Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ फेब्रुवारी २००९
  हाक विज्ञानवतींना!
  कुसुमताईंशी झुळूझुळू गप्पा
  हे असंच चालायचं!
  अनिलची गोष्ट
  विज्ञानमयी
  नोबेल ललना
  कुडियोंका है जमाना !
  अकारविल्हेची वाट
  प्रतिसाद
  पालक, पाल्य आणि प्रोजेक्ट!
  सँडविचवाला
  अनुसरा मार्ग बचतीचे
  कर्णबधिरांच्या शिक्षणाचा..
  कलावंताचा अंतर्नाद
  हिरवी पातोडी
  नर्मदे हर आणि विठू पंढरीचा!

 

हा इंटरव्ह्य़ू नाहीये. तू आमच्याशी गप्पा मारतोएस असं समज..’ स्वत:ची ओळख ‘जॉय’ म्हणून करून देणारा इंग्लिशमध्ये म्हणाला. अनिलने मनातल्या मनात उत्तर तयार केलं. मग श्वास घेऊन ते दिलं : ‘श्यूअर.’ जॉयने त्याला विचारलं, ‘आर यू अ पीपल पर्सन?’ (‘तुला लोकांच्यात मिसळायला आवडतं का?’ ‘आय थिंक सो,’ अनिल उत्तरला. त्यानंतर जॉयने आणि त्याच्याबरोबरच्या शेफालीने अनिलशी गप्पा मारायला सुरुवात केली. चवी-चवीने श्रीखंड खावं तसे ते इंग्लिशमध्ये बोलत होते. अधेमधे कोटय़ा करून हसत होते. शेफाली सहज तिच्या केसांतून हात फिरवे. जॉय त्याच्या ऑरेंज ज्यूसचा घोट घेई. अनिलच्या लक्षात आलं की, आपण उगाच नवाकोरा शर्ट घातला. तो टोचत होता आणि त्यामुळे उकडतही फार होतं. पण खिशातून रुमाल काढून घाम पुसायचा त्याला धीर होईना. मनातल्या मनात इंग्लिशमध्ये वाक्य जुळवण्यात इतर काही करायचं भान उरत नव्हतं. मध्ये मध्ये ते दोघे त्याला ‘रिलॅक्स’ असं सांगत होते, त्याचा राग येत होता. स्वत:बद्दलची
 

माहिती सांगता सांगता अनिलने एक प्रिंटआऊट पुढे केला- ‘माय रेझ्यूम’ असं म्हणून. ‘रेझ्यूमे’ जॉयने पटकन् त्याचा उच्चार सुधारला. ‘सॉरी’, अनिल म्हणाला. मग जॉयने त्याला अनेक प्रश्न विचारले, ‘तू सोडवलेला सगळ्यात मोठा क्रायसिस कोणता? एखादा प्रॉब्लेम सोडवायला तुला थोडं खोटं बोलावं लागलं तर बोलशील का? यू नो व्हाइट लाईज्? लोकांना तुझ्यातलं नेमकं काय आवडतं, असं तुला वाटतं?’.. वगैरे वगैरे.
अनिल धडपडत उत्तरं देत होता. पण त्याच्या इंग्रजी शब्दांच्या साठय़ात त्याचं म्हणणं मावत नव्हतं. त्याला वाटायला लागलं की, आपल्या बोलण्यात काहीच चढउतार नाहीत. अगदीच सरळसोट बोलतो आपण. शेफालीने तर एक जांभई दाबल्यासारखी वाटली. जॉयचाही प्रश्न विचारायचा उत्साह मावळताना जाणवत होता. मग शेफालीने एक शेवटचा सल्ला दिला, ‘हे बघ, पी. आर. ही काही सोपी गोष्ट नाही. अनेकदा आपल्या क्लायंटला काय हवंय, ते त्याच्या आधी आपल्याला ओळखावं लागतं. समोरच्याला आपल्याबद्दल विश्वास वाटणं सगळ्यात महत्त्वाचं. आणि त्यासाठी आपण आपली पर्सनॅलिटी ओपन आणि फ्रेंडली आहे, हे दाखवलं पाहिजे.’ अनिलला वाटलं की, आपल्यात काय नाही, ते ही अशी गोल फिरून का सांगतेय? का नकार ऐकतानाही आपल्याला कम्फर्टेबल वाटण्याची ही पद्धत?
तो बाहेर येऊन बसला, तसा दुसरा एक मुलगा आत गेला. त्याने ओळख नसताना जॉयला पटकन् ‘हाय’ म्हटलं, याचं अनिलला आश्चर्य वाटलं. त्याने आजूबाजूच्या लोकांवर नजर टाकली. सगळे उत्साहाने एकमेकांशी बोलण्यात गर्क होते. त्याला वाटलं, ‘आपलं म्हणणं समोरच्याने ऐकावं इतकं महत्त्वाचं आहे, हा विश्वास कुठून येतो? आपण खरं तर इंग्लिश मीडियममध्ये शिकलो, मग हे बोलताएत ती भाषा इतकी अनोळखी का वाटतेय? या सगळ्यांचे हातवारे इतके सफाईदार आणि एकसारखे कसे? हे सगळे मिळून कट करून एखाद्या गुप्त ठिकाणी एकत्र केस कापून येत असावेत.. आपण जॉय आणि शेफालीसमोर एखादा विनोद करायला हवा होता. त्यांना आपण फारच कंटाळवाणे वाटलो असणार. आपलं काय रहातंय? काय कमी पडतंय? काहीतरी कमी पडतंय..’ तेवढय़ात तो मघाचाच मुलगा हसत बाहेर आला आणि जॉय त्याला म्हणाला, ‘जस्प्रीत तुझ्याशी सगळ्या डिटेल्स बोलून घेईल, तोपर्यंत..’ त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच अनिल तिथून चालू पडला. भगभगीत उन्हातून चालत सुटला. डोक्याला, मानेला चटके बसत होते. ‘आपण बावळटासारखे कसली वाट बघत बसलो? जस्प्रीत असा कोणी अस्तित्वातच नसणार. आपला अपमान करायला त्या तिघांनी मिळून तो रचला. त्या ऑफिसमध्ये आपल्यासारख्यांना जागा नाहीच. मग आधीच का नाही हाकललं? आता कुठे जावं?’ आईने ‘घरी कधी येशील?’, विचारलं होतं ते आठवलं. तिचा प्रचंड राग आला. ही सगळी तिचीच चूक आहे, असं त्याला वाटलं. हे ऊन, हा शर्ट, ट्रेनमधली गर्दी, तो भंगार इंटरव्ह्य़ू.. सगळंच.
चालून चालून थकवा आला तसा तो समोरच्या मॉलमध्ये शिरला. एका बेंचवर बसला. तिथला गारवा त्याच्या हाडात शिरला, तसं त्याला काळ थांबल्यासारखं झालं. हवेत एक मंद सुवास होता. सुखावणारा. आजूबाजूच्या चेहऱ्यांवर चकचकीत झळाळी पसरलेली होती. त्याला वाटलं, हा मॉल जगाच्या पाठीवर कुठेही असू शकतो. मग त्याने ठरवलं की, आपण मुंबईत नाहीच. त्याला खूप हलकं वाटलं. त्याने खिशातून होते- नव्हते ते सगळे पैसे काढले. आईने बँकेत भरायला पाच हजार रुपये दिले होते. मग तो एका दुकानात शिरला.. मग दुसऱ्या दुकानात.. आणि खरेदी करत सुटला. टी-शर्ट, स्कार्फ, जॅकेट, गॉगल, इलेक्ट्रिक रेझर, स्विस् नाईफ, हेअर नरिशिंग जेल, आंघोळ करताना पाठ घासायचा ब्रश.. सगळे पैसे संपेपर्यंत त्याने खरेदी केली. त्याला नशेत असल्यासारखं वाटत होतं. हेलकांडतच तो बाहेर पडला. दिवस संपत आला होता. तिन्हीसांजेची वेळ होती. स्टेशनवर येऊन त्याने ट्रेन पकडली. गर्दीचा पुन्हा राग आला म्हणून कानात हँड्सफ्री खुपसला आणि मोठय़ा आवाजात रेडिओ ऐकायला लागला. रेडियोवरच्या बडबडीत विचारांना डोक्यात शिरायला फटच सापडत नाही, याची त्याला गंमत वाटली. स्टेशनवर उतरून तो घराच्या दिशेने चालू लागला. लांबून नाक्यावर नजर टाकली. धन्या, शिरू आणि केश्या दम मारत उभे होते. सिगरेटवाल्याकडच्या पिवळ्या प्रकाशात ते धुळकट दिसत होते. अनिलला वाटलं, यांना घेऊन जाऊन त्या जॉय आणि शेफालीला मार दिला पाहिजे.
नाक्यावर जायचं रद्द करून तो घराकडे वळला. एक मजला चढून त्याने बेल वाजवली. पण ती वाजलीच नाही. त्याला अचानक आठवलं की, आईने येताना ती दुरूस्त करायला मेकॅनिक सोबत आणायला सांगितला होता. वैतागून तो जिने चढू लागला. चढत चढत थेट गच्चीवर जाऊन पोचला. मग आणखी वर. टाकीवर.
जोरात वारा सुटला होता. कानात घों-घों करत होता. त्याने खाली वाकून पाहिलं. वरून सगळे बारकेसे दिसत होते. छोटय़ा छोटय़ा गाडय़ा.. छोटी छोटी झाडं.. आपल्याला ते छोटे छोटे, त्यांना आपण. खोटे खोटे. खेळण्यातले. मग त्याने खरेदीतला एक टी-शर्ट काढला आणि वाऱ्यावर धरला. थोडा वेळ फडकल्यावर वाऱ्याने टी-शर्ट हिसकावून नेला. तो अनिलला दूरवर उडत जाताना दिसला. मग त्याने एक-एक करून सगळे कपडे असेच वाऱ्यावर सोडून दिले. त्याला वाटलं, आपण थोडे थोडे शहरभर वाटले गेलोय. थोडेसेच आपल्याजवळ उरलोय. मग त्याला सगळ्या वस्तूंचं काय करावं, कळेना. त्याने त्या एक-एक करून टाकीत टाकून दिल्या. बुडूक बुडूक असा आवाज झाला. टाकीने सगळं गिळून टाकल्यावर मिट्ट काळोख होईपर्यंत तो तसाच तिथे बसून राहिला.
दार ठोकून तो घरात शिरला, तशी आई प्रश्न विचारायला लागली. तिचा आवाज कानावर पडत होता, पण शब्द कळत नव्हते. त्याला आईची कीव आली. वाटलं, हिचं जग आपल्यापाशी सुरू होतं आणि आपल्याकडे येऊन संपतं. हिला काय सांगणार?
‘काय रे, इतका उशीर का झाला? पैसे भरलेस का? कामाचं काय झालं? हल्ली लक्ष कुठे असतं तुझं? आमच्याशी काही बोलत का नाहीस? घरी काही सांगतच नाहीस? काय चाललंय सध्या तुझं? अरे, मी कोणाशी बोलत्येय?..’ तिच्या तोंडातून आवाज येत राहिले. त्याने दुसऱ्या खोलीत जाऊन दरवाजा धाडकन् लावून घेतला.
इरावती कर्णिक