Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ फेब्रुवारी २००९
  हाक विज्ञानवतींना!
  कुसुमताईंशी झुळूझुळू गप्पा
  हे असंच चालायचं!
  अनिलची गोष्ट
  विज्ञानमयी
  नोबेल ललना
  कुडियोंका है जमाना !
  अकारविल्हेची वाट
  प्रतिसाद
  पालक, पाल्य आणि प्रोजेक्ट!
  सँडविचवाला
  अनुसरा मार्ग बचतीचे
  कर्णबधिरांच्या शिक्षणाचा..
  कलावंताचा अंतर्नाद
  हिरवी पातोडी
  नर्मदे हर आणि विठू पंढरीचा!

 

विदर्भातील खेडय़ांतून सणासुदीला अथवा पाहुणे आले असता आवर्जून केली जाणारी घरची भाजी म्हणजे पातोडी. इथं खेडय़ांतून तशीही ताजी भाजी मिळायची मारामार. भाजीपाला फक्त बाजाराच्याच दिवशी घरात येणार. तो मग क्रमवारी करून आठवडाभर टिकवायचा. रात्री शक्यतो घरची भाजी करायची. म्हणजे फोडणीचं वरण, डाळीचं बेसन, मुगवडय़ा, चुनवडय़ा, करोडा, तिळाची पातळ भाजी, वगैरे. नाही तर साधं वरण कुठे गेलंच नाही. म्हणूनच खेडय़ात म्हण पडली- ‘खेडय़ाची वस्ती अन् दाय खाय निस्ती.’ या परिस्थितीवर तोडगा काढतानाच अनेक भाज्यांचा शोध स्त्रियांनी लावला असावा. त्यात ‘पातोडी’ महत्त्वाची.
पातोडीला निसर्गदत्त उत्साहाची देणगी लाभली असावी. कारण गृहिणी कितीही थकलेली असो किंवा कितीही पदार्थ तिला करायचे असोत, पण पातोडी करताना तिच्या अंगात उत्साह संचारतो. पातोडीची पाककृतीही प्रांतानुसार बदलते. म्हणजे भाषा जशी बारा कोसांवर बदलते, तशीच पातोडीही. पण तिची रसनातृप्ती मात्र कायम राहते.
 

पुण्याला एकदा पातोडी केली. शेजारी एक ब्राह्मण जोडपं राहत होतं. ते तसे फिकं खाणारे. तरी भीत भीत वेगळी पाककृती म्हणून नेऊन दिली, तर त्या कुटुंबाला ही भाजी इतकी आवडली, की ते तिच्या प्रेमातच पडले. मनात म्हटले, याला म्हणतात ताकद! पदार्थाच्या अंगी अशी ताकद असली पाहिजे की, कोणत्याही गावचा, कोणत्याही देशाचा माणूस असो, त्याची रसना तृप्त झालीच पाहिजे आणि तो तिच्या प्रेमात पडलाच पाहिजे. त्यातही आजच्या हॉटेलच्या रसनातृप्तीच्या जमान्यात अशा एखाद्या पदार्थाने बाजी मारणे म्हणजे तो लज्जतदार असल्याची पावतीच होय.
पूर्वी पाटा-वरवंटय़ाचा जमाना होता, तेव्हा तर पातोडीचा थाट विचारूच नका. पातोडी खरी ‘पाटवडी’ शब्दापासून तयार झाली असावी. कारण कुठे कुठे ती पाटावर- अर्थात् आता पोळपाटावर मोठी पोळी लाटून तिच्या वडय़ा पाडूनही केली जाते. विदर्भात तिला ‘जिती पातोडी’ म्हणतात. तर त्यात मसाला न घालता ती केली तर तिला ‘चुनवडय़ा’ म्हणतात. पूर्वी चुलीचा व पाटय़ाचा जमाना होता तेव्हा पातोडीसाठी एक अख्खा कांदा चुलीत टाकला जाई- म्हणजे मग आरात (मंद विस्तव) तो चांगला खरपूस भाजला जाई. तोच प्रकार खोबऱ्याचा. फक्त खसखस, शेंगदाणे, मिरे, लवंग व तेजपत्ता हे सर्व तव्यावर तेल सोडून भाजले जाई. या पातोडीला चांगला हिरवागार रंग यावा म्हणून चुलीत लावलेल्या तुऱ्हाडीचा एक ते दीड इंच तुकडा जळत असतानाच तो बाहेर काढून, त्यावर पाणी टाकून विझवून, कोळसा पाडून तोही मसाल्यात वाटायला घेतला जाई आणि मग सुरू होई सुगरणीची कमाल.
ती पाटय़ावर उकिडवी बसून हा मसाला जास्तीत जास्त बारीक वाटण्याचा प्रयत्न करी. हाही वऱ्हाडी शब्द. जितका मसाला बारीक, तितकी भाजी चांगली. खेडय़ात भरपूर मसाला टाकणं गरिबीमुळे परवडत नाही. तेव्हा ही गृहिणी पुन्हा अक्कलहुशारी वापरते. ती त्या मसाल्यात आवळ्याएवढी हरभऱ्याची डाळ आणि तेवढेच तांदूळ तव्यावर तेलात चांगले परतून ते घासून घासून वाटते. त्यामुळे रस्सा दाट होतो. हे सगळे वाटून झाले की, ही सुगरण तो तुऱ्हाटीचा ताजा कोळसा घेते आणि पाटय़ावर बारीक वाटते. अर्थात कोळसा उगाळा किंवा वाटा; काळा तो काळाच. मग त्यात ती चमचाभर हळद टाकून परत बारीक वाटते. आता तिला रंगाचं ज्ञान कुठून असणार? आजकाल कलर मिक्सिंगमध्ये कुठल्या रंगांचं मिश्रण केले की कुठले रंग तयार होतात, याचं शिक्षण देतात. पण हे न शिकताच ती कोळसा आणि हळद यांचं मिश्रण करून पाटय़ावर हिरवा रंग तयार करते. मग तो गोळा मसाल्यावर ठेवून पाटा धुण्याचेही पाणी त्या ताटातच निपटून काढते. आता वाटून झाले. मग ती आयत्यांसाठी बेसन पातळसर भिजवते. त्यात ओवा, तिखट, मीठ, हळद घालते आणि भज्यांपेक्षा थोडे जास्त पातळ डाळीचे पीठ भिजवते. ही त्यातल्या त्यात श्रीमंत आणि रसना तृप्त करणारी, शिवाय देखणी घरची भाजी. घरची एवढय़ासाठी, की शेतकरी स्त्रीच्या घरी बहुधा कुठली तरी डाळ असतेच. मुगाची, तुरीची, मोटीची, हरभऱ्याची किंवा बरबटीची. त्या डाळीचे पीठ ती धिरडय़ांसाठी वापरू शकते. गोविंदप्रभू चरित्रात ‘आहिते’ असा उल्लेख धिरडय़ांसाठी आहे आणि ‘पाटवडी’ असा उल्लेख पाटवडीसाठी आहे. त्यावरून विदर्भात ही भाजी पूर्वापारपासून करीत असावेत.
एकदा वाटूनघाटून झाले की मग भाजी फोडणीला दिली जाते. फोडणी नेहमीप्रमाणेच. तेल तापल्यावर, मोहरी तडतडल्यावर आधी लसूण-जिऱ्याचा पेंड (पेस्ट) तेलात परतायचा आणि नंतर मसाल्याचा पेंड व कोळशाची हिरवी गोळी टाकायची आणि तिखट टाकायचे. फक्त हळद आधीच घेतल्यामुळे हळद तेवढी टाकायची नाही. ही भाजी छान चटणीकलर होते. आता आपण पदार्थाच्या रंगांमध्ये वैविध्य आणण्याचा प्रयत्न करतो. पण पूर्वी हे पातोडीतून साधले जाई. पातोडी हिरवीगार. त्यात बेसनाचे आयते शंकरपाळ्यासारखे तुकडे करून टाकायचे. हे आयते पिवळे होतात. हिरव्या रश्शात पिवळे आयते छान रंगसंगती साधतात. शिवाय सोबत पांढरा भात, पिवळे वरण, एखादे पक्वान्न, केशरी कुरडई असे सारे असतेच. भाजी जितकी हिरवीगार, तितकी करणारी सुगरण- असे सोपे समीकरण असते.
दिवाळीनंतर प्रत्येकीचा भाऊ येतो. त्याला पाहुणचारासोबत पातोडी द्यायचं ठरलेलं असतं. पितरांसाठीही ती आवर्जून करतात. खेडय़ात तशा भाज्या ठरलेल्या असतात. म्हणजे बाजाराच्या दुसऱ्या दिवशी सगळ्यांकडे डाळभाजी, तिसऱ्या दिवशी कोहळे, चौथ्या दिवशी ढेमसे, पाचव्या दिवशी शेंगा, सहाव्या दिवशी वांगी, सातव्या दिवशी बटाटे.. झाला हप्ता. बाजाराच्या दिवशी पुन्हा घरची वा शेतातील भाजी. घरी शेती असली तर भेंडी, गवार, बरबटी (चवळी) वगैरे शेतात पेरतातच. शिवाय ओल्या तुरीच्या शेंगा व ओले हरभरे भाजीसाठी वापरतात. दारात दोडकी, वाल, भोपळे असतातच. तेही अशा वेळी कामी येतात. पण सणाला व पाहुणे आले की चांगली भाजी म्हणून पातोडी करतातच. मांसाहार करणारे अंडी, मटण व चिकन करतात, त्यातलाच हा प्रकार समजू या.
आमचं लग्न झाल्यावर सुरुवातीच्या हौसेच्या दिवसांत मी वेगवेगळं काही रांधू लागले. त्यात ही पातोडी पण आली. पण आमचा स्वयंपाक स्टोव्हवर! त्यामुळे तुऱ्हाटीचा कोळसा मिळण्याची शक्यता नाही. बरं! पातोडीला दगडी कोळसा, लाकडाचा विकतचा कोळसा चालतो की नाही, हेही ठाऊक नाही. सगळ्या कोळशांचे गुणधर्म सारखे थोडेच असणार? इतर कोळसे खायला चालतात की नाही, हेही माहीत नाही. कोळशापासून हिरा निघतो आणि हा हिरा जर पोटात गेला तर माणूस मरतो, हेही माहीत होते. त्यामुळे म्हटले, कोळशाला हात घालून हात काळे कशाला करा! त्यापेक्षा काळ्या कोळशाचा नाद सोडून दिलेलाच बरा. शिवाय आमच्या घरी एकदा अंडय़ाची रस्साभाजी केली तर ती चांगलीच लालभडक व तर्रेबाज झाली होती. मी स्वत: मांसाहार करत नसल्यामुळे फक्त दुरूनच ती पाहिली होती. त्यामुळे हिरवी पातोडी शक्य नाही तर आपण लाल पातोडी करू, असे मनात म्हणत मी हिरव्या पातोडीचा नाद सोडून दिला, तो आजतागायत. शेवटी हिरवी मिरची पिकली की लाल होतेच. टोमॅटो, पपई, आंबा अशी फळंही नंतर लाल होतातच. मग आपणच कशाला हिरव्याचा अट्टहास धरा? हिरवा रंग ताटात पाहिजेच तर मस्तपैकी मेथीचा घोळणा करूया, असे ठरविले.
कृती तीच केली. मसाला तोच वाटला. फक्त फोडणीत मसाला परतल्यावर त्यात हळद आणि लाल तिखट घातले. तेही परतले. पाणी घालून, उकळी आणून रस्सा तयार केला. त्यात बेसनचे आयते करून त्याचे तुकडेही घातले. अर्थात ही जेवायला बसतानाची कृती. तत्पूर्वी रस्सा तयार ठेवला व आयत्यांचे चौकोनी शंकरपाळ्यांसारखे तुकडे एका टोपलीत तयार ठेवले. जेवताना सगळ्यांनी या लाल भाजीवर चांगलाच ताव मारला. कारण तिखट तेलात परतल्यामुळे तेल लाल झाले आणि रस्सा खाली उतरल्यावर तेल वर आल्यामुळे भाजी लाल दिसू लागली. लाल तवंगाच्या त्या रश्श्यात पिवळे आयते छान शोभा देऊ लागले. तेव्हापासून काही खास करण्याची हुक्की आली, तोंडाला चव नसली अथवा आजारपणातून उठणारी व्यक्ती घरात असली की, आम्ही पातोडी हमखास करतो. मात्र त्यात डाळ, तांदूळ घालत नाही. फक्त शेंगदाणे, खोबरे, कांदा, खसखस व इतर मसाला तेवढा घालतो. पण हीही पातोडी रसना तृप्त करते. शेवटी रंगावर खरं तर काही नसतंच. गोरी किंवा काळी स्त्री अशी तुलनाही त्यामुळेच व्यर्थ आहे. स्वभाव चांगला हवा. आणि स्वभावाला कुठे रंग असतो?
ही पातोडी आमच्या घरी सर्वाच्या रसनेचा ताबा घेत चांगलीच स्थिरावली. कधीतरी चर्चेत तिचा विषय निघाला तेव्हा कळले की, इकडे अशी लाल किंवा पिवळीच पातोडी करतात. शिवाय त्यात आयत्यांचे तुकडे न टाकता बेसन घट्ट भिजवतात व पोळी लाटून, तुकडे करून घालतात. अर्थातच हे तुकडे शिजू द्यावे लागतात. आमच्या आजोळी या पातोडीलाच ‘जिती पातोडी’ म्हणतात. अर्थात ती पचायला जड असावी म्हणून तसं म्हणत असावेत का? किंवा जळलेला कोळसा घातल्यामुळे ती जळलेली होत असावी का? काही माहीत नाही. कोळसा घातल्यामुळे ती पचायला सुलभ होते का? हाही फक्त अंदाजच. आता तर खेडय़ांतूनही चुली हद्दपार झाल्यात. तेव्हा सर्वत्र अशीच कोळसा न घालता पातोडी करीत असावेत. फक्त आयत्याचे तुकडे तेवढे घालत असावेत. पण अशा वेळी या पातोडीला काय म्हणावे?
मध्ये आम्ही आमच्या स्नेह्यांकडे गेलो तर त्यांनीही पातोडीचा बेत आखला. त्या गृहिणीनं फक्त तेलातच मसाल्यावर बेसन घातले. पातोडी घट्टसर झाली. घट्ट दाल-फ्रायसारखी अथवा पातळ पिठल्यासारखी. तीही चांगली लागली. तरीही चवीत फरक होताच. आमच्या तोंडी फक्त आमचीच पातोडी बसली होती.
मध्यंतरी नागपूरला साहित्य संमेलन झालं. ते ‘अखिल भारतीय’ असल्यामुळे त्याचा वेगळाच थाट होता. त्या संमेलनात पाहुण्यांना खास वऱ्हाडी पदार्थ खाऊ घालावेत म्हणून वेगवेगळे पदार्थ केले गेले होते. त्यात पातोडीही होती. पण ती वेगळीच वाटत होती. त्या पातोडीतही रस्सा तोच होता. फक्त डाळीचं घट्ट पिठलं करून, ते परातीत थापून त्याच्या वडय़ा पाडल्या होत्या आणि त्या रश्श्यात सोडलेल्या होत्या. आम्ही परगावी जाताना ताकाच्या बेसनाच्या (पिठल्याच्या) ते असंच घट्ट करून वडय़ा पाडून नेतो. ते दोन-तीन दिवस टिकतं. त्या वडय़ा आपल्या रव्याच्या वडय़ांसारख्या असतात. तर या थापून केलेल्या थालिपीठाइतक्याच जाडीच्या असतात. पण का कोणास ठाऊक, आम्हाला मात्र आमच्याच पद्धतीची पातोडी खमंग लागते आणि आवडतेही. पण या पातोडीमुळे अनेकांना आमचा हेवा वाटतो. त्यांच्या मत्सराग्नीत त्यामुळे भर पडते.
पातोडी चांगली जमली तर खाणाऱ्याच्या ती स्मरणात राहतेच, पण कधी कधी करणाऱ्याच्याही स्मरणात राहू शकते. एका मावसबहिणीबाबत असंच घडलं. लग्न होऊन ती सासरी गेली. मोठय़ा खटल्याचं तिचं घर; तरी तिची हौस उसळी मारायचीच. एक दिवस ‘पातोडी’ तिला आठवली. सासूला विचारलं, तर ती ‘कर’ म्हणाली. ही हौसेने तयारीला लागली. हिनं मनापासून पातोडी रांधली. परातभर आयते केले. मोठा गंजभर खमंग लालसर रस्सा केला. सासरे लवकर जेवायला बसतात म्हणून आधी सर्व खटाटोप केला. धुणं तसंच धुवायचं राहू दिलं. सासरे जेवायला आले. हिनं पातोडी वाढली. लालसर- पिवळसर रश्श्यात पिवळेधम्म आयते शोभू लागले. तितक्यात जेठानी आली.
‘शोभा! माय माय.. धुनं तसंच पळलं हाये वं तिकडे गोटय़ावर!’
‘हो जी बाई! धुतो आता.’
‘वाली मंग. मी टाकतो पोया.’
‘बरं!’
ती भाबडेपणाने उठली. चुलीच्या पारोळ्यात पातोडीचा रस्सा झाकलेला होता आणि ताटात आयते होते. त्यावर फडके टाकले होते. सासरे जेवायला बसले होते. पहिली पोळी तिनं वाढली होतीच. पण माणसांना आपण किती काम करतो आणि त्यांची किती काळजी घेतो, हे जेठानीला दाखवायचे होते. शेवटी पुरुषप्रधान संस्कृतीत पुरुषांची मर्जी महत्त्वाची.
सासरे जेवू लागले. त्यांना पातोडी बेहद्द आवडली. त्यांच्या चेहऱ्यावरून तृप्ती निथळू लागली. करणारी समोर नव्हती, नाही तर त्यांनी शाबासकी दिली असती. आपण मेहनतीनं भाजी रांधली.. आता सगळ्यांना ती खाऊ घालावी.. दुपारी धुणं धुवावं, असं तिचं मत होतं. पण शोभाचा हा डाव जेठानीनं हाणून पाडला. तिला सासऱ्यासमोर हटकलं. बिचारी मुकाट धुणं धुवायला गेली. भाजी खूपच चांगली झाली, हे सासऱ्यांच्या देहबोलीवरून व चेहऱ्यावरून जेठानीच्या लक्षात आले. तिचा खूप जळफळाट झाला. ती रस्सेदार भाजी तिच्या डोळ्यांत सलू लागली. सासरे जेवून उठताच तिनं त्या भाजीत बचकाभर मीठ टाकून दिलं.
नंतर एक-एक जेवायला येऊ लागले. भाजी इतकी खारट, की तोंडात घेववेना. भाजीची छी: थूऽ करीत, साधं वरण, चटणी वा वरण व लोणचं असं सगळेजण जेवू लागले. एकानंही भाजी खाल्ली नाही. सासू फटाके फोडू लागली. तिचा नवरा जेवायला बसला. तसा तिनं तोंडाचा पट्टा आणखीनच वाढवला. नवऱ्याला ताव आला. तो तसाच ताटावरून न जेवता, न हात धुता उठला आणि न्हाणीत येऊन तिला बदडू लागला. सासरा जेवून वावरात गेला होता. आपलं काय चुकलं, हेच तिला कळेना. ती तशीच धुणं धुऊन, वाळत घालून सरळ वर गेली आणि अंगावर पांघरुण घेऊन उपाशीच झोपून राहिली.
जेठानीनं ताकाचं बेसन घोटलं. ते सगळ्यांनी नाइलाजानं खाल्लं. रस्सा तसाच राहिला. आयते मात्र वरून तेल, मीठ घेऊन जेवताना खपले. तिला कोणीही ऊठ वा जेव म्हटले नाही. नवराही उपाशीच शेतात निघून गेला. त्याची शेतात बापाशी भेट झाली. बाप म्हणाला,
‘काय साजरी रांधली रे भाजी तुया वायरीनं?’
‘काय? निऱ्हा खारटडक्क केली तिनं.’
‘नायी रे, इतली साजरी, का जसे बोट चोकत राहावं.’
‘आमाले तं खारट लागली.’
सासऱ्याच्या लक्षात आले.
‘बाबू! तुले सांगू काय, पन तू घरात कोनाले सांगू नोको.’
‘काय? नायी सांगत.’
‘तुया बायकोलेई?’
‘नायी.’
‘अरे! भाजी मस्त झाली. हे पावून मोठीनं त्यात मीठ टाकलं. ज्यादाचं. नक्कीच. मी सकाऊन ते भाजीच तं जेवलो. पन आता हे गोष्ठ फुटली तं मोठीचं आखीनच बिगळीन. म्हणून तू कोणाले सांगू नोको. अळीमिळी गूपचिळी राय.’
नवऱ्याला हे ऐकून बायकोला मारल्याचा पश्चात्ताप झाला. त्याचं वावरात मन लागेना. तो काम टाकून घरी आला. बायको माडीवर उपाशीतापाशी रडत होती. त्यानं तिला समजावलं. खाली आणलं. दोघंही उपाशी. सगळ्यांची जेवणं झालेली. झाकलप झालेली. उरलेली पातोडी तशीच होती गंजात आणि उष्टी बाहेरच्या गंजात. घरदार सुस्तावलेलं. नवरा म्हणाला, ‘भाजीचे धपाटे कर. आपण दोघं खाऊ.’ पातोडीच्या रश्श्यात कणिक बेसन कालवून शोभानं धपाटे केले. नवरा-बायको जेवले. पातोडी चांगलीच झाली होती. त्यामुळे धपाटे चांगलेच झाले- तरी खारट लागले. काही उरले. दुपारी दीर-नणंदांनी ते ताटलीत घेऊन खाल्ले. उष्टी भाजी मात्र गायीच्या मेव्हणात गेली. तरीही सासू पातोडीवरून शोभाला ठसके फोडत राहिली. पुन्हा म्हणून तिनं त्या घरात पातोडी रांधली नाही आणि खाल्लीही नाही. नवऱ्याच्या हातचा पहिला मार पातोडीनं दिला होता. नंतर मात्र शोभाला त्याची सवय झाली. ती पातोडी खायची सवय विसरली.
प्रतिमा इंगोले