Leading International Marathi News Daily

बुधवार, २५ फेब्रुवारी २००९

विशेष लेख

मायबोली व्हावी ज्ञानबोली

 

विकसित देशांत ‘माहितीपश्चातचे ज्ञानाधिष्ठित जग’ उदयाला आले आहे. स्पर्धात्मकता ही त्या त्या देशाकडील उपयोजित ज्ञान साठय़ावर अवलंबून राहील हे स्पष्टच आहे. हेच वास्तव व्यक्ती आणि समाजालाही लागू पडणारे आहे. शिक्षण घेतानाही ‘नॉलेज वर्कर’ होणे हाच उद्देश असणार आहे.
नव्या ज्ञानाच्या निर्मितीचा वेग पाहता ज्ञानाचेही अवमूल्यन होते, ज्ञानही कालबाह्य़ होते. गेल्या चाळीस हजार वर्षांत निर्माण झाले नाही तेवढे ज्ञान गेल्या चार वर्षांत निर्माण झाले. दर सात वर्षांनी अर्धेअधिक ज्ञान कालबाह्य़ होते. भविष्य एखाद्या प्रपातासारखे येऊन आपल्यावर आदळते एवढा विकासाचा वेग आहे. भारताला प्राचीन काळापासून ज्ञानकर्मीची परंपरा आहे. अध्यात्म हे ज्ञान म्हणूनच मिळविले गेले, वाढविले गेले. अणूचा विचार करणाऱ्या कणादपासून आजवर भारताची ज्ञानोपासना दिसून येते. अशात ‘ज्ञानयुगात महाराष्ट्र’ हा महत्त्वाचा विषय आहे. पुढल्या दोन दशकांत महाराष्ट्र, मराठी भाषा व मराठी माणूस कोठे असेल, महाराष्ट्राचे ज्ञाननेतृत्व कसे असेल याचा विचार करताना मराठी भाषा व संस्कृतीचे माहात्म्य मराठी माणसाच्या आर्थिक क्षमताविकासावर व पर्यायाने ज्ञानकर्मी होण्यावर अवलंबून राहील. महाराष्ट्रापुढे ज्ञानविकास आणि ज्ञानकर्मी कौशल्यविकासाचे मोठे व्यापक आव्हान असणार आहे. महाराष्ट्रापुरता विचार करताना महाराष्ट्राला मराठी भाषा व केवळ इंग्रजीच नव्हे तर विविध देशी-विदेशी भाषा शिकून विविध भाषांतील ज्ञान इंटरनेटसारख्या तंत्रज्ञानाच्या आधारे हुडकून, त्याचा सर्वदूर प्रसार करणे साध्य करता येईल.
‘भाषाकौशल्य’ हे नेहमीच कळीचे ज्ञानकौशल्य आहे. भाषा हे ज्ञानाच्या संसाधनाचे, धारणेचे आणि अभिसरणाचे मूलभूत साधन आहे. भाषांतराची सुविधा यात मोलाचे सहकार्य करते. मराठी जनांनी ‘ज्ञानभाषा’ इंग्रजीवर उत्तम प्रभुत्व मिळविले पाहिजे व अर्थकारणातील सहभाग वाढविला पाहिजे, हे ओघाने आलेच. ज्या मराठी भाषकांना उत्तम इंग्रजी येते त्यांच्या संधी विस्तारत राहतील.
यासाठी केवळ पहिलीपासून कौशल्याधिष्ठित इंग्रजी शिकविणे पुरेसे नाही. साहित्याच्याच अंगाने वा मदतीने इंग्रजी शिकवायचे की व्यवहारोपयोगी इंग्रजी शिकवायचे हा वेगळ्या लेखाचा विषय आहे. मात्र भाषेला भावविश्व असते त्यामुळे भाषा त्यातील साहित्याला वगळून शिकविता येणार नाही हा मुद्दा बाजूला ठेवून रोजीरोटीची भाषा झालेल्या इंग्रजीविषयी रोजच्या कामकाजाचे एक कौशल्य म्हणून इंग्रजी शिकण्यावर भर द्यायला हवा. ज्यांना इंग्रजीतील अभिजात साहित्य शिकायचे आहे त्यांना तसा पर्याय असू द्यावा.
लाखो विद्यार्थी दहावीनंतर गळतात हे लक्षात घेता दहावी संपण्याच्या आतच इंग्रजीचे व्यावहारिक कामकाजाचे प्रशिक्षण द्यायला हवे. या संधीमुळे विद्यार्थी शाळा सोडण्याचे प्रमाण कमी होण्याची शक्यता निर्माण होऊ शकेल. ज्ञानाचे अभिसरण अधिक व्यापक व आत्मविश्वासाने होईल. मुख्य प्रवाहात आल्यावर भाषाकौशल्याचा दर्जा वाढविण्यासाठी मुले आपसूक प्रेरित होऊन प्रयत्न करतील. सहजसुंदररीत्या इंग्रजी भाषाकौशल्ये आत्मसात करण्यासाठी इंग्रजीत आहेत तेवढी पुस्तके इतर कोणत्याही भाषेत नाहीत. मराठीतली उपलब्ध पुस्तके खचितच समाधानकारक नाहीत. मराठी माध्यमाच्या शाळेत जाऊन चांगले इंग्रजी येत नसल्याने इंग्रजी माध्यमाच्या शाळांची एक निश्चित बाजारपेठ सर्वत्र आकाराला येत आहे. मात्र इंग्रजी माध्यमाच्या शाळांत शिकणाऱ्यांची भाषिक कौशल्येही अगदी शालान्त परीक्षेपर्यंतही विकसित झालेली नसतात.
काही अपवाद वगळता इंग्रजीची ही स्थिती असताना विदेशी भाषा शिक्षणाविषयी तर बोलायलाच नको. विदेशी भाषांच्या रोजगारनिर्मितीच्या क्षमतेकडे आपण डोळसपणे कधी पाहणार आहोत? ज्याला जितक्या अधिक भाषा येतील तितक्या अर्थव्यवस्थांमध्ये तो सक्रिय सहभाग घेऊन स्वत:च्या संधी व क्षमतांचा विकास व वृद्धी करू शकेल, असा सध्याचा काळ आहे. भाषा शिकण्याची वाट आता निश्चितच भाकरीच्या, रोजगाराच्या मार्गाने जाते. तेव्हा शक्य त्या देशी-विदेशी भाषांमध्ये ज्ञानकर्मी होतील तेच विविध आर्थिक प्रक्रियांमध्ये भाग घेतील. भाषातज्ज्ञ प्रा. अविनाश बिनीवाले विदेशी भाषांना ‘भाकरीच्या भाषा’ म्हणतात तेव्हा ते विविध भाषा आत्मसात केल्याने साध्य होणाऱ्या अनेक आर्थिक विकासाच्या संधींविषयी बोलत असतात.
ज्ञानकर्मी होण्यासाठी दुसरे एक मौलिक कौशल्य म्हणजे भाषांतरकौशल्य. भाषांतर हे श्रवण, संभाषण, वाचन व लेखन यानंतरचे पाचवे कौशल्य आहे. भाषांतरकौशल्य हे थेट ज्ञानाशी संबंधित कौशल्य आहे. या कौशल्यामुळे इतर भाषांतील ज्ञान आपल्या भाषेत आणता येते. माहितीतंत्रशास्त्राने घडवून आणलेला माहितीचा विस्फोट पाहता या अफाट माहितीतून आवश्यक, कालसंगत, समर्पक ज्ञान अर्क काढावा तसे काढून घेता येण्याचे कौशल्य महत्त्वाचे आहे. इंटरनेट वगैरे तंत्रज्ञानाद्वारे फार तर माहितीचे स्रोत सर्वत्र नेता येतील. पण माहितीतून ज्ञान मिळविण्याविषयी काय? माहिती म्हणजे ज्ञान नव्हे. ज्ञानाचे नूतनीकरण करणे, ज्ञानाचे व्यवस्थापन करणे, समर्पक उपयोग करणे या बाबी महत्त्वाच्या आहेत. ज्ञानाची विषमता भाषांतरकौशल्याच्या व्यापक वापरानेच दूर होईल.
अधिकाधिक लोकांना मातृभाषेतून ज्ञान उपलब्ध करून देणे हे आव्हान सर्वच भाषांना स्वीकारावे लागणार आहे, अगदी इंग्रजीलासुद्धा. इतर भाषांतील ज्ञान आपल्या भाषेत आणणे म्हणूनच आवश्यक आहे. जपान, अमेरिकेसारख्या विकसित देशांत हेच करण्यात आले. सर्व पातळ्यांवर ज्ञानाची उपलब्धता निर्माण होणे महत्त्वाचे आहे. यासाठी भाषांतरकौशल्य विकसित करून, उत्तम भाषांतरकार घडवून इंग्रजीच नव्हे तर इतर भाषांतील ज्ञान- माहिती मराठीत आणून, या ज्ञानाचे अभिसरण वाढवून एक व्यापक ज्ञानव्यवस्था मायमराठीत उभारावी लागेल. या प्रक्रियेत मराठीला ज्ञानभाषा करण्याला वेग येईल हे ओघाने आलेच. यासाठीच राष्ट्रीय ज्ञान आयोगाने येत्या चार-पाच वर्षांत देशाला पाच लाख भाषांतरकारांची गरज लागेल असे स्पष्ट केले आहे. केवळ इंग्रजीसारख्या इतर भाषांतीलच नव्हे तर देशी भाषांतील साहित्याचे, माहिती ज्ञानाचे भाषांतर अनेक भाषांत व्हायला हवे. मराठी साहित्य ताकदीने जगभर जायला हवे. टागोरांच्या ‘गीतांजली’चा इंग्रजी अनुवाद झालाच नसता तर नोबेल पारितोषिक मिळाले असते काय?
महाराष्ट्रामध्ये भाषांतराची परिस्थिती खचितच उत्साहवर्धक नाही. महत्त्वाचे म्हणजे ‘केल्याने भाषांतर’सारखे नियतकालिक मराठीतून प्रसिद्ध होते. त्याचा भर हा बव्हंशी साहित्यिक भाषांतरावर आहे. ही फार मोलाची चळवळ आहे. ‘मायमावशी’सारखा दर्जेदार, भाषांतरित साहित्याची मेजवानी देणारा दिवाळी अंक निघतो.. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे आंतरभारतीच्या सानेगुरुजी अनुवाद केंद्राने मोठी सुविधा लाभार्थीसाठी निर्माण केली आहे. अमेरिकेत ज्याप्रमाणे निवांत ठिकाणी राहून केवळ मनसोक्त लिखाणाचे काम करण्याच्या सुविधा असतात तशीच ही सुविधा आहे. प्रत्येक जिल्ह्य़ात असे केंद्र असले तर फार मोठे योगदान घडेल. मेहता प्रकाशनसारख्या संस्थांनी तर अनुवादित पुस्तकांचा विशेष वाचकवर्गच निर्माण केला आहे. पंकज कुरुलकरांच्या ग्रंथायननेही यातले नवे पर्व सुरू केले आहे.
मात्र गेल्या तीन-चार वर्षांत जी चारशे-साडेचारशे भाषांतरित पुस्तके मराठीत प्रसिद्ध झाली आहेत ती बव्हंशी कथा, कादंबऱ्यांच्या स्वरूपाची आहेत. मराठीत विज्ञान, व्यवसाय, व्यवस्थापन यांसारख्या व्यवहारोपयोगी नॉनफिक्शन म्हणता येईल अशा पुस्तकांना ‘साहित्य’ म्हणून अजूनही मान्यता नसल्याचे दिसून येते. हे बदलले तरच ज्ञानशाखा आपल्याला उपलब्ध होतील. व्यवस्थापनावरील वा शेअर बाजारावरील बेस्ट सेलर मराठीत प्रसिद्ध व्हायला हवे. त्याचाही साहित्याप्रमाणेच गौरव व्हायला हवा.
पारिभाषिक शब्दकोश नव्या ज्ञानाच्या अनुषंगाने अपडेट करायला हवेत. ते सरकारी संकेतस्थळांवर विनामूल्य उपलब्ध व्हायला हवेत. संगणकविषयक अनेक पुस्तके मराठीत प्रसिद्ध होत आहेत व त्याला प्रतिसादही चांगला आहे. महाराष्ट्र ज्ञान मंडळाने- एम.के.सी.एल.ने एम.एस.सी.आय.टी.सारखा अभ्यासक्रम सर्वासाठी मराठी माध्यमातूनही ज्या प्रकारे सर्वत्र यशस्वीरीत्या नेला ते पाहता ज्ञान मिळविण्यासाठी व त्याच्या अभिसरणासाठी केवळ इंग्रजीच हवी हे म्हणणे व्यर्थ ठरले आहे. हा महाराष्ट्राच्या ज्ञानकारणाच्या उत्क्रांतीतला एक मोलाचा टप्पा आहे. जागतिक कीर्तीचे तंत्रज्ञानतज्ज्ञ प्रभाकर देवधर तर संगणकाचे प्रशिक्षण मातृभाषेतून द्यावे असे म्हणतात त्यात मोठा अर्थ आहे.
अमेरिकेत चिनी भाषा शिकण्याला आहे तसेच महत्त्व हिंदी शिकण्यालाही आले आहे हे ओघाने नमूद करायला हवे. कधी ना कधी महाराष्ट्राचे वेगाने विकसित होत असलेले जिल्हे देशी-विदेशी गुंतवणुकीने किंवा हवाई मार्गाने जोडले जातील तेव्हा संपर्कभाषा म्हणून मराठी जाणणाऱ्यांची गरज भासेलच. अनेक दाक्षिणात्य विद्यापीठांतून स्थानिक भाषांतून दूरस्थ पद्धतीने एम.बी.ए.सारखे अभ्यासक्रम दिले जातात. हिंदीतून एम.बी.ए. करण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे.
मराठीत ज्ञानाचा साठा वाढविण्यासाठी व्यापक भाषांतर- ज्ञानप्रकल्प हाती घ्यावे लागतील. यासाठी जगभर पसरलेल्या मराठीजनांनी त्यांच्या वाचनात आलेली महत्त्वाची पुस्तके सुचविली पाहिजेत. मराठी माणसाने अनेक वर्षे लक्ष्मीऐवजी सरस्वतीची उपासना अधिक केल्याने मोठय़ा प्रमाणात मराठी माणसे प्राध्यापक, शिक्षक आहेत. त्यांना लिहिते करायला हवे, भाषांतरांची कामे हाती घ्यायला सांगायला हवे. निवृत्त व्यक्ती मोठे योगदान देऊ शकतील. शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांना भाषांतरकौशल्य आत्मसात करण्यावर भर द्यायला हवा.
भाषांतराद्वारे मराठीत आणायचे ज्ञान शोधणे आता तसे सोपे झाले आहे. इंटरनेट व इतर ज्ञानजालांतून उपयुक्त ज्ञान मराठीत भाषांतरित करून देण्यासाठी मोठी मोहीम हाती घ्यायला हवी. मराठीला अशाच प्रयत्नाने ज्ञानभाषा करून सक्षम व अधिक उत्पादक करता येईल. मग संतांची मराठी अर्थव्यवस्थेची भाषा होईल. मराठीजनांचे परावलंबित्व कमी होईल. भाषेचा अडसर न राहिल्याने सक्षमीकरणासाठी इंग्रजीच्या मागे धावण्याचे एवढेही प्रयोजन उरणार नाही. इंग्रजी शिकणे वेगळे व इंग्रजी माध्यमात शिकणे वेगळे हे स्पष्ट होईल. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था वाढल्यावर व मराठीत ज्ञानकारण वाढल्याने, अर्थकारण वाढल्याने मराठी माणसांशी व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांना मराठी शिकणे मोलाचे वाटेल. मग मराठी साहित्यात एम.ए. करणाऱ्यांनाही आपणहून काही लाख रुपयांची नोकरी देण्यासाठी कंपन्या कॅम्पस प्लेसमेंटसाठी येतील!
प्रकाश अल्मेडा
संचालक, इन्स्टिटय़ूट ऑफ नॉलेज मॅनेजमेंट
www.knowledgefoutnain.org