Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ फेब्रुवारी २००९
  रहस्यमय विज्ञान शाखा
फॉरेन्सिक सायन्स
  अकाऊन्टन्सी, चार्टर्ड अकाऊंन्टट, कॉस्ट अकाऊन्टिंग
  स्वप्न उड्डाणाचे!
  रामानुजन फेलोशिप
  विदेशातील शिक्षणपद्धत : एक संपन्न अनुभव संस्था-उद्योग संवाद
  संशोधन आराखडय़ाचे लेखन
  सेंट्रल बँक ऑफ इंडिया लिपिकपदाची तयारी
  चव, गुणवत्ता आणि दर्जा यांचा संगम
स्नॅक्स सेंटरचा व्यवसाय
  आर्मी, नेव्ही, एअरफोर्स
  ज्ञानयुगात भाषांतरकार व्हा!
  डिफरन्ट एमबीए
सिंहगड बिझिनेस स्कूल
  यशाचा नवा मार्ग
करिअर पुस्तके

 

आतापर्यंत संशोधनकृतीशी संबंधित असा मूलभूत संकल्पनांचे आकलन होण्यावर आपण लक्ष केंद्रित केले होते. संशोधनात समस्येचे पद्धतशीरपणे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जातो, असे आपणास आढळले. तसेच संशोधनाच्या महत्त्वपूर्ण वैशिष्टय़ांचा आढावा घेतला. संशोधन ही एक चक्रीय स्वरूपाची प्रक्रिया आहे. संशोधनकृतीमध्ये एक मूलभूत समस्या निवडून त्या समस्येची उकल करण्यासाठी, कार्यवाहीच्या दृष्टीने अधिक स्पष्टीकरण व्हावे म्हणून मूळ समस्या परत स्वीकृत व अस्वीकृत गृहीत कृत्याच्या स्वरूपात मांडली जाते म्हणून संशोधनप्रक्रिया चक्रीय आहे, असे नव्हे तर एका समस्येच्या शोधलेल्या उत्तरातून दुसऱ्या शैक्षणिक समस्येची निर्मिती होत असते म्हणून ही प्रक्रिया चक्रीय समजली जाते. संशोधन ही एक कौशल्यपूर्ण व व्यावसायिक कृती असल्याने संशोधकाला आधारसामग्रीचे संग्रहण, मापण करण्यासाठी व स्पष्टीकरण करण्यासाठी काही संशोधन साधनांचा वापर करावा लागतो. संशोधन समस्येचे कथन स्पष्टपणे करण्याचे महत्त्व, संशोधन कार्याच्या मर्यादा, व्याप्ती ठरविणे व त्यामुळे संशोधनाला अचूकता कशी लाभते हे पाहिले आहे.
 

संशोधनाच्या परिभाषेत नमूद केल्याप्रमाणे आणि संशोधनकार्य निर्विघ्नपणे, सुलभरीत्या पार पाडण्यासाठी मुख्य समस्येचे उपसमस्यांमध्ये विभाजन करणे याचाही विचार केला. ज्ञानप्राप्तीच्या निगमनात्मक व उद्गामी या दोन तर्कपद्धती पाहिल्या. संशोधन या शब्दाचे आपणास जेवढे आकलन झाले आहे त्यावरून संशोधनात उद्गामी तर्कशास्त्राचा म्हणजे वैज्ञानिक पद्धतीचा वापर केला जातो हे अभ्यासले. शेवटी आपणास असे आढळून आले की, संशोधनाच्या विविध पद्धती आहेत व ज्या प्रकारची माहिती आपणास संकलित करावयाची असते त्यावरच संशोधन पद्धतीची निवड अवलंबून असते. संशोधकाने या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच संशोधनास योग्य पद्धतीची निवड करावयाची असते.
वरील सर्व चर्चा औपचारिक संशोधनाच्या संदर्भात आहेत, कारण संशोधनाद्वारे तुम्ही जे ज्ञान प्राप्त केलेले आहे त्याची चिकित्सा व मूल्यमापन करावयाचे असते. यातील पहिला टप्पा योग्य संशोधन आराखडय़ाचे लेखन होय. या आराखडय़ामधून तुम्हाला संशोधन प्रक्रियेचे परिपूर्ण ज्ञान झाले की नाही तसेच तुम्ही हाती घेतलेल्या संशोधन कार्यात कोणते प्रश्न हाताळणार आहात, या सर्वाची इत्यंभूत माहिती मिळते.
वैशिष्टय़पूर्ण संशोधन आराखडय़ात पुढील मूलभूत गोष्टी अंतर्भूत असतात-
० नियोजित अभ्यासाचा आराखडा.
० संबंधित अभ्यासाच्या कार्यवाहीसाठी संशोधकाला उपलब्ध असणारी साधने.
० प्रस्तुत अभ्यासासाठी संशोधकाची योग्यता दर्शविणारी विधाने.
० साधनसामग्रीची उपलब्धता आणि माहिती मिळविण्यासाठी संशोधकाने वापरलेली साधने.
० अभ्यासविषयाचे सर्वसाधारण महत्त्व.
विद्यार्थी संशोधन आराखडय़ाकडे केवळ एक औपचारिकतेचा भाग म्हणून पाहत असतात. ही एक गंभीर अशी चूक आहे. आराखडय़ाचे लेखन महत्त्वाचे का आहे हे आपणास समजणे आवश्यक आहे. संशोधन ही एक अत्यंत खडतर अशी कृती आहे. संशोधकाचा वेळ, क्षमता, इतर साधने यांचे नियोजन करणे त्या दृष्टीने तितकेच महत्त्वाचे आहे. संशोधकाने काळजीपूर्वक तयार केलेल्या आराखडय़ातून त्याने हाती घेतलेल्या कार्यावर किती गंभीरपणे विचार केलेला आहे, त्याला कोणत्या गोष्टीचा शोध घ्यावयाचा आहे या सर्व गोष्टी दिसून येतात. विद्यार्थी संशोधन कार्यासाठी नावनोंदणी करतात; परंतु त्यांना ते संशोधन पूर्ण करता येत नाही. काही वेळा ते कार्य पूर्ण करण्यास खूप वेळ लागतो. अक्षम्य दिरंगाई पत्करावी लागते, अशी अगणित उदाहरणे आपल्यासमोर आहेत. याचे प्रमुख कारण त्यांनी सुरुवातीस संशोधन आराखडय़ाकडे केलेले दुर्लक्ष व निष्काळजीपणा होय.
संशोधन आराखडा हा संशोधन कार्याचे नियोजन असते किंवा तुम्ही निवडलेल्या कृतीचा नकाशा असतो. आराखडा जर चांगल्या प्रकारे केला असेल तर तो तुमच्या संपूर्ण संशोधन कार्यात एखाद्या कुशल मार्गदर्शकाप्रमाणे भूमिका बजावत असल्याचे दिसून येईल. संशोधन करतेवेळी खरे पाहता या आराखडय़ाकडे पुन:पुन्हा पाहणे, पूर्ण झालेल्या गोष्टींवर खुणा करणे, अपूर्ण गोष्टींची दखल घेणे या कृती वारंवार व्हायला हव्यात.
आराखडय़ाची मांडणी (रचना)
चांगल्या आराखडय़ाची रचना खालीलप्रमाणे केली जाते-
(१) समस्या व समस्येची मांडणी (प्रस्थापना)
(अ) समस्येचे विधान
(ब) उपसमस्यांची विधाने
(क) गृहीतकृत्ये
(ई) मर्यादा
(उ) संज्ञांची व्याख्या
(ऊ) गृहिते
(ए) अपेक्षित फल
(ऐ) अभ्यासाचे महत्त्व
(२) संबंधित साहित्याचा अभ्यास
(३) आधारसामग्री, आधारसामग्रीची कार्यवाही आणि अर्थनिर्वचन
(अ) आधारसामुग्री
१. प्राथमिक (अस्सल) आधारसामग्री
२. दुय्यम आधारसामग्री
(आ) आधारसामग्री स्वीकृतीबाबतचे निकष
(इ) संशोधन पद्धती
(४) प्रत्येक उपसमस्येची कार्यवाही
(अ) आवश्यक आधारसामग्री
(आ) माहिती कोणत्या ठिकाणी उपलब्ध आहे?
(इ) आधारसामग्री कोणत्या प्रकारे संग्रहित केली जाईल.
(ई) आधारसामग्रीची कार्यवाही व निर्वचन कसे केले जाईल?
(५) संशोधकाची गुणवत्ता
(६) संशोधन प्रकल्प वा प्रबंधाचे अंतिम अपेक्षित प्रतिवृत्त
(७) निवडक संदर्भसूची, संशोधक कोणत्या प्रकारे त्याचा वापर करणार आहे? प्रत्येक घटकाचा अर्थ काय? आपल्या सोयीसाठी वरीलपैकी प्रत्येक घटकाचे वर्णन सविस्तरपणे खाली दिले आहे.
समस्येचे प्रस्थापन
संशोधनातून नवनवीन ज्ञाननिर्मिती होत असते. त्यामुळे शोध करावयाचा विभाग अचूकपणे निर्देशित करणे आवश्यक आहे. त्या विभागाची संक्षिप्त परिभाषा ठरविली पाहिजे. संशोधन समस्येची परिभाषा म्हणजे समस्येची पाश्र्वभूमी व प्रत्येक उपविभागातील समाविष्ट बाबींचे विस्ताराने स्पष्टीकरण करणे होय. दुसऱ्या शब्दात आपणास त्याचे वर्णन असे करता येईल की, व्यापक समस्येच्या मर्यादा ठरविणे व संशोधकाचा या प्रत्येक उपघटकासंबंधी विचार करावयाचा दृष्टिकोन अचूकपणे सांगणे आवश्यक आहे. प्रबंधाचे विधान असा शब्दप्रयोग आपण ऐकतो. असे प्रबंध विधान लिहिणे महत्त्वाचे व उपयुक्त आहे. प्रबंधाच्या विधानातून संशोधनाची मध्यवर्ती कल्पना समजते तसेच संदर्भाची एक विशिष्ट सीमित अशी चौकट उपलब्ध होते. संशोधनाला आपण जेव्हा सुरुवात करतो, त्या वेळी नेमके काय करावयाचे आहे हे पाहण्यासाठी पुन:पुन्हा प्रबंध विधानांचा संदर्भ घ्यावा लागतो व पुढील कार्यवाही करावी लागते.
रणजित राजपूत
संपर्क- ९९६९००५५५५