Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ फेब्रुवारी २००९
  रहस्यमय विज्ञान शाखा
फॉरेन्सिक सायन्स
  अकाऊन्टन्सी, चार्टर्ड अकाऊंन्टट, कॉस्ट अकाऊन्टिंग
  स्वप्न उड्डाणाचे!
  रामानुजन फेलोशिप
  विदेशातील शिक्षणपद्धत : एक संपन्न अनुभव संस्था-उद्योग संवाद
  संशोधन आराखडय़ाचे लेखन
  सेंट्रल बँक ऑफ इंडिया लिपिकपदाची तयारी
  चव, गुणवत्ता आणि दर्जा यांचा संगम
स्नॅक्स सेंटरचा व्यवसाय
  आर्मी, नेव्ही, एअरफोर्स
  ज्ञानयुगात भाषांतरकार व्हा!
  डिफरन्ट एमबीए
सिंहगड बिझिनेस स्कूल
  यशाचा नवा मार्ग
करिअर पुस्तके

 

सद्यस्थितीत खाद्यपदार्थ, स्नॅक्सला फार मागणी आहे. शिवाय कॅटरिंगचा व्यवसाय अगदी पूर्वापार चालत आहे. लग्नसमारंभाच्या वेळी अशा कॅटर्सच्या सेवेची गरज भासत असे, परंतु आता लग्न, मुंज, बारसे, बर्थ-डे, पार्टीज, विविध प्रकारांच्या कार्यक्रमांचे आयोजन, इव्हेंटस् सर्वच ठिकाणी खाण्या-पिण्याची सोय करण्यासाठी कॅटरिंगच्या सेवेची गरज भासते. त्यामुळे सद्यस्थितीत हा उद्योग अगदी तेजीत आहे आणि या उद्योगाचे भविष्यही उज्ज्वल आहे. या उद्योगाविषयी..
आज जागतिक मंदीच्या फटक्यामुळे एक लाखाहून अधिक लोकांचे रोजगार गेले आहेत. आतापर्यंत फक्त कामगार वर्गावर बेकारीची तलवार लटकत असायची. सुपरवायझर्स, मॅनेजर यांचे पगार वाढायचे, त्यांना बढत्या मिळायच्या, पण आता या वर्गाच्या डोक्यावरही बेकारीची तलवार लटकती आहे. जागतिकीकरणाने सर्व क्षेत्रातील संदर्भ बदलले आहेत. आज थोडय़ाच उपलब्ध असणाऱ्या नोकऱ्यांच्या बदल्यात असख्यांना नोकऱ्यांच्या संधी गमवाव्या लागतील. सातत्याने नवनिर्मिती करणारे, वेगळे काही तरी करणारे, जास्त काम करणारेच या स्पर्धेत टिकून राहतील. जे टिकून आहेत, त्यांना भविष्यात टिकून राहण्यासाठी आपले कौशल्य आणि ज्ञान
 

वाढवावे लागेल नाही तर स्पर्धेच्या जगात त्याचे काम आणखी चोखपणे करण्यासाठी स्पर्धक उभाच असेल, म्हणजे जो कसाबसा टिकला आहे त्याची शाश्वतही नाही, म्हणूनच उद्याच्या जगात उद्योजकता खूप महत्त्वाची आहे.
शिक्षण घेत असतानाच अथवा शिक्षण पूर्ण झाल्यावर एखादी नोकरी करीत असतानाच पूरक अभ्यासक्रम घेऊन उद्योजकतेचे आव्हान स्वीकारण्याचा विचार केला पाहिजे. अजूनही बहुतेक जग ‘उद्योग करणार आहेस, अरे नीट विचार केलास का, उद्योग नीट चालला नाही तर दिवाळे निघायचे, पैसे बुडतील, त्यापेक्षा एक वेळची भाकरी देणारी नोकरीच बरी’ अशा प्रकारचे सल्ले देणारी मंडळी नवीन उद्योग करणाऱ्याला मिळतात. आज जागतिकीकरणाने जगण्याचे संदर्भ बदलले आहे. या जगात जगण्यासाठी प्रत्येकाला संघर्ष करावाच लागणार आहे आणि उद्योजकीय वृत्ती अंगिकारावीच लागणार आहे, त्याशिवाय पर्याय नाही.
संधीच्या दालनापैकी चांगला अर्थार्जन मिळवून देणारा व्यवसाय म्हणजे स्नॅक्स सेंटरचा व्यवसाय. १०-१२ वर्षांपूर्वी पोळी-भाजी केंद्र, स्नॅक्स सेंटर एवढी नव्हती. तेव्हा फक्त छोटेखानी हॉटेल किंवा मोठी रेस्टॉरंट असायची. पण आज बदलत्या काळात पती-पत्नी दोघेही नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने म्हणजे स्नॅक्स सेंटरचा व्यवसाय. ग्राहकांच्या चवीचे स्वरूप बदलले आहे. फास्ट फूडबरोबरच हेल्दी फूडकडे त्यांचा कल जास्त आहे. त्यामुळे घराबाहेर कुठे खायचे असेल तर घरच्यासारखे स्वच्छ, दर्जेदार आणि चांगले अन्न जवळपास कुठे मिळेल याच्या शोधात ग्राहक असतो. आता फास्ट फूडबरोबरच खमंग, स्वादिष्ट, चमचमित फूडबरोबरच लाईट फूडसारख्या संकल्पनासुद्धा रुजू लागल्या आहेत. त्यामुळे शहरात जागोजागी पोळी-भाजी केंद्रे, स्नॅक्स सेंटर वाढली आहेत आणि येणाऱ्या काळात त्यांची संख्या अजून वाढेल.
स्नॅक्स सेंटरच्या व्यवसायामध्ये अर्थार्जनाची खूप चांगली संधी आहे. स्नॅक्स सेंटरमध्ये वडे, समोसा, कटलेट, डोशांचे विविध प्रकार, हराभरा कबाब, ब्रेडरोल, इडली, चाटमध्ये रगडा पॅटीस, शेवपुरी, दहीपुरी, पाणीपुरी सारख्या वैविध्यपूर्ण स्नॅक्स सेंटरमध्ये ठेवता येऊ शकतात आणि त्याला विशेष मागणी आहे. स्नॅक्स सेंटरच्या जोडीला कॅटरिंगचा बिझनेस, पोळी भाजी केंद्र सुरूही करता येईल. पण चव आणि दर्जा या दोघांची उत्तम सांगड घालून या व्यवसायामध्ये पदार्थाचा दर्जा टिकवणे खूप महत्त्वाचे आहे.
त्यामुळे हा व्यवसाय करताना तुमच्या अंगी पाककौशल्य असणे आवश्यक आहे. तुमच्याशिवाय तुमचे आचारी जे हे पदार्थ बनवणार आहेत ते अनुभवी, पाककौशल्येत निपुण असणे आवश्यक आहे.
स्नॅक्स सेंटरच्या व्यवसायात स्पर्धा खूप आहे, पण स्पर्धेचा बाऊ न करता व्यवसायात यश मिळवणे सहज शक्य आहे. त्यासाठी आपल्या कॅटरिंगचे ज्ञान असले पाहिजे. आपण ग्राहकाला देणाऱ्या सेवा इतर स्नॅक्स सेंटरपेक्षा अनोख्या, दर्जेदार असायला हव्यात. वाढप्यांचे कपडे स्वच्छ, नीटनेटके असावेत तसेच ड्रेसकोड व्यवस्थित असावा. अचानक अपुऱ्या पडलेल्या मनुष्यबळासाठी आपण एखाद्या महिला गृह उद्योगाची मदत घेऊ शकता. त्यांच्याशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले तर बहुतेक पदार्थासाठी त्यंचीही मदत घेता येईल, पण त्यासाठी त्यांची चव, दर्जा याचा आपणास अंदाज असायला हवा.
स्नॅक्स सेंटरचा व्यवसाय हा टीम वर्कचा व्यवसाय आहे, त्यामुळे सुरुवातीला पाच माणसांची किंबहुना अधिक माणसांची टीम तयार करणे आवश्यक आहे. यामध्ये तीन-चार कुक (आचारी), दोन-तीन जेवण सव्‍‌र्ह करण्यासाठी वाढपी तसेच स्वच्छतेसाठी काम करणारी माणसे अशी माणसांची टीम तयार करावी लागते.
रोज तयार कराव्या लागणाऱ्या स्नॅक्सची जय्यत तयारी करावी लागते. मेनूप्रमाणे आदल्या दिवशीच तयारी करावी लागते. सकाळच्या नाश्ता, चहा किंवा इतर शीतपेयांनंतर जेवणासाठी निश्चित केलेली वेळ त्यानुसार जेवणाचे अचूक व्यवस्थापन, त्याच प्री-प्लॅनिंग महत्त्वपूर्ण ठरते.
कोणत्याही कामाचे योग्य नियोजन केले तरच वेळेवर सुविधा देणे शक्य होते. स्नॅक्स सेंटरचा व्यवसाय हा चवीवर आधारित असतो. त्यामुळे चवीच्या बाबतीत आपली पत ठेवणे गरजेचे असते. आजकाल ग्राहकांच्या खाद्यपदार्थाच्या मागणीतही बदल केले जाऊ लागले आहेत. विविध प्रकारच्या पंजाबी, चायनिज, चाट आयटम्सना सुद्धा विशेष मागणी आहे. स्नॅक्स सेंटरचा व्यवसाय करणाऱ्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे, की काळानुरूप बदलणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे पदार्थाची चव, दर्जा, उत्कृष्ट व्यवस्थापन, आकर्षकपणा या बाबी महत्त्वपूर्ण ठरतात.
हा व्यवसाय करण्यासाठी केवळ कॅटरिंगचा कोर्स एवढीच बाब महत्त्वाची नसून व्यवसाय सुरू करण्यापूर्वी एक-दोन वर्षतरी एखाद्या कॅटर्सकडे एखाद्या हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये कामाचा अनुभव घेणे अतिशय महत्त्वपूर्ण ठरते, त्यामुळे या व्यवसायातील बारकावे लक्षात येतील.
कॅटरिंगचा प्रोफेशनल बिझनेस करावयाचा असल्यास पाककौशल्याशी निगडित काही कोर्स केले तर निश्चितच फायदा होऊ शकतो. आज स्नॅक्स सेंटरच्या व्यवसायाची चलती आहे, कारण सर्वाच्या वाढलेल्या कामाच्या वेळा, रात्री उशिरापर्यंत काम करण्याची कार्यसंस्कृती त्यामुळे स्नॅक्स सेंटरमधून पदार्थ पॅक करून घेणाऱ्या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मध्यमवर्ग, उच्चमध्यमवर्गाची संख्या वाढत आहे. दरडोई उत्पन्नही वाढत असल्यामुळे प्रक्रिया केलेले तसेच बाहेरचे अन्नपदार्थ खाण्याकडे लोकांचा कल चांगला आहे. त्यामुळे स्नॅक्स सेंटरचा उद्योग आज तर फायदेमंद तर आहेच पण या उद्योगाला उत्तम भविष्य आहे.
सारिका भोईटे-पवार
फोन: ९८१९५९७१३२/ २५३७९९४४.