Leading International Marathi News Daily

बुधवार, २५ फेब्रुवारी २००९

क्रीडा

बदलत्या हवामानात कामगिरीतील सातत्य कायम राखण्याचे भारतापुढे आव्हान
न्यूझीलंडविरुद्ध पहिली ट्वेन्टी-२० लढत आज
ख्राईस्टचर्च, २४ फेब्रुवारी / पीटीआय
एएमआय पार्कवर उद्या, बुधवारी होणाऱ्या पहिल्या ट्वेन्टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट लढतीने बहुचर्चित भारत-न्यूझीलंड मालिकेचा शुभारंभ होत आहे. महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ न्यूझीलंड भूमीतही दर्जेदार कामगिरीची छाप पाडणार का, ही देशविदेशातील तमाम क्रिकेट रसिकांची उत्सुकताही या लढतीच्या अनुषंगाने शिगेला गेली आहे. मात्र, विश्वविजेत्या धोनीच्या टीम इंडियाला डॅनियल व्हेटोरीच्या न्यूझीलंड संघाच्या दणकटपणापेक्षा येथील सारख्या बदलणाऱ्या हवामानाचीच अधिक चिंता आहे.

नवा दिवस नवी लढत -धोनी
ख्राईस्टचर्च, २४ फेब्रुवारी / पीटीआय

महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाची आजपर्यंतची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. पण, कर्णधार धोनीने मात्र यापूर्वीच्या कामगिरीचा विचार करीत नसून ‘नवा दिवस नवी लढत’ या योजनेनुसार उद्या, बुधवारी न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या मालिकेतील पहिल्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये विश्वविजेतेपदाचा मान मिळवला असल्यामुळे या लढतीत धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाचे पारडे जड भासत आहे. उद्या, न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या लढतीत भारतीय खेळाडू पुन्हा नव्या जोमाने सुरुवात करतील, असा विश्वास कर्णधार धोनीने व्यक्त केला.

ऑस्ट्रेलियाला कमी लेखत नाही -आर्थर
डरबन, २४ फेब्रुवारी/वृत्तसंस्था

आम्ही ऑस्ट्रेलियाला त्यांच्या देशात जाऊन पराभूत केले असले तरी आगामी मालिकेत रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखालील संघाला कमी लेखण्याची चूक आम्ही करणार नाही, असे मत दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी व्यक्त केले आहे.दक्षिण आफ्रिका-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी गुरुवार २६ फेब्रुवारीपासून जोहान्सबर्ग येथे सुरू होत आहे.

युनूसच्या त्रिशतकाचा श्रीलंकेला तडाखा
कराची, २४ फेब्रुवारी / वृत्तसंस्था

कर्णधार युनूस खानने कारकिर्दीतले पहिलेच त्रिशतक झळकावत यजमान पाकिस्तानला श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात सुरक्षित केले. उत्तम तंत्र, अप्रतिम मनोनिग्रह तसेच लढवय्या वृत्तीचा सुरेख मेळ साधत युनूस खानने नाबाद ३०६ (५४५ चेंडू, २७ चौकार, ४ षटकार) धावांची खेळी केली आणि पाकिस्तानने श्रीलंकेच्या ६४४ ( ७ बाद डाव घोषित) धावांना चौथ्या दिवसअखेर ५ बाद ५७४ धावांचे सडेतोड उत्तर दिले. श्रीलंकेची पहिल्या डावातील धावसंख्या गाठण्यासाठी आता यजमान पाकिस्तानला केवळ ७० धावांची गरज असून त्यांचे ५ फलंदाज शिल्लक आहेत. आजचा खेळ संपला तेव्हा त्रिशतकवीर युनूस खानला यष्टिरक्षक फलंदाज कमरान अकमल २७ धावा काढून साथ देत होता.

कनेरियाने प्रयोग थांबवावेत- वकार
कराची, २४, फेब्रुवारी/ पीटीआय

जर क्रिकेट विश्वात जास्त दिवस काढायचे असतील तर प्रयोग थांबवून पुन्हा एकदा गोलंदाजीचा विचार करावा असा सल्ला फिरकी गोलंदाज दानिश कनेरियाला पकिस्तानचा माजी कर्णधार आणि रिवर्स स्विंगचा बादशहा असलेल्या वकार युनूसने दिला आहे.जर एखादा गोलंदाज ५० पेक्षा जास्त सामने खेळला असेल आणि त्याच्या नावावर २०० हून आधिक विकेट्स असतील तर त्याच्याकडून नक्कीच सर्वाच्या अपेक्षा वाढलेल्या असतात आणि तो त्याच्याकडील अनुभवाने त्यांची अपेक्षापूर्ती करीत असतो.

मुंबई उपनगरचे निर्विवाद वर्चस्व
महापौर चषक मल्लखांब आणि अ‍ॅक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धा
मुंबई, २४ फेब्रुवारी/क्री.प्र.
१९ व्या मुंबई महापौर चषक मल्लखांब आणि अ‍ॅक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेवर दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशीही मुंबई उपनगरच्याच खेळाडूंनी निर्विवाद वर्चस्व गाजवले.
मल्लखांब स्पर्धेच्या १४ वर्षांखालील गटात बोरिवली स्पोर्टस् अ‍ॅण्ड कल्चरल सेंटरचा अभिषेक देवल आणि साताऱ्याची आरती कोल्हापूरे यांनी पुरलेला मल्लखांब आणि दोरीवरील मल्लखांबावरील कसरतींनी रसिकांची तसेच परीक्षकांची मने जिंकून अजिंक्यपदाचा मान मिळवला. या दोघांच्या करामतीमुळेच सातारा जिल्ह्य़ाने मुलींच्या गटात तर बोरिवली स्पोर्टस् अ‍ॅण्ड कल्चरल सेंटरने मुलांच्या गटात सांघिक विजेतेपदही मिळवले.

आयसीएल मुद्यावर एप्रिलमध्ये दुबईत चर्चा
जोहान्सबर्ग,२४ फेब्रुवारी/वृत्तसंस्था

इंडियन क्रिकेट लीगला (आयसीएल) मान्यता देण्याच्या मुद्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एप्रिलमध्ये दुबई येथे होणाऱ्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत चर्चा होणार आहे.
इंडियन क्रिकेट लीगला मान्यता द्यावी, असा अर्ज या लीगचे निर्माते सुभाष चंद्रा यांनी आयसीसीकडे केला आहे. या मागणीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेच निर्णय घ्यावा, असे आयसीसीच्या काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत ठरले होते. त्यानुसार आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष डेव्हिड मॉर्गन, मुख्य कार्यकारी अधिकारी हरुन लॉरगॅट, सुभाष चंद्रा, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव एन. श्रीनिवासन, इंडियन क्रिकेट लीगच्या व्यवसाय विभागाचे प्रमुख हिमांशू मोदी यांची काल रात्री येथे बैठक झाली. तीन तास चाललेल्या या बैठकीत आयसीएलच्या मान्यतेच्या मुद्यावर कोणताही निर्णय होऊ शकला नाही. आयसीसीच्या कार्यकारी मंडळाची बैठक आजपासून येथे चालू झाली आहे. आयसीएलच्या मागणीसंदर्भात आयसीसीच्या येथील बैठकीत चर्चा होणार नाही. आयसीसीच्या एप्रिलमध्ये दुबई येथे होणाऱ्या बैठकीत या मुद्यावर चर्चा होईल, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

दुबई ओपन : पेस-ड्लोहीचे आव्हान संपुष्टात
दुबई, २४ फेब्रुवारी/ पीटीआय

दुबई टेनिस अजिंक्यपद स्पर्धेतील दुहेरीच्या पहिल्याच सामन्यात भारताचा लिएण्डर पेस आणि त्याचा सहाकारी लुकास ड्लोही या तिसऱ्या मानांकित जोडीला सायमोन बोलेल्ली आणि ईव्हो कलरेविच या बिगर मांनाकित जोडीने ६-४, २-६, १०-८ असे पराभूत केला असून त्यांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. पहिला सेट ६-४ असा गमावल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये पेस-ड्लोही जोडीने दमदार पुनरागमन केले. दुसरा सेट त्यांनी ६-२ असा सहज खिशात टाकल्यानंतर ते सामन्यावर पकड घेतील असे वाटत होते. पण त्यानंतर खेळविण्यात आलेल्या निर्णायक ट्रायब्रेकरमध्ये बोलेल्ली-कलरेविच जोडीने आक्रमक खेळ करीत सेटसह सामना जिंकत उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला. भारताचे महेश भूपती आणि प्रकाश अमृतराज यांचे त्यांच्या सहकाऱ्यांबरोबरचे दुहेरीतले सामने उद्या खेळविण्यात येणार आहेत. दुसऱ्या मानांकित महेश भूपती आणि त्याचा सहकारी मार्क नोल्स यांचा सामना संयुक्त अरब अमिरातीच्या मोहम्मद अब्बास आणि मोहम्मद नादेन या जोडीबरोबर होणार आहे. तर प्रकाश अमृतराज आणि त्याचा सहकारी ऐसाम-अल-हक कुरैशी यांचा पहिला सामना झेक प्रजासत्ताकच्या मर्डीन डॅम आणि त्याचा स्वीडनचा साथीदार रॉबर्ट लिन्डस्टेट यांच्याशी होणार आहे.