Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ फेब्रुवारी २००९
विविध
(सविस्तर वृत्त)

‘स्लमडॉग मिलिऑनर’ने कमावले मिलियन डॉलर
नवी दिल्ली, २४ फेब्रुवारी/पीटीआय

 

‘स्लमडॉग मिलिऑनर’ या चित्रपटाने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात आठ पारितोषिके पटकावून बाजी मारली असली तरी त्याला प्रेक्षकांचाही उदंड प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाला जेवढा खर्च आला त्याच्या दहापट व्यवसाय या चित्रपटाने केला असून, ८०० कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसा मिळाला आहे. भारतात या चित्रपटाने ३० कोटी रुपयांचा व्यवसाय केला असल्याचे समजते. दिल्ली व महाराष्ट्र सरकारने हा चित्रपट करमुक्त केला आहे. आता ऑस्कर मिळाल्याने या चित्रपटाचा प्रेक्षकवर्ग आणखी वाढणार असल्याचा उद्योगक्षेत्रातील तज्ज्ञांचा अंदाज आहे. या चित्रपटासाठी ७५ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. इंग्लंडच्या फिल्म-४ व सेलादोर फिल्म्स यांनी भारतीय कलाकारांच्या मदतीने हा चित्रपट तयार केला असून, कालपर्यंत १६३ दशलक्ष डॉलर म्हणजे ८०० कोटी रुपयांपेक्षा अधिक धंदा त्याने केला आहे. करमणूकविषयक व्हरायटी या नियतकालिकाने ही माहिती दिली आहे.
अमेरिकी चित्रपटगृहांत सध्या जे चित्रपट चालू आहेत त्यात ‘स्लमडॉग मिलिऑनर’ हा चित्रपट चौथ्या क्रमांकावर असून, तो आता आणखी वरच्या स्थानावर सरकण्याची शक्यता आहे. रविवारी रात्री ऑस्कर जाहीर झाल्यानंतर आता या चित्रपटाचा प्रेक्षकवर्ग वाढून उत्पन्नही वाढणार आहे. स्लमडॉग मिलिऑनरने अमेरिकेत ९८ दशलक्ष डॉलरचा व्यवसाय केला असून, इतर ठिकाणी ६५ दशलक्ष डॉलरचा गल्ला मिळवला आहे. संपूर्ण जगात हा चित्रपट २०० दशलक्ष डॉलर उत्पन्नाकडे वाटचाल करील, असा अंदाज आहे. रविवारी ऑस्कर पुरस्कार जाहीर होण्याच्या अगोदरच्या काळात या चित्रपटाने अमेरिकेत २० लाख डॉलरचा व्यवसाय केला होता. शनिवारी चार दशलक्ष डॉलरपेक्षा कमी व्यवसाय केला, तर शुक्रवारी या चित्रपटाने २.१ दशलक्ष डॉलरची कमाई अमेरिकेत केली होती.