Leading International Marathi News Daily

बुधवार, २५ फेब्रुवारी २००९

राज्य

चाकूर तालुक्यातील शिवमंदिरे भाविकांनी गजबजली
चाकूर, २४ फेब्रुवारी/वार्ताहर

तालुक्यातील झरी (नवकुंड) व वडवळ (नागनाथ) येथील शिवमंदिरांना ऐतिहासिक व पौराणिक वारसा आहे. महाशिवरात्रीनिमित्ताने अभिषेक व दर्शनासाठी भाविकांनी काल या दोन्ही मंदिरांमध्ये मोठी गर्दी केली होती. चाकूर येथील सत्यसाई गजानन प्रतिष्ठानच्या शिवालयातही दूरवरून भाविक येत होते.
तालुक्यातील दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झरी (नवकुंड) येथील सिद्धेश्वर नागनाथाच्या यात्रेत महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यांतील भाविक दर्शनासाठी येतात.

सह्याद्रीच्या कुंभार्ली घाटदरीत जवानांनी अनुभवला पॅराग्लायडिंगचा थरार
चिपळूण, २४ फेब्रुवारी/वार्ताहर

लष्करातील जवानांमध्ये आत्मविश्वासासह धाडस निर्माण करण्यासाठी ‘गोवा टू अहमदनगर’ अशी २४ दिवसांची पॅराग्लायडिंगची मोहीम सुरू करण्यात आली असून सह्याद्री खोऱ्यातील कुंभार्ली घाटमाथ्यावरून खोल दरीतील थरार जवानांनी अनुभवला.पॅराग्लायडिंग हा परदेशात प्रसिद्ध असणारा खेळ. वाऱ्याच्या झोक्याने आकाशात उंच भरारी घेऊन निसर्गाचे सव्‍‌र्हेक्षण करणारा हा खेळ चित्तथरारक कसरतींचा दाखलेही देणारा आहे. डोंगरमाथ्यावरून उड्डाण घेऊन या खेळाचा आस्वाद घेण्यासाठी मनात साहस व हृदयात धाडस असणे गरजेचे आहे. भारताची भौगोलिक परिस्थिती थोडी वेगळी आहे.

वनौषधी उपचार पद्धती धोक्यात!
राजगोपाल मयेकर
दापोली, २४ फेब्रुवारी

औषध प्रमाणीकरणाच्या चौकटीत सरकारने वनौषधींनाही समाविष्ट केल्याने या उपचार पद्धतीवरच गंडांतर आले आहे. या निर्णयामुळे वनौषधी निर्मिती क्षेत्रात खासगी कंपन्यांना वाव मिळणार असला तरी व्यक्तिगत उपचार करणाऱ्या वैद्यांना मात्र चांगलाच फटका बसणार आहे. वात, कफ आणि पित्त या त्रिदोषांवर आधारलेल्या या वनौषधी उपचार पद्धतीमध्ये वनस्पतीतील रोगप्रतिकारक घटकापेक्षा एकूण मात्रेच्या प्रमाणाला मुख्य स्थान दिले जाते.

निगडीत भारत निर्माण योजनेत पाइप घोटाळा;मंडणगडातील पाणी योजना संशयाच्या भोवऱ्यात
चिपळूण, २४ फेब्रुवारी/वार्ताहर

मंडणगड तालुक्याच्या निगडी गावातील भारत निर्माण नळपाणी योजनेच्या कामात लाखो रुपयांचा पाइप घोटाळा ग्रामीण पाणीपुरवठा स्वच्छता समितीचे सचिव अमीर कडवेकर यांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी ग्रामस्थांनी पालकमंत्री सुनील तटकरे यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यामुळे तालुक्यातील भारत निर्माणच्या काही योजना संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.

लालचुटूक आटकांनी जागा केला बाळपणीचा सुखाचा काळ!
देवरुख, २४ फेब्रुवारी/वार्ताहर

कैऱ्या, आवळे, चिंचा, बकुळ, फणस, करवंदे, जांभळे हा कोकणी मेवा आता सर्वानाच परिचित आहे. मात्र घडाने लटकणारी आणि पूर्वापार अतिशय दुर्मिळतेनेच आढळणारी लालचुटूक ‘आटकं’ ही या मेव्याचीच सहभागीदार! आंबट-गोड चवीची चेरीप्रमाणे भासणारी आटकं सध्या खेडोपाडी दिसू लागली असून, ती सर्वानाच ‘बालपणीचा काळ सुखाचा’ची आठवण करून देत आहेत. आंबट-गोड लागणारी आणि लालचुटूक रंगामुळे लक्ष वेधणारी आटकं अन्य कुठल्याही कोकणी मेव्याच्या तुलनेत थोडय़ा अभावानेच उपलब्ध होतात.

वेळास येथे २२ मार्चपासून कासव महोत्सव
चिपळूण, २४ फेब्रुवारी/वार्ताहर

येथील सह्याद्री निसर्गमित्र, मंडणगड तालुक्यातील वेळास ग्रामपंचायत व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २२ व २३ मार्च रोजी वेळास येथे कासव महोत्सव होणार आहे. सागरी कासवे धोक्यात आली आहेत. त्यांची संख्या दरवर्षी कमी होत आहे. मोठय़ा प्रमाणावर होणारी मासेमारी, समुद्राचे वाढते प्रदूषण, मांसासाठी होणारी कासवांची हत्या यासारख्या गोष्टींमुळे कासवांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होत आहे. त्यांचे निसर्गातील महत्त्व लक्षात घेऊन संरक्षण होणे आवश्यक आहे. या जाणिवेतून सह्याद्री निसर्गमित्रने सहा वर्षांंपूर्वी वेळास येथून सागरी कासवे संरक्षण मोहिमेची सुरुवात केली होती. या मोहिमेत वेळास किनाऱ्यावर कासवांच्या संरक्षित केलेल्या घरटय़ातील पिल्ले समुद्रात जाण्यास सुरुवात झाली आहे. या महोत्सवाच्या दिवशीही काही घरटय़ांतील नवजात कासव पिल्ले वाळूतील घरटय़ांतून बाहेर पडून समुद्राकडे जाताना पाहायला मिळण्याची शक्यता आहे. यादृष्टीनेच हे दोन दिवस कासव महोत्सवासाठी निवडण्यात आले आहेत.या महोत्सवाचे उद्घाटन सकाळी साडेआठ वाजता होईल. त्याचवेळी गेल्या चार वर्षांंत कासव संरक्षण मोहिमेमध्ये मोलाचे सहकार्य करणाऱ्या व्यक्तीला कासवमित्र पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, तसेच शालेय विद्यार्थ्यांची जागृती फेरी व रात्री सह्याद्री निसर्गमित्रने बनविलेली कासवांवरील फिल्म दाखविण्यात येणार आहे. यावेळी राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाचे सदस्य भाऊ काटदरे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. महोत्सवासाठी वेळास येथे राहण्याची व जेवणाची पर्यटकांची व्यवस्था करण्यात आली आहे. या महोत्सवासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोबी, टोमॅटोचे भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल!
परतूर, २४ फेब्रुवारी/वार्ताहर

फुलकोबी, पत्ताकोबीसह टोमॅटोचे भाव कोसळल्याने परिसरातील शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे.पाणीटंचाई व दुष्काळी परिस्थितीवर काही प्रमाणात मात करून शेतकऱ्यांनी परिश्रमाने फुलकोबी, पत्ताकोबीसह टोमॅटोचे पीक मोठय़ा प्रमाणावर घेतले. उन्हाळ्यात या फुलवर्गीय भाज्यांना मोठी किंमत येईल असे शेतकऱ्यांना वाटत होते. मात्र येथील दररोज भरणाऱ्या भाजीमंडीसह शनिवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात कोबी व टोमॅटोची आवक आश्चर्यकारकरीत्या वाढली आहे. आवक वाढल्याने भाज्यांचे भाव कोसळले आहेत. कोबी आठ रुपये किलो तर टोमॅटो पाच-सहा रुपये किलो या दराने विकत आहेत. दरम्यान कोबी, टोमॅटोच्या पिकांवर मोठा खर्च होऊन अपेक्षित भाव मिळत नसल्याने उत्पादन खर्चदेखील भरून निघेनासा झाला आहे. पाणीटंचाई, दुष्काळी परिस्थितीवर काही प्रमाणात मात करून घेतलेल्या पिकांना भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

साखरेपेक्षा गूळ महागला
संजय शहापूरकर
सोयगाव, २४ फेब्रुवारी

ग्रामीण भागात मागणी वाढल्याने गुळाचा भाव २५ रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. साखरेचा भाव मात्र २२ रुपये किलो आहे.यंदा उसाचे उत्पन्न कमी झाल्याने साखर कारखाने लवकर बंद पडले. त्या पाठोपाठ गुऱ्हाळेही लवकर बंद पडल्याने गूळ उत्पादनाला फटका बसला. प्रक्रिया उद्योग चिक्की उद्योगात गुळाचा वापर वाढल्याने गुळाची मागणी वाढली.पश्चिम महाराष्ट्रातून गुळाची आवक मोठय़ा प्रमाणावर होते. पिवळ्या गुळाचा भाव २५ रुपये किलोपर्यंत पोहोचला. हा विक्रमच आहे. विशेष साखरेचे भाव नेहमीच गुळापेक्षा तेजीत राहत होते. मात्र गेल्या चार दिवसांत गुळाने साखरेला पाठीमागे टाकले.फार पूर्वी पाहुण्याला गूळ-पाणी देण्याची पद्धत होती. ती आता कमी झाली असली तरी गुळाचा चहा ग्रामीण भागात लोकप्रिय होऊ लागला आहे. गेल्या काही दिवसांत गुळाच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचे किराणा दुकानदारांनी सांगितले. साखरेपेक्षा गुळाची गोडी वाढल्याने ग्रामीण भागातील गुऱ्हाळे पुन्हा सुरू होतील, असा अंदाज आहे.

गुहागर भूमी अभिलेख इमारतीच्या उद्घाटनात तहसीलदारांचा खोडा?
चिपळूण, २४ फेब्रुवारी/वार्ताहर

१३ लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेली गुहागर तालुका भूमी अभिलेख इमारत उद्घाटनाअभावी धूळ खात पडली असून, त्यावर झालेला खर्च वाया गेला आहे. येथील नागरिकांची गैरसोय होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. तालुका भूमी अभिलेख कार्यालय गेली अनेक वर्षे कुंभारवाडी येथे भाडय़ाच्या घरात सुरू होते, परंतु त्यानंतर तहसील कार्यालयासमोरील जागेत १३ लाख रुपये खर्चून नवीन इमारत बांधण्यात आली. या भूमी अभिलेख कार्यालयाच्या इमारतीत शेतजमीन न्यायाधीकरण विभाग हलविण्याचा हेतू तहसील प्रशासनाचा आहे. तसा दबाव तहसीलदारांनी आणल्याने उद्घाटनाचा मुहूर्त टळला. ही इमारत सर्वाच्या सोयीसाठी असली तरी तहसीलदारांच्या अट्टाहासामुळे अद्यापही उद्घाटनाची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे जनतेची गैरसोय होत आहे. अंतर्गत अनेक सुविधांची गैरसोय आहे. याबाबत चौकशी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. याची दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

मातृमंदिरच्या विजय नारकर यांना सहजीवन पुरस्कार
देवरुख, २४ फेब्रुवारी/वार्ताहर

सामाजिक कार्यातील अविश्रांत कामगिरीची दखल घेऊन देवरुखच्या मातृमंदिर संस्थेचे कार्याध्यक्ष विजय नारकर यांना पुण्याच्या कै. आनंदीबाई छगन सुरा मेमोरियल ट्रस्टच्या सौजन्याने सहजीवन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. खेडच्या सहजीवन पुरस्कार समितीतर्फे हा पुरस्कार त्यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.पुरस्कार सोहळ्याला माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार, अभिनेते राहुल सोलापूरकर व हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विवेक रेडकर उपस्थित होते. सोहळ्यांतर्गत लिटल चॅम्प शमिका भिडे व शैलजा अमृते यांनाही गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. नारकर यांनी १९५७ ते १९६९ या काळात भूदान आणि ग्रामदान चळवळीत मौलिक कामगिरी केली. आरोग्य, बालशिक्षण, श्रमप्रतिष्ठा, शेती, तंत्रशिक्षण, पाणी योजना यामध्ये सक्रिय राहून त्यांनी कोकणातील सामाजिक परिवर्तनात मोठा हातभार लावला आहे. याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.यापूर्वी नारकर यांना एस. एम. जोशी, कै. ग. रा. नारकर, महाराष्ट्र फाऊंडेशन-न्यूयॉर्क बापू शतकोत्तर रजत जयंती, प्राईड पर्सन ऑफ डिस्ट्रिक्ट, राजीव साबळे ग्रामीण विकास आणि मेडिकल असोसिएशनचा जगन्नाथ पुरस्कार असे सात पुरस्कार मिळालेले आहेत. या पुरस्काराबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.

वीज प्रश्नी शिवसेनेचा रास्ता रोको
कळवण, २४ फेब्रुवारी / वार्ताहर

तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत करावा, जळीत रोहित्र त्वरित बदलून द्यावे या प्रमुख मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने मंगळवारी दुपारी येथे बस स्थानकासमोर रास्ता रोको करण्यात आला. सुमारे तासभर चाललेल्या आंदोलनामुळे वाहतूक विस्कळित झाल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. वीजेच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेने या आंदोलनाचे आयोजन केले होते. ग्रामीण जिल्हाप्रमुख कारभारी आहेर, जयंत दिंडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक बस स्थानकाबाहेर जमा झाले. यावेळी सर्वच नेत्यांनी आघाडी शासनावर जोरदार टीकास्त्र सोडले. कळवण तालुक्यात केल्या जाणाऱ्या अतिरिक्त भारनियमनामुळे शेतकरी हतबल झाला आहे. वीज वितरण कंपनीवर कोणाचाही अंकूश नसल्याने अनागोंदी कारभार सुरू असल्याचा आरोप आहेर यांनी केला. तालुक्यातील भारनियमन बंद करून वीज पुरवठा सुरळीत न केल्यास तीव्र स्वरूपात आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. कडक उन्हाची पर्वा न करता शेकडो शिवसैनिक, शेतकरी व महिला या आंदोलनात सहभागी झाल्या. वीज वितरण कंपनी व तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी प्रकाश आहेर, संभाजी पवार, लालचंद सोनवणे आदी उपस्थित होते.