Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ फेब्रुवारी २००९
  हाक विज्ञानवतींना!
  कुसुमताईंशी झुळूझुळू गप्पा
  हे असंच चालायचं!
  अनिलची गोष्ट
  विज्ञानमयी
  नोबेल ललना
  कुडियोंका है जमाना !
  अकारविल्हेची वाट
  प्रतिसाद
  पालक, पाल्य आणि प्रोजेक्ट!
  सँडविचवाला
  अनुसरा मार्ग बचतीचे
  कर्णबधिरांच्या शिक्षणाचा..
  कलावंताचा अंतर्नाद
  हिरवी पातोडी
  नर्मदे हर आणि विठू पंढरीचा!

 

‘भाव तोचि देव’ नावाचं ते नानासाहेब शिरगोपीकरांचं नाटक होतं. एकनाथांच्या जीवनावरचं नाटक. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. नाटकातल्या जादूच्या करामतींवर लोक खूश होते. मला भरत नाटय़मंदिरातली ती गर्दी आठवते. माझ्या नानाकाकानं जादा खुच्र्या टाकायला लावून दोन खुच्र्याच्या हातांवर (बहुधा) तिकीटघरातली गल्ल्याची पेटी ठेवून त्यावर मला बसवलं होतं, हे आठवतं. नाटक आता काहीच नाही आठवत, पण नाथांच्या घरी गंध म्हणजे श्री-खंड उगाळणाऱ्या श्रीखंडय़ाला देव अदृश्यपणे मदत करतो आणि गंध आपोआप उगाळलं जाऊ लागतं, हा सीन आल्यावर झालेला टाळ्यांचा प्रचंड कडकडाट आठवतो.
 

आणखी एक आठवण आहे ती पाच रंगांच्या पाच साडय़ा नेसून येणाऱ्या गौळणीची. पाच कडव्यांचं गाणं होतं ते. प्रत्येक कडव्यात एकेका रंगाचं वर्णन होतं आणि त्या- त्या रंगाची साडी नेसून एकच नटी रंगमंचावर येत होती. दोन कडव्यांच्या मधल्या अध्र्याएक मिनिटाच्या अवकाशात ते तिला कसं शक्य होत होतं, कोण जाणे. पण बघणाऱ्यांनी थिएटर डोक्यावर घेतलं होतं, हेही आठवतं.
नंतर फारा दिवसांनी- दिवसांनी नव्हे, वर्षांनी- ना. ग. जोशींनी केलेलं ‘प्राचीन गीतमंजुषे’चं संपादन हाती आलं आणि एकनाथांची गौळण म्हणून ते नाटकातलं गाणं तिथे वाचायला मिळालं. नाथांच्या रचनेची खरी ताकद तेव्हा थोडी लक्षात आली. कविता म्हणून ती गौळण वाचताना शाहिरी परंपरेवरचं नाथांचं आणि नाथांवरचं लोकपरंपरेचं ऋणही लक्षात आलं.
पहिली गौळण रंग सफेत। जशी चंद्राची ज्योत
गगनी चांदणी लखलखीत। ऐका तिची मात
किंवा-
पिवळा पितांबर नेसून आली। आंगी बुट्टेदार चोळी
एक लहान तनु उमर कवळी। जशी चाफ्याची कळी
अशा ओळी समोर आल्या तेव्हा एकनाथ संतपरंपरेतल्या आसनावरून क्षणभर उठून समाजमनातल्या एका भव्य रंगमंचावर येऊन उभे राहिले. प्रथमच त्यांच्यातला कलावंत मला दिसला. नृत्य, संगीत, साहित्य, तत्त्वज्ञान यांची उत्तम जाण असलेला आणि अभिव्यक्तीचे नाना घाट, नाना प्रकार माहीत असलेला एक श्रेष्ठ, जाणता, प्रयोगशील कलावंत म्हणून त्यांच्याकडे पाहता आलं. त्यांनी रचलेली दत्तात्रेयांची आरती, त्यांची तोपर्यंत ऐकलेली भारुडं, त्यांच्या गौळणी- आपण आजवर नाथांच्या निर्मितीला फक्त संत- विचारांच्या अंगानंच समजून घेत आलो. सत्शील, उदार, समन्वयशील आणि धर्माच्या मानवतावादी प्राणतत्त्वाचा विस्तार करू पाहणारं त्यांचं चरित्र आणि त्यांची जीवनदृष्टी यांचं मोठेपण समजून घेण्यासाठी धडपडलो. पण त्यांच्या निर्मितीमागे कलावंत म्हणूनही स्पष्ट दिसणाऱ्या ज्या काही प्रबळ प्रेरणा होत्या, त्या कशा आपल्या लक्षात आल्या नाहीत?
‘भावार्थ रामायण’ वाचताना, विशेषत: प्रारंभीचं किष्किंधाकांडातलं नाथांचं निवेदन वाचताना कलावंत म्हणून एकनाथ अगदी थेटच भेटतात. ‘भावार्थ रामायण’ ही नाथांच्या आयुष्याच्या उत्तरायणातली रचना. तिच्यामागचं उद्दिष्ट केवळ पारमार्थिक प्रबोधनाचं नाही; आणखीही एक युगसापेक्षता त्यामागे आहे.
कोणत्याही कलावंताचं आपल्या काळाशी एक नातं असतंच. नाथांचंही होतं. भोवतालचा हतप्रभ, भ्रांतचित्त आणि विस्कळित असा समाज पाहताना राजधर्माचा आणि मनुष्यधर्माचा आदर्श त्याच्यापुढे उभा करावा आणि जीवनसंघर्षांत आधार देणारा, बळ देणारा, न्यायाधिष्ठित राज्याचं स्वप्न साक्षात् करणारा एक नायक त्याला मिळावा म्हणून त्यांना रामचरित्र गावंसं वाटलं.
मात्र, लेखनाला प्रारंभ करताना गाण्याची ऊर्मीच इतकी अनावर झाली, इतकी तीव्र झाली, की बाकी सगळं सगळं मागे पडलं. कोणत्याही सच्च्या कलावंताची निर्मिती म्हणजे नुसतं त्याच्या मनोरंजनाचं साधन नसतं. नुसता करमणुकीचा छंद नसतो. फुरसतीचा वेळ घालवण्यासाठी केलेला खेळ नसतो तो; तो त्या कलावंताचा अंतर्नादच असतो. रामायण हा नाथांचा असा अंतर्नाद बनला.. निदिध्यास बनला.
त्यांच्या काळाचा विचार करता, कोणा एखाद्या विद्वानाशी स्पर्धा करावी, कोणी आदेश देऊन सांगितलं म्हणून ग्रंथरचनेचा खटाटोप करावा, आपल्या पांडित्याचं प्रच्छन्न प्रदर्शन करावं, असं काहीच त्या रचनेमागे नव्हतं.
भोवतालचं वास्तव त्यांना अस्वस्थ करणारं होतं. लेखनाचं बीज त्या वास्तवातून वर आलं होतं. एका महाकाव्याचा हात धरून ते फुलणार होतं. ती रचना नाथांच्या आंतरिक तळमळीतून आली होती. ती त्यांची आंतरिक गरज बनली होती. इतकी, की त्यांना दैनंदिन व्यवहार करणंसुद्धा अवघड झालं होतं. त्यांच्या आशयाचा ईश्वर- त्यांचा राम त्यांना काही सुचूच देत नव्हता. ध्यानी, मनी, स्वप्नी सतत तोच होता. कुठे जाता- येताना, जेवताना, झोपताना तोच एक झपाटून टाकणारा विषय होता. नाथांनी लिहिलं आहे..
सांडोनी श्रीरामकथालेखन। मज करिता गमनागमन
मार्गी श्रीराम रामायण। स्वये संपूर्ण प्रकाशीं
करू बैसता भोजन। ग्रासोग्रासी स्मरे रामकथन
मागां घालूनिया जेवण। रामायण स्वये वदवी
निजेले असता स्वप्नी पूर्ण। श्रीराम दावी रामायण
आपुले गुह्य़ निरोपण। सांगे आपण न बोलोनी
एखादं काव्य, एखादी कथा-कादंबरी- एवढंच काय, एखादं चित्र, शिल्प किंवा एखादी संगीतरचना सुचू लागली की दुसरं काहीच नको असतं कलावंताला. जगातले रोजचे व्यवहार नको वाटतात. नाथांनी त्या अवस्थेचंच नेमकं वर्णन केलं आहे. काहीही बिनमहत्त्वाचं बोलायला लागलं की ते शब्द मागे सारून रामकहाणीच पुढे येते. शब्द येतो तो रामकथेचाच येतो. कधी गाढ झोपेतही कुणी हलवून उठवावं तसा तो राम मला जाग आणतो आणि लिहायला लावतो.
निर्मितीच्या ऊर्मीनं खळबळून गेलेल्या कलावंताची ही स्थिती आहे. नाथांच्या मनातला आशय अभिव्यक्तीसाठी धडपडतो आहे. उसळी घेतो आहे. खाता-पिता, उठता-बसता सारखा छळतो आहे. आता तो शब्दांमध्ये धरण्याखेरीज दुसरी गती नाही.
तो आशय प्रकट करण्याएवढी आपली योग्यता आहे तरी का? असा प्रश्न ओझरता त्यांच्या मनात मधूनच येऊन जातो आहे खरा, पण शेवटी थोर आशय त्याच्या प्राणभूत थोरवीनं माध्यमालाही थोर करतो. माध्यमाच्या उणिवांपलीकडे जात तो स्वयंप्रभेने प्रकट होतो. एकनाथांना याचंही भान आहे. त्यांनी लिहिलं आहे-
माझे अंगी मूर्खपण। त्या मजकरवी रामायण
श्रीराम करवितो आपण। निग्रहूनी निजबळे
आपल्याच पोटी येऊन राम आवेगानं लिहवून घेतो आहे. जणू तोच खरा लिहिता आहे. जणू माझ्या कवित्वाचा तोच इत्यर्थ आहे.
कलावंताच्या सृजनतंद्रीचं वर्णन करताहेत नाथ. संस्कृतातलं ज्ञानभांडार भावार्थदीपिकेच्या रूपानं मराठीत खुलं करणारे ज्ञानदेव नाथांचे पूर्वसूरी होते. देशभाषेचा अभिमान आणि सगळ्याच माणसांविषयीची आस्था यांचं देणं वारशानं नाथांना त्यांच्याकडूनच मिळालं होतं. म्हणून संस्कृतातलं रामायण मराठीतूनही सहज रसाळपणे आपल्याला सुचत जातं आहे, हे लक्षात आल्यावर नाथांची म्हटलं आहे की, ‘कशी काय या रघुनाथाला माझी मराठी कथा आवडते आहे, कोण जाणे. पण तो अगदी बळजोरीनं मराठीच माझ्याकडून लिहून घेतो आहे.’
कलावंताला आतून जाणवणारी निर्मितीची निकड आणि सर्वस्व ओढून धरणारी सृजनतंद्री या दोन्ही गोष्टींची जाणीव लख्खपणे प्रकट करणारे एकनाथ भावार्थ रामायणात दिसले तेव्हा पुन्हा एकदा तो श्रेष्ठ विद्वान आणि सच्चरित्र संतपुरुष परमार्थ चिंतनाच्या बैसकेवरून उठला आणि निर्मितीच्या प्रेरणेनं अस्वस्थ झालेल्या कलावंताचा अंतर्नाद ऐकवू लागला.
तेवढय़ापुरतं भावार्थ रामायण माझ्यासाठी नवीन झालं. नवीन, आजचं आणि माझं!
अरुणा ढेरे