंद्र गुहा यांनी टीका केली.
पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र व लोकप्रशासन विभागातर्फे प्रा. राजेंद्र व्होरा यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त डॉ. गुहा यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ‘डेमॉक्रसी अ‍ॅण्ड व्हायोलन्स इन इंडिया अ‍ॅण्ड बियॉण्ड’ असा त्याचा विषय होता. प्रा. सुहास पळशीकर यांनी प्रास्ताविक केले, तर विभागप्रमुख यशवंत सुमंत यांनी आभार मानले. सोमनाथ घोळवे, आशिष ठाकरे या विद्यार्थ्यांना या वेळी पुरस्कार प्रदान करण्यात आले.
काश्मीर, श्रीलंका आणि आता नक्षलवाद व महाराष्ट्र-कर्नाटकमधील तोडफोडीचा संदर्भ देऊन डॉ. गुहा म्हणाले हिंसाचाराने प्रश्न सोडविणे शक्य नसल्याच्या मतावर आपण ठाम असून खऱ्या अर्थाची लोकशाही प्रस्थापित करणे, हाच सर्वमान्य, दीर्घकालीन तोडगा ठरू शकतो.’