Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ फेब्रुवारी २००९
(सविस्तर वृत्त)

तब्बल बारा वर्षांनंतर चक्रेश्वर मंदिर झळाळले
चाकण, २४ फेब्रुवारी/वार्ताहर

तब्बल बारा वर्षांनंतर पुन्हा एकदा चाकणचे ऐतिहासिक चक्रेश्वर मंदिर झळाळले असून, मंदिराचे संपूर्ण आकर्षक रंगकाम व नूतनीकरण करण्यात आले आहे. लवकरच या ऐतिहासिक मंदिराची सर्व माहिती संकेतस्थळावर भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती चक्रेश्वर मंदिर ट्रस्टचे

 

अध्यक्ष व माजी आमदार राम कांडगे व मंदिराचे विश्वस्त किरण मांजरे यांनी दिली.
निसर्गाची वृद्धी हीच परमेश्वराची भक्ती व पर्यावरणाचा समतोल ही मानवी सेवा या भावनेतून सुमारे पन्नास वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या चक्रेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टने मागील वीस वर्षांपासून चक्रेश्वर मंदिराच्या विकासासाठी लोकसहभागातून नव्वद लाखांपेक्षा अधिक निधी उभारून विकास केला आहे. राज्य शासनाने नुकताच या चक्रेश्वर मंदिराला तीर्थक्षेत्र विकासाचा ‘क’ दर्जा दिला असून, या मंदिरालगतच्या ओढय़ाजवळ संरक्षक भिंतीसाठी पंधरा लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. संताजी महाराज जगनाडे यांच्या नावे संकुल उभारण्याचा मनोदय देवस्थानचे अध्यक्ष राम कांडगे, उपाध्यक्ष गोपाळ जगनाडे, विश्वस्त किरण मांजरे, कुंडलिक भुजबळ यांनी व्यक्त केला. सुबक व आकर्षक रंगकामासोबत चक्रेश्वर मंदिर परिसरातील आकर्षक बागेने भाविकांची मोठी गर्दी या परिसरात होऊ लागली आहे.
चार हजार वर्षांपूर्वीचा संदर्भ
चक्रेश्वर मंदिरासमोर असलेल्या वराहमूर्तीवरील कलाकुसरीचा इतिहास हा सुमारे चार हजार वर्षांपूर्वीचा आहे, असा दावा ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रसन्न आपटे यांनी केला आहे.