Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ फेब्रुवारी २००९
  रहस्यमय विज्ञान शाखा
फॉरेन्सिक सायन्स
  अकाऊन्टन्सी, चार्टर्ड अकाऊंन्टट, कॉस्ट अकाऊन्टिंग
  स्वप्न उड्डाणाचे!
  रामानुजन फेलोशिप
  विदेशातील शिक्षणपद्धत : एक संपन्न अनुभव संस्था-उद्योग संवाद
  संशोधन आराखडय़ाचे लेखन
  सेंट्रल बँक ऑफ इंडिया लिपिकपदाची तयारी
  चव, गुणवत्ता आणि दर्जा यांचा संगम
स्नॅक्स सेंटरचा व्यवसाय
  आर्मी, नेव्ही, एअरफोर्स
  ज्ञानयुगात भाषांतरकार व्हा!
  डिफरन्ट एमबीए
सिंहगड बिझिनेस स्कूल
  यशाचा नवा मार्ग
करिअर पुस्तके

 

आजच्या ज्ञानाधिष्ठित युगात कोणत्याही क्षेत्रात काम करण्यासाठी यापुढे ज्ञान हेच अंतिम संसाधन असणार आहे. त्यामुळे सर्वाना ‘ज्ञानकर्मी नॉलेज वर्कर’ होणे आवश्यक आहे. कोणत्याही उत्पादन व सेवेतील ज्ञान हा कळीचा घटक झाला आहे. ज्ञान आणि कौशल्य यांची सांगड घालून वाटचाल करणे महत्त्वाचे ठरणार आहे. कोणत्याही व्यक्तीकडील, समूहाकडील, समाजाकडील व राष्ट्राकडील अद्ययावत ज्ञानाचा साठा व या ज्ञानाचा यथायोग्य उपयोग करण्याची क्षमता यांवरच एकूण स्पर्धात्मकता व समृद्धीची दशा आणि दिशा ठरणार आहे. त्यामुळे बहुसंख्याकांच्या भाषांना ज्ञानभाषा होण्यावाचून पर्याय नाही. खरेतर बहुसंख्याकांची भाषा ज्ञानभाषा असणे हेच मुळी व्यापक सक्षमीकरण करणारे, स्पर्धात्मकता देणारे मूल्य ठरणार आहे. अलीकडेच निधन झालेल्या सॅम्युअल हटिंग्टन या विचारवंतानी ‘संस्कृती कलहा’ची संकल्पना मांडून मोठा वादंग उडविला होता. यापुढे
 

समृद्धीसाठी कलह होण्याआधी स्पर्धा होईल ती ज्ञानावर आधारित स्पर्धात्मकतेच्या स्रोतांसाठी कलह व स्पर्धा होतील ते राष्ट्रांत व संस्कृतीत नसून विविध ज्ञानाधिष्ठित स्पर्धात्मकता असणाऱ्या बहुविध समूहांमध्ये ज्ञान हे भविष्याच्या उत्क्रांतीचे इंधन ठरणार आहे हे स्पष्ट आहे.
या विषयावर कार्यशाळा घेताना उपस्थितांचा एक प्रश्न असतो- ‘ज्ञानकर्मी झाले पाहिजे म्हणजे नक्की काय?’ अनेकांना वाटते की संगणकाचा वापर करता आला की ज्ञानकर्मी झालो. खरेतर ज्ञानाच्या वापराविषयीची तंत्रकौशल्ये आणि शुद्ध ज्ञान यात फरक करायला हवा. खरेतर माहिती आणि ज्ञान यांच्यातला फरक समजून सुरुवात करायला हवी. आपली शिक्षणपद्धती माहिती ठासून भरण्यावर व ते ज्ञान किती आठवते यावर आधारित आहे. परंतु माहिती म्हणजे ज्ञान नव्हे. ज्याला सर्वात अधिक माहिती आहे तोच सर्वात अधिक समृद्ध आणि सुरक्षित होण्याचे दिवस संपले. नाहीतर घरात शेकडो पुस्तके असणारा माणूस वरचढ ठरला असता. बंद पडलेली मशीन एका ठोक्यासरशी चालू करणारा, बाईकला किक मारून ती ऐकून काय बिघाड आहे याचा अचूक अंदाज बांधणारा ज्ञान असल्यासारखे वाटते. ठोका मारायचा कसा हे झाले कौशल्य, मात्र मारायचा कोठे हे झाले ज्ञान. माहितीला अनुभवाची प्रगल्भ जोड मिळाली की आपण त्याला ज्ञान असे म्हणू शकतो. अंतर्दृष्टी व शहाणपण या त्यापुढच्या पायऱ्या असू शकतात. एखादा अनुभवी कामगार कंपनी सोडून जातो वा निवृत्त होतो तेव्हा कंपनीकडील ज्ञानाचा ऱ्हास होतो. आपल्याकडे पारंपरिक म्हणावे असे प्रचंड अनुभवसिद्ध ज्ञान आहे. नाहीतर एवढय़ा विपरीत, प्रतिकूल परिस्थितीत आपले पूर्वज प्राप्त परिस्थितीला योग्य प्रतिसाद देऊन टिकून राहू शकले नसते. आपले ऋषीमुनी हेही ज्ञानकर्मीच होते. परमेश्वराच्या एकूण अस्तित्वाचा वेध घेणारे ऋषी ईश्वराविषयीचे ज्ञानी होते. आज चांद्रयान पाठविणारे आपले शास्त्रज्ञ- संशोधक- अभियंते हेही ज्ञानकर्मीच आहेत, ते ज्ञानानेच काम करतात.
ज्ञान जरी स्वत: सार्वभौम असले, त्याला भाषा वा माध्यमाची बंधने नसली तरीही त्याच्या उपाययोजनासाठी ते बहुसंख्य लोकांना त्यांच्या नेहमीच्या भाषेत उपलब्ध व्हायला हवे. राष्ट्राच्या प्रगतीचा मार्ग ज्ञानसंसाधने बहुसंख्यांना उपलब्ध करून देण्यातून जातो. त्यासाठी शिक्षण तसेच सुसंगत असायला हवे. यापुढे आर्थिक विषमतेपेक्षा माहितीची विषमता व माहितीच्या विषमतेहून ज्ञानाची, ज्ञानसंसाधनांच्या उपलब्धतेविषयी व वापराविषयीची विषमता ही सर्वात अधिक मारक ठरणार आहे. म्हणून मायमराठीला ज्ञानभाषा करण्यासाठी तातडीने, नियोजनबद्ध, व्यापक प्रयत्न व्हायला हवेत व त्याला संस्थात्मक स्वरूप यायला हवे. ज्ञानयुगात महाराष्ट्र याविषयी व्हिजन आकाराला यायला हवी. महाराष्ट्र ज्ञान मंडळासारखे शक्तीस्रोत आपल्याकडे उदयाला आले आहेत. इंटरनेटसारख्या माध्यमातून ज्ञानाचे अभिसरण, वहन सर्वदूर करता येईल. मात्र त्याआधी ज्ञान उपलब्ध करण्याचे आव्हान विचारात घ्यावे लागेल. महामार्ग असणे महत्त्वाचे आहे, मात्र त्यावरून न्यायचे काय हेही कळीचे आहे.
मराठीला ज्ञानभाषा करण्यासाठी भाषांतर हे कौशल्य अत्यंत कळीचे आहे. इंग्रजीत सर्वाधिक ज्ञाननिर्मिती होत असली तरीही इंग्रजीच नव्हे तर इतर देशी- विदेशी भाषांमधील ज्ञानभांडारे माय मराठीत यायला हवीत. अर्थात केवळ साहित्याचाच नव्हे तर इतर थेट विविध जीवन व्यवहारात उपयोगी ठरणाऱ्या ज्ञानाचे अभिसरण व्हायला हवे. तरच व्यापक सक्षमता येईल. ज्ञानकर्मी होण्यासाठी सर्वानीच इंग्रजी शिकायला हवे असे खचितच नव्हे. अद्ययावत ज्ञानाचा वापर करून आपल्या महाराष्ट्रातील दूरच्या गावातील शेतकऱ्याला त्याच्याकडील शेतीच्या तुकडय़ातून अधिक उत्पादन करण्याविषयीचे ज्ञान मराठीतच मिळायला हवे तरच तो ते वापरू शकेल. भाषांतरामुळे जगभरातील असे ज्ञान त्याला त्याच्या संदर्भात, त्याच्या भाषेत दिले तरच ते उपयुक्त ठरणार आहे. आपल्या कृषीविद्यापीठांकडून असे ज्ञान उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे. ज्ञानाच्या उपयोजनेत भाषेचा, एकूण माध्यमाचा अडसर येतोच. म्हणूनच ज्ञानकर्मी होण्यासाठी भाषांतरकौशल्य महत्त्वाचे आहे. इंटरनेटसारख्या तंत्रज्ञानाने ज्ञानाच्या स्रोतांपर्यंत जाण्यातील काळ-वेळ, अवकाश व अंतर यांना दूर केले असले तरीही भाषेचा अडसर आहेच, सुदैवाने युनिकोडसारखे ज्ञानाचे अभिसरण वाढविणारे तंत्रज्ञान आता दिमतीला आहे. भाषेच्या अस्तित्वाच्या लढाईत भाषांतरकार समर्थ योगदान देऊ शकतात.
राष्ट्रीय ज्ञान आयोगाचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी देशाला पाच लाख भाषांतरकारांची आवश्यकता असल्याचे म्हटले असून भाषांतरक्षेत्रात मोठय़ा संधी असल्याचे स्पष्ट केले आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर याविषयी मोलाची माहिती आहे. मात्र आपल्याकडे चांगल्या भाषांतरकारांची सर्वच क्षेत्रात वानवा असल्याचे दिसून येते. न्यायालयीन कामकाजाच्या भाषांतरासाठी वणवण करावी लागते. मिळालेला न्यायही लोकांना कळण्यासाठी भाषांतर करायला हवेच. तांत्रिक, आर्थिकच नव्हे तर सर्वच क्षेत्रांत भाषांतरकारांची मोठी आवश्यकता आहे. आपल्याकडे मराठीतून व्यवस्थापनासारखा ज्ञानविषय शिकविण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू झाला आहे. पण मराठीत व्यवस्थापनविषयक किती ग्रंथ आहेत बरे? आपल्याकडील साहित्य म्हणजे केवळ कथा, कविता, कादंबऱ्या अशी काहीशी संकुचित संकल्पना आहे. आर्थिक, व्यापारी विषयावरील लेखनही साहित्यच समजावे. मराठीत संगणकविषयक पुस्तके तुरळक स्वरुपात आहेत. एमआयटी, येलसारख्या कितीतरी प्रसिद्ध विद्यापीठांचे लाखो पानांचे अभ्याससाहित्य विनामूल्य महाजालावर उपलब्ध आहे. ते जर वापरता येईल अशा नेहमीच्या मराठीत झाले आणि सर्वदूर उपलब्ध झाले तर मराठीला कितीतरी बळ मिळेल. संतांची भाषा मराठी ज्ञानयुगाचीही भाषा होईल आणि मराठी बाळे या नव्या सिंहिणीचे दूध पिऊ लागतील.
महाराष्ट्राला मोठय़ा प्रमाणात भाषांतरकारांची आवश्यकता असणार आहे. मात्र यासाठी प्रशिक्षण देण्यासाठी काही ठोस उपाययोजना दिसून येत नाही. साने गुरुजी अनुवाद केंद्रांचे काम यादृष्टीने महनीय आहे. या उपक्रमाला शासनाने सर्वतोपरी पाठबळ द्यायला हवे. आंतरभारतीच्या माध्यमातून इतर देशी भाषांतील सर्जनशील साहित्यच नव्हे तर व्यवहारोपयोगी उपयुक्त ज्ञानही मराठीत आणण्यासाठी भाषांतरकौशल्याचे प्रशिक्षण द्यायला हवे. मराठीत बीए, एमए करणाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देऊन तयार करता येईल. भाषेतून करिअर घडविण्याच्या संधी देता येतील. यापुढे विविध इंटरनेटवरील संकेतस्थळांना स्थानिक भाषांतील मजकुराची आवश्यकता भासणार आहे, असे विविध अहवालांवरून लक्षात येते. ग्रंथायनच्या व्हीजनरी पंकज कुरुलकर यांनी मोठय़ा प्रमाणावर अनुवादित पुस्तके देशातील सर्वच भाषांत आणून सर्वदूर नेण्याचा जो महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे त्यातून एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. प्रकाशनव्यवसाय हा खरा तर ज्ञानव्यवसायच आहे. ग्रंथायनला मिळणारे यश पाहता यापुढे भाषांतरकौशल्य एक मौलिक कौशल्य ठरणार आहे हे लक्षात येते. तंत्रज्ञान, विविध ज्ञानक्षेत्रातील ज्ञानी मंडळी व त्यांच्याकडील ज्ञानाचे भाषांतर करून ते ज्ञान बहुसंख्याकांना उपलब्ध करून देणारे भाषांतरकार या त्रयींच्या माध्यमातून मोठी सर्वसमावेशक ज्ञानक्रांती घडून येईल. यासाठी भाषांतरकार होऊ इच्छिणाऱ्यांना केवळ भाषांतरकौशल्याचेच नव्हे तर ज्ञानव्यवस्थापनाचे- नॉलेज मॅनेजमेंटचे तसेच संगणक- इंटरनेटवापराचे प्रशिक्षण द्यावे लागेल.
प्रकाश अल्मेडा
almeida.prakash@gmail.com