Leading International Marathi News Daily
बुधवार, २५ फेब्रुवारी २००९
विविध
(सविस्तर वृत्त)

‘स्लमडॉग’च्या बालकलाकारांची डिस्नेलॅण्डला भेट
वॉशिंग्टन, २४ फेब्रुवारी / पी.टी.आय.

 

स्लमडॉग मिलिऑनर या चित्रपटाच्या ऑस्कर यशानंतर त्यातील बालकलाकारांच्या चमूने त्यांची स्वप्नमय सफर चालूच ठेवली असून, आज त्यांनी डिस्नेलॅंडला भेट दिली. अनेक अमेरिकी पाहुण्यांचे त्यांची छायाचित्रे टिपण्यासाठी कॅमेरे सरसावले.
या चित्रपटात मुख्य अभिनेत्री लतिका हिची बालपणातील भूमिका साकार करणारी मुंबईची तन्वी लोणकर हिने डिस्नेलँड येथून वृत्तसंस्थेला सांगितले की, येथे जे लोक आम्हाला पाहण्यासाठी उत्सुकतेने आले होते त्यांनी आम्हाला लगेच ओळखलेही व त्यांनी कुतुहलाने आमची छायाचित्रे टिपली. अजूनही ऑस्करच्या स्वप्नवत प्रवासातून अजूनही बाहेर न आलेली तन्वी भारावलेल्या मनस्थितीत आहे. ती मूळची गोरेगावची आहे. अमेरिकेतील हे वास्तव्य या सगळ्याच बालचमूसाठी गोड स्वप्नमालिकेसारखे आहे.
अमेरिकेत गेल्यानंतर कुठल्या गोष्टींशी जुळवून घ्यावे लागले असे विचारले असता तन्वी म्हणाली की, मला मांसाहार करायला आवडत नाही त्यामुळे मी शाकाहारी अन्न पसंत केले. मागणी केली तर भारतीय प्रकारचे अन्न दिले जाईल असे आम्हाला आयोजकांनी सांगितले होते. पण शाकाहारी अन्न मागवल्यानंतर खूप वेळ लागत होता तरीही मी ब्रेकफास्ट व जेवणासाठी शाकाहारी पदार्थच घेतले. स्लमडॉगची घोषणा होईपर्यंत ऑस्कर कार्यक्रमातील थोडा वेळ कंटाळवाणा गेला खरा पण कोडॅक थिएटरमधील रेड कार्पेटवरून चालताना व नंतर आम्हाला जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्यामुळे सगळे काही भरून पावल्यासारखे वाटले.
तन्वीचे वडील गणेश तिच्याबरोबर होते, त्यांनी सांगितले की, लॉसएंजल्सच्या प्रवासात बच्चेकंपनीला आश्चर्याचे सुखद धक्के बसले. लंडन विमानतळावर थांबलो तेव्हा लोक आले व त्यांनी शुभेच्छा दिल्या तो आनंदाचा क्षण होता. अमेरिकेत कडक सुरक्षा असताना स्लमडॉगच्या कलाकार चमूला मात्र सगळीकडे सस्मित सेवा मिळाली त्यांना नेहमीच अग्रक्रम देण्यात आला. अमेरिकी प्रसारमाध्यमांनी प्रचंड प्रमाणात या सगळ्याला प्रसिद्धी दिली.
तन्वीची आई शर्मिला मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात पॅरा मेडिकल स्टाफ म्हणून काम करते तिने आपल्या मुलीच्या दर्शनासाठी दूरचित्रावाणी संच लावून ठेवला होता. स्लमडॉगच्या चमूतील ती चिमुकली काहीशी लाजाळू वाटत होती.