Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ फेब्रुवारी २००९
  रहस्यमय विज्ञान शाखा
फॉरेन्सिक सायन्स
  अकाऊन्टन्सी, चार्टर्ड अकाऊंन्टट, कॉस्ट अकाऊन्टिंग
  स्वप्न उड्डाणाचे!
  रामानुजन फेलोशिप
  विदेशातील शिक्षणपद्धत : एक संपन्न अनुभव संस्था-उद्योग संवाद
  संशोधन आराखडय़ाचे लेखन
  सेंट्रल बँक ऑफ इंडिया लिपिकपदाची तयारी
  चव, गुणवत्ता आणि दर्जा यांचा संगम
स्नॅक्स सेंटरचा व्यवसाय
  आर्मी, नेव्ही, एअरफोर्स
  ज्ञानयुगात भाषांतरकार व्हा!
  डिफरन्ट एमबीए
सिंहगड बिझिनेस स्कूल
  यशाचा नवा मार्ग
करिअर पुस्तके

 

सेंट्रल बँक ऑफ इंडिया लिपिकपदाची तयारी
स्पर्धा परीक्षांचे जग हा स्तंभ लिहीत असल्यापासून लिखाण तोकडे पडावे इतक्या ठिकाणी भरती प्रक्रियेसाठी स्पर्धा परीक्षा घेण्यात येणार असल्याचे जाहीर झाले आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही एक अग्रगण्य राष्ट्रीयीकृत बँक असून या बँकेत आता लिपिक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
जवळपास प्रत्येक आठवडय़ाला कोणत्या तरी बँकेतर्फे केंद्र शासन अथवा राज्य शासनातर्फे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी सध्या नोकरी युग म्हणावे लागेल, असा काळ जात आहे. नोकऱ्या आहेत कुठे? नोकरीसाठी वशिला लागतो, असे म्हणणाऱ्यांसाठी हे नोकरीचे अर्ज म्हणजे एक चपराकच म्हणावी लागेल. या नोकरीच्या युगात नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांनी जीवनाला स्थैर्यता व सुरक्षितता मिळवून देणारी ही नोकरी मिळविण्याचे कसोशीने प्रयत्न करायला हवे.
स्पर्धा परीक्षांबाबत बरेचसे गैरसमज आहेत आणि तेही पसरविणारे म्हणजे या बाबतीतील अर्धज्ञानी व स्पर्धा परीक्षांतील अयशस्वी उमेदवार याबाबत आपणास जे वाटते, जे विचार आपल्या मनामध्ये येतात ते आपल्या विश्वासावर तसेच समजुतींवर आधारित असतात. या आपल्या वाटण्यातूनच आपला दृष्टिकोन तयार होत असतो आणि म्हणूनच हा दृष्टिकोन सकारात्मक ठेवण्यासाठी नकारात्मक दृष्टिकोन असणाऱ्या व्यक्तींपासून शक्यतो दूर राहण्याचा प्रयत्न करा. स्पर्धा परीक्षांची व्यवस्थित व योग्य माहिती करून घ्या. अभ्यासक्रम समजून घेऊन तो कसा व्यवस्थितपणे पूर्ण करता येईल
 

याबाबतचे तंत्र तयार करा. करिअरच्या वाटचालीत या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत म्हणून आपल्याकडील वेळेचा योग्य वापर करून घेऊन आपले उत्तम करिअर बनवा.
परीक्षेचा अभ्यासक्रम व तयारी : या परीक्षेसाठी टेस्ट ऑफ रिझनिंग, इंग्रजी, टेस्ट ऑफ न्युमरिकल अ‍ॅबिलिटी, टेस्ट ऑफ क्लेरिकल अ‍ॅप्टिटय़ूड असे चार विषय असून यासाठी एक तास पस्तीस मिनिटांचा कालावधी देण्यात येतो. प्रत्येक घटकावर ५० प्रश्न असून प्रत्येक घटकात स्वतंत्रपणे उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. ही परीक्षा पूर्णपणे वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाची असून या परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग पद्धत अवलंबिण्यात येते. तसेच या ऑब्जेटिव्ह पेपरनंतर डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा घेण्यात येते. या ऑब्जेटिव्ह व डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेत स्वतंत्रपणे उत्तीर्ण होणे आवश्यक आहे तसेच यात उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येते.
लेखी परीक्षा व मुलाखत यांच्या एकत्रित गुणांनुसार अंतिम निवड यादी बँकेतर्फे जाहीर करण्यात येईल.
टेस्ट ऑफ रिझनिंग- यालाच बुद्धिमापन चाचणी असे म्हणतात. यात शाब्दिक बुद्धिमापन चाचणी व अशाब्दिक बुद्धिमापन चाचणी असे दोन विभाग पडतात. अशाब्दिक बुद्धिमापन चाचणी या घटकात आकृत्यांची मालिका पूर्ण करणे, समान संबंध असणारी आकृती पर्यायातून निवडणे, एखाद्या कागदाला ठराविक ठिकाणी घडी घालून नंतर उघडल्यास पर्यायातील कोणत्या आकृतीप्रमाणे दिसेल. आकृतीची आरशातील प्रतिमा पर्यायातून निवडणे अशा प्रकारच्या प्रश्नांचा यात समावेश केलेला असतो. शाब्दिक बुद्धिमापन चाचणी या घटकात मालिका पूर्ण करणे वेगळी संख्या अथवा वर्ण शोधणे, आकृतीतील गाळलेल्या जागी योग्य संख्या पर्यायातून निवडणे, अक्षरांची अथवा अंकांची लयबद्ध रचना पूर्ण करणे, समान संबंध या घटकात अंक-अंक संबंध, वर्ण-अंक संबंध, वर्ण-वर्ण संबंध अशा प्रश्नांचा समावेश होतो. सांकेतिक भाषा या घटकात वर्णाचा अंकाशी संबंध जोडून भाषा तयार करणे त्याचप्रमाणे वर्णाचा संबंध चिन्हाशी जोडून भाषा तयार करणे, अशा प्रश्नांचा यात समावेश केलेला असतो. या व्यतिरिक्त दिशाविषयक प्रश्न, नातेसंबंध, माहितीचे पृथक्करण, वेन-आकृत्या, विधाने- अनुमान, घडय़ाळ व दिनदर्शिका यावर आधारित प्रश्न, बैठक व रांगेतील प्रश्न, आकृत्यांची संख्या मोजणे, अशा प्रश्नांचा यात समावेश केलेला असतो.
न्यूमरिकल अ‍ॅबिलिटी टेस्ट- या घटकात संख्या व संख्याप्रणाली, पदावली स्वरूपाची उदाहरणे, ल. सा. वि. व म. सा. वि., शतमान- शेकडेवारी, सरासरी, गुणोत्तर- प्रमाण, भागीदारी, नफा-तोटा, काळ-काम व वेग, अंतर- वेग व वेळ, घडय़ाळावरील उदाहरणे, नळ व हौद या घटकांवरील उदाहरणे, बोट व प्रवाहावरील प्रश्न, क्षेत्रफळ व पृष्ठफळ, समांतर रेषा, त्रिकोण व चौकोन या घटकांवर आधारित प्रश्न, पायथागोरस प्रमेयावर आधारित प्रश्न, मिश्रणावरील प्रश्न, आलेखावर तसेच माहितीवर आधारित प्रश्नांचा यात समावेश केलेला असतो. या घटकाचा अभ्यास करताना प्रथम गणितातील संबोध पक्के करून जास्तीत जास्त उदाहरणे सोडविण्याचा सराव
करावा. अशा प्रकारे या घटकाचे नियोजन केल्यास परीक्षेतील उदाहरणे सोडविणे सोपे होईल.
इंग्रजी भाषा- यात व्याकरणविषयक प्रश्नांचा समावेश केलेला असतो. समानार्थी शब्द व विरुद्धार्थी शब्द, अनेक शब्दांबद्दल एक शब्द, वाक्प्रचार व म्हणी, उताऱ्यावरील प्रश्न, वाक्यातील चुकीचा भाग ओळखणे, वाक्य सुधारून लिहिणे, क्रियापदाचे योग्य रूप लिहिणे, काही शब्दांना अधोरेखित करून त्या जागी पर्यायातील कोणते शब्द योग्य प्रकारे असू शकतात अथवा कोणत्याही नवीन शब्दाची आवश्यकता नाही हे सांगायचे असते. वाक्यात चेंज दि डिग्री, अ‍ॅक्टिव्ह वॉईस व पॅसिव्ह वॉईस यावर आधारित प्रश्न, उताऱ्यावरील प्रश्न अशा प्रकारच्या प्रश्नांचा यात समावेश केलेला असतो. यासाठी शब्दसंग्रह वाढविणे, त्याचप्रमाणे इंग्रजी वाचन फार आवश्यक आहे. एखादे इंग्रजी मासिक तसेच दररोज चांगली माहिती पुरविणारे इंग्रजी वर्तमानपत्र वाचावे.
क्लेरिकल अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट- यात एखादा पत्ता देऊन त्याच्याशी तसाच्या तसा जुळणारा पत्ता पर्यायातून निवडणे तसेच शब्दकोशाप्रमाणे शब्द लावल्यास पहिला, दुसरा, तिसरा अथवा चौथा कोणता शब्द येईल हे ठरविणे.
परीक्षापद्धती तसेच अभ्यासक्रम व्यवस्थितपणे समजून घेऊन तयारी केल्यास येणाऱ्या आर्थिक वर्षांत आपण सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी. परंतु त्यासाठी आवश्यकता आहे ती सातत्यूर्ण अभ्यासाची. मेहनत व योग्य दिशेने अभ्यासाच्या तयारीसाठी तर मग लागा अभ्यासाला.
प्रा. संजय मोरे
फोन : ९३२२३५०४६६
(लेखक हे मुंबई विद्यापीठातील बहि:शाल विभागात गणिताचे अध्यापन करतात.)