Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ फेब्रुवारी २००९
  हाक विज्ञानवतींना!
  कुसुमताईंशी झुळूझुळू गप्पा
  हे असंच चालायचं!
  अनिलची गोष्ट
  विज्ञानमयी
  नोबेल ललना
  कुडियोंका है जमाना !
  अकारविल्हेची वाट
  प्रतिसाद
  पालक, पाल्य आणि प्रोजेक्ट!
  सँडविचवाला
  अनुसरा मार्ग बचतीचे
  कर्णबधिरांच्या शिक्षणाचा..
  कलावंताचा अंतर्नाद
  हिरवी पातोडी
  नर्मदे हर आणि विठू पंढरीचा!

 

नोबेल पुरस्कारविजेत्यांमध्ये महिलांची संख्या पुरुषांच्या मानाने अल्पच आहे. आजपर्यंत ३४ महिलांना हा पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या कर्तृत्वाची ओळख ‘नोबेल ललना’ या पुस्तकातून होते.
जगात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्कारांची सुरुवात होऊन आता शंभरहून अधिक वर्षे झाली आहेत. या पुरस्कारांबाबत जाणवणारी आणखी एक गोष्ट म्हणजे पुरस्कार विजेत्यांमध्ये महिलांची असलेली अत्यल्प संख्या. हे पुरस्कार प्रदान करण्यास १९०१ सालापासून सुरुवात झाली. तेव्हापासून २००८ पर्यंत एकूण ८०१ व्यक्तींना तसेच २० संस्थांना नोबेल पुरस्कार देण्यात आले. आणि त्यात केवळ ३५ महिला या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत.
‘नोबेल फाऊंडेशन’ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, पदार्थविज्ञानासाठी दिला जाणारा पुरस्कार हा आतापर्यंत केवळ दोन महिलांना मिळाला आहे. रसायनशास्त्र- तीन महिला, शरीरविज्ञान किंवा वैद्यकीय पुरस्कार आठ महिलांना, साहित्य पुरस्कार ११ महिलांना आणि शांतताविषयक कार्याबद्दलच्या नोबेल पुरस्काराने १२ महिलांना गौरवले गेले आहे. आजवर अर्थशास्त्रविषयक पुरस्कार एकाही महिलेला मिळालेला नाही. या पुरस्कारविजेत्या महिलांची एकूण संख्या ३६ होते. मात्र, मारी क्युरी यांना दोनदा नोबेल पुरस्कार दिला गेल्याने प्रत्यक्ष नोबेल पुरस्कार विजेत्या महिलांची संख्याही ३५ आहे.
महिलांना मिळालेले नोबेल पुरस्कार हाच धागा पकडून मीरा सिरसमकर यांनी ‘नोबेल ललना’ हे पुस्तक लिहिले आहे. पुस्तकामध्ये
 

एकूण ३४ नोबेल पुरस्कार विजेत्या महिलांची माहिती देण्यात आली आहे. २००८ साली ‘शरीरविज्ञान किंवा वैद्यकीय’ या गटात नोबेल पुरस्कार मिळालेल्या एॅनोईस सिनोसी या कर्तृत्ववान महिलेचा या पुस्तकात समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे त्या वगळता ३४ महिलांच्या कार्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न या पुस्तकात करण्यात आला आहे. लेखिकेची ‘नोबेल ललना’ ही ही मालिका ‘स्त्री’ मासिकात सप्टेंबर २००६ ते जानेवारी २००८ या काळात प्रसिद्ध झाली. त्याचेच हे संकलन.
या सर्व ३४ स्त्रिया महान असल्या, तरी त्यातील मेरी क्युरी, मदर तेरेसा आदी हाताच्या बोटावर मोजता येतील, इतक्याच महिलांची माहिती सर्वसामान्यांना असते. त्यामुळे या ३४ कर्तृत्ववान महिलांची ओळख पुस्तकाद्वारे करून देण्याची संकल्पना दाद देण्याजोगी आहे. माहिती मिळवण्यासाठी लेखिकेने केलेले परिश्रमही पुस्तक वाचताना लक्षात येतात. मात्र त्या लेकनात रंजकता कमी असल्यामुळे तसेच बरेचदा हे लिखाण शब्दश अनुवादाच्या अंगाने जाणारे असल्याने पुस्तकातील काही व्यक्तिचित्रे वाचताना ती लगेच दयाला भिडत नाहीत. या संबंधात उदाहरणांदाखल ही काही वाक्ये.. ‘‘आपण अनुभवांच्या चैतन्य कणांना लेखणीत पकडून धवल कागदावर अढळपद देऊ शकतो, हे समजल्यावर त्या पूर्वरचित शब्दवैभवाचा शोध घेतो.’
अशा अनेक बोजड वाक्यांचा वाचकांना कितीसा अर्थबोध होईल? भाषांतरांच्या खटाटोपात अशी वाक्ये लिहिली गेली असावीत. अशा प्रकारची वाचकांना न उमगणारी आणि अडथळा वाटणारी वाक्ये सुरुवातीच्याच प्रकरणात आहेत. नंतरचे लेख मात्र बऱ्यापैकी जमले आहेत.
पुस्तकातील काही व्यक्तिचित्रे फारच त्रोटकपणे रेगवलेली आहेत. उदा. बार्था व्हॉन सुत्नेर या अल्फ्रेड नोबेल यांची मैत्रीण असलेल्या आणि शांततेचा पुरस्कार प्राप्त झालेल्या संशोधिकेच्या लेखाबद्दल कुतूहल होते. मात्र तो लेख तिच्याबद्दलचे कुतूहल शमवण्यास पुरेसा पडत नाही.
पुस्तकांतले काही लेख मात्र चांगले आहेत. विशेषत: बेटी विल्यम्स, अल्वा मिरडॅल, रिटा मॉन्टॅलॅसिनी, बार्बरा मॅक्लिंन्टाक, पर्ल बक, नेली सॅक्स यांच्यासंबंधी या लेखांमध्ये आवश्यक ती सारी माहिती मिळते.
विज्ञानाशी संबंधित महिलांवर लिहिताना जी भाषा वापरली आहे, ती छान जमली आहे.
या पुस्तकात ज्या महिलांच्या कर्तृत्वाचा आढावा घेण्यात आला आहे, त्यांच्यातील एक समान धागा म्हणजे त्या सर्वाना मिळालेला नोबेल पुरस्कार. त्यांची क्षेत्रे वेगवेगळी आहेत, परंतु त्यांची जिगर, तळमळ मात्र सारखीच आहे. नोबेल पुरस्काराने जागतिक मान्यता मिळालेल्या या कर्तृत्ववान महिलांच्या कार्याची ओळख व्हायला एकत्रितपणे करून देण्यात हे पुस्तक यशस्वी झाले आहे. ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’ने प्रसिध्द केलेल्या या २२९ पानी पुस्तकाची किंमत आहे १८० रुपये.
अनिल चक्रदेव