Leading International Marathi News Daily

बुधवार, २५ फेब्रुवारी २००९

विविध

‘स्लमडॉग मिलिऑनर’ने कमावले मिलियन डॉलर
नवी दिल्ली, २४ फेब्रुवारी/पीटीआय

‘स्लमडॉग मिलिऑनर’ या चित्रपटाने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात आठ पारितोषिके पटकावून बाजी मारली असली तरी त्याला प्रेक्षकांचाही उदंड प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाला जेवढा खर्च आला त्याच्या दहापट व्यवसाय या चित्रपटाने केला असून, ८०० कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसा मिळाला आहे. भारतात या चित्रपटाने ३० कोटी रुपयांचा व्यवसाय केला असल्याचे समजते.

‘स्लमडॉग’च्या बालकलाकारांची डिस्नेलॅण्डला भेट
वॉशिंग्टन, २४ फेब्रुवारी / पी.टी.आय.

स्लमडॉग मिलिऑनर या चित्रपटाच्या ऑस्कर यशानंतर त्यातील बालकलाकारांच्या चमूने त्यांची स्वप्नमय सफर चालूच ठेवली असून, आज त्यांनी डिस्नेलॅंडला भेट दिली. अनेक अमेरिकी पाहुण्यांचे त्यांची छायाचित्रे टिपण्यासाठी कॅमेरे सरसावले. या चित्रपटात मुख्य अभिनेत्री लतिका हिची बालपणातील भूमिका साकार करणारी मुंबईची तन्वी लोणकर हिने डिस्नेलँड येथून वृत्तसंस्थेला सांगितले की, येथे जे लोक आम्हाला पाहण्यासाठी उत्सुकतेने आले होते त्यांनी आम्हाला लगेच ओळखलेही व त्यांनी कुतुहलाने आमची छायाचित्रे टिपली.

तामिळनाडूच्या तुरुंगांमध्येही निनादले ‘जय हो’ चे सूर!
चेन्नई, २४ फेब्रुवारी/वृत्तसंस्था

सवरेत्कृष्ट संगीतासाठी ‘स्लमडॉग मिलिऑनर’ चे संगीतकार ए.आर. रहमान यांना ऑस्कर पुरस्कार प्रदान करण्यात आला. या चित्रपटाला एकुण आठ ऑस्कर पुरस्कार मिळाले. त्यामुळे भारतामध्ये आनंदाला पारावार उरला नाही. अगदी तामिळनाडूच्या मध्यवर्ती कारागृहांमध्ये देखील सोमवारी ‘जय हो’ गाण्याचे सूर निनादले..साऱ्या कैद्यांनी ऑस्करविजेत्यांचे अभिनंदन केले. ‘स्लमडॉग मिलिऑनर ’मधील रहमानने संगीत दिलेल्या ‘जय हो’ या गाण्याने जगभरात इतिहास निर्माण केला आहे. तामिळनाडूतील नऊ मध्यवर्ती कारागृहांमध्ये ‘जय हो’ गाण्याचे सूर निनादले व त्याच्या जोडीला ‘स्लमडॉग मिलिऑनर’ चित्रपटातील काही दृश्येही कैद्यांना दाखविण्यात आली. यावेळी सर्व कैद्यांनीही ‘जय हो’ या जादुई मंत्राचा एकमुखाने घोष केला. कैद्यांसमोर ‘जय हो’ हे गाणे सादर करण्याचा अभिनव निर्णय तामिळनाडू सरकारने घेतला होता. यासंदर्भात तामिळनाडूचे पोलीस महासंचालक (तुरुंग) आर. नटराज यांनी सांगितले की, संगीतकार ए. आर. रहमान यांची सर्वानाच उत्तम ओळख आहे. तामिळनाडूच्या तुरुंगांमध्ये रोज सकाळी व संध्याकाळी देशभक्तीपर गाणी लावली जातात. त्यामध्ये ए. आर. रहमान यांनी संगीत दिलेल्या ‘थाई मन्न्ो वनक्कम’ या गाण्याचाही समावेश आहे. तुरुंगांमध्ये कैद्यांना दूरचित्रवाणीचे कार्यक्रम बघण्याची सुविधा उपलब्ध नसली तरी ‘स्लमडॉग मिलिऑनर’ला आठ ऑस्कर पुरस्कार मिळाल्याची बातमी कैद्यांना वृत्तपत्रांच्या माध्यमातून कळली होती. त्यामुळे ‘जय हो’ गाण्याचे सूर मध्यवर्ती तुरुंगांमध्ये निनादताच कैद्यांच्या चेहऱ्यांवर आनंद झळकला.

कर्करोगाशी झुंजणाऱ्या जेड गुडीचा विवाह
लंडन, २४ फेब्रुवारी / पी.टी.आय.

इंग्लंडमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेल्या ‘बिग ब्रदर’ या ‘रिअ‍ॅलिटी शो’तील ब्रिटिश अभिनेत्री जेड गुडी हिने तचा कर्करोग अखेरच्या टप्प्यात असताना तिचा बॉयफ्रेण्ड जॅक ट्वीड याच्याशी विवाह करून साऱ्यांनाच धक्का दिला. ‘बिग ब्रदर’ शो मध्ये सहभागी झालेली भारतीय अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्यावर वर्णभेदी शेरेबाजी करून जेड गुडीने तिच्याशी केलेले भांडण जगभर गाजले होते. मात्र, शिल्पा शेट्टी या शोची विजेती ठरली होती. शिल्पाने जेन गुडीचे सारे गुन्हे माफ करून तिला कलर वाहिनीवरील ‘बिग बॉस’ रिअॅलिटी शोत सहभागी होण्याची संधी देऊन मनाचा मोठेपणा दाखवला. परंतु, जेड गुडीला कर्करोग असल्याचे निदान झाल्याने जेन गुडीला शो अर्धवट सोडून लंडनला पर जावे लागले होते. जेड अवघी २७ वर्षांची असून तिचा कर्करोग अंतिम टप्प्यात असल्याने ती जास्तीत जास्त आठवडाभराची सोबती असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. मरणाची चाहूल लागलेल्या जेडने तिचा बॉयफ्रेण्ड जॅकबरोबर विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली होती. जॅकने तिच्याशी रविवारी लंडनमधील एका हॉटेलात विवाह करून तिची इच्छा पूर्ण केली.

ओबामा यांना पाहायचा आहे ‘स्लमडॉग मिलिऑनर
वॉशिंग्टन, २४ फेब्रुवारी / पी.टी.आय.

ऑस्करमध्ये आठ पुरस्कार पटकाविणारा ‘स्लमडॉग मिलिऑनर’ हा चित्रपट पाहण्याची इच्छा आता अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी व्यक्त केली आहे. मुंबईतील धारावी या आशियातील सर्वात मोठय़ा असणाऱ्या झोपडपट्टीतील वास्तववादी चित्रण असणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शक डॅनी बॉयल आहेत. या चित्रपटाने ऑस्करमध्ये सवरेत्कृष्ट चित्रपटाबरोबर आठ पुरस्कार मिळविले आहेत. यामध्ये संगीतकार रहमान यांच्या दोन महत्वपूर्ण पुरस्कारांचा समावेश आहे. ओबामा यांनी हा चित्रपट पाहिला की नाही याची आपणास कल्पना नसल्याचे व्हाइट हाऊसमधील प्रवक्ता रॉबर्ट गिब्स यांनी सांगितले. ओबामा यांनी अलीकडेच बरेच चांगले चित्रपट आपल्या दोन्ही मुलींसमवेत पाहिले आहेत पण त्यामध्ये ‘स्लमडॉग’ चा समावेश नव्हता. ऑस्करमध्ये या चित्रपटाने धूम उठविल्याने ओबामा यांना आता हा चित्रपट पाहावयाचा आहे.

फ्रिडा पिंटोला वूडी अ‍ॅलेनच्या चित्रपटात भूमिका
न्यूयॉर्क, २४ फेब्रुवारी / पी.टी.आय.

आठ ऑस्कर विजेत्या ‘स्लमडॉग.’मधील भारतीय अभिनेत्री फ्रिडा पिंटोला नामवंत सिनेदिग्दर्शक वूडी अ‍ॅलेन यांच्या चित्रपटातील भूमिका साकारण्याची ऑफर आली आहे. २४ वर्षीय फ्रिडा पिंटो मॉडेलिंगच्या दुनियेतून चित्रपटात आणण्याचे श्रेय ‘स्लमडॉग’ चे दिग्दर्शक डॅनी बॉयल यांना जाते. स्लमडॉगने ऑस्करच्या दुनियेत झेंडा रोवल्यामुळे या चित्रपटातील कलावंतांना जागतिक चित्रपट क्षेत्रात एकाएकी प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. वूडी अ‍ॅलेन यांना दिग्दर्शनाचे तीन ऑस्कर मिळाले आहेत. त्यांनी फ्रिडाच्या भूमिकेचे कौतुक केले असून तिला नव्या चित्रपटात भूमिका देण्याची ऑफर दिली. येत्या जुलै महिन्यात याचे चित्रिकरण सुरू होईल.