Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ फेब्रुवारी २००९
  हाक विज्ञानवतींना!
  कुसुमताईंशी झुळूझुळू गप्पा
  हे असंच चालायचं!
  अनिलची गोष्ट
  विज्ञानमयी
  नोबेल ललना
  कुडियोंका है जमाना !
  अकारविल्हेची वाट
  प्रतिसाद
  पालक, पाल्य आणि प्रोजेक्ट!
  सँडविचवाला
  अनुसरा मार्ग बचतीचे
  कर्णबधिरांच्या शिक्षणाचा..
  कलावंताचा अंतर्नाद
  हिरवी पातोडी
  नर्मदे हर आणि विठू पंढरीचा!

 

मुलाच्या आई-वडिलांचे काय?
३१ जानेवारीच्या ‘चतुरंग’मध्ये डॉ. अरुंधती साने यांचे ‘मुलींच्या पालकांना मान द्या’ हे पत्र वाचले. मात्र, मुंबई- पुण्यात परिस्थिती नेमकी उलट झाली आहे. स्वत:ला सुशिक्षित, पांढरपेशा म्हणवणाऱ्या मुंबई-पुण्यातल्या मुली आणि त्यांच्या पालकांचे वागणे पाहिले तर मुलांचे आई-वडील हीसुद्धा हाडामांसाची माणसेच आहेत, त्यांनाही राग, लोभ, संताप, अपमान या भावना आहेत, त्यांनाही प्रतिष्ठा आहे, हे ओरडून सांगायची वेळ आलेली आहे. जिचं लग्न- तिच्या मनाचा व हौशीचा विचार करायला हवा, यात दुमत नाहीच. पण मुलाच्या आईनेही काही बेत केलेले असतात. सुनेच्या स्वागताची काही स्वप्ने पाहिलेली असतात, हे काही जणींच्या गावीही नसते. तिलाही हौस असते आणि ती पुरी करायला तिलाही एकच संधी असते, हे कसे विसरून चालेल?
- राधा मराठे, पुणे.

आठवणी जाग्या झाल्या
३१ जानेवारीच्या चतुरंग पुरवणीमधील ‘हुरडोत्सव’ आणि ‘गुर्जरी पोंकनगरी’ हे दोन्हीही लेख हुरडा सोहळ्याचे यथार्थ चित्रण करणारे आहेत. या लेखांमधील शेतातील वर्णन वाचून तो अनुभव घेत असल्यासारखे वाटले. मी रायगडची असून, पोपटीमधल्या शेंगांसोबत ओले खोबरे खाल्ले आहे. आमच्या घरच्या आवारात कनक, करांदे यांसारख्या कंदभाज्या आम्ही लावायचो. त्या त्यांच्याच पाचोळ्यामध्ये भाजून खात असू. ती चव वेगळीच होती. या लेखामध्ये उल्लेखिलेल्या नागपूरच्या मेघना वाहोकरांनी आताची पिढी आणि जुन्या पिढीला घट्ट बांधून ठेवण्याचा जो प्रयत्न केला आहे, तो स्तुत्य आहे. मस्त मनमोकळं शिवार सगळ्यांनी अनुभवायचं असेल तर पालक मंडळींनी लहानग्यांना हा अनुभव नक्की द्यायला हवा.
रायगड जिल्ह्य़ामध्येही अशी हुरडा पार्टीची संकल्पना साकारता येईल. कृषी पर्यटन करू पाहणाऱ्यांनी याचा जरूर विचार करावा,

 

जेणेकरून लहानथोर सर्व मंडळींना हा थंडीच्या मोसमातील आनंदाचा आणि निसर्गसान्निध्याचा लाभ घेता येईल.
- स्मिता गुप्ते, विलेपार्ले

प्रपंच-परमार्थाचे यथार्थ चित्रण
अरुणा ढेरे यांचा ‘प्रपंच व परमार्थ’ हा लेख अतिशय आवडला. तो वाचताना ‘संत तुकाराम’ चित्रपटामधील गरुडाचे विमान तुकोबारायांना वैकुंठाला न्यायला येते, तो प्रसंग डोळ्यांसमोर तंतोतंत उभा राहिला. आवली, जिजासाठी तुकोबांची तळमळ व आवलीची संसाराची, घराची, गुराढोरांची माया- यातील काय श्रेष्ठ, हे ठरवता येत नाही.
हा लेख वाचताना मन इतकं भरून आलं आणि मनात विचार आला, की तुकोबांनी जसा आवलीला आग्रह केला- ‘चल.. चल’ तसा आग्रह माझ्या पतीनेही मला केला तर त्या गरुडाच्या विमानात जायला मात्र मला नक्कीच आवडेल.
- ममता आपटे

मनातील उमेद जागविणारी पुरवणी
नव्या वर्षांतील ‘चतुरंग’चे नवे रूप आनंददायी आहे. ‘चिकन सूप फॉर द सोल’ हे समर्पक शीर्षक असलेल्या सदरातील उषा महाजन यांनी रूपांतरित केलेल्या कथा वाचनीय असतात. व्यक्तीच्या मनातील विचार, त्यात होणारे कालानुरूप बदल त्या कथांमधून व्यक्त होतात. मंगला गोडबोले यांच्या सदरामधूनही नवनवे विचार पोहोचतात. ‘विज्ञानमयी’ हे सदर तर संग्रही ठेवण्याजोगे आहे. या पुरवणीमुळे अजया भागवत, वर्षां भावे यांच्यासारख्या ‘सारेगमप’ स्पर्धेसाठी अमूल्य योगदान देणाऱ्या सर्वाबाबत विशेष माहिती मिळाली. ही पुरवणी केवळ आकर्षक नव्हे, तर माहितीपूर्ण आहे. अरुणा ढेरे यांनी लिहिलेल्या ‘यमुनातीरीचे बुलबुल’ या लेखातील खेळ श्रावण महिन्यात रात्र जागवताना अजूनही खेळला जातो. चतुरंग पुरवणी मनाला उभारी आणते. स्त्रीवर्गाला नवी उमेद देते.
- प्रतिभा बिवलकर, डोंबिवली.

संग्राह्य अन् संस्मरणीय लेख!
वर्तमानपत्र, फुलांचा पुडा आणि दुधाची बाटली यांचं आयुष्य अल्पजीवी असतं, असं म्हणतात. पण काही वर्तमानपत्रांच्या काही दीर्घकाळ स्मरणात ठेवण्याजोग्या लेखांच्या बाबतीत असं म्हणता येत नाही. पंधरा-वीस वर्षांपेक्षा जास्त काळ जपून ठेवलेल्या अशाच काही कात्रणांचे अभिवाचन (‘वृत्तपत्रीय कात्रणांचे अभिवाचन’च्या नावाने) आम्ही आमच्या ‘जवळीक’ या संस्थेतर्फे केले होते.
‘चतुरंग’चे अलीकडचे काही लेख मनाला स्पर्शून गेले. राधा गानू यांचा ‘फडताळ आणि खुंटी’ (१३ डिसेंबर) हा लेख किंवा ‘लग्न समारंभ- एक वास्तव मालिका’ (१० जानेवारी) हा शुभा प्रभू-साटम यांचा लेख हे कायम लक्षात राहतील. शिवाय रवींद्र पाथरे यांचा ‘ऐटबाज उपेक्षित!’ हाही लेख आवडला. ‘चिकन सूप’, ‘..पण बोलणार आहे’ आणि ‘कवितेच्या वाटेवर’ हीही सदरे आवडली. अरुणा ढेरे यांचं रसग्रहण हीही कविताच वाटते. कवितेचा आस्वाद देत त्या वाचकाला श्रीमंत करतात.
‘चतुरंग’ पुरवणीची अशी किती पाने वर्षअखेरीपर्यंत साठवावी लागतील, कोण जाणे! ‘चतुरंग’मधील लेखच नव्हे, तर काही प्रतिक्रियाही जपून ठेवण्याजोग्या असतात. उदा. मंजुषा गोसावी यांची २४ जानेवारीला प्रसिद्ध झालेली ‘परावलंबित्वावर पर्याय’ ही प्रतिक्रिया.
शशिकांत लावणीस, सोलापूर ’