Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ फेब्रुवारी २००९
  रहस्यमय विज्ञान शाखा
फॉरेन्सिक सायन्स
  अकाऊन्टन्सी, चार्टर्ड अकाऊंन्टट, कॉस्ट अकाऊन्टिंग
  स्वप्न उड्डाणाचे!
  रामानुजन फेलोशिप
  विदेशातील शिक्षणपद्धत : एक संपन्न अनुभव संस्था-उद्योग संवाद
  संशोधन आराखडय़ाचे लेखन
  सेंट्रल बँक ऑफ इंडिया लिपिकपदाची तयारी
  चव, गुणवत्ता आणि दर्जा यांचा संगम
स्नॅक्स सेंटरचा व्यवसाय
  आर्मी, नेव्ही, एअरफोर्स
  ज्ञानयुगात भाषांतरकार व्हा!
  डिफरन्ट एमबीए
सिंहगड बिझिनेस स्कूल
  यशाचा नवा मार्ग
करिअर पुस्तके

 

मी अकरावी विज्ञान शाखेत शिकत आहे. मला पायलट बनायचे आहे. तरी यातील विविध संधींबद्दल सविस्तर माहिती द्यावी.
- प्रवीण कवडे

आज देशामध्ये पायलटांचा तुटवडा आहे. साधारणत: दोन ते तीन हजार प्रशिक्षित पायलटांची आवश्यकता आहे. एवढय़ा मोठय़ा संख्येला प्रशिक्षण देण्यासाठी देशातील संस्था अपुऱ्या पडत असल्याने विमान कंपन्या परदेशामध्ये पायलट प्रशिक्षणासाठी उमेदवार पाठवत आहेत.
वैमानिक हा विमानाचा कप्तान असतो. प्रवाशांच्या जीवाच्या सुरक्षेची जबाबदारी त्याच्यावर असते. यामुळे त्याच्या प्रशिक्षणामध्ये वाहतूक नियंत्रण, हवामानशास्त्र, रेडिओ, नेव्हिगेशन, विविध यंत्रांची देखभाल यांचा अंतर्भाव असतो. ही माहिती वैमानिकाला ग्राऊंड ट्रेनिंगअंतर्गत दिली जाते. टेक ऑफ व लँडिंगचे तंत्र आत्मसात करणे, विमानांची टक्कर टाळणे, ऐन वेळी एखादे इंजिन बंद पडल्यास वा एखादे यंत्र निकामी झाल्यास य़ा आणीबाणीच्या परिस्थितीला शांतपणे सामोरे जाऊन योग्य निर्णय घेणे, सातत्याने
 

जमिनीवरील नियंत्रण कक्षाशी संपर्कात राहून त्यांच्या सूचनांचे पालन करणे असे जोखमीचे काम वैमानिकाला करावे लागते. वैमानिक बनण्याचे प्रशिक्षण शासनाचे अनुदान असलेले फ्लाईंग क्लब, खासगी फ्लाईंग क्लब व १९८५ला स्थापना झालेल्या इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डमण अ‍ॅकेडमीमध्ये दिले जाते.
प्रायव्हेट पायलट लायसन्स (पी.पी.एल.)- ज्यांना केवळ हौस म्हणून विमान चालविणे शिकायचे आहे त्यांच्यासाठी हे प्रशिक्षण असते. यासाठी १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून, वय १७ वर्षे पूर्ण असले पाहिजे. ६० तासांच्या हवाई प्रशिक्षणानंतर परीक्षा देऊन प्रायव्हेट पायलट लायसेन्स मिळते. यानंतर एक इंजिन असलेल्या प्रवासी वा मालवाहतूक करणाऱ्या विमानाचा पायलट बनता येते. मात्र यासाठी आर्थिक मोबदला घेता येत नाही. पी.पी.एल. मिळवून प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रत्येक तासाला रु. ३,३००/- म्हणजे साधारणत: दोन लाख रुपये खर्च येतो. (संस्थानिहाय खर्च बदलू शकतो.)
कमर्शिअल पायलट लायसन्स (सी.पी.एल.)-या प्रशिक्षणामध्ये २५० तासांचे हवाई प्रशिक्षण दिले जाते. एकूण १८ महिन्यांच्या या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षकांसमवेत तसेच स्वतंत्रपणे उड्डाण करायला शिकवले जाते. यासाठी विज्ञान शाखेतून १२वी उत्तीर्ण असणे व वय किमान १७ वर्षे असणे आवश्यक आहे. या संपूर्ण प्रशिक्षणासाठी विविध प्रशिक्षण संस्थांमध्ये साधारणत: १६ ते २० लाख रुपये इतका खर्च येतो. या प्रशिक्षणात एअर रेग्युलेशन नॅव्हिगेशन, हवामानशास्त्र, इंजिन आणि सिग्नल इत्यादी विषयांचा समावेश असतो. प्रशिक्षण संस्थांमध्ये दिले जाणारे प्रशिक्षण हे एक इंजिन असणाऱ्या विमानांवर दिले जाते. य़ा प्रशिक्षणानंतर विद्यार्थी व्यावसायिक विमानसंस्थेत को-पायलट म्हणून रुजू होऊ शकतो. मात्र त्याआधी आधुनिक अशा मल्टी-इंजिन विमानाचे प्रशिक्षण घेणे आवश्यक असते. या प्रशिक्षणाची व्यवस्था संबंधित विमान कंपनी करते. परंतु प्रशिक्षणाचा खर्च मात्र स्वत:ला करावा लागतो. अर्थात मिळणारा पगारही लाखाच्या घरात असतो. त्यामुळेच मध्यमवर्गीय मुले/मुली कर्ज काढूनही या क्षेत्राकडे पळत आहेत. इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अ‍ॅकॅडमी, १९८५ मध्ये स्थापन झालेल्या या अ‍ॅकॅडमीमध्ये शिकवले जाणारे अभ्यासक्रम हे नागरी विमान वाहतूक संचालनालय Director General of Civil Aviation (D.G.C.A.) व आंतरराष्ट्रीय नागरी वाहतूक संस्था यांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आखले गेले आहेत. अ‍ॅकॅडमीमध्ये कमर्शिअल पायलट लायसन्स (सीपीएल) मधील दोन अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. अ‍ॅकॅडमीचा विशेष म्हणजे येथे बी.एस्सी. एव्हिएशनची पदवीही घेता येते.
या संस्थेत दोन अभ्यासक्रम शिकवले जातात. सी.पी.एल. कोर्स आणि बी.एस्सी. भौतिकशास्त्र व गणित विषयांतून ५५ टक्के गुण मिळवून १२वी उत्तीर्ण झालेल्या व किमान १७ वर्षे वय असलेल्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. (राखीव वर्गासाठी ५० टक्के गुण आवश्यक आहेत.) दोन वर्षांच्या अभ्यासक्रमाची फी १९ लाख रुपये इतकी आहे. पी.पी.एल. असणाऱ्यांसाठी सी.पी.एल. कोर्स विज्ञान शाखेतून १२वी उत्तीर्ण व प्रायव्हेट पायलट लायसन्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. हौशी पायलट असलेल्यांना कमर्शिअल पायलट बनवण्यासाठी हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. दीड वर्षांच्या अभ्यासक्रमाची फी १४ लाख रुपये इतकी आहे. या दोन अभ्यासक्रमांसाठी अखिल भारतीय पातळीवर प्रवेश परीक्षा घेतली जाते. लेखी परीक्षा, पायलट अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट व मुलाखत अशा चाळण्यांमधून अंतिम निवड केली जाते.
अधिक माहितीसाठी संपर्क:
इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अ‍ॅकॅडमी, फुरसतगंज एअरफिल्ड, रायबरेली, उत्तर प्रदेश-२२९३०२
दूरध्वनी- २२०२०९६/२२०२८०८
वेबसाइट- www.integrua.gov.in
भारतीय हवाई दलातून खालील प्रकारे आपल्याला पायलटचे प्रशिक्षण घेता येईल :-
१) एन.डी.ए. : १२ वी विज्ञान शाखेतून शिक्षण पूर्ण केल्यानंतर हवाई दलामध्ये पायलट म्हणून रुजू होण्यासाठी नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमीमध्ये प्रवेश मिळवणे आवश्यक आहे. येथे प्रवेश देण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यू.पी.एस.सी.) वर्षांतून दोन वेळा परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेतून एअरफोर्ससाठी उमेदवारांची निवड केली जाते. निवड झालेल्या उमेदवारांना नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमीमध्ये तीन वर्षे प्रशिक्षण देण्यात येते. त्यानंतर फ्लाइंगचे विशेष प्रशिक्षण एअरफोर्स अ‍ॅकॅडमीमध्ये देण्यात येते. यानंतर पायलट म्हणून एअरफोर्स स्टेशनमध्ये नियुक्ती केली जाते.
पात्रता : किमान वयोमर्यादा १६ वर्षे सहा महिने ते कमाल वयोमर्यादा १९ वर्षे इतकी असते. एन.डी.ए.च्या एअरफोर्स शाखेसाठी बारावी विज्ञान शाखेतून भौतिकशास्त्र व गणित हे विषय घेऊन उत्तीर्ण होणे आवश्यक असते. या परीक्षेसाठी अविवाहित पुरुष पात्र असतात.
लेखी परीक्षा व मुलाखत : लेखी परीक्षेसाठी एकूण दोन प्रश्नपत्रिका असतात. प्रश्नपत्रिका- एक ही गणित विषयाची असून यासाठी ३०० गुण असतात तर प्रश्नपत्रिका- दोन ही सामान्य क्षमता चाचणीची असते. यात इंग्रजी, सामान्यज्ञान, विज्ञानावर आधारित प्रश्न असतात. एकूण गुण ६०० असतात. दोन्ही प्रश्नपत्रिकांसाठी प्रत्येकी अडीच तासांचा वेळ असतो. प्रश्नांचे स्वरूप बहुपर्यायी वास्तुनिष्ठ असते. लेखी परीक्षेचा टप्पा पार केलेल्यांना मुलाखत तसेच बुद्धिमत्ता व व्यक्तिमत्त्व चाचणी यासाठी बोलावले जाते.
परीक्षेच्या अधिक माहितीसाठी www.upsc.gov.in ही वेबसाइट पाहावी.
२) शॉर्ट सव्‍‌र्हिस कमिशन (महिला व पुरुष) फ्लाइंग (पायलट) कोर्स :
प्रवेश प्रक्रिया : यामध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांची पायलट अ‍ॅप्टिटय़ूड बॅटरी टेस्ट (पी.ए.बी.टी.) घेतली जाते. यशस्वी उमेदवारांची व्यक्तिमत्त्व चाचणींसाठी निवड केली जाते. पहिल्या टप्प्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी त्याचप्रमाणे पिक्चर परसेप्शन टेस्ट घेण्यात येते. दुसऱ्या टप्प्यामध्ये मानसशास्त्रीय चाचण्या, समूह चाचणी, तसेच मुलाखत घेण्यात येते. यानंतर वैद्यकीय तपासणी केली जाते व गुणवत्ता यादी प्रकाशित केली जाते.
प्रशिक्षण : यशस्वी उमेदवारांना ७४ आठवडय़ांचे प्रशिक्षण एअरफोर्स अ‍ॅकॅडमी, हैदराबाद येथे दिले जाते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर शॉर्ट सव्‍‌र्हिस कमिशन दिले जाते. याअंतर्गत आपण १४ वर्षांपर्यंत भारतीय हवाई दलात काम करू शकता.
प्रवेश पात्रता : १९ ते २३ वर्षे ही वयोमर्यादा असून अविवाहित पुरुष वा महिला यामध्ये प्रवेश घेऊ इच्छितात.
शैक्षणिक पात्रता : १२ वीमधून भौतिकशास्त्र व गणित घेऊन प्रथम श्रेणीतून कोणत्याही शाखेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे किंवा इंजिनीअरिंग (बी.ई.) पदवीधारक असणे आवश्यक आहे.
३) कम्बाइन्ड डिफेन्स सव्‍‌र्हिस एक्झामिनेशन (सी.डी.एस.ई.) : एअरफोर्ससाठी अविवाहित पुरुष उमेदवारांसाठी वयोमर्यादा १९ ते २३ वर्षे इतकी असते.
शैक्षणिक पात्रता : १२ वीमधून भौतिकशास्त्र व गणित विषय घेऊन कोणत्याही शाखेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी पात्र असतात. तसेच बी.ई. (इंजिनीअरिंग) पदवीधरही पात्र असतात.
प्रवेश परीक्षा : लेखी परीक्षेमध्ये इंग्रजी, सामान्यज्ञान, गणित असे प्रत्येकी १०० गुणांचे पेपर्स असतात. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना बुद्धिमत्ता व व्यक्तिमत्त्व परीक्षेला सामोरे जावे लागते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ५२ आठवडय़ांच्या यशस्वी प्रशिक्षणानंतर परमनंट कमिशन दिले जाते. भारतीय हवाई दलामध्ये फ्लाइंग ऑफिसरचा हुद्दा यावेळी दिला जातो.
४) एन.सी.सी. (नॅशनल कॅडेट कॉर्पस) : एन.सी.सी. ‘सी’ प्रमाणपत्र धारकांना एअरफोर्समध्ये भरती करण्यासाठी परीक्षा घेतली जाते. याद्वारे अविवाहित पुरुषांची निवड केली जाते व प्रशिक्षणानंतर परमनंट कमिशन दिले जाते.
अधिक माहितीसाठी संपर्क :-
डिरेक्टरेट ऑफ नॅशनल कॅडेट कॉर्पस,
जुने सचिवालय, नवी दिल्ली-११००५४.
दूरध्वनी : ०११-३८९०१४६
(या परीक्षेसंदर्भात जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये प्रकाशित केली जाते.)
आनंद मापुस्कर
फोन : ०२२-३२५०८४८७.