Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ फेब्रुवारी २००९
  हाक विज्ञानवतींना!
  कुसुमताईंशी झुळूझुळू गप्पा
  हे असंच चालायचं!
  अनिलची गोष्ट
  विज्ञानमयी
  नोबेल ललना
  कुडियोंका है जमाना !
  अकारविल्हेची वाट
  प्रतिसाद
  पालक, पाल्य आणि प्रोजेक्ट!
  सँडविचवाला
  अनुसरा मार्ग बचतीचे
  कर्णबधिरांच्या शिक्षणाचा..
  कलावंताचा अंतर्नाद
  हिरवी पातोडी
  नर्मदे हर आणि विठू पंढरीचा!

 

ज्ञानपीठविजेते कवी, साहित्यिक आणि नाटककार कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिन काल महाराष्ट्रात ‘मराठी दिन’ म्हणून साजरा झाला. त्यानिमित्तानं त्यांच्या भगिनी कुसुम सुनावणी यांच्याशी गप्पा मारून लिहिलेला हा लेख-

उतरतीला आलेलं ऊन.. कॉलनीतल्या आळसावलेल्या रस्त्यांवरची वर्दळ पुन्हा वाढू लागलेली.. रस्त्यालगतच्या वृक्षांवर विसावलेल्या चिमण-पाखरांनी आपले पंख फडफडवले नि ते दाणापाण्यासाठी झेपावण्याच्या तयारीत असतानाच्या प्रसन्न वेळी मी पुण्याच्या सहकारनगर-२ मधील क्रांती हाऊसिंग सोसायटीच्या बंगला नं. ५ मध्ये प्रवेशले. ज्ञानपीठ पुरस्कारविजेते कवी कुसुमाग्रज तथा तात्यासाहेब शिरवाडकरांच्या वय वर्षे ऐंशीकडे झुकलेल्या कनिष्ट भगिनी कुसुमताई सुनावणी माझी वाटच पाहत होत्या. सडपातळ, गोऱ्यापान, टवटवीत, हसतमुख कुसुमताईंना पाहून मला कवी कुसुमाग्रजांना भेटल्याचा आनंद झाला.
ख्यालीखुशालीवरून विषय कवींच्या स्मृतींकडे सरकला तशा कुसुमताई भावनाविवश झाल्या. सांगू लागल्या, ‘मी तात्यांपेक्षा १५ वर्षांनी लहान. आतासारखं त्यावेळी बहीण-भावांचं बोलणं नसे. मनामध्ये ज्येष्ठ व्यक्तीबद्दल भीतीयुक्त आदर असे. आम्ही धाकटी भावंडं त्यांना ‘तात्या’ म्हणून हाक मारत असू. वडील मंडळी त्यांना ‘गजानन’ या नावाने संबोधित. नाशकात ते ‘तात्यासाहेब’ म्हणून ओळखले जात. आमचे वडील व्यवसायाने वकील होते. आमच्या पिंपळगाव बसवंतला शाळा फक्त तिसरी-चौथीपर्यंतच होती. त्यामुळे आमचं चौथीपर्यंतचं शिक्षण पिंपळगावला झालं की पुढचं शिक्षण नाशिकला होई. तिथं आमच्या आजी वेणूताई शिरवाडकर आमचं सारं बघत.’

 

तात्या नाशिकच्या हं. प्रा. ठा. महाविद्यालयात कला शाखेत शिकत असताना त्यांचे कुटुंब गंगाकिनाऱ्यावरील बालाजी मंदिरालगतच्या चाळीत तिसऱ्या मजल्यावर राहत होते. तिथं तळमजल्यावर तात्यांची स्वतंत्र खोली होती. तिथंच त्यांनी कवितेचा पाळणा जोजवला असावा. कुसुमताई सांगतात, ‘मी त्यांना कधीही कविता लिहिताना पाहिल्याचं स्मरत नाही. सुट्टीमध्ये तात्या वणी (सप्तश्रृंगी) येथे राहणाऱ्या आत्या यमुनाबाई देशपांडे यांच्याकडे जात. आत्यांचे यजमान अमृतराव तथा भय्यासाहेब देशपांडे यांना पुस्तकांची आवड होती. त्यांची ग्रंथसंपदा संपन्न होती. महाभारत, रामायण, गडकऱ्यांची नाटके त्यांच्या संग्रही होती. तिथं तात्या हे सारे ग्रंथ वाचत. ते ग्रंथांच्या प्रेमात पडले आणि तिथंच त्यांची मानसिक भूमी तयार झाली. मुळातल्या प्रतिभेला स्रोत मिळाला.’
..अशा तऱ्हेनं आमच्या गप्पा रंगात आल्या होत्या. तोच कुसुमताईंची कन्या विनिताने चहाचा ट्रे समोर ठेवला. गरम चहाचे घोट घेत ताई सांगू लागल्या, ‘आमचे तात्या स्वत:च्या बाबतीत अबोल होते. स्वत:चा मोठेपणा नि स्वत:च्या कवितेची चर्चा त्यांनी कधीही केली नाही. त्यांचा आवाज चांगला होता. गाण्याची आवड होती. ते पेटी सुंदर वाजवीत. नाटकातील पदे गुणगुणत. तात्यांना एकटेपणाची आवड होती. स्वभाव प्रेमळ, विनोदी होता. बोलणं कोटीबाज होतं. त्यांचे मित्र, भावंडं किंवा इतर परिचित मंडळी तात्यांशी आदरणीय अंतर ठेवून वागत.’ त्याचं उदाहरण देताना कुसुमताई पुढे सांगू लागल्या, ‘आमचे लहान बंधू लेखक वसंत शिरवाडकर यांना एकदा पैशांची गरज होती. तात्यांनी त्यांना ५००० रुपयांचा चेक हस्तांतरित केला. त्यांनी तो इकडे-तिकडे ठेवल्याने त्यांना तो सापडेना. तो चेक तात्यांना केराच्या कोपऱ्यात सापडला. चेक उचलून हातात घेत ते म्हणाले, ‘अरे, हा चेक इथं केरात पडलाय!’ एवढंच बोलून त्यांनी चेक वसंताच्या हाती दिला. तात्या रागावले नाहीत. परंतु वसंतराव मात्र चांगलेच खजिल झाले.’
तात्यांनी वयाच्या ३५ व्या वर्षी लग्न केलं. त्यांच्यापेक्षा वयाने मोठय़ा असणाऱ्या त्यांच्या पत्नी गंगूबाईंना (पूर्वाश्रमीच्या गंगूबाई सुनावणी) कवितेचा दांडगा व्यासंग. काव्याची जाण नि नामवंतांच्या ओळखी यातूनच त्यांच्या मैत्रीचा गोफ विणला गेला. त्याचे पुढे लग्नात रूपांतर झाले. त्यांच्या घरात धार्मिकतेचं अवडंबर नव्हतं. तात्या आस्तिक असले तरी त्यांनी लग्नानंतर देव घरात ठेवले नाहीत. ते शंकरभक्त होते. कुठेही गेले की ते देवांपुढे मन:पूर्वक नतमस्तक होत.
तात्यांचे अत्यंत आवडते दैवत होतं- नाटककार राम गणेश गडकरी तथा गोविंदाग्रज. त्यांचं अनुकरण करून त्यांनी ‘कुसुमाग्रज’ हे कविनाम धारण केलं. मी त्यांची लाडकी बहीण. म्हणून माझ्या नावावरून तात्या झाले ‘कुसुमाग्रज’. सुरुवातीला त्यांच्या कविता प्रकाशकांकडून साभार परत येत. परंतु ते त्याबद्दल नि:शब्दच राहिले. आपल्या भावना व्यक्त न करणं, हे त्यांचं खास वैशिष्टय़! तात्या म्हणत, ‘साहित्याविषयी न बोलणारा तो माझा खरा मित्र.’ त्यांचं गुणगुणणं हे त्यांच्या अतीव आनंदाचं प्रतीक असे. ते छोटय़ा छोटय़ा गोष्टींत आनंद घेत व इतरांच्या सुख-दु:खांत समरस होत.
‘तात्यांच्या प्रोत्साहनामुळेच मी लग्नानंतर पुणे विद्यापीठातून एम. ए. झाले. आम्ही तेव्हा खडकीच्या अ‍ॅम्युनेशन फॅक्टरीच्या सदनिकेत राहत असू. माझी मे महिन्याची सुट्टी सुरू झाली की तात्या माझ्याकडे येऊन राहात. आमच्या घरी असलेल्या झोपाळ्यावर बसायला तात्यांना खूप आवडत असे. त्यांना चमचमीत तिखट पदार्थाबरोबरच गुळपोळ्या, जिलेबी, श्रीखंडाची आवड होती. त्यांना प्रवास आवडे. विविध प्रदेशांतील लहान-मोठी गावे पाहणे, बाजारहाट करणे, हा त्यांच्या आवडीचा विषय. त्यांचं सर्वाधिक आवडतं ठिकाण म्हणजे इंदौर! त्यांनी कधी डाकबंगल्याखेरीज अन्य कोणत्या निवासस्थानांत मुक्काम केला नाही. सापुताऱ्याच्या निसर्गरम्य, नीरव शांत डाकबंगल्यात त्यांचा बऱ्याचदा मुक्काम असे. कारण त्यांना उच्चभ्रू राहणीमानाची गरज वाटत नसे. शांत रात्रींत त्यांचं कवितालेखन चाले. अशी नीरव शांतता त्यांना स्फूर्ती देई. स्पर्धेची वृत्ती त्यांच्यात नव्हती. ‘नटसम्राट’ गाजलं तेव्हा त्यांना आनंद झाला. सिनेमात काम करण्याची त्यांची इच्छा होती, पण त्यांच्या ललाटात ती गोष्ट नव्हती.
‘कोणासाठीच तात्यांनी कधी शब्द टाकला नाही..’ ही आठवण जागवत कुसुमताई सांगू लागल्या, ‘मी एम. ए. च्या दुसऱ्या वर्षांत असताना मला व्याकरणाचा पेपर कठीण गेला. मनात पास-नापासाची भीती होती. तो पेपर कवी निकुम्ब यांच्याकडे तपासायला गेल्याची वार्ता मला कुठूनतरी मिळाली. मी तात्यांना सांगितलं की, ‘मला पेपर अवघड गेलाय. निकुम्बांकडं मार्काची चौकशी कर.’ हे माझं बोलणं तात्यांना आवडलं नाही. ते मला म्हणाले की, ‘तुझा अभ्यास झाला नव्हता तर तू परीक्षेला का बसलीस?’ असे हे आमचे सरळमार्गी तात्या!
तात्यांच्या चेष्टेखोर, नर्मविनोदी स्वभावाचा एक किस्सा कुसुमताईंनी अगदी आनंदून सांगितला.. ‘अहो, मी लहान असताना आमच्या वडिलांकडे वकीलकामासाठी येणाऱ्या एका पक्षकाराने वापरलेल्या विडीचं थोटूक हळूच बेमालूमपणे तात्यांनी माझ्या पोलक्याच्या खिशात ठेवलं. आणि मला म्हणाले, ‘इकडे ये, तुझ्या खिशात काय आहे पाहूयात!’ मी ‘काही नाही,’ म्हणाले. मग तात्यांनी माझ्या खिशातून विडीचं थोटूक काढून दाखवलं. माझी घाबरगुंडी उडालेली पाहून म्हणाले, ‘थांब! दादांना सांगतो,’ असं म्हणत ते स्वत:च जोरजोरात हसत सुटले. मग माझ्या लक्षात आलं की, तात्यांनीच माझी चेष्टा केलीय!’
तात्यांच्या स्मृती जागवत आमचे दोन तास कसे सरले, ते कळलंच नाही. मी कुसुमताईंचे आभार मानले तेव्हा ओठांवर कविवर्याची ‘संवाद’ ही कविता रेंगाळत राहिली..
तुम्ही जेव्हा
माझ्या कवितेशी बोलता
तेव्हा माझ्याशी बोलू नका.
कारण- माझ्या कवितेत मी असेन बराचसा
बहुधा,
पण, माझ्या बोलण्यात मात्र तुम्हीच असाल पुष्कळदा.
प्रतिभा आळतेकर