Leading International Marathi News Daily

बुधवार, २५ फेब्रुवारी २००९

‘केसरी’ टूर्सच्या ठाणे येथील अद्ययावत कार्यालयाचे उद्घाटन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे व शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. ‘केसरी टुर्स’च्या वीणा पाटील यांनी लिहिलेल्या ‘वीणाज् वर्ल्ड’ या पुस्तक मालिकेतील ‘नॉर्थ अमेरिका’ या पुस्तकाचे प्रकाशनही ठाकरे यांच्या हस्ते यावेळी झाले. केसरी पाटील हेही यावेळी उपस्थित होते.

शिक्षणापासून वंचित मुलांच्या भवितव्यासाठी अग्रवाल महाविद्यालयाचा अनुबंध
ठाणे/प्रतिनिधी :
कॉलेज म्हणजे मौजमजा, डेज, फन अँड एन्जॉयमेंट हे नेहेमीचं समीकरण. मात्र अग्रवाल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी त्यापलीकडे जाऊन काही सृजनात्मक उपक्रम हाती घेतले आहेत. कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा गट ‘अनुबंध’ आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांनी ६ व ७ फेब्रुवारी रोजी ‘वंचित मुलांच्या शिक्षण विकासात महाविद्यालयांचा सहभाग’ यावर राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित केली होती. महाविद्यालयातर्फे भंगार गोळा करणाऱ्या, स्टेशनवर फिरणाऱ्या मुलांसाठी अनौपचारिक शिक्षणवर्ग चालवले जातात. त्याची एक व्यापक मांडणी करण्यासाठी आचार्य अत्रे सभागृहात कार्यशाळा घेतली.अण्णाभाऊ साठेनगर वस्तीतील मुलांनी डॉ. अनिल अवचट यांच्या ‘सृष्टीत-गोष्टीत’ या पुस्तकातील काही गोष्टींवर नाटय़रूपांतर सादर करून कार्यशाळेचे उद्घाटन केले.

डम्पिंग बंद करण्याचे आश्वासन फोल
मुंबईच्या कचरा दुर्गंधीचा ठाण्याला विळखा!

सोपान बोंगाणे

ठाणे-मुलुंड हद्दीवरील कचरा डम्पिंगच्या दुर्गंधीने आता ठाणे शहरातील निम्म्या वस्तीला विळखा घातला आहे. विशेषत: सकाळ व सायंकाळच्या वेळी सुटत असलेल्या कचऱ्याच्या जीवघेण्या दुर्गंधीमुळे ठाणेकर त्रस्त झाले असून, मुलुंड येथील हे कचरा डम्पिंग तातडीने बंद करून ते इतरत्र हलविण्याच्या विधीमंडळात दिलेल्या आश्वासनालाही सरकारने हरताळ फासला आहे.

पालिकेच्या अनुदानाची टीएमटीकडून उधळपट्टी
संजय बापट

डबघाईला आलेल्या ठाणे परिवहन सेवेला उभारी आणण्यासाठी प्रशासनाकडून पालिकेकडे दरवर्षी कोटय़वधी रुपयांच्या अनुदानाची मागणी केली जाते. ठाणेकरांची गरज लक्षात घेऊन पालिकाही भरीव अनुदान देते. मात्र या अनुदानाचा सुयोग्य कारणासाठी वापर करण्याऐवजी त्याची मोठय़ा प्रमाणात इतर खर्चावरच उधळपट्टी केली जात असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे यापुढे अनुदान देताना थेट टीएमटीला न देता संबंधित कामावरच पालिकेने खर्च करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा एनआरसी कामगारांचा इशारा
कल्याण/वार्ताहर -
नॅशनल रेयॉन कंपनीच्या एनआरसी मजदूर संघ या कामगार संघटनेने केलेल्या तीन करारांमुळे कामगारांना भाजी विकायचा व्यवसाय, तर महिलांना पापड करून आपला संसाराचा गाडा चालविण्याची वेळ आणली असून, देशोधडीला लागलेले कामगार येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत बहिष्काराचे हत्यार उपसणार असल्याचे एनआरसी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष भीमराव डोळस यांनी सांगितले.

भिवंडीत कृषी कन्या शेतकरी मंडळाची स्थापना
ठाणे/वार्ताहर

बँक ऑफ महाराष्ट्र गणेशपुरी शाखा व राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक यांच्या संयुक्त विद्यमाने घोटगाव, ता. भिवंडी, जि. ठाणे येथे कृषी कन्या शेतकरी मंडळाची स्थापना नुकतीच मान्यवरांच्या उपस्थितीत झाली.या कार्यक्रमात बँक ऑफ महाराष्ट्राचे ठाणे क्षेत्रीय कार्यालयाचे उपमहाव्यवस्थापक विलास आंबेकर, तसेच नाबार्डचे जिल्हा समन्वय अधिकारी ए.वाय. पाटील, तसेच अग्रणी बँक अधिकारी अनंत घाटे उपस्थित होते. आंबेकर यांच्या हस्ते शेतकरी मंडळाचे उद्घाटन करण्यात आले.
प्रसाद चिकित्साचे प्रोजेक्ट मॅनेजर वर्षां परचुरे यांनी प्रास्ताविक केले, तसेच शेतकरी मंडळाच्या वतीने मंडळाच्या अध्यक्षा बंदिनी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.प्रभाकर परब, नाबार्डचे ए.वाय. पाटील, अग्रणी बँक अधिकारी अनंत छाटे आदींची यावेळी भाषणे झाली. कृषी कन्या शेतकरी मंडळ या महिलाच शेतकरी असल्यामुळे आजूबाजूच्या गावांतील सुमारे हजार शेतकरी उपस्थित होते.

भिवंडी लोकसभा मतदारसंघात बहुजन समाजाचे वर्चस्व
भिवंडी/वार्ताहर :
भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मतदारांची जातीय लोकसंख्या पाहता अल्पसंख्याकांपेक्षा आगरी कुणबी मिळून बहुजनांची मते सर्वाधिक असल्याने, या मतदारसंघात बहुजन समाजातील उमेदवार द्यावा, अशी एकमुखी मागणी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे. अल्पसंख्याकास उमेदवारी दिल्यास जातीयवादी शक्तींनाच त्याचा फायदा होईल, असे त्यांचे म्हणे आहे.
भिवंडी लोकसभा मतदारसंघात १४ लाख ५० हजार मतदार आहेत. त्यापैकी चार लाख ५० हजार आगरी समाजाची, चार लाख ५० हजार कुणबी समाजाची, तीन लाख मुस्लिम, एक लाख ५० हजार आदिवासी व दलित समाजाची मते आणि एक लाख गुजराथी, मारवाडी व दक्षिण भारतीय समाजाची मते आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी या मतदारसंघातून काँग्रेसतर्फे बहुजन समाजातील माजी महापौर सुरेश टावरे, ज्येष्ठ नेते गुरुनाथ टावरे, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश घोलप आदी इच्छुक आहेत. खासदार दामू शिंगडा यांनीही पालघरऐवजी भिवंडीतून तिकीट मिळविण्याचे प्रयत्न केले, मात्र बहुसंख्य कॉंग्रेस नेत्यांनी त्यास विरोध केल्याने त्यांनी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू अरुण सावंत यांचे नाव पुढे केले. सावंत यांनी मुंबईतील काही जवळच्या पत्रकारांना ही माहिती दिली. ते वाडय़ाचे मूळ रहिवासी असले तरी याभागात त्यांचे कार्य वा संपर्क नसल्याने ही शिंगडा यांचीच खेळी असल्याचे मानले जाते.

गॅस व विजेच्या संपर्काने गंधारे येथे स्फोट
कल्याण/प्रतिनिधी -
गंधारे येथील एका बैठय़ा घरात सिलिंडरच्या टाकीतून बाहेर पडलेला गॅस आणि विजेचा संपर्क येऊन स्फोट झाला. यामध्ये घराच्या एका बाजूची भिंत कोसळली व एक जण जखमी झाला. आज दुपारी ही घटना घडली. गंधारे येथील एका बैठय़ा घरात अशोक व शिवाजी लोखंडे हे भाऊ एकत्रित कुटुंबपद्धतीने राहतात. अशोक हे कामानिमित्त घराबाहेर गेले होते. घरात त्यांचे वडील दामू लोखंडे होते. सिलिंडरमधून बाहेर पडलेला गॅस विजेच्या संपर्कात येताच घरात स्फोट झाला. घराच्या एका बाजूची भिंत स्फोटामुळे कोसळली. त्यात दामू लोखंडे हे जखमी झाले आहेत.

परिवहन समिती सदस्य नेमणुकीची ‘स्थायी समिती’ होऊ न देण्याची मागणी
कल्याण/प्रतिनिधी -
पालिकेच्या परिवहन समिती सदस्यांची नियुक्ती करण्यापूर्वी शासनाचे मत व विधी विभागाचा सल्ला घेण्यात यावा, मगच या नेमणुका करण्यात याव्यात, अन्यथा स्थायी समिती सदस्य, सभापती नियुक्तीप्रमाणे परिवहन समिती सदस्यांच्या नियुक्तींचा नव्याने गोंधळ सुरू होईल, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक व एमएमआरडीएचे सदस्य रवि पाटील यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. परिवहन समितीमधील सहा सदस्य निवृत्त होत आहे. नवीन सदस्य नियुक्त करण्यासाठी येत्या २७ फेब्रुवारी रोजी सभा घेण्यात येणार आहे. ही सभा शासनाचे मत आल्याशिवाय घेऊ नये किंवा अगोदरच रद्द करण्याची यावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. उपायुक्त संजय घरत म्हणाले, सभा रद्द करावी किंवा कसे हे शासनाचे अधिकार आहेत. मात्र शासनाचे मत, कायदेशीर सल्ला घेऊन या नेमणुका करण्यात आल्या तर कोणताही पेच उद्भवणार नाही. शासनाकडून आदेश आल्याशिवाय नेमणुकांच्या प्रक्रियेत प्रशासन हस्तक्षेप करणार नाही. ठरल्या दिवशी त्या घेण्यात येतील.