Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ फेब्रुवारी २००९
  रहस्यमय विज्ञान शाखा
फॉरेन्सिक सायन्स
  अकाऊन्टन्सी, चार्टर्ड अकाऊंन्टट, कॉस्ट अकाऊन्टिंग
  स्वप्न उड्डाणाचे!
  रामानुजन फेलोशिप
  विदेशातील शिक्षणपद्धत : एक संपन्न अनुभव संस्था-उद्योग संवाद
  संशोधन आराखडय़ाचे लेखन
  सेंट्रल बँक ऑफ इंडिया लिपिकपदाची तयारी
  चव, गुणवत्ता आणि दर्जा यांचा संगम
स्नॅक्स सेंटरचा व्यवसाय
  आर्मी, नेव्ही, एअरफोर्स
  ज्ञानयुगात भाषांतरकार व्हा!
  डिफरन्ट एमबीए
सिंहगड बिझिनेस स्कूल
  यशाचा नवा मार्ग
करिअर पुस्तके

 

एखादा रक्ताचा डाग, एखाद्या वस्तूवर उमटलेले हातांचे ठसे, एखादा केस किंवा इतर काही तरी; परंतु त्या इतक्याशा क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टींवरून फॉरेन्सिक विशेषज्ञ शास्त्रीय दृष्टिकोनातून विश्लेषण करून त्या गुन्ह्याच्या तपासाला योग्य त्या दिशा मिळवून देतो. थोडक्यात, सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न केला जातो. अशी ही अद्भुत, रहस्यमय, आव्हानात्मक विज्ञान शाखा म्हणजेच फॉरेन्सिक सायन्स. फॉरेन्सिक सायन्स ही शाखा अधिकाधिक बळकट करण्याचा आटोकाट प्रयत्न भारत सरकारतर्फे करण्यात येत आहे आणि म्हणूनच विज्ञान व कायदा या दोन भिन्न शाखा परस्परांना पूरक ठरत असून त्यांच्यामधील अंतर कमी होत चाललेले आहे.
तुम्ही कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असा, ‘शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी पायापासूनच सुरुवात करावी लागते’, हा सुविचार जसा तुमच्या वैयक्तिक किंवा व्यावसायिक यशाशी संबंधित आहे त्याचप्रमाणे तो तुम्ही करीत असलेल्या कामाशीदेखील संबंधित आहे आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीला ठराविक घटनेमागील सत्य शोधून काढायचे असेल तेव्हा तर त्या व्यक्तीला त्या घटनेचा मुळापासून अभ्यास करून
 

मगच एखाद्या निष्कर्षांप्रत यावे लागते, मग ती व्यक्ती म्हणजे एखादा वकील असू दे, डॉक्टर असू दे, शास्त्रज्ञ असू दे किंवा मग एखादा गुन्हे अन्वेषण विभागातील फॉरेन्सिक विशेषज्ञ असू दे. बऱ्याचदा आपण रहस्यमय मालिका, चित्रपट किंवा कादंबऱ्यांमधून वाचतो किंवा पाहतो की, ज्या वेळी एखादा गुन्हा घडतो त्या वेळी त्या गुन्हेगाराकडून काही चुका होतात आणि त्यामुळे गुन्ह्याच्या ठिकाणी काही ना काही तरी संशयास्पद वस्तू मिळते, उदा. एखादा रक्ताचा डाग, एखाद्या वस्तूवर उमटलेले हातांचे ठसे, एखादा केस किंवा इतर काही तरी; परंतु त्या इतक्याशा क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टींवरून फॉरेन्सिक विशेषज्ञ शास्त्रीय दृष्टिकोनातून विश्लेषण करून त्या गुन्ह्याच्या तपासाला योग्य त्या दिशा मिळवून देतो. थोडक्यात, सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न केला जातो. अशी ही अद्भुत, रहस्यमय, आव्हानात्मक विज्ञान शाखा म्हणजेच फॉरेन्सिक सायन्स. भारताचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील हे तर एकदा म्हणालेच होते की, ‘गुन्हा तपासकार्यात सत्याची उकल करताना फॉरेन्सिक सायन्सचा जो हातभार लागतो तो नि:संशयपणे अत्यंत महत्त्वाचा असाच आहे.’ गुन्हा घडलेल्या ठिकाणी फॉरेन्सिक तंत्र जाणणारे विशेषज्ञ पोहोचणे ही अत्यंत आवश्यक बाब झालेली आहे. सध्याच्या गुन्हेगारी जगतामध्ये म्हणजेच उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून केलेल्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनातून तपास करावा लागतो व त्यासाठी आवश्यकता असते ती फॉरेन्सिक विशेषज्ञांची. अशा वैज्ञानिक आधारांवर मिळालेल्या निष्कर्षांच्या साहाय्याने न्यायदान प्रक्रियेत अधिक पारदर्शीपणा येतो. म्हणूनच पोलीस आणि न्यायालयेसुद्धा अशा प्रकारच्या शास्त्रीय तपासकार्याचाच आग्रह धरतात. फॉरेन्सिक सायन्स ही शाखा अधिकाधिक बळकट करण्याचा आटोकाट प्रयत्न भारत सरकारतर्फे करण्यात येत आहे आणि म्हणूनच विज्ञान व कायदा या दोन भिन्न शाखा परस्परांना पूरक ठरत असून त्यांच्यामधील अंतर कमी होत चाललेले आहे.
‘फॉरेन्सिक’ या शब्दातूनच गुन्हा शोधून काढण्याची शास्त्रीय पद्धत व तंत्र याच गोष्टी स्पष्ट होतात. अत्यंत भयंकर अशा खून, बलात्कार यांसारख्या घटनांमधील गुन्हेगार DNA प्रोफाईलिंग तंत्राच्या माध्यमातून शोधून काढणे, बॉम्बस्फोटासारख्या गुन्ह्याच्या ठिकाणी मिळालेल्या छोटय़ाशा संशयास्पद खुणेचे फॉरेन्सिक पृथक्करण करून शोध घेणे, गुन्ह्यात वापरलेल्या हत्यारांचा शोध घेणे, स्त्रियांवरील अत्याचार (उदा. हुंडाबळी) या संदर्भातील गुन्ह्यांच्या शोधकार्यात मदत यांसारख्या गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेण्याच्या कार्यात या तंत्राचा विशेष वापर केला जातो.
फॉरेन्सिकतज्ज्ञांचे प्रमुख कर्तव्य म्हणजे पुरावा म्हणून प्राप्त झालेल्या नमुन्यांचे मायक्रोस्कोप, स्पेक्ट्रोस्कोप, इन्फ्रारेड किरणे आणि अल्ट्रा-व्हायलेट किरणांच्या साहाय्याने प्रयोगशाळेत परीक्षण करणे आणि गुन्ह्यांचे मूळ कारण शोधून काढणे. या परीक्षणामध्ये रक्त, वीर्य आणि इतर द्रवपदार्थ, सुकलेल्या डागांचे परीक्षण इ. गोष्टी येतात. तसेच DNA प्रोफाईलिंगचा वापर करून नमुन्यांचा तुलनात्मक अभ्यास करणे, रक्त आणि लघवीच्या नमुन्यांचे पृथक्करण करून गुन्हेगाराच्या शरीरातील ड्रग्जच्या किंवा अल्कोहोलच्या प्रमाणाचा अंदाज घेणे इ.साठी या तंत्राचा वापर केला जातो.
या सर्व प्रयोगांमध्ये काम करणारे त्या त्या विषयातील खास प्रशिक्षण घेतलेले अनेक विशेषज्ञ या प्रयोगशाळेत काम करीत असतात. उदा. फोरेन्सिक पॅथोलॉजिस्ट पोस्टमार्टम परीक्षणानंतर मृत्यूमागचे कारण शोधून काढतात. मृत शरीराच्या परीक्षणानंतर फोरेन्सिक पॅथेलॉजिस्ट जखमेची खूण आणि वापरलेले हत्यार यांच्यातील विशिष्ट संबंधानुसार त्या हत्याराचा प्रकार कोणता? हे स्पष्ट करतात. बऱ्याचदा हे लोक वैद्यकीय शाखेतून आलेले असतात. फोरेन्सिक टॉक्सिकोलॉजिस्ट हे गुन्ह्य़ासाठी वापरलेल्या रासायनिक पदार्थ, ड्रग्ज किंवा विष या संदर्भात खुलासा करतात. फोरेन्सिक मानसोपचारतज्ज्ञ हे गुन्हेगाराची मानसिकता कशी आहे? हे शोधून काढतात. त्यासाठी म्हणजेच गुन्ह्य़ामागचे मूळ कारण शोधून काढण्यासाठी विविध चाचण्यांचा वापर करतात. फोरेन्सिक मायक्रोबायोलॉजिस्ट जैविक पुरावा शोधून काढतात तर फोरेन्सिक ओडोन्टोलॉजिस्ट दातांच्या संदर्भातील माहितीवरून गुन्हा शोधून काढण्याच्या कार्यात हातभार लावतात. DNA चाचणीचा वापर करून फोरेन्सिक फिंगर प्रिंट तज्ज्ञ हाताच्या ठशांचे नमुने अभ्यासतो. फोरेन्सिक अ‍ॅन्थ्रोपोलॉजिस्ट त्यांच्या ज्ञानाच्या व तंत्राच्या साह्य़ाने मानवी मृत देहाच्या अवशेषांचा अभ्यास करून मृत्यूमागचे कारण शोधून काढण्यास सहकार्य करतात.
या क्षेत्रात कार्य करू इच्छिणाऱ्या उमेदवाराकडे वैज्ञानिक/ शास्त्रीय दृष्टिकोन असणे आवश्यक आहे. असा उमेदवार तार्किक पद्धतीने विचार करणारा आणि अत्यंत जिज्ञासू असणे आवश्यक आहे. या क्षेत्रात येण्यासाठी उत्सुक असणारा उमेदवार भौतिक किंवा जीवशास्त्रीय विज्ञान या शाखेचा रसायनशास्त्र हा एक अधिक विषय अभ्यासलेला उमेदवार असावा तसेच जर सांख्यिकी या विषयाचे ज्ञान अशा उमेदवाराकडे असेल तर त्याचे पारडे अधिक जड होईल.
फोरेन्सिक पॅथोलॉजिस्ट होण्यासाठी उमेदवाराकडे M.B.B.S. ही पदवी व त्यानंतर फोरेन्सिक सायन्समध्ये M.D. करणे आवश्यक आहे. M.Sc. नंतर या क्षेत्रातील संशोधन करण्यात रस असलेला विद्यार्थी ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस (ALLMS) तर्फे उपलब्ध असलेल्या Ph.D. साठी जाऊ शकतो. फिंगर प्रिन्ट तज्ज्ञ होण्यासाठी कमीत कमी शैक्षणिक अर्हता M.Sc. किंवा फोरेन्सिक सायन्स/ जेनेटिक्स/ मॉलिक्युलर बायोलॉजी या विषयातील Ph.D. असणे आवश्यक आहे. फोरेन्सिक टॉक्सिकोलॉजीमध्ये कार्य करण्यासाठी M.Sc. किंवा या विषयातील Ph.D. किंवा MBBS असणे आवश्यक आहे. फोरेन्सिक अ‍ॅन्थ्रोपोलॉजिस्ट ही व्यक्ती फिजिकल बायोलॉजिकल अ‍ॅन्थ्रोपोलॉजी या विषयात Ph.D. घेतलेला असणे आवश्यक आहे.
भारतासारख्या विकसनशील देशामध्ये एकीकडे विज्ञान-तंत्रज्ञानाची प्रगती होत असताना, जागतिक महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करण्याची इच्छा असताना दुसरीकडे बऱ्याच समाज विघातक वृत्ती आपल्या समाजात वावरत असतात आणि म्हणूनच दुर्दैवाने अनेक गुन्हे घडत असतात. अशा गुन्ह्य़ांची उकल करण्यासाठी आपल्या शहरातील पोलीस दलाला, सी. बी. आय.सारख्या सरकारी यंत्रणांना फोरेन्सिक विशेषज्ञांची खूपच आवश्यकता आहे. म्हणून अशा उमेदवारांना साहजिकच प्रचंड मागणी आहे. तेव्हा जिज्ञासू, धाडसी, वेगळं काहीतरी करण्याची इच्छा असलेल्या तल्लख बुद्धिमत्तेच्या व तत्पर वृत्तीच्या युवकांनी या क्षेत्रात येण्याचा विचार नक्कीच करायला हवा.
फोरेन्सिक सायन्समध्ये अभ्यासक्रम चालविणाऱ्या भारतातील संस्था खालीलप्रमाणे-
१) अ‍ॅन्थ्रोपोलॉजी डिपार्टमेंट ऑफ युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली.
२) नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ क्रिमिनोलॉजी अ‍ॅण्ड फोरेन्सिक सायन्स, दिल्ली.
३) अन्ना विद्यापीठ, चेन्नई, तामिळनाडू.
४) बुंदेलखंड विद्यापीठ, झांसी, उत्तर प्रदेश.
५) डॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठ, आग्रा, उत्तर प्रदेश.
६) डॉ. हरिसिंग गौर विश्वविद्यालय, गौर नगर, सागर, मध्य प्रदेश.
७) युनिव्हर्सिटी ऑफ मद्रास, चेन्नई, तामिळनाडू.
८) उस्मानिया विद्यापीठ, हैद्राबाद, आंध प्रदेश.
९) कर्नाटक विद्यापीठ, धारवाड, कर्नाटक.
१०) पंजाबी विद्यापीठ, पतियाळा, पंबाज.
११) उत्कल विद्यापीठ, भुवनेश्वर, ओरिसा.
वरील सर्व विद्यापीठांमध्ये ट.रू. (फोरेन्सिक सायन्स)हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे.
तसेच मुंबईमध्ये टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस (ळकरर) सायन-ट्रॉम्बे रोड, देवनार येथे एम. ए. (क्रिमिनॉलॉजी) हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे.
सुहास कदम
suhaskadam11@yahoo.in