Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

‘साहित्यिकांनी बदलत्या समाजजीवनाचा आढावा घ्यावा ’
पुणे, २४ फेब्रुवारी/प्रतिनिधी

ज्या साहित्यातून वास्तव समाजजीवनाचे दर्शन घडते तेच साहित्य समाजाला आपलेसे वाटते म्हणून

 

साहित्यिकांनी सामाजिक दृष्टिकोनातून बदलत्या समाजजीवनाचा आढावा घेण्याची आवश्यकता आहे, असे मत पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे विभागप्रमुख डॉ.मनोहर जाधव यांनी आज व्यक्त केले.
डायमंड प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या व डॉ.तानाजी पाटील लिखित ‘मराठी कादंबरी : समीक्षा’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ.जाधव यांच्या हस्ते आज झाले. त्या वेळी ते बोलत होते.
या प्रसंगी व्यासपीठावर पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.अशोक शिंदे, डायमंड प्रकाशनाचे संचालक दत्तात्रेय पाष्टे, डॉ.तानाजी पाटील, अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ.संदीप सांगळे उपस्थित होते. डॉ.जाधव म्हणाले की, निकोप दृष्टिकोनातून लेखकाने साहित्याच्या निर्मितीकडे लक्ष्य दिल्यास ते साहित्य समाजाभिमुख होण्यास वेळ लागणार नाही. डॉ.पाटील यांच्या मराठी कादंबरी : समीक्षा या ग्रंथातून नेमक्या सामाजिक दृष्टिकोनाचे प्रत्यंतर घडते. बदलत्या परिस्थतीनुसार सामाजिक अंगाने साहित्याची निर्मिती होणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ.शिंदे यांचेही या वेळी भाषण झाले. प्रास्ताविक डॉ. पाटील यांनी केले तर डॉ.सांगळे यांनी स्वागत केले. प्रा. पांडुरंग मिसाळ यांनी सूत्रसंचालन केले. पाष्टे यांनी आभार मानले.