Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ फेब्रुवारी २००९
  हाक विज्ञानवतींना!
  कुसुमताईंशी झुळूझुळू गप्पा
  हे असंच चालायचं!
  अनिलची गोष्ट
  विज्ञानमयी
  नोबेल ललना
  कुडियोंका है जमाना !
  अकारविल्हेची वाट
  प्रतिसाद
  पालक, पाल्य आणि प्रोजेक्ट!
  सँडविचवाला
  अनुसरा मार्ग बचतीचे
  कर्णबधिरांच्या शिक्षणाचा..
  कलावंताचा अंतर्नाद
  हिरवी पातोडी
  नर्मदे हर आणि विठू पंढरीचा!

 

‘इतरांबद्दल आस्था बाळगणे ही गोष्टच जीवनाला अनन्यसाधारण महत्त्व व खोलवर अर्थ प्राप्त करून देत असते.’
- पॅब्लो कॅसॅल्स्
जर तुम्हाला या जगात काही बदल घडवून आणावासा वाटतोय, आपली स्वत:ची अशी वेगळी ओळख मागे ठेवून जावंसं वाटतंय वा स्वर्गाच्या प्रवासाचं (मोक्षप्राप्तीचं) आधीच आरक्षण करून ठेवायचं आहे, तर अशा वेळी तुम्ही काय कराल? गहन विचार करून काही भव्यदिव्य कृती कराल? का रोजच्या दिवसात एखादी तरी चांगली गोष्ट करण्याचा ध्यास धराल?
मायकेल क्रिस्तीआनो हा न्यूयॉर्क सिटी कोर्टातील एक अधिकारी. रोज नेमाने पहाटे साडेचारला उठून अगदी वाईट हवा, सुट्टीचा दिवस, कामाचा दिवस असेना का पण, पायी पायी त्याच्या सँडविच विक्रीच्या दुकानात जात असतो. तो काही मोठय़ा साखळीचा मालक नाही. त्याचं स्वत:चंच असं हे लहानसं स्वयंपाकघरच आहे. तिथे त्याची सुप्रसिद्ध सँडविचेस विकली जातात. ती बनवण्याची सर्व सामग्री तयार असते. न्यूयॉर्क सिटी हॉलजवळच्या सेंटर व लाफायेट स्ट्रीटस् या रस्त्यावर बेघर लोकांसाठी जी
 

तात्पुरती निवारा केंद्रं आहेत, त्यांना भेट देण्यासाठी मायकेल साधारण ५.३० ला निघतो. तिथल्या लोकांमध्ये सँडविचेस वाटून मगच कोर्टामध्ये कामावर जातो.
वीस वर्षांपूर्वी हा सिलसिला सुरू झाला, तो जॉन नावाच्या एका बेघर माणसाला कपभर कॉफी व एक ब्रेडरोल दिल्यानंतर. अनेक दिवस मायकेल दररोज जॉनसाठी सँडविचेस, चहा, कधी कपडे आणत असे. कडाक्याच्या थंडीत तो कोर्टात गेला की, जॉनला त्याच्या रिकाम्या गाडीत दिवसभरासाठी जागा देत असे. एखादं सत्कर्म करावं एवढीच मायकेलची सुरुवातीच्या काळात इच्छा होती.
पण एके दिवशी त्याच्या अंतर्मनानं कौल देऊन त्यापेक्षा जास्त काहीतरी करण्यास भाग पाडलं. कडाक्याच्या थंडीतल्या त्या सकाळी जॉनला त्याने विचारलं की, त्याला स्वच्छ, नीटनेटकं राहण्यास आवडेल का? मायकेलने खरं तर ती नुसती मनाची वरवरची तयारी दाखवली होती, कारण त्याला पूर्ण खात्री होती की, जॉन त्यासाठी नकारच देणार. अपेक्षा नसताना जॉनने त्याला विचारलं, ‘‘तू स्वत: मला स्वच्छ करणार आहेस का?’’
मायकेलचं अंतर्मन म्हणू लागलं, ‘‘तुझ्या तोंडून सहज निघून गेलेल्या शब्दाचं पालन आता तुला करणं भाग आहे.’’ त्या गरीब, गलिच्छ केसाळ, घाणेरडय़ा वासाची कपडय़ाची लक्तरं चढवलेल्या, रानटी अवतार असलेल्या माणसाकडे बघून मायकेलच्या अंगावर काटाच आला, पण त्याच वेळी नकळत स्वत:हून घेतलेली जबाबदारी, दिलेला शब्द त्याला नजरेसमोर दिसू लागलं. कोर्टामधल्या स्वच्छतागृहात जॉनला घेऊन जाऊन त्याने आपल्या कामाला सुरुवात केली.
अनेक वर्षांंच्या वेदना व दुर्लक्षित अवस्थेमुळे जॉनचं पूर्ण अंग जखमा व व्रणांनी भरून गेलं होतं. कापून टाकलेला त्याचा उजवा हात बघून मायकेलच्या मनात भीती व घृणा अशा दोन्ही भावना एकत्रित झाल्या. दाढी, आंघोळ, केस कापणे या कामात जॉनला मदत करून नंतर मायकेलने त्याच्यासमवेत बसून नाश्ताही केला. ‘‘आणि त्या क्षणी मला साक्षात्कार झाला की, माझ्या हातून काही विधायक घडणार आहे व असं करण्याची माझ्यात आंतरिक शक्ती आहे.’’ मायकेलला आजही हे आठवत असतं.
इथेच सँडविचेस बनविण्याच्या त्याच्या कल्पनेचा उगम झाला. मायकेलने धंदा सुरू केला, तेव्हा त्याला कोणत्याही उद्योगसमूहाकडून मदतीचा हात मिळाला नाही, असं सांगून मायकेल म्हणतो, ‘‘गरिबांना मदत करून त्याबद्दल प्रसारमाध्यमातून मला प्रसिद्धी मिळावी, अशी माझी अजिबात इच्छा नाही. माझ्या परीने जमेल तसा खारीचा वाटा उचलून मला केवळ रोजच्या रोज काहीतरी चांगलं काम करत राहायचं आहे. कधी माझ्या खिशातले पैसे खर्च करून, तर कधी हितचिंतकांकडून मिळणाऱ्या मदतीतून माझं काम चालू असतं. एके दिवशी एक माणूस या प्रमाणात का होईना, पण मी खरंच काहीतरी करू शकतोय.’’
‘‘असेही दिवस असतात, जेव्हा रोज बर्फ पडत असतो आणि अशा वेळी ऊबदार अंथरुणामधून उठून माझ्या घरच्यांच्या मायेच्या सुरक्षित वातावरणातून बाहेर पडून सँडविचेस घेऊन शहरात जाणं मोठं कठीण जातं. पण मग माझा आतला आवाज, कडकडणाऱ्या दातांनी बोलू लागतो आणि माझ्या हालचालींना एकदम गती येते.’’
आणि खरंच अशा रीतीने गेली २० वर्षे मायकेल रोज २०० सँडविचेस बनवत आलाय. ‘‘मी सँडविचेस कधीच टेबलावर पसरून ठेवत नाही. लोकांनी तिथूनच स्वत: उचलून घेण्यापेक्षा मी प्रत्येकाशी नजरेला नजर भिडवून हस्तांदोलन करतो. त्यांचा दिवस आनंदाचा जावा म्हणून शुभेच्छा देतो व मग सँडविच देतो. तिथली प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी मोठी असते. ‘बेघर लोक’ म्हणून मी त्यांच्याकडे कधीच बघत नाही. उलट त्यांना अन्न, प्रोत्साहन, स्मितहास्य व भावनिक गरज असते, असाच मी विचार करतो. मायकेलने स्पष्ट करत सांगितलं.
‘‘एकदा आमचे मेयर कॉच स्वत: माझ्याबरोबर आले होते. तेव्हा प्रसारमाध्यमाचे लोकही नव्हते- केवळ आम्ही दोघंच होतो.’’ मायकेल सांगतो, ‘‘परंतु मेयरच्या बरोबरीने काम केल्याच्या स्मृतीपेक्षा मायकेलला आणखी एका व्यक्तीबरोबर केलेल्या कामाचं खूप जास्त महत्त्व वाटतं..’’
वरचेवर येऊन सँडविच घेऊन जाणारा एक माणूस अचानकच कुठेतरी गायब झाला होता. मायकेल त्याच्याबाबत सतत विचार करत असे. त्याला मनातून आशा वाटे की, त्याची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा सुधारली असावी. पण अचानक एक दिवस तो माणूस स्वच्छ दाढी, आंघोळ करून धुतलेले गरम कपडे घालून स्वत: बनवलेली सँडविचेस घेऊन आला होता. त्याला ती सर्व लोकांच्यात वाटायची होती. मायकेलकडून मिळणारं ताजं अन्न, प्रेमळ हस्तांदोलन, मायेची ऊब व शुभेच्छांमुळे त्याला ज्याची गरज होती, ते प्रोत्साहन मिळालं होतं. त्याचा आशावाद जागृत झाला होता. बेघर म्हणून ओळखलं जाण्याऐवजी एक व्यक्ती म्हणून ओळख मिळाल्यावर त्याच्या आयुष्याला नवीच दिशा मिळाली होती.
त्या क्षणी कोणत्याही संवादाची, संभाषणाची गरज नव्हती. दोघेजण गुपचूपपणे आपापलं काम करण्यात मग्न होते, सँडविचेस वाटत होते. न्यूयॉर्क शहरासाठी तो एक सर्वसामान्य दिवसासारखाच दिवस होता, पण तो दिवस आला होता नव्या आशा घेऊन!
मेलडी मॅकार्टी
मूळ कथा-The Sandwich Man
स्वैरानुवाद- उषा महाजन