Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

भीमाशंकरच्या दर्शनासाठी दोन लाख भाविक
मंचर, २४ फेब्रुवारी/वार्ताहर

देशातील बारा ज्योतिर्लिगापैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्य़ातील श्री क्षेत्र भीमाशंकरमध्ये हरहर महादेव

 

चा जय घोष करत दोन लाखांहून अधिक भाविकांनी येथील शिवलिंगाचे शांततेत दर्शन घेतले. वनमंत्री बबनराव पाचपुते यांनी ज्योतिर्लिगाला सोमवारी पहाटे जलाभिषेक केला.या वर्षी दर्शन घेणाऱ्यांत महिला भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती. यात्रेनिमित्त मंदिर व परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. खेड आणि आंबेगाव तालुक्यांच्या सरहद्दीत श्री क्षेत्र भीमाशंकराचे मंदिर असल्याने दोन्ही तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी येथे चोख बंदोबस्त ठेवला होता. रविवारी सायंकाळी राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी तर सोमवारी पहाटे वनमंत्री बबनराव पाचपुते यांनी ज्योतिर्लिगाचे दर्शन घेतले.
‘हरहर महादेवा’ची घोषणा करत भर उन्हात सोमवारी दोन लाखांहून अधिक भाविकांनी देवाचे दर्शन घेतले. देशातील बारा ज्योतिर्लिगापैकी जिल्ह्य़ातील एकमेव शिवज्योतिर्लिग भीमाशंकर येथे आहे. रविवारी रात्रीपासून येथे भााविकांच्या रांगा लागल्या होत्या.
उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली १४ पोलीस अधिकारी, १६० कर्मचारी, २५ महिला कर्मचारी, २४ वाहतूक पोलीस, ५० होमगार्ड सुरक्षिततेच्या दृष्टीने येथे तैनात करण्यात आले होते. प्रांताधिकारी डॉ. किरण महाजन, खेडचे तहसीलदार सुभाष भागडे, आंबेगावचे तहसीलदार प्रशांत पाटील नियंत्रण कक्षात बसून सर्वावर लक्ष ठेऊन होते. महाराष्ट्रतूनच नव्हे तर गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आदी राज्यातून भाविक येथे दर्शनासाठी आले होते. एसटी महामंडळाने पुणे आगारातून जादा ६५ एसटी गाडय़ा आणि १७ लक्झरी बसेस भीमाशंकरला सोडल्या होत्या. त्याचप्रमाणे नाशिक, ठाणे, मुंबई, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आदी जिल्ह्य़ातून जादा एसटी गाडय़ा सोडण्यात आल्या होत्या.
श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरापासून सुमारे तीन ते साडेतीन किलोमीटपर्यंत भाविकांनी दर्शनासाठी रांग लावली होती. आकाशातून सूर्य आग ओकत असताना देखील दर्शनाची ओढ तसूभरही कमी झाली नाही. दर्शनबारीतील मुले, महिला, आबालवृद्धांसह सर्व भाविकांच्या ‘हरहर महादेव, भोलेबाबा की जय’ अशा घोषणांनी भीमाशंकर अभायरण्यातील परिसर दुमदुमून गेला होता.
दरम्यान भीमाशंकर मंदिराच्या परिसरात कचरा होऊ नये म्हणून महाराष्ट्र आरोग्य मंडळाचे ४१ कार्यकर्ते स्वकाम सेवा मंडळ आळंदीचे ८५ कार्यकर्ते, अनिरुद्ध सेवा मंडळ पुणेचे २०० कार्यकर्ते, सनातन संस्थेचे ३९ कार्यकर्ते प्लॅस्टिकचे कागद आणि कचरा गोळा करून मंदिर परिसराची स्वच्छता ठेवत होते. मंदिर आणि दर्शनबारीत भाविकांना पाणी मिळावे म्हणून पाणपोईची सेवा पुरविण्यात आली होती. तसेच परिसरात शौचालयाची देखील तात्पुरती सोय करण्यात आली होती.