Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

तणनाशके : उपयुक्त की हानिकारक?
बु धवार, दि. २५ फेब्रुवारी ०९ रोजी पुण्यामध्ये मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चर (टउउकअ), महाराष्ट्र राज्य कृषी विभाग, महाराष्ट्र सरकार व इंडियन सोसायटी ऑफ वीड सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय ‘तण व्यवस्थापन आणि तणनाशकांचा वापर करून पिकाची

 

उत्पादकता वाढविणे’ या विषयावर कार्यशाळा आयोजित केलेली आहे. ही कार्यशाळा सुमंत मुळगावकर सभागृह, (MCCIA, Trade Tower, ICC complex) सेनापती बापट रोड, पुणे येथे होणार आहे.
या कार्यशाळेस Dr. J. G. Varshney, Director, National Research Centre for weed science, Jabalpur, प्रभाकर देशमुख, कृषी आयुक्त, महाराष्ट्र राज्य, राजाराम देशमुख, कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, ए. एस. इनामदार, संचालक Crop life India, Mr. S. Kumarswamy, Chairman Agrochemical Policy Group (APG) Mumbai व चेअरमन अ‍ॅग्रिकल्चर विंग (टउउकअ) हे मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यशाळेमध्ये धान्य, कडधान्य, भाजीपाला, तेलबिया, फळबाग व नगदी पिके यामधील तण व्यवस्थापन या विषयांवर मार्गदर्शन होणार आहे.
आज देशामध्ये अन्नसुरक्षा मोहीम राबविताना देशातील जमिनीची सुपीकता वाढविणे व टिकविणे हे कार्य प्राधान्याने करण्याचे धोरण आहे. रासायनिक तणनाशके या धोरणास बाधा आणणारी तर आहेतच, शिवाय जमिनींची असलेली सुपीकता व उत्पादकता कमी करण्यास कारणीभूत होऊन उत्पादन वाढण्याऐवजी घटणार आहे.
कार्यशाळेच्या संयोजकांचा हेतू कितीही उदात्त असला तरी तणनाशकाचे दुष्परिणाम भयंकर आहेत.
रासायनिक तणनाशकांच्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम..
१) अगोदरच अडचणीत असणारा शेतकरी संकटात सापडेल. २) जमिनीची सुपीकता व उत्पादकता कमी होईल. ३) उपयुक्त जिवाणू मारले जातील. ४) शेतीस जैवभार मिळणार नाही. ५) जैवभाराचे आच्छादन कमी होईल. ६) जमिनीच्या तापमानात वाढ होईल. ७) पाणी दूषित होईल. ८) पाण्याची गरज व वापर वाढेल. ९) सेंद्रिय कर्बाचे प्रमाण घटेल. १०) महिलांचा स्थानिक रोजगार कमी होऊन उपासमार वाढेल. ११) पुढील पिकांचे उत्पादन घटेल. १२) जैववैविध्य संपुष्टात येईल. १३) प्रदूषण वाढल्यामुळे पर्यावरणास धोका पोहोचेल. १४) शेजारील सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे प्रमाणपत्र मिळणार नाही. १५) जिवाणूंना संरक्षण व खाद्य न मिळाल्यामुळे त्यांची संख्या व कार्यक्षमता कमी होईल. १६) विषारी अंश शेतीमालात राहिल्यामुळे मानवाच्या आरोग्यावर परिणाम होईल. १७) तणनाशक वापरलेल्या शेतातील तण जनावरांनी खाल्ल्यास त्यास बाधा होऊ शकते.
सेंद्रिय शेतीमधील तणनियंत्रण पद्धत
१) शेतीमध्ये तणाचा उपद्रव आणि उपयुक्तता यांचा अभ्यास केल्यास व त्याचे निर्मूलन करण्याऐवजी योग्य पद्धतीने नियंत्रण केल्यास शेतीस अनेक फायदे होतात. संयोजकांनी तणामुळे ३० टक्के उत्पादकता घटते हा दावा केला आहे. या विधानाची गृहिते, आधार व सत्यता पडताळून पाहण्याची गरज आहे.
२) शेतीमधील तण व मुख्य पीक यांच्यामध्ये सूर्यप्रकाश मिळण्यासाठी स्पर्धा लागून तणांची उंची जर मुख्य पिकापेक्षा जास्त झाली तर मुख्य पिकास सूर्यप्रकाश कमी मिळाल्यामुळे त्याची उत्पादकता कमी होऊ शकते. म्हणून तणाचे नियंत्रण (छाटणी) करून तणाची उंची मुख्य पिकापेक्षा कमी ठेवावी. मुख्य पिकापेक्षा उंची कमी असलेले तण शेतीस कोणत्याही प्रकारे हानिकारक नसून उपयुक्तच आहे.
३) जमिनीमधील मुख्य पिकाची अन्नद्रव्ये तण जरी घेत असले तरी त्याचे कितीतरी अधिक पटीने गुणन करून जमिनीस परत देते. त्यामुळे दुसरे पीकही चांगले येते.
४) खुरपणी व निंदणीद्वारे तणनियंत्रण तर होतेच, त्याचबरोबर मातीच्या वरच्या थराची उलथापालथ झाल्यामुळे मृद् आच्छादन होते व जमिनीतील ओलावा टिकून राहतो.
निघालेले तण तेथेच टाकल्यास जैव आच्छादन होते. आच्छादनामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन पाणी कमी लागते.
आच्छादन जमिनीमधील जिवाणूंना खाद्य व संरक्षण पुरवते.
निघालेले तण पशुखाद्य म्हणूनही वापरता येते. या पशूपासून मिळणारे शेण व मूत्र परत जमिनीस मिळून तिची सुपीकता वाढते.
५) मानवी पद्धतीने खुरपणी करण्यास शेतमजुरांची उपलब्धता कमी आहे व ते खर्चिक आहे, हा गैरसमज असून, कल्पित, तसेच असत्य आहे. मजुरांची कमतरता अजिबात नाही आणि ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी शेतकऱ्याने स्वत: त्यावर अनेक मार्ग काढले आहेत.
मानवी श्रमावर चालणारे सायकल कोळपे.
बैलाच्या साहाय्याने कोळपणी.
जैव आच्छादन करून तणनियंत्रण.
६) ग्रामीण भागात खुरपणी हा महिलांसाठी शेतीमधील रोजगाराचे प्रमुख साधन आहे. ते जर आपण काढून घेतले तर महिलांचे ५० टक्के उत्पन्न कमी होऊन उपासमारीत भर पडेल.
७) खुरपणीसाठी महिलांना दिलेला पैसा गावातच राहून गरिबी कमी करण्यास सहायक होतो. तणनाशकासाठी दिलेला पैसा शहराकडे जाऊन श्रीमंती वाढविण्यास कारणीभूत होतो. यामुळे गरीब व श्रीमंत यांच्यातील दरी अधिक वाढेल.
वरील सर्व बाबी विचारात घेता तणनाशकांची शेतीस गरज नाही व ती वापरणे सर्वासाठी घातक आहे, ही शेतकरी, समाज व राष्ट्रहितासाठी आम्ही ठाम भूमिका घेतली आहे.
तणनाशकांचे उत्पादक आपला माल खपविण्यासाठी कार्यशाळा, मेळावे भरवून आपल्या उत्पादनाचे गुणगान गातात, हा त्यांच्या व्यवसायाचा भाग असू शकतो; परंतु National Research Centre for weed Science, Jabalpur, महाराष्ट्र राज्य कृषी विभाग, महाराष्ट्र शासन, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी व अ‍ॅग्रिकल्चर विंग टउउकअ यासारख्या सामाजिक संस्थांनी कार्यशाळा आयोजित करून त्याचा प्रचार करणे किंवा पाठिंबा देणे नैतिक दृष्टीने योग्य नाही.
पांडुरंग शितोळे
अध्यक्ष, ग्रामपरिवर्तन
पुण्यामध्ये मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चरमध्ये बुधवारी तणनाशकांच्या वापरावर एक कार्यशाळा आयोजित केली आहे. रासायनिक तणनाशके जमिनीची उत्पादकता घटविण्यास कराणीभूत होत असताना राज्य शासनाच्या विभागांनी अशा कार्यशाळेमध्ये सहभाग द्यावा का वादाचा विषय ठरावा..