Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ फेब्रुवारी २००९
  रहस्यमय विज्ञान शाखा
फॉरेन्सिक सायन्स
  अकाऊन्टन्सी, चार्टर्ड अकाऊंन्टट, कॉस्ट अकाऊन्टिंग
  स्वप्न उड्डाणाचे!
  रामानुजन फेलोशिप
  विदेशातील शिक्षणपद्धत : एक संपन्न अनुभव संस्था-उद्योग संवाद
  संशोधन आराखडय़ाचे लेखन
  सेंट्रल बँक ऑफ इंडिया लिपिकपदाची तयारी
  चव, गुणवत्ता आणि दर्जा यांचा संगम
स्नॅक्स सेंटरचा व्यवसाय
  आर्मी, नेव्ही, एअरफोर्स
  ज्ञानयुगात भाषांतरकार व्हा!
  डिफरन्ट एमबीए
सिंहगड बिझिनेस स्कूल
  यशाचा नवा मार्ग
करिअर पुस्तके

 

विदेशातील शिक्षणपद्धत : एक संपन्न अनुभव संस्था-उद्योग संवाद
‘नॅशनल जिओग्राफिक’ किंवा ‘डिस्कव्हरी’ चॅनेलवरचे माहितीपट तुम्ही पाहिले आहेत? तंत्रज्ञान, वैद्यकशास्त्र, खेळ किंवा प्राणीजगत विषय कोणताही असो, ज्या तज्ज्ञांच्या मुलाखती होतात, ते बहुधा प्रतिष्ठित विद्यापीठांत प्राध्यापक असतात. असे का? औद्योगिक राष्ट्रांमध्ये, उद्योगजगत उत्पादन व सव्‍‌र्हिस यावर आपले लक्ष केंद्रित करते व संशोधन व सुधारणा याची जबाबदारी बहुधा विद्यापीठांवर सोपवलेली असते. एखाद्या उद्योगाला तांत्रिक प्रश्नावर उत्तर शोधायचे आहे, उत्पादनाच्या तंत्रात सुधारणा करायची आहे किंवा कृषीक्षेत्राला चांगले बियाणे पाहिजे किंवा कीटकनाशकांच्या चांगल्या पद्धती पाहिजेत किंवा शासनास अर्थक्षेत्रातील समस्येवर तज्ज्ञांचा सल्ला हवा आहे किंवा ज्यामुळे सुरक्षेला धोका आहे अशा गुंतागुंतींच्या मुद्यांवर सूचना हव्या आहेत तर प्रथम त्यांच्या मनात येईल, ही जबाबदारी एका सक्षम विद्यापीठाकडे सोपवावी. भारतीय विद्यापीठांना
 

शासनाकडून अनुदान मिळते. पण अमेरिका, कॅनडा, युनायटेड किंगडम इथल्या बहुतेक विद्यापीठांना तिथल्या शासनाकडून अनुदान मिळत नाही. त्यामुळे तिथल्या विद्यापीठांमध्ये आणि प्राध्यापकांमध्ये ज्यामुळे निधी मिळू शकेल, असे औद्योगिक प्रकल्प मिळवण्याची चढाओढ असते. प्राध्यापकांना असे जास्त प्रकल्प मिळाले तर, त्यांच्या विद्यार्थ्यांना त्या खऱ्याखुऱ्या प्रकल्पांवर काम करण्याची जास्त संधी मिळते. वर्गात शिकलेले ज्ञान लगेच प्रत्यक्ष व्यवहारात उपयोगात आणण्याची एक नामी संधी त्यांना मिळते. मरीन झुऑलॉजीचा कोर्स करतानाच जर अटलांटिक महासागरात डीप-सी डायव्हिंग करणाऱ्या टीममध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली तर काय बहार येईल विचार करा! याचाच अर्थ ज्या विद्यार्थ्यांचा औद्योगिक व संशोधनाच्या प्रकल्पांचे काम करण्याकडे कल आहे त्याला जास्त निधी उपलब्ध होतो/ शिष्यवृत्ती मिळते. त्यामुळे खूप औद्योगिक प्रकल्प हाती घेणाऱ्या व त्यासाठी भरपूर निधी मिळणाऱ्या विद्यापीठाची निवड केली पाहिजे.
शिकवणे व मूल्यांकन : विदेशात जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना दोन मोठे फरक जाणवतात. वर्गातील लेक्चर- व्याख्याने कमी असतात व वाचनालय व प्रयोगशाळेत जास्त तास व्यतीत करावे लागतात. एमबीए करणाऱ्या विद्यार्थ्यांला भारतात साधारण दर आठवडय़ाला ३५ ते ४० तासांच्या लेक्चरना हजर राहावे लागते आणि दोन वर्षांत ३५ पेक्षा जास्त विषय शिकायचे असतात. भारतातील अभ्यासक्रमाची व्याप्ती लक्षात घेता साधारण हेच चित्र इतर प्रोग्राममध्येही असते. विदेशातील विद्यापीठात दर आठवडय़ाला १५ ते २० तास व्याख्याने असणारा कोणताही कोर्स हा पूर्णवेळ कोर्स समजला जातो. यात लेक्चर व टय़ुटोरियलचा समावेश असतो. याचा अर्थ विद्यार्थी इतर वेळी मोकळा असतो का? अजिबात नाही! ते पूर्णवेळ गुंतलेले असतील इतक्या असाईनमेंट व वाचनालयाचे काम त्यांना दिलेले असते. विद्यार्थ्यांनी स्वत: काम करून ते वर्गासमोर सादर करावे लागते; त्यावर टीका झाली तर स्वत:ची बाजू मांडावी लागते. गरज असेल तर या कामासाठी प्राध्यापक त्यांना मार्गदर्शन करतात. विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे विचार करण्याची सवय लागावी व त्यांनी स्वत:चे काम सादर करावे हा उद्देश असतो.
मूल्यांकनाची पद्धतही खूपच वेगळी असते. बहुतेक विषयांसाठी शेवटी लेखी परीक्षा असली तरी विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्याचे तेच एकमेव साधन नाही. वर्गात विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याने प्राध्यापकांना त्यांच्या कामगिरीचे निरीक्षण करण्यास पुरेसा वेळ असतो. असाइनमेंट, प्रयोगशाळेतील काम, वर्गात त्याचा सहभाग (व उपस्थिती) , ग्रुप असाइनमेंट, सहामाही व अंतिम परीक्षा यातील त्यांच्या कामगिरीच्या आधारे त्यांचे सतत मूल्यांकन केले जात असते. यामुळे सर्व विद्यार्थ्यांच्या लेखन, संभाषण व काम करण्याच्या क्षमतेचे मूल्यांकन होते.
क्रेडिट आधारित पद्धत : दरवर्षी असणारे पेपर/ विषय यावर भारतातील पदवी पद्धत आधारित आहे. जगभर मात्र (व आयआयएससी, आयआयटी, बिर्ला इन्स्टिटय़ूट व अशा काही भारतातील संस्थांतही) एका समान तऱ्हेच्या परीक्षार्थीना क्रेडिट व ग्रेड पॉइंट (गुण) या आधारे अधिकृत केले जाते. प्रत्येक शैक्षणिक वर्षांतील प्रत्येक कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर उच्चमाध्यमिक शाळेतील किंवा विद्यापीठातील विद्यार्थ्यांला त्याचे क्रेडिट-गुण दिले जातात. ते राज्य शासन किंवा ती संस्था पदवी मिळवण्यासाठी किमान किती क्रेडिट-गुण आवश्यक आहेत ते ठरवते. हे क्रेडिट-गुण देण्याच्या अनेक पद्धती आहेत; उदा. प्रत्येक कोर्ससाठी एक, वर्गातील प्रत्येक तासासाठी/ आठवडय़ासाठी एक, कोर्ससाठी जो कालावधी आह त्यातील (गृहपाठासहित) प्रत्येक तासासाठी/आठवडय़ासाठी एक इत्यादी.
उदाहरणासह समजावून घेऊ. अमेरिकेतील शिक्षणपद्धतीत कोर्सचा अर्थ आपण समजतो, त्यापेक्षा वेगळा आहे. उच्चशिक्षणातील अभ्यासक्रमाचे अनेक छोटय़ा भागांत- मॉडय़ुलमध्ये विभाजन केले जाते. या छोटय़ा भागाला- मॉडय़ुलला कोर्स म्हणतात. प्रत्येक शैक्षणिक कोर्समध्ये किती सूचना-तास असावेत ते निश्चित केलेले असते. त्याशिवाय फिल्डवर्क कोर्स, प्रयोगशाळा कोर्स, लेक्चर कोर्स, स्टुडिओ कोर्स किंवा कामगिरी कोर्स, प्रात्यक्षिक कोर्स किंवा परिषदा किंवा संशोधन कोर्स या सर्वाचाही त्या शैक्षणिक कोर्समध्ये समावेश असतो.
पदवीपूर्व स्तरापर्यंत चार वर्र्षांचा अभ्यासक्रम आणि निश्चि केलेले किमान क्रेडिट-तास पूर्ण करणे आवश्यक असते. हे किमान क्रेडिट-तास सहसा १२० व १३० तास असतात. दर आठवडय़ाला जितके सूचना-तास आहेत त्यालाच क्रेडिट-तास म्हटले जाते. निश्चित केलेले किमान क्रेडिट-तास मिळवणे पदवीसाठी अनिवार्य आहे. कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर त्याला त्या कोर्समध्ये काय ग्रेड मिळाली आहे व निश्चित केलेले क्रेडिट-तास या दोन्हींच्या आधारे त्याच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जाते.
बहुतेक महाविद्यालयात व विद्यापीठात तिमाही किंवा सहामाही सत्र पद्धत असते. तिमाही पद्धतीत शैक्षणिक वर्ष तीन भागांत विभागले जाते. त्यांना क्वार्टर (एक-चतुर्थाश भाग) म्हटले जाते. प्रत्येक क्वार्टर साधारण १२ आठवडय़ांचा असतो. शिवाय उन्हाळ्यात एक जास्तीचा क्वार्टर असतो, त्यासाठी नोंदणी करणे मात्र ऐच्छिक असते. परदेशी विद्यार्थी या उन्हाळ्यातील कोर्सला अनुपस्थित राहिले तरी त्यांच्या व्हिसा-स्टेटस्मध्ये फरक पडत नाही.
सहामाही सत्र पद्धतीत शैक्षणिक वर्ष दोन सत्रांत विभागले जाते. थंडीचा मोसम व वसंत ऋतू (म्हणजे साधारणपणे वर्षांचे शेवटचे काही महिने व वर्षांच्या सुरुवातीचे काही महिने). प्रत्येक सत्रासाठी विद्यार्थ्यांना १६ क्रेडिट-गुण मिळतात म्हणजे पूर्ण वर्षांसाठी ३२. दर आठवडय़ाला किती तास असतात यावरून प्रत्येक कोर्ससाठी सरासरी तीन किंवा त्यापेक्षा जास्त क्रेडिट-गुण असतात. इथेही उन्हाळ्यात एक ऐच्छिक सत्र असते. तुम्ही पूर्णवेळ विद्यार्थी आहात की अंशकालीन हे निश्चित करण्यासाठी क्रेडिट-तास निर्णायक घटक आहेत. परदेशी विद्यार्थ्यांनी त्यांचे व्हिसा-स्टेटस् टिकवून ठेवण्यासाठी पूर्णवेळ विद्यार्थी असणे आवश्यक आहे.
पदवीच्या किंवा मास्टर डिग्रीच्या स्तरावरती किमान ३० क्रेडिट-तास आवश्यक असतात. एका वर्षांतील किंवा दोन वर्षांतील पूर्णवेळ अभ्यासक्रमात जे क्रेडिट-तास असतात त्यांचा यात समावेश आहे. प्रत्येक विषयासाठी तीन क्रेडिट-गुण असणारे आठ कोर्सेस करून आणि सहा क्रेडिट-तास असलेला थिसिस करून ते आपली मास्टर पदवी
मिळवू शकतात. थिसिस नसेल तर प्रत्येक विषयासाठी तीन क्रेडिट-गुण असणारे १० कोर्सेस करूनही त्याला किंवा तिला मास्टर पदवी मिळवता येते. भारतीय विद्यार्थ्यांकरिता या क्रेडिट पद्धतीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे प्रोग्राम किती कालावधीत पूर्ण करायचा याचे स्वातंत्र्य मिळते. विद्यार्थी प्रत्येक सत्रात जास्त क्रेडिट मिळवून त्याची पदवी किंवा मास्टर डिग्री नियोजित वेळेच्या आत मिळवू शकतो.
विनायक कामत
vykamat@gmail.com