Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ फेब्रुवारी २००९
  हाक विज्ञानवतींना!
  कुसुमताईंशी झुळूझुळू गप्पा
  हे असंच चालायचं!
  अनिलची गोष्ट
  विज्ञानमयी
  नोबेल ललना
  कुडियोंका है जमाना !
  अकारविल्हेची वाट
  प्रतिसाद
  पालक, पाल्य आणि प्रोजेक्ट!
  सँडविचवाला
  अनुसरा मार्ग बचतीचे
  कर्णबधिरांच्या शिक्षणाचा..
  कलावंताचा अंतर्नाद
  हिरवी पातोडी
  नर्मदे हर आणि विठू पंढरीचा!

 

मुलांच्या शाळेतले प्रोजेक्ट किंवा चार्ट तयार करून देणं, हे खरं तर पालकत्वाच्याच कर्तव्याचा अप्रत्यक्ष घटक बनलं आहे. त्यावर आऊटसोर्सिग हा एक व्यावसायिक पर्याय असू शकतो. पण मुलांचे प्रोजेक्ट करतानाही आनंदाचे अनेक झरे सापडू शकतात.
‘‘बाबा, आपल्या देशात युनियन टेरिटरीज् किती आहेत?’’ बौद्धिक टॉनिकच्या जाहिरातीत मुलं जशी बापाला कचाटय़ात पकडणारे प्रश्न विचारतात, अगदी तस्साच प्रश्न चिरंजीवांकडून आला.
हल्ली मुलांच्या जी.के.च्या प्रश्नाला केव्हाही तयार राहावं लागतं. आणि अनेक प्रश्न सुरुवातीला सोपे वाटतात. खरं सांगतो, पाचच केंद्रशासित प्रदेश आठवले. चंडिगढ आणि दिल्ली हे केंद्रशासित प्रदेश म्हणून काही केल्या आठवले नाहीत.
 

‘‘अरे, दिल्लीला आता स्टेटचं पण स्टेटस आहे. इट्स अ कॅपिटल युनियन टेरिटरी! त्यामुळे दिल्ली पटकन आठवली नाही.’’ गिरे तो भी टांग उपर, या वृत्तीने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
आपला बाबा जिनीयस आहे आणि आई सुपरवुमन, असं किशोरवयापर्यंत सगळ्याच मुलांना वाटत असतं. पौगंडावस्थेपासून बापाबद्दलचं मत बदलायला सुरुवात होते. पण तोपर्यंत तरी हे आभासी स्वरूप टिकवून ठेवण्याची धडपड बापलोकांना करावीच लागते.
त्यातल्या त्यात जी.के. ही एनीटाइम बापाची परीक्षा पाहण्याची गोष्ट. पण हल्ली त्याचीही भीती वाटते. कारण त्याच्या आडून शाळेतली शिक्षिका प्रश्न विचारत्येय, असं सतत वाटत राहतं. आपली मापं काढली जातायत, ही भावना विशिष्ट वयानंतर आवडेनाशी होत असावी. चांगला पालक होण्यासाठी आधी या भावनेवर मात करावी लागते.
बऱ्याचदा जी.के.चा साधासाच वाटणारा प्रश्न ही एखाद्या प्रोजेक्टची किंवा चार्टची चाचपणी असते. ‘बाबा, टीचरने युनियन टेरिटरीजवर चार्ट करायला सांगितलाय,’ याचा अर्थ असाच असतो की पिताश्रींनी सारे कामधंदे बाजूला ठेवून एखाद्या रात्री मान मोडून तो करून द्यायचा.
मुलांनी कितीही आधी सांगितलं तरी, ‘जरा आधी तरी सांगायचं रे,’ असं एक साधारण वाक्य पालकांकडून फेकलं जातं. पण त्याचा काही उपयोग नसतो. कितीही आयत्यावेळी हे काम आलं तरी ते जागून आणि खपून करावंच लागतं.
अर्थात यालाही काही पर्याय आहेत. गुजराती कोंदणात राहणारा मित्र प्रवीण आमचे हे कष्ट बघून एक दिवस चुकचुकला. हे सगळं तुम्ही कशाला करताय? आपण असं काही करायचं नसतं. प्रोजेक्ट करून देणारे खूप प्रोफेशनल लोक असतात. आमच्या प्रतीकचे दोन-चार मित्र (कोंदणातले) एकत्र येऊन पैसे काढतात आणि प्रोजेक्ट करायला देतात.
ही माहिती जरा नवीन होती. अर्थात हल्ली व्यावसायिक पातळीवर काहीही शक्य असतं. गावातलं फाटकाजवळचं मारवाडय़ाचं छोटसंच दुकान. पण तिथे पालकांची नेहमीचीच झुंबड असते. तिथल्या काऊंटरवरच्या कुणालाही फक्त शाळेचं नाव सांगायचं आणि इयत्ता सांगायची. प्रोजेक्टसाठी आवश्यक ती सगळी सामग्री तो समोर आणून देणार. राखी मेंकिंगसाठी अमकं सामान, काइट मेकिंगसाठी हे घ्या, घडय़ाळ तयार करायचंय, त्यासाठी तमकं सामान, युटेन्सिल्स पाहिजेत ही घ्या, व्हेजिटेबल्सचा पिक्चर चार्ट हवाय, हा घ्या. तोंडातून उच्चारलेली प्रत्येक गोष्ट तो आणून देईल, असं वाटायला लागतं. परवा ‘सोर्स ऑफ वॉटर’चा चार्ट हवा होता. तोही मिळाला. नदी, धरण, तलाव, हातपंप, नळ अशी सगळी टीचरने लिहून दिलेली चित्रं रेडिमेड होती. अशा वेळी एखाद्याला साक्षात्कार होताना जसं वाटत असेल अगदी तसंच वाटतं.
अख्खाच्या अख्खा प्रोजेक्टच कुणी तरी शाळेचा ड्रॉइंगचा सर किंवा एखादा आर्ट स्कूलचा विद्यार्थी करून देतो, ही भन्नाट कल्पना तर नवीनच होती. या व्यावसायिकतेचा अंदाज आल्यावर मग मुलाच्या शाळेतले आधी इतर पालकांनी केलेले सुंदर सुंदर प्रोजेक्ट पाहताना स्वत:बद्दल कधी तरी वाटलेला गंड आणि लाज थोडी कमी झाली. हे सगळं आऊटसोर्स करायची आयडिया आपल्या मराठी डोक्यात कशी आली नाही, याचीही गंमत वाटली.

तरीही सगळंच्या सगळं आऊटसोर्स करून शाळेत ते मुलाच्या नावे पाठवायची आयडिया काही भावली नाही ती नाहीच. आपलं आऊटसोर्सिग कशापुरतं मर्यादित तर इंटरनेटवर जाऊन थोडी ‘गुगल’खोरी करायची, किंवा मग ‘विकिपिडिया’ आहेच. ‘गुगल डॉट को डॉट इन’चा केवढा आधार अशावेळी वाटतो ते पालक नसणाऱ्यांना कळणार नाही. पण त्यातूनही आपला गुगलेक्चुअल बाप सर्वज्ञानी आहे, ही मुलांमधली प्रतिमा टिकवण्यापेक्षाही त्यांना इन्व्हॉल्व करून घेता आलं तर मजा येते. नुसतंच डाऊनलोडिंग तर अगदी कॉलेजातली पोरंही करतात. पण आपल्या जमान्यातल्या या माहितीच्या स्रोताचं अ‍ॅप्लिकेशन सॉलिड गमतीशीर असतं.
युनियन टेरिटरीची माहिती शोधताना ‘गुगल अर्थ’वरून लक्षद्वीप आणि अंदमान-निकोबारमधली समुद्रातली छोटी-मोठी बेटं मोजताना आम्ही बापलेक भरकटलो खरे, पण लहानपणी अंगणात झोपून तारे मोजण्याच्या अनुभवाची आठवण ताजी झाली.
दादरा-नगर-हवेली आणि दीव-दमण या दोन्ही ठिकाणी ‘लॅन्ग्वेजेस स्पोकन’मध्ये ‘मराठी’ असा उल्लेख बघून मुलाला झालेला आनंद मनाला कुठेतरी दिलासा देऊन गेला.
बाकी रात्री उशीरा जागून चार्ट तयार करण्यातली गंमत वेगळीच. डायनिंग टेबल रिकामं करून त्यावर स्वत:ची सारखी सारखी वळकटी करून पाहणाऱ्या चार्ट पेपरवर वजनं ठेवून त्याला सरळ करण्याचे प्रयत्न; चार्ट पेपरवर पेन्सिलीने टेबल आखताना कॉलम आणि रोच्या मोजणीत होणारे गोंधळ, खाडाखोड, शाळेत बापाची अब्रू जायला नको, म्हणून पुन:पुन्हा ताडून घेतलेली इंग्रजी स्पेलिंग्ज; या सगळ्या कसरतीतला आनंद वेगळाच असतो.
रात्री उशीरा कधी तरी मान आणि कंबर आवाज करू लागते. स्वयंपाक घर म्यान करून माताजींचं प्रस्थान झालेलं असतं. चिरंजीव जांभयांच्या सूचना ऐकून केव्हाच पहुडलेले असतात. एफ.एम.वरचा अ‍ॅन्कर त्याच्या खर्जातही तरलता आणून दोन गाण्यांमधला दुवा शोधत असतो. आणि काम संपत आणल्याचा आपलाच एक छान मूऽऽड लागलेला असतो. अशा वेळी कॉलेजातल्या दिवसातल्या इंजिनीअरिंगच्या मित्रांसाठी जागून मारलेल्या जीटय़ा (ग्लास ट्रेसिंग्ज) आठवतात. कुणाच्या नोटबुकांच्या रात्रीत केलेल्या कॉप्या. कुठे तरी कुठल्या तरी एकांकिकेसाठी केलेलं नेपथ्य किंवा विग, विज्ञान प्रदर्शनासाठी तयार केलेला प्रोजेक्ट वगैरे असं काहीही आठवत बसतं.
त्या मूडमध्ये उत्तररात्री निगुतीने प्रोजेक्ट तयार होतो. मान तिरकी करून त्या प्रोजेक्टकडे एकदा पाहायचं आणि डोळ्यांवर कितीही झापड असली तरी सकाळी उठून मुलाची पहिली दाद ऐकण्यातही एक वेगळंच समाधान असतं. ते मात्र आऊटसोर्स करता येत नाही.
पराग पाटील
paraglpatil@gmail.com