Leading International Marathi News Daily

बुधवार, २५ फेब्रुवारी २००९

व्यक्तिवेध

‘भारतीय पत्रकारितेतील प्रथम महिला’ म्हणून ज्यांचा आदराने उल्लेख केला जातो, त्या अमिता मलिक यांचे गेल्या आठवडय़ात, २० फेब्रुवारी रोजी, वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. निधनाची बातमी आली आणि भारतीय रेडिओ, टीव्ही आणि प्रिंट मीडिया क्षेत्राचा गेल्या अनेक दशकांचा- पाहिलेल्या आणि त्याही पूर्वीच्या, न पाहिलेल्या दशकांचा पट उलगडत गेला. ज्येष्ठ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या चित्रपट समीक्षक आणि दूरचित्रवाणी माध्यमाच्या समीक्षक म्हणून अमिता मलिक यांचा वावर विसाव्या शतकाच्या उत्तरार्धाने सातत्याने आणि प्रकर्षांने अनुभवला. १९२१ मध्ये जन्मलेल्या अमिता यांनी १९४४ मध्ये ऑल इंडिया रेडिओच्या लखनौ केंद्रावर आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली आणि १९४६ मध्ये त्या दिल्ली केंद्रावर आल्या; दिल्लीकर झाल्या आणि पुढे देशाच्या प्रसारण व पत्रकारिता क्षेत्राच्या केंद्रस्थानी राहिल्या. ‘स्टेट्समन’, ‘टाइम्स ऑफ इंडिया’, ‘इंडियन एक्स्प्रेस’ आणि अगदी

 

आता-आतापर्यंत म्हणजे महिन्याभरापूर्वीपर्यंत ‘पायोनियर’मधून त्यांनी सदर लेखन केले. ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये ८० च्या दशकात दूरचित्रवाणीवरील त्यांचे ‘साइट अँड साऊंड’ हे सदर प्रसिद्ध होत असे. ऑल इंडिया रेडिओवर अमिता मलिक यांच्या कारकीर्दीची सुरुवात झाली, तर दूरचित्रवाणी माध्यमाचा भारतातला जन्म हाच त्यांची कारकीर्द ऐन भरात असतानाचा. दूरचित्रवाणीवरच्या समीक्षा-लेखनाच्या त्या अशा प्रकारे ‘पायोनियर’ तर होत्याच, या समीक्षेला आकार देतानाच दूरचित्रवाणी माध्यमाला त्याचे व्यक्तिमत्व देण्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हातभार लावण्याचे मोठे कामही त्यांच्या हातून झाले आहे. ‘स्टेट्समन’चे तत्कालीन संपादक जेम्स कॉली यांनी त्यांना ‘लिसनिंग पोस्ट’ या सदराच्या रूपाने चित्रपट समीक्षा लिहायला उद्युक्त केले. सत्यजित राय-मृणाल सेन-ऋत्विक घटक भारतीय सिनेमाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवू लागले होते तो हा काळ होता. ऑल इंडिया रेडिओच्या विकासातल्या विविध टप्प्यांच्या आणि पुढे १९५९ नंतर दूरचित्रवाणीच्याही विकासाच्या त्या साक्षीदार, इतिहासकार होत्या. १९६५ पासून खऱ्या अर्थाने नियमितपणे दूरचित्रवाणीचे प्रक्षेपण सुरू झाले तेव्हा ६७ मध्ये तर अमिता मलिक यांनी त्यावर मार्लन ब्रँडो आणि सत्यजित राय यांच्याबरोबर कार्यक्रम सादर केले. फाळणीपाठोपाठ सांप्रदायिक दंग्यांचा ऐन भर असतानाच्या काळात अमिता यांनी इक्बाल मलिक यांच्याशी विवाह केला. मलिक यांचे कुटुंबीय लाहोरमध्ये, पण सेक्युलर विचारांच्या इक्बाल मलिक यांनी भारतातच राहणे पसंत केले. इक्बाल मलिक सरकारी नोकरीत आणि म्हणून प्रसिद्धीच्या झोतापासून दूर, तर अमिता मलिक यांच्यावर पत्रकारिता- प्रसारण- प्रक्षेपण क्षेत्रामुळे सतत वाढता प्रकाशझोत. यातून वैवाहिक जीवनात तणाव निर्माण झाले, दोघे वेगळे झाले, तरी इक्बाल मलिक यांच्या आजारपणात, शेवटच्या आजारपणातही अमिता मलिक यांनी त्यांची काळजी घेतली. व्यक्तिगत जीवनातल्या या भरती-ओहोटीला तोंड देत असतानाच त्यांची करिअर आकार घेत होती. १९९९ मध्ये ‘अमिता, नो होल्ड्स बार्ड : अ‍ॅन ऑटोबायोग्राफी’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले. त्यातही पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी कराचीत बॅ. जिना हे माऊंटबॅटन यांच्याकडून सत्तेची सूत्रे स्वीकारीत असतानाचे रेडिओ कव्हरेज करण्यासाठी गेलेल्या इक्बाल मलिक यांनी पाकिस्तानने उभ्या केलेल्या अडथळ्यांना तोंड देत ते कसे मिळवले आणि ऑल इंडिया रेडिओवर प्रसारित कसे केले याची हकीकत वर्णन केली आहे. अमिता मलिक यांच्या या आत्मचरित्रातून जसे त्यांचे व्यक्तिमत्व उलगडते, तसाच भारतीय मीडियाचा तोवरचा इतिहासही अवतरतो. प्रदीर्घ अभ्यास, अनुभव, सक्रिय सहभाग आणि चिंतन-विश्लेषणातून त्यांच्या या मीडिया समीक्षेला एक ऐतिहासिक परिप्रेक्ष्य लाभले आहे. आणि तरीही त्यात कुठे विद्वत्तेचा बोजड आव नाही. नव्या पत्रकारांना जेवढय़ा सहजपणे त्यांच्याशी संवाद साधता येई, तेवढीच सहजता, तारुण्यातली खेळकर सळसळ त्यांच्या लेखनातून जाणवत असे. एकच ताजे उदाहरण सांगायचे तर, महेंद्र सिंह धोनीने त्याचे लांबसडक केस कापले तेव्हा त्या हळहळल्या होत्या. धोनीने आपल्या कुणा अभिनेत्री मैत्रिणीच्या सांगण्यावरून केस बारीक केले असल्याच्या अफवेचा उल्लेख करून ८० वर्षांच्या या सदर लेखिकेने कॉमेंट केली होती, ‘हे खरं असेल तर मूर्खच म्हटली पाहिजे ती पोरगी!’