Leading International Marathi News Daily                               शुक्रवार, २७ फेब्रुवारी २००९

अन्यथा मनसेची वाट धरावी लागेल!
‘रंगशारदा’त शिवसेना पदाधिकाऱ्यांचे दिसले वेगळेच रंग
मुंबई, २६ फेब्रुवारी / प्रतिनिधी
राज्यातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या आणि कर्जमाफी या प्रश्नांवरून गेल्या तीन वर्षांपासून शिवसेनेने केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्याविरोधात रान उठविलेले असताना राष्ट्रवादी काँग्रेसशी युती केल्यास आम्हाला जिल्ह्यांत तोंड दाखवायला जागा राहणार नाही आणि त्याउपरही राष्ट्रवादीशी युती केल्यास आम्हाला ‘मनसे’चा रस्ता धरावा लागेल, अशी जोरदार चर्चा आज विदर्भ आणि मराठवाडय़ातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये ‘रंगशारदा’त सुरू होती.

भाईंनी सरांना शालजोडीतून हाणले..
मुंबई, २६ फेब्रुवारी/प्रतिनिधी

रंगशारदामधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीत मेळाव्याचे संचालन मनोहर जोशींकडे होते. खासदार मोहन रावले यांचे भाषण बऱ्यापैकी लांबले. त्यामुळे भाषणानंतर मनोहर जोशींनी आपल्या खुसखुशीत शैलीमध्ये रावले यांना जाहीर कानमंत्र द्यायला सुरुवात केली. सर समोरील पदाधिकाऱ्यांकडे पाहत म्हणाले ‘मी लोकसभा अध्यक्ष असताना रावले यांची माझ्याबाबत तक्रार असायची की मी त्यांना लोकसभेत बोलू देत नाही. मी तसे का करीत होतो हे आता तुन्हाला कळलेच असेल. कारण रावले यांना कुठे थांबायचे ते समजतच नाही.

ज्येष्ठ समाजवादी नेते प. बा. सामंत यांचे निधन
मुंबई, २६ फेब्रुवारी / प्रतिनिधी

समाजवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते, माजी आमदार प. बा. सामंत यांचे आज गोरेगाव येथील त्यांच्या निवासस्थानी दुपारी चारच्या सुमारास वाजता निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी कुसुमताई, पुत्र गिरीश, कन्या निलम आणि नातवंडे असा परिवार आहे. प. बा. सामंत १९७८ मध्ये जनता पक्षाच्या तिकिटावर विधानसभेवर निवडून आले होते. त्यांनी न्यायालयात केलेल्या याचिकेमुळेच तत्कालीन मुख्यमंत्री अ. र. अंतुले यांना सिमेंट भ्रष्टाचार प्रकरणी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. प. बा. सामंत यांनी मृणाल गोरे, कमल देसाई यांच्यासोबत नागरी निवारा परिषदेची स्थापना केली.

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाईभत्त्यात सहा टक्के वाढ
नवी दिल्ली, २६ फेब्रुवारी/पीटीआय

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्याच्या रकमेत सहा टक्के वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला. कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या ग्राहक मुल्य निर्देशांकात वाढ झाल्याने महागाई भत्त्याच्या रकमेतही सहा टक्क्यांनी वाढ करण्यात आली. यावर्षी १ जानेवारीपासून पुढील १४ महिन्यांसाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या (निवृत्त कर्मचारी वगळता) महागाई भत्त्याच्या रकमेत सहा टक्के वाढ केल्यापोटी सरकारी तिजोरीवर ४१०० कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. तसेच याच कालावधीसाठी निवृत्त कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात होणारी वाढ लक्षात घेता सरकारी तिजोरीवर १९२० कोटी रुपयांचा बोजा पडेल. या वर्षी केंद्रीय कर्मचारी व निवृत्त केंद्रीय कर्मचारी यांच्या महागाई भत्त्याच्या रकमेतील वाढीपोटी सरकारी तिजोरीवर अनुक्रमे ३५१४ कोटी व १९२० कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनमानात व निवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनात सहाव्या वेतनोयोगाच्या शिफारशी लागू केल्यानंतर गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात वाढ करण्यात आली होती.

बांगला देशातील बंडाचे लोण इतरत्र; ५० अधिकारी ठार?
ढाका, २६ फेब्रुवारी / पी.टी.आय.

बांगला देश रायफल्समधील सैनिकांनी बुधवारी केलेल्या बंडाचे लोण आता राजधानी ढाका सोडून संपूर्ण देशाच्या अन्य भागात पसरले असून, आतापर्यंत लष्कराशी झालेल्या चकमकीत पिलखाना मुख्यालयाच्या ब्रिगेडीयरसह सुमारे ५० लष्करी अधिकाऱ्यांनी जीव गमवला आहे. दरम्यान बंडखोरी करणाऱ्या सैनिकांना सार्वत्रिक माफी घोषित करणाऱ्या बांगला देशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी बंडखोर सैनिकांनी तातडीने आपआपल्या छावण्यांमध्ये परतावे अन्यथा कारवाईस सामोरे जावे असा इशारा दिला आहे. तसेच देशाच्या सुरक्षिततेसाठी आपण बंडोखोरांविरुद्ध कोणतेही पाऊल उचलण्यास मागे-पुढे पाहणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र शरणागती पत्करली नाही तर बंडखोरांवर कोणती कारवाई करण्यात येईल यावर बोलण्याचे पंतप्रधान हसिना यांनी टाळले.
वाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, दिनाजपूर व रंगपूर जिल्ह्य़ातही सैनिकांनी बंडाचे निशाण फडकावले असून छावण्यातून बाहेर निघत त्यांनी जोरदार निदर्शने केली. मात्र येथे कुठलीही जिवितहानी झाली नाही. जवळ जवळ सीमावर्ती भागातील १२ जिल्ह्य़ांत बंडाचे लोण पसरले असून तेथून लष्कराच्या अधिकाऱ्यांनी पलायन केल्याचे वृत्त आहे. बुधवारी झालेल्या चकमकीत पिलाखाना ५० जणांचा मृत्यू झाल्याचे कायदे मंत्री कामराल - इसलाम यांनी म्हटले आहे. मृत अधिकाऱ्यामध्ये बांगला देश रायफल्सचे ब्रिगेडियर अब्दुल बारी व कर्नल अनीस यांचा समावेश आहे.

पाकिस्तानच्या ‘मॅरिएट’ हॉटेलमध्ये आग, नऊ जखमी
इस्लामाबाद,२६ फेब्रुवारी/वृत्तसंस्था

पाच महिन्यांपूर्वी २० सप्टेंबर रोजी आत्मघाती दहशतवाद्यांनी ६०० किलो स्फोटकांचा ट्रक उडवून देऊन बेचिराख केलेल्या येथील येथील पंचतारांकित हॉटेल मॅरिएटच्या एका भागाला आज दुपारी भीषण आग लागली व यात हॉटेलमध्ये काम करणारे नऊ मजूर जखमी झाल्याची भीती व्यक्त करण्यात आहे. एका महिन्यापूर्वी हे हॉटेल सुरू करण्यात आले होते व तेथे सुशोभिकरणाचे काम चालू होते. हॉटेलमधील बॉयलरचा स्फोट झाल्यानेच ही आग लागल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. आग लागल्याने अनेक मजूर धुराने गुदमरून बेशुध्द पडले तर एक आगीत होरपळला.

मंत्रालय पुन्हा ठप्प
सोमवारी मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा
मुंबई, २६ फेब्रुवारी/ खास प्रतिनिधी

सहाव्या वेतन आयोगातील भत्ते देण्याबाबत अर्थखात्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी यापूर्वीच स्पष्ट केल्यानंतरही सर्वसामान्य नागरिकांना वेठीला धरत मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी आज दुसऱ्या दिवशीही काम बंद आंदोलन करून सरकारला आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान भत्त्यांबाबत अधिकारी-कर्मचारी कृती समितीबरोबर मुख्यमंत्री सोमवारी चर्चा करणार आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांनी काल मंत्रालयातील दरवाजे बंद करून काम ठप्प पाडले होते. सरकारविरोधात घोषणांनी मंत्रालय दणाणून गेले होते. काल व आज अशा दोन दिवसांचे काम बंद आंदोलन कर्मचारी संघटनांनी पुकारले होते. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी बंद मागे घेण्याचे काल केलेले आवाहन झुगारून आजही कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. मात्र निवडणुकीच्या तोंडावर सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची हिम्मत सरकार दाखवू शकलेले नाही. त्याऐवजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कर्मचारी संघटनांशी भत्ता देण्याबाबत चर्चा केली असून येत्या सोमवारी मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा होणार आहे.

बोर्डाच्या परीक्षेपूर्वी होणार विद्यार्थ्यांची ‘झडती’
पुणे, २६ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी

दहावी-बारावीसारख्या महत्त्वाच्या परीक्षांची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने युद्धपातळीवर मोहीम हाती घेतली आहे. कॉपी रोखण्यासाठी जादा संख्येने भरारी-बैठी पथके कार्यान्वित करतानाच बोर्डाच्या परीक्षेसाठी वर्गात जाताना विद्यार्थ्यांची ‘झडती’ घेतली जाणार आहे. कॉपीच्या बहुतांश प्रकरणांना त्यामुळे आळा बसेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. सामूहिक कॉपी व परीक्षा केंद्रांवरील बाहय़ हस्तक्षेप रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने जमावबंदी आदेशाची कडक अंमलबजावणी करण्यात येत असून ‘कॉपीप्रवण’ मराठवाडय़ातील केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.कॉपी पकडली, तर पर्यायाने होणाऱ्या कारवाईमध्ये विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाते. त्यामुळे कॉपीच होऊ नये, यासाठी प्राधान्याने उपाययोजना करण्यात येत आहेत. बूट आणि मोजांमधून विद्यार्थी कॉपीसाठी चिठ्ठय़ा आणतात, असे निदर्शनास आल्यानंतर कोल्हापूर विभागीय मंडळाने परीक्षेसाठी वर्गामध्ये अनवाणी जाण्याची सक्ती विद्यार्थ्यांवर केली आहे. गेल्या वर्षी एका केंद्रावर ही सक्ती प्रायोगिक स्वरूपात राबविण्यात आली. त्यामुळे कॉपी कमी झाल्याचे आढळल्यानंतर मुख्याध्यापक, पालकांना विश्वासात घेऊन विभागभर हा नियम करण्यात आला. त्याच धर्तीवर राज्यभर दहावी-बारावीच्या परीक्षेला वर्गात जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांची ‘झडती’ घेण्याचा आदेश मंडळाने दिला आहे.

‘राष्ट्रवादी’ची टीका, पवारांचा खुलासा अन् काँग्रेसची नापसंती
नवी दिल्ली, २६ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुखपत्र असलेल्या ‘राष्ट्रवादी’च्या ताज्या अंकात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि पक्षाचे तरुण सरचिटणीस राहुल गांधी यांच्याविषयी करण्यात आलेल्या टीकेवर आज काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आली. मात्र, या टिप्पणीपासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतला दूर ठेवल्याबद्दल काँग्रेसने समाधानही व्यक्त केले. ‘राष्ट्रवादी’च्या अंकात सोनिया आणि राहुल गांधी यांच्यावर हेतुपुरस्सर टीका करण्यात आल्याचे काँग्रेस वर्तुळात म्हटले जात आहे. ‘राष्ट्रवादी’च्या अंकातील लेखाचा टीकेचा सूर अनावश्यक आहे, असे काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार अभिषेक सिंघवी म्हणाले. मात्र, या टिप्पणीविषयी बुधवारी रात्रीच पवार यांनी तातडीने खुलासा केल्याबद्दल पक्षाचे ‘समाधान’ झाले आहे, असेही ते म्हणाले. जागावाटपाच्या चर्चेत काँग्रेसला झुकविण्यात अपयश आल्यामुळे आता अशा क्लृप्त्यांचा अवलंब केला जात असल्याचे मत काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केले. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांवर मित्रपक्षांच्या मुखपत्रातूनच अशी टीका होणार असेल तर राष्ट्रवादीशी जागावाटपाची चर्चा करण्यातच अर्थ नाही, असा पवित्रा महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांनी घेतला आहे. येनकेन प्रकारेन काँग्रेसकडून जादा जागा पदरी पाडून घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते प्रयत्न करीत असल्याचे काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे.

गोविंदराव आदिक राष्ट्रवादीच्या मार्गावर?
मुंबई, २६ फेब्रुवारी / खास प्रतिनिधी

मंत्रिपद नाकारल्याने नाराज झालेले काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गोविंदराव आदिक यांनी नवी दिल्लीत जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केली. दुसरीकडे आदिक यांच्या समर्थकांच्या आज झालेल्या मेळाव्यात काँग्रेसला रामराम ठोकावा असाच मतप्रवाह व्यक्त करण्यात आला.आदिक यांच्या शरद पवारांबरोबर झालेल्या भेटीमुळे ते राष्ट्रवादीचा मार्ग पत्करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. काँग्रेस हायकमांडने मंत्रिपदासाठी नाव निश्चित केले असतानाही ऐनवेळी नगर जिल्ह्य़ातील आदिक यांचे राजकीय विरोधक बाळासाहेब विखे-पाटील यांचे पुत्र राधाकृष्ण यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्यामुळे आदिक हे संतप्त झाले आहेत. आदिक यांच्या समर्थकांचा आज मुंबईत मेळावा झाला. तेव्हा बहुसंख्य कार्यकर्त्यांनी झाले तेवढे पुरे आता काँग्रेसला रामराम ठोका, असेच मत व्यक्त केले. काँग्रेसमध्ये भवितव्य नाही, असेच कार्यकर्त्यांचे म्हणणे होते.

वृद्ध दाम्पत्याची हत्या; नोकर फरारी
मुंबई, २६ फेब्रुवारी / प्रतिनिधी

अंधेरी येथील नित्यानंदनगर येथे घरात एकटय़ा राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्याची गळा दाबून हत्या केल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली. घरातील नोकर फरारी असून त्यानेच चोरीच्या उद्देशाने ही हत्या केली असावी, असा संशय आहे. चरण (७९) आणि कमळा (६९) कुंदनानी हे दाम्पत्य मूळबाळ नसल्याने एकटेच राहत होते. चरण यांना अर्धागवायूचा झटका आल्याने नातेवाईकांनी देखभालीसाठी १५ दिवसांपूर्वीच अमितकुमार (२२) नावाचा नोकर ठेवला होता. आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास कुंदनानी दाम्पत्याची गळा दाबून हत्या झाल्याचे उघड झाले.

 


प्रत्येक शुक्रवारी