Leading International Marathi News Daily                               गुरुवार, २६ फेब्रुवारी २००९

राज्य सरकारचा निवडणूक बोनान्झा..
मुंबई, २५ फेब्रुवारी / खास प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विविध घटकांना खुश करण्याचा सपाटाच राज्य सरकारने लावला आहे. मुंबईतील जुन्या, मोडकळीस आलेल्या व उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास करताना चार चटईक्षेत्र निर्देशांक देतानाच त्यातील रहिवाशांना ३०० चौरस फुटांचे घर दिले जाणार आहे. राज्यातील धार्मिक स्थळे, ठाणे शहरातील म्हाडा इमारती तसेच तबेलेधारकांना वाढीव चटईक्षेत्र देऊन रहिवाशांबरोबरच बिल्डरांचे सरकारने कल्याण केले आहे.

धुमश्चक्री!
बांगला देश लष्कराचे बंड झाले थंड
ढाका, २५ फेब्रुवारी/पीटीआय
बांगला देश रायफल्समधील सैनिकांनी बंडाचे निशाण फडकावित आज पिलखाना येथील मुख्यालयाला वेढा दिला होता. पगाराच्या भांडणातून त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना ओलिस ठेवले होते. या वेळी बांगलादेश रायफल्सच्या बंडखोर सैनिकांनी केलेल्या गोळीबारात एक जण ठार झाला व सहा जण जखमी झाले. या बंडखोर सैनिकांना माफी देण्यात येईल अशी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी घोषणा केल्यानंतरच हे सैनिक शरण आले आणि बंड शमले लष्कर व पोलिसांच्या जलद कृती दलांनी ढाका शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या बांगलादेश रायफल्सच्या मुख्यालयाला वेढा घातला होता.

श्रीलंकेत २२ तामिळी बंडखोर ठार
लष्कराला होतोय तिखट प्रतिकार
कोलंबो, २५ फेब्रुवारी/पीटीआय
पराजयाच्या छायेत असलेले तामिळी बंडखोर आपल्या कब्जात उरलेला पुडुकुम्डियीरुप्पू हा अखेरचा बालेकिल्ला राखण्यासाठी कडवी झुंज देत असून त्यामुळे श्रीलंका लष्कराला काहीसे आस्ते कदम धोरण अवलंबावे लागत आहे. दरम्यान मंगळवारी या भागात झालेल्या संघर्षांत २२ तामिळी बंडखोर ठार झाले.

मंत्रालय ठप्प!
सरकार हतबल
मुंबई, २५फेब्रुवारी/ खास प्रतिनिधी

सहाव्या वेतन आयोगातील प्रवासी भत्ता व घर भत्ता तात्काळ मिळावा, या मागणीसाठी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी आज मंत्रालयाचेच कामकाज बंद पाडले. सकाळी मंत्रालयात आलेल्या कर्मचाऱ्यांनी हजेरी लावल्यानंतर मंत्रालयाचे दरवाजे लावून घेतले तर अनेक दालने आंदोलकांनी उघडूच दिली नाहीत. कर्मचाऱ्यांच्या या असहकार आंदोलनामुळे सामान्य जनतेला तर आज मंत्रालयाचे दरवाजे बंदच राहिले पण अनेक मंत्र्यांनीही आज घरीच राहाणे पसंत केले. या पाश्र्वभूमीवर मंत्रिमंडळाची बैठक सह्याद्री अतिथीगृहात घेण्याची वेळ राज्य सरकारवर आली. कर्मचाऱ्यांचे असहकार आंदोलन उद्या गुरुवारी राज्यभरात केले जाणार असून त्यामुळे राज्यभरातील सरकारी कामकाजावर त्याचा परिणाम होणे अटळ आहे. आज मंत्रालयात शेकडो कर्मचाऱ्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

कसाबसह ३८ जणांविरुद्ध आरोपपत्र
मुंबई, २५ फेब्रुवारी / प्रतिनिधी
मुंबईवर गेल्या २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यातील जिवंत पकडण्यात आलेला पाकिस्तानचा एकमेव दहशतवादी अजमल अमीर कसाब याच्यासह ३८ जणांविरुद्ध मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने आज अतिरिक्त महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर आरोपपत्र दाखल केले. या ३८ जणांव्यतिरिक्त आरोपपत्रात मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या नावांचाही समावेश आहे. कसाब, फईम अन्सारी व सबाऊद्दीन अहमद यांच्यासह ३५ फरारी आरोपीं जणांविरुद्ध भारतीय दंड संहितेमधील विविध कलमे त्याचप्रमाणे देशाविरुद्ध युद्ध पुकारणे, कस्टम्स, स्फोटके, परदेशी नागरिक कायदा, बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा, सार्वजनिक मालमत्तेची हानी करणे आणि अन्य विविध कायद्याअंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले.

विश्वविजेत्या भारताला न्यूझीलंडने नमवले
ख्राईस्टचर्च, २५ फेब्रुवारी / वृत्तसंस्था

‘जबरदस्त’ असा लौकिक असलेल्या भारतीय फलंदाजीच्या क्रमवारीने आज सपशेल निराशा केली आणि न्यूझीलंडने विश्वविजेत्या भारतीय संघावर पहिल्या ट्वेन्टी-२० लढतीत लीलया मात केली. ब्रेंडन मॅक् क्युलमच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर ७ चेंडू व ७ फलंदाज शिल्लक राखून मिळवलेल्या या विजयासह न्यूझीलंडने दोन सामन्यांच्या ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेत १-० ने आघाडी घेतली. एएमआय स्टेडियमवर आज दिवस/रात्र रंगलेल्या या पहिल्या लढतीत न्यूझीलंडचा कर्णधार डॅनियल व्हेटोरीने नाणेफेक जिंकून पाहुण्या भारतीय संघाला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले.

काँग्रेसचे नगरसेवक रिव्हॉल्वर घेऊन पालिका सभागृहात
मुंबई, २५ फेब्रुवारी / प्रतिनिधी

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षेबाबत कडेकोट उपाययोजना केल्याचे पालिका आयुक्त सातत्याने सांगत असतानाच आज या ‘सुरक्षा व्यवस्थेच्या’ अब्रुची लक्तरे एका नगरसेवकाने पालिकेच्याच वेशीवर टांगली. काँग्रेसचे हे नगरसेवकमहाशय चक्क आपल्या पँटच्या मागच्या खिशात रिव्हॉल्वर ठेवून पालिकेच्या सभागृहात आले. मेटल डिटेक्टर, सीसी टी. व्ही. कॅमेरे आणि सुरक्षारक्षक यांना साक्षीला ठेवत सभागृहात आलेल्या या नगरसेवकांना जेव्हा याबाबत जाब विचारण्यात आला तेव्हा त्यांनी उलट सुरक्षारक्षकांनाच दम भरण्याचा प्रयत्न केला.

आजपासून बारावीची परीक्षा
मुंबई, २४ फेब्रुवारी / प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी बारावीची परीक्षा गुरूवारपासून सुरू होत आहे. या परीक्षेसाठी राज्यातून ११ लाख ८४ हजार २२६ विद्यार्थी बसले आहेत. यात सहा लाख ९० हजार १३९ विद्यार्थ्यांचा तर चार लाख ९४ हजार ८७ विद्यार्थिनींचा समावेश आहे. एकूण पाच हजार ३०१ कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. परीक्षेसाठी राज्यात एक हजार ८३० केंद्रांची तजवीज करण्यात आली आहे. मुंबई विभागातून २ लाख ६४ हजार विद्यार्थी परीक्षेसाठी बसले आहेत. परीक्षेची संपूर्ण तयारी झाली असून सर्व केंद्रावर सुरळीतपणे परीक्षा पार पडेल अशी आशा शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागीय सचिव बसंती रॉय यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. विद्यार्थी-पालकांच्या तक्रारी व अडचणीचे निवारण करण्याच्या उद्देशाने मंडळाने हेल्पलाईन सुरू केली आहे. हेल्पलाईनचा क्रमांक २७८९३७५६ असा आहे. मुंबई विभागीय मंडळाने यंदा प्रथमच परीक्षेबाबतची सर्व माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. दहावी - बारावीची परीक्षा केंद्रे तसेच बैठक व्यवस्थेची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. संकेतस्थळाचा पत्ता www.sscboardmumbai.in असा आहे.

माजी मंत्री सुखराम यांना तीन वर्षे कारावास
नवी दिल्ली, २५ फेब्रुवारी/पी.टी.आय.

माजी दूरसंचार मंत्री सुखराम यांनी चार कोटी २५ लाख रुपये बेहिशोबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी मागील १३ वर्षे सतत चालू असलेल्या खटल्यात दिल्ली न्यायालयाने त्यांना बुधवारी तीन वर्षे कारावास आणि दोन लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. ही शिक्षा सुनावताना सार्वजनिक स्तरावर वावरणारे जे लोकप्रतिनिधी भ्रष्टाचाराचा अवलंब करतात ते समाजासाठी त्रासदायक असल्याचे कडक ताशेरेही दिल्ली न्यायालयाने ओढले आहेत. या निकालाविरोधात आता सुखराम यांनी दिल्ली उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. माजी दिवंगत पंतप्रधान नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात दूरसंचार मंत्री असलेले ८२ वर्षीय सुखराम यांनी जमविलेली ही चार कोटी २५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्याचेही आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत. ऑगस्ट १९९६ मध्ये सुखराम यांच्या दिल्लीतील घरावर छापा टाकून सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दोन कोटी ४५ लाख रुपयांची रोकड जप्त केली. त्याचवेळी हिमाचल प्रदेशमधील मंडी येथील त्यांच्या घरावरही छापा घालण्यात आला व तेथून एक कोटी १६ लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली होती.

 


प्रत्येक शुक्रवारी