Leading International Marathi News Daily

बुधवार, २५ फेब्रुवारी २००९

पिंपरी पालिकेचे अंदाजपत्रक २ हजार कोटींवर
नवीन प्रकल्पांऐवजी सुरू असलेली कामे पूर्ण करण्यास प्राधान्य

पिंपरी, २४ फेब्रुवारी / प्रतिनिधी

चार टक्के पाणीपुरवठा लाभकर लागू करण्याची शिफारस वगळता करवाढ नसलेले भांडवली कामांवर भर देतानाच नवीन प्रकल्पांऐवजी सुरु असलेली कामे पूर्ण करण्यास प्राधान्य देणारे दोन हजार ६८ कोटी रुपयांचे सन २००९-२०१० चे अंदाजपत्रक पिंपरी पालिकेचे आयुक्त आशिष शर्मा यांनी आज स्थायी समितीला सादर केले.

पीएमपीच्या धडकेत सायकलस्वार ठार
हडपसर, २४ फेब्रुवारी / वार्ताहर

पीएमपीएल बसची दुचाकी, हातगाडी आणि सायकलस्वारास धडक बसून झालेल्या तिहेरी अपघातात सायकलस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. पुणे-सोलापूर रस्त्यावर जनसेवा बँकेसमोर आज सकाळी ११ च्या सुमारास ही घटना घडली.
या अपघातात विश्वास युवराज देसले (वय ३२, रा. तुकाईदर्शन, भेकराईनगर, गल्ली नं.१०, मूळ गाव धुळे) हा सायकलस्वार जागीच ठार झाला. बसचालक कल्याण अगतराव कांदे (वय ३०, रा. मोशी, ता. हवेली) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मंदीतही ‘श्रीराम रबर’ मध्ये वेतनवाढीचा सुखद धक्का
पिंपरी, २४ फेब्रुवारी / प्रतिनिधी

औद्योगिक मंदीचे वारे वाहात असताना दुसरीकडे सुखद धक्का देणारी भरघोस वेतनवाढ भोसरी येथील श्रीराम रबर प्रॉडक्टने दिली आहे. भोसरी औद्योगिक क्षेत्रातील श्रीराम रबर प्रॉडक्ट कंपनी ही प्रख्यात आहे. या कंपनीच्या व्यवस्थापन आणि एमआयडीसी वर्कर्स युनियन यांच्यामध्ये वेतनवाढीचा हा करार झाला. त्यामुळे कामगारांच्या वेतनात दोन हजार ७०० रुपये वाढ करण्यात आली आहे.

गुबगुबीत कुत्री आणून मनसेचे ‘तीव्र आंदोलन’!
शहरातील मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा प्रश्न अखेर अनिर्णितच

पुणे, २४ फेब्रुवारी/प्रतिनिधी

सर्वसाधारण सभेत कुत्री आणून मोकाट कुत्र्यांचा प्रश्न मनसेचे नगरसेवक मांडणार असल्याचे निरोप आज दुपारी आले. मग लगेच प्रसिद्धिमाध्यमांच्या प्रतिनिधींचींही गर्दी झाली. महापालिकेतील बंदोबस्तही कडक झाला..नगरसेवक व पत्रकारांशिवाय सर्वाना सभेत जायला मज्जाव करण्यात आला.. सभा सुरू झाली..आणि मोठाच भ्रमनिरास झाला. कारण सभेत मनसेचे नगरसेवक आले ते हातात शोभेची कुत्री घेऊन!

कलानुभव अन् संगीत संवादाला रसिकांची दाद
पुणे, २४ फेब्रुवारी/प्रतिनिधी

प्रसिद्ध लघुपट निर्माते व लेखक प्रभाकर पेंढारकर यांनी त्यांच्या ‘बॉर्डर रोड’ लघुपटाच्या निर्मितीबाबत सांगितलेले अनुभव व त्याविषयी लिहिलेल्या कादंबरीबाबत उलगडलेले अंतरंग.. तसेच शास्त्रीय संगीत गायक सत्यशील देशपांडे यांनी साधलेला संगीत संवाद.. अक्षरस्पर्श ग्रंथालयाच्या दशवार्षिक उत्सवाच्या समारोपानिमित्त आज आयोजित करण्यात आलेल्या या दोन वेगवेगळ्या विषयांवरील कार्यक्रमांना रसिकांनी भरभरून दाद दिली.

‘लोकसंख्येबाबत जागृतीसाठी पथनाटय़ हे प्रभावी माध्यम’
पुणे, २४ फेब्रुवारी/प्रतिनिधी

लोकसंख्या नियंत्रणाविषयी जनजागृती करण्यासाठी पथनाटय़ हे प्रभावी माध्यम आहे, असे मत दै. ‘लोकसत्ता’चे निवासी संपादक मुकुंद संगोराम यांनी व्यक्त केले. राज्य साधना केंद्र आणि फॅमिली प्लॅनिंग ऑफ इंडियाच्या पुणे शाखेतर्फे शहरातील विविध झोपडपट्टय़ांमध्ये राहणाऱ्या महिलांकरिता ‘पथनाटय़ प्रशिक्षण शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन संगोराम यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी साधना केंद्राचे संचालक डॉ. कैलास बवले, असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मुकुंद महाजन, सचिव मुद्देबिहाळकर, निवृत्त ब्रिगेडियर जठार उपस्थित होते. याप्रसंगी माध्यमभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल फॅमिली असोसिएशनतर्फे संगोराम यांचा सत्कार करण्यात आला.जगाच्या सहा अब्ज लोकसंख्येपैकी अडीच अब्ज लोकसंख्या भारत व चीन या देशांत आहे, असे सांगून संगोराम म्हणाले की, चीनने लोकसंख्या नियोजित केली. त्याचे दृश्य परिणामही पाहायला मिळत आहेत. भारतासारख्या लोकशाही राष्ट्राला याविषयी जनजागृती करणे हा एकमेव पर्याय शिल्लक आहे. त्यामुळेच साधना केंद्र आणि फॅमिली असोसिएशन या संस्थांचे कार्य विशेष महत्त्वाचे ठरते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संध्या जोशी यांनी केले व आभार मानले. ज्योती गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.

वेश्याव्यवसाय करणाऱ्या मुलींना दलालासह अटक
पुणे, २४ फेब्रुवारी/प्रतिनिधी

शहर व परिसरात वेश्याव्यवसाय करणाऱ्या चार मुलींसह दोन दलालांना पोलिसांनी अटक केली. शिवाजीनगर स्थानकाजवळ पोलिसांनी ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या मुलींपैकी एक परराज्यातील आहे. विठ्ठल माणिक डोंगरे (वय २३, रा. सुखसागरनगर), हरिचरण धरेंदर शर्मा (वय २२, रा. कात्रज-देहू रस्ता बाह्य़वळण मार्ग, बाणेर) या दोन दलालांना, तसेच सोनू समीर खान (वय २०, रा. मुंब्रा शरीफ कॉम्प्लेक्स, शरिफा रस्ता, ठाणे), स्नेहा अजय रेड्डी (वय २०, रा. म्हाडा कॉलनी, अंधेरी, मुंबई), लवप्रीत सतनाम सिंग (वय २५, रा. चेंबूर, मुंबई) व शबनमबानू बादशहा शेख (वय २२, रा. पूजा अपार्टमेंट, बंगळुरू) या चार मुलींना पोलिसांनी या प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलीस आयुक्त संग्रामसिंह निशानदार, पोलीस निरीक्षक सूर्यकांत केकाणे, सहायक पोलीस फौजदार जगताप, पोलीस हवालदार नारायण फासगे, पोलीस शिपाई सोनवणे, पोलीस नाईक सय्यद आदी यांच्या पोलीस पथकाने ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या सहाजणांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कॉल सेंटर कामगारांच्या मागण्या मान्य; संप मागे
पिंपरी, २३ फेब्रुवारी / प्रतिनिधी

भोसरी औद्योगिक वसाहतीमधील बीएसएनएलच्या कॉल सेंटरमधील कामगारांच्या मागण्या मान्य झाल्याने शुक्रवार (२० फेब्रुवारी) पासून सुरु असलेला संप आज मागे घेण्यात आला. विभागीय कामगार आयुक्त एन. एच.अहमद, झुम डेव्हलपर्स ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी व नागरी हक्क सुरक्षा समितीचे प्रतिनिधी यांच्यामध्ये त्याबाबत आज झालेल्या बैठकीत स्वीकारार्ह तोडगा निघाल्याने आज दुपारी संप मागे घेण्यात आला. ठेकेदार कंपनीच्या वतीने संदीप वाद्य आणि प्रविण रामटेके, तर कामगारांच्या वतीने नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे, पिंपरी पालिकेचे नगरसेवक मारुती भापकर, प्रदीप पवार, नीलेश सुंबे, कामगार प्रतिनिधी विजय मागाडे, नवनाथ गारगोटे,सचिन गावडे, मारुती वानखेडे, सुषमा काळे, दीपाली ठाकूर आणि पुरुषोत्तम फपागिरे उपस्थित होते.

समाजवादी पक्षाचा मराठा आरक्षणाला पाठिंबा
पुणे, २४ फेब्रुवारी/प्रतिनिधी

इतर समाजाच्या आरक्षणास धक्का न लावता मराठा समाजातील आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांना आरक्षण देण्यास समाजवादी पक्षाने पाठिंबा दर्शविला आहे.मराठा समाजामध्येही मोठय़ा प्रमाणात गरीब, शैक्षणिकदृष्टय़ा मागास लोक असून त्यांना सरकारी व खासगी नोकरीत संधी मिळत नाही, तसेच बऱ्याच मराठा समाजाची परिस्थिती बिकट आहे, त्यामुळे समाजवादी पक्षाने या आरक्षणास पाठिंबा दिला आहे. तसेच शिवनेरीवरील मराठा कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्यांचा पक्षाने निषेध केला आहे, ही माहिती समाजवादी पक्षाचे निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

महिलांसाठी स्वतंत्र व्यसनमुक्ती केंद्र
पुणे, २४ फेब्रुवारी/प्रतिनिधी

महिलांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढत असून त्यांना व्यसनापासून मुक्त करण्यासाठी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातर्फे महिलांसाठी स्वतंत्र व्यसनमुक्ती केंद्र सुरू करण्यात आले आहे.मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या मुक्ता पुणतांबेकर यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. देशात काही केंद्रातर्फे महिलांसाठी अशा उपचारांची सोय आहे, परंतु हे उपचार पुरुष रुग्णांबरोबरच एकत्र दिल्याने काही महिला रुग्ण अशा उपचारास तयार होत नाहीत. त्यामुळे मुक्तांगणने ‘निशिगंध’ हे महिलांसाठी स्वतंत्र केंद्र सुरू केले आहे. या केंद्रात सर्व कर्मचारी सुद्धा महिलाच राहणार आहेत. एकशे वीस रुग्णांच्या निवासी उपचारांची सोय या केंद्रात करण्यात आली आहेत.

मार्केट यार्डात सव्वालाखाची घरफोडी
पुणे, २४ फेब्रुवारी / प्रतिनिधी

दुकान बंद असताना अज्ञात चोरटय़ाने मागील बाजूचा शेडचा पत्रा उचकटून त्याद्वारे रोख एक लाख २२ हजार ३८६ रुपयांची रक्कम पळवून नेली. याबाबत शांतिलाल देवीचंद पोरवाल (वय ७३, रा. गंगाधाम बिबवेवाडी) यांनी ही स्वारगेट पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. पोरवाल यांचे मार्केट यार्डात धान्याचे दुकान आहे. शनिवार ते सोमवार दुकान बंद होते. त्या वेळी अज्ञात चोरटय़ाने त्याचा फायदा घेऊन दुकानाच्या मागील बाजूचा पत्र्याचा शेड उचकटला आणि त्याद्वारे आत प्रवेश केला. दुकानाच्या गल्ल्यातील रोख रक्कम चोरटय़ाने पळवून नेली. पोलीस उपनिरीक्षक जावळे तपास करीत आहेत.

गरीब व गरजू मुलांसाठी ‘स्लंबर किट’ चे वाटप
पुणे, २४ फेब्रुवारी/प्रतिनिधी

संगमनेर तालुक्यातील ६३ शाळांमध्ये गरीब व गरजू मुलांसाठी शिक्षणाचे व झोपण्याचे साहित्य असलेल्या तीन हजार ‘स्लंबर किट’ वाटण्याचे काम रोटरी क्लब ऑफ पुणे कॅन्टोन्मेंटतर्फे चालू आहे.
रोटरी क्लबचे अध्यक्ष शैलेश गांधी यांनी ही माहिती दिली. आतापर्यंत १८०० किट वाटले आहेत. या किट वाटण्यासाठी कॅनडामधील स्कॅब संस्थेच्या ड्राडन कुटुंबीयांतर्फे मदत करण्यात येते. एका किटला ३५ कॅनडीय डॉलर ते या रोटरी क्लबला देतात.या ‘स्लंबर किट’मध्ये चादर, रजई, उशी, मच्छरदाणी व शालेय साहित्यामध्ये स्कूल बॅग, वह्य़ा, पेन्सिल असे साहित्य आहे. राहिलेली बाराशे किट २६ फेब्रुवारीपर्यंत वाटण्यात येतील, असे गांधी यांनी सांगितले.