Leading International Marathi News Daily
शनिवार, २८ फेब्रुवारी २००९
  हाक विज्ञानवतींना!
  कुसुमताईंशी झुळूझुळू गप्पा
  हे असंच चालायचं!
  अनिलची गोष्ट
  विज्ञानमयी
  नोबेल ललना
  कुडियोंका है जमाना !
  अकारविल्हेची वाट
  प्रतिसाद
  पालक, पाल्य आणि प्रोजेक्ट!
  सँडविचवाला
  अनुसरा मार्ग बचतीचे
  कर्णबधिरांच्या शिक्षणाचा..
  कलावंताचा अंतर्नाद
  हिरवी पातोडी
  नर्मदे हर आणि विठू पंढरीचा!

 

‘दिलसे’ लिहिले जात आहे-
मध्य प्रदेशातील भोपाळमधून.. म्हणजेच ‘देश के दिलसे’!
मध्य प्रदेशातील समाज, संस्कृती आणि बदलत्या जीवनाचा वेध..
कलिंगदेशात् पश्चाद्र्धे पर्वतेऽमरकंटके।
पुण्या च त्रिषु लोकेषु रमणीयता पदे पदे।।
हे वर्णन आहे नर्मदेचं. असं म्हटलं जातं की, कलिंगदेशाच्या पश्चिमेला असलेल्या अमरकंटकच्या पर्वतामधून निघणारी नर्मदा ही तिन्ही लोकांतली सर्वात पवित्र नदी आहे. पावलोपावली तिचं सौंदर्य मन मोहून टाकणारं व आनंददायी आहे. इथे मध्य प्रदेशात २ फेब्रुवारी हा दिवस ‘नर्मदा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. इथले लोक असं मानतात की, जिच्यात स्नान करून माणूस आपली पापं धुऊन काढतो, ती गंगा वर्षभर माणसांची पापं धुऊन धुऊन अपवित्र होते आणि ती अपवित्रता धुऊन काढण्यासाठी गंगा हिमालयातून उठून मध्य प्रदेशात येते व २ फेब्रुवारीला नर्मदेत स्नान करून पवित्र होऊन परतते. पुन्हा माणसांची पापं धुऊन काढण्यासाठी!
ज्या दिवशी स्वत: गंगा नर्मदेत स्नान करण्यासाठी अवतरते, तो दिवस साहजिकच इथे सण म्हणून साजरा होतो. हजारो-लाखो भाविक जागोजागी नर्मदातटी येऊन नर्मदेत स्नान करतात. कित्येक फुटी जरीकाठाची रंगीत चुनरी नर्मदेला पांघरतात. पूजा-अर्चा होते. माणसांच्या गर्दीने नर्मदा दुथडी भरून वाहते. गंगेचे येणे असे साजरे केले जाते.
 

एकूण सर्वत्रच नद्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कारण जिथला प्रदेश त्या ‘सुजलाम् सुफलाम्’ करत जातात, तिथल्या लोकांसाठी ती नदी ही त्यांची जीवनधारा असते. परंतु भारतात जेवढं नद्यांचं मानवीकरण झालं आहे, तेवढं इतरत्र जगात कुठंच झालं नसावं. आपल्याकडे गंगेला ‘गंगा’ म्हणून स्वत:चा स्वभाव आहे. शंतनु राजाची राणी म्हणून आपल्या सात मुलांना एकापाठोपाठ एक पाण्यात टाकणारी गंगा. आठव्या मुलाच्या वेळेस तिच्या कृतीचे समर्थन मागताच राजाला एकटं सोडून निघून जाणारी गंगा. आणि आज शतकानुशतके माणसांच्या पापक्षालनाची धुरा अंगावर घेऊन शांतपणे त्याचा भार सहणारी तपस्विनी गंगामाई. माणसाच्या आत्मवाढीचा जसा प्रवास असतो, तसाच शंकराच्या धारेतून प्रकटणाऱ्या गंगेचा प्रवास आपण आपल्या लोकसाहित्यातून जतन केला आहे. पुण्यश्लोक गंगेला जसा स्वभाव आहे, तसाच यमुनेचाही एक स्वभाव आहे. यमुना प्रेमाचं प्रतीक आहे. आणि आश्चर्य म्हणजे सहसा समाजमान्य न होणाऱ्या प्रेमाचं! राधा कृष्णाहून मोठी आहे, विवाहित आहे आणि तरीदेखील त्यांचं प्रेम लोकापवादाला बळी न पडता यमुनेमधून आजतागायत अव्याहत वाहत आहे. कदंबाच्या बनातून, बासरीच्या सुरांतून, राधेच्या धवलकांती शरीरातून, कृष्णाच्या गोपपसाऱ्यातून यमुना आपल्या मनात वाहत राहते, ती पवित्र प्रेमाची नदी म्हणूनच! कृष्णा, कावेरी, गोदावरी- एवढंच नाही, तर गुलाबी गालांच्या, अवखळ, खळाळत्या चालीच्या काश्मिरी तरुणींची आठवण व्हावी अशा झेलम, सतलज या पहाडी नद्यांनाही आपण स्वभाव बहाल केले आहेत. नाव उच्चारताच ती नदी तिच्या स्वभावधर्मानेच आपल्यात अवतरते. भारतीयत्वाची अजून एक खासियत म्हणजे केवळ देव-देवता किंवा नद्या, तलाव, समुद्राचं मानवीकरण करून आपण थांबत नाही, तर अनेकदा त्याला काव्यात्म परिमाणही बहाल करतो. म्हणूनच वर्तमानपत्रांमधून जेव्हा २ फेब्रुवारीचं महत्त्व वाचलं, तेव्हा मला असं वाटलं की, हिमालयातून उठून साक्षात् गंगेनं पाप धुण्यासाठी नर्मदेत येण्यामागं केवढी तरी मोठी काव्यागत कल्पना लोकांमध्ये रुजवली गेली आहे. हे काव्यात्म संचित म्हणजेच आपल्यातलं भारतीयत्व!
नर्मदेच्या जन्मासंबंधी स्कंदपुराणात कथा आहे की, एकदा शंकर आणि पार्वती अमरकंटक पर्वतावर घनघोर तपश्चर्येला बसले असताना शंकराच्या शरीरातून अतिश्रमाने निघालेल्या घामाच्या धारा जलधारा होऊन पर्वतातून वाहू लागल्या. पुढे त्या जलधारांनी स्त्रीचं रूप घेऊन शंकराची आराधना केली. ही तपस्या साधारण दहा हजार वर्षे सुरू होती. तिच्या कठोर तपश्चर्येने प्रसन्न होऊन शंकराने तिला वर दिला की, ती एक सदा पवित्र आणि भरलेली नदी होऊन पृथ्वीवर राहील. तेव्हा त्या स्त्रीने शंकराकडे मागणं केलं की, तिची निष्पत्ती कुणाही स्त्रीच्या योनीतून झालेली नाही म्हणून तिला ‘अ-योनिज’ मानले जावे आणि जेव्हा प्रलयात सर्व जीव-जनावरं, सागर, नदी-नाले, स्थावर मालमत्ता नष्ट होईल, तेव्हाही या जगात ती शंकराच्या कृपेने अक्षय वाहत राहील. तिला मृत्यू असणार नाही. हाही वर तिला शंकराने दिला.
मी नर्मदेविषयी लिहीत आहे, असे समजताच छोटी टेकाम नर्मदेविषयीच्या तिच्या गोंडी कथा आपल्या हस्ताक्षरात लिहून घेऊन आली. हरद्याला मीटिंगसाठी निघाले होते. भोपाळहून हरद्याचा प्रवास तीन-साडेतीन तासांचा. वाटेत बुधनीच्या आसपास दाट जंगल लागलं. जंगलाचा अनवट, ताजा वास भोवती दाटून आला. मध्य प्रदेशची सुखद थंडी जंगलची हिरवी वाट अधिकच रम्य करून जात होती. प्रवासात छोटीचं बालिश अक्षर आणि हिंदी समजून घेत होते. छोटी सांगत होती- नर्मदेच्या लग्नाची कथा. शंकराचा वर घेऊन नर्मदा पृथ्वीवर आली ती साऱ्या पृथ्वीवर संचार करतच. तिचे अवखळ चालणं, धावणं, खळाळणं.. तिचं सुंदर रूप! देव-दानव तिच्यासाठी वेडे झाले. नर्मदा सगळ्यांनाच हुलकावणी देऊ लागली. कुणाच्याच हाती येईना. प्रेम करावं, पण प्रेमात अडकून पडू नये. कुणामध्ये अडकून राहणं, हा तिचा स्वभावच नाही. तिच्या तीरावर येणाऱ्या प्रत्येकाला सुजलाम् सुफलाम् करत जावे, पण हाती मात्र कुणाच्याच लागू नये. नर्मदा प्रत्येकाच्या हातून निसटत राहिली. म्हणूनच नर्मदेला ‘कुमारी नदी’ म्हणतात. तिच्या कौमार्यातच तिचं तेज, तिची शक्ती, तिची ताकद सामावली होती. अशी तेजरफ्तार नर्मदा एकदाच लग्नाला तयार झाली. शोणभद्रशी! पण ऐनवेळी शोणभद्राने तिला दगा दिला. नर्मदाच ती! केवळ शोणभद्रावरच नाही, तर सगळ्या पुरुषांवरच कोपली. सरळ दिशा बदलून पश्चिमेलाच वाहू लागली. तेव्हापासून ती एकटीच पश्चिमेला जाऊन सागराला मिळते.
हरद्याला निघालेली माझी गाडी होशंगाबादपाशी आली. अचानक वाटलं, होशंगाबादच्या घाटावर जाऊन आत्ता या क्षणी नर्मदा किमान एकदा डोळाभर पाहून तरी घ्यावी! इतक्या वेळा या वाटेवरून जातो खरं, पण घाटावर जाणं होत नाही. मी घडय़ाळात पाहिलं. दुपारी एक-दीडची वेळ. मीटिंग साडेतीनची. यात किमान अर्धा तास तरी माझ्या हाताशी होता. नर्मदेची ओढ अपार दाटून आली आणि गाडी वळणावर येताच मी ड्रायव्हरला गाडी घाटाच्या दिशेने घ्यायला सांगितली. ‘अब? इस वक्त?’ गाडीचे चाक कुरकुरावं, तसा ड्रायव्हर कुरकुरला. दुपारी दीडच्या अडनिडय़ा वेळेला मी घाटावर जावं, याबद्दल त्याने त्याच्या परीने असंतोष व्यक्तही केला. पण मी ठाम होते. हुकमाचा एक्का काढून त्याच्या हातावर ठेवताच ‘हौऽऊ’ म्हणत त्याने गाडी घाटावर घेतली. (‘हो’ म्हणताना इथले लोक नेहमीच ‘हौऽऊ’ म्हणतात.) होशंगाबादला न जाता आपण सरळ हरिद्वारच्याच वाटेवर जात असावं असं वाटू लागलं. गाडी होशंगाबादच्या घाटावर पोचली. दार उघडून बाहेर आले, तर समोर अथांग पसरलेली साक्षात् नर्मदा आणि तिचे बांधलेले सुंदर घाट. मी घाटाच्या पायऱ्यांवर पोचले. घाटावर फार गर्दी नाही. कपडे धुणाऱ्या काही बाया, मुली. अर्धवस्त्रात आंघोळ करणारे काही पुरुष. मी दूरवर नजर टाकली, तर समोर पिवळ्या कपडय़ातला एक जटाधारी उग्र डोळ्यांचा साधू.. परिक्रमावासी वाटावे असे काही लोक, तर काही असेच भणंग भटके.. चिलीम घेऊन धूर सोडत बसलेली काही मंडळी. त्या सगळ्यांत मी अगदीच वेगळी. लक्षात आलं, खरंच यायला नको होते मी या वेळी इथे. या घाटावर मी या क्षणी तशी उपरीच आहे. वाटलं, माझ्या अपरिचित अस्तित्वाने इथले लोक उगीच क्षणभर तरी बिचकतील. शक्यतो इथल्या कुणालाही धक्का न पोचू देता उभं राहावं. शक्य असलं तर अदृश्यच होऊन जावं. की निघून जावं इथून? मात्र, पाण्याची मोहिनीच अशी, की मागे फिरणंही शक्य नव्हतं. एरवीची प्रवासी मी असते तर धावत पायऱ्या उतरून पाण्यात पाऊल बुडवून परतले असते. पण त्या क्षणी माझ्याभोवती असलेल्या सीमा पार करून जाणं मला शक्य नव्हतं. घाटावरून नुसतीच तरळत मी माणसांपासून दूर जात राहिले. नर्मदेच्या काठा-काठाने सगळ्यांपासून दूर जाऊन थांबले. माझ्या बाजूला गाईचं एक कोवळं वासरू. पलीकडे हळदीचा पिवळा रंग लागलेली एक बकरी. तिच्यावर सांडलेलं ऊन. पाण्यात उतरणाऱ्या पायऱ्या. आणि खाली नुसतंच निळं पाणी. ‘तुझ्या नुसत्या दर्शनानंही लोकांना तेच पुण्य मिळेल- जे गंगा, यमुना किंवा सरस्वतीत स्नान करून मिळेल..’ शंकराने नर्मदेला वर दिला होता. खरंच, किती स्नेहशील दर्शन आहे इथे होशंगाबादला नर्मदेचं! नाही पाण्याला खळाळ, नाही आवेग. इतकं शांत रूप, की जणू ती तिच्या घाटावरल्या सगळ्यांच्याच अंगावरून हात फिरवत जात असावी. मी माणसांपासून इतकी दूर उभी होते, की माणसांच्या कोलाहलाचा शब्दही सुना झाला होता. वाऱ्यावर फडफडणाऱ्या माझ्या पदराचाच काय तो आवाज! मी अंगाभोवती पदर लपेटून घेतला. फडफडण्याचा तोही आवाज विरला. मी मला माझ्यातच लपेटून उभी राहिले. निश्चल. समोर नर्मदा आणि पलीकडच्या काठावर एक पांढरं, देखणं देऊळ. त्यावर झळाळणारं लख्ख पांढरं ऊन. वेळ ही एक सापेक्ष कल्पना आहे. काही क्षण किंवा काही मिनिटं समोरचं जिवंत दृश्य डोळ्यांत साठवून घेत मी उभी होते. अचानक भास झाला की, मी जसं समोरचं देऊळ पाहत आहे, तसेच तेही मला पाहत आहे. निर्जीवत्व आपल्या मनात असतं. कदाचित ते देऊळही तितकंच सजीव असेल- जितकी मी! कुणीतरी पलीकडून आपल्याकडे पाहत आहे, या विचाराने मी किंचित दचकले. भानावर आले. बाजूला पाहिलं, तर त्या क्षणी वासराची कातडीही किंचित थरथरली. माझ्या देहावरची लहर तिथवर तर नाही पोचली? लहर नर्मदेच्या पाण्यावर, वासरावर, माझ्यावर. इतकी एकात्मता एखाद्या क्षणी निर्माण होते, की हे नुसतेच माझ्यातील कल्पनेचे पसारे? मी मान झटकून माझ्याभोवतीचा सगळाच माहोल डुचमळवला. घाईघाईने गाडीपाशी परतले.
‘कह तो दिया था, अब इस टाइम वहाँ जाना ठीक नहीं।’ मी गाडीत परतताच ड्रायव्हरनं टोकलं. मी काहीच बोलले नाही. जे पाहिले, ते त्याला सांगणे शक्य नव्हते. मला स्वत:लाच नर्मदेच्या पाण्यातून बाहेर काढून कामाच्या परिघात शिरणं आवश्यक होतं. गाडी घाटापासून दूर जात राहिली.. नर्मदा होशंगाबादकाठी वाहत राहिली.. काम संपवून घरी परतले तेव्हा रात्र चांगलीच चढली होती. बुधनीच्या जंगलातून परतताना झाडांवर झिरपून सांडलेलं चांदणं ढळत्या दिवसाला गहिरं परिमाण देऊन जात होतं. दिवसभराचा प्रवास, कामाचा ताण साथीला होताच. तरीही होशंगाबाद घाटावरची नर्मदा त्यापार मनात राहून गेली होती. घरात आल्या आल्या मी भिंतीवरून ‘कालनिर्णय’ काढलं. यावर्षीचा दिवाळी संपण्याचा दिवस आणि कार्तिकी पौर्णिमा असे दोन दिवस जुळवले. मुंबईला मित्राला फोन लावला- ‘ऐक, या वर्षी भाऊबीज १९ ऑक्टोबरला आहे. दिवाळीनंतर पंधरा दिवसांनी कार्तिकी पौर्णिमा येते. भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी जर आपण नर्मदा परिक्रमेला निघालो, तर ज्या दिवशी पंढरपूरला विठ्ठलाच्या देवळात वारकरी पोचतील, त्याच दिवशी आपण अमरकंटकला परिक्रमा पूर्ण करून येऊ. मला माहीत आहे- आपल्याकडे फार वेळ नाही; पण गाडी करून गेलो तर अमरकंटक ते अमरकंटक अशी नर्मदा परिक्रमा तेवढय़ा दिवसांत करणे अशक्य नाही.’ मी एका दमात सांगून टाकले. मित्र बिचारा एक भला माणूस. रात्रीच्या वेळी ‘आगा ना पिछा’ असा माझा भन्नाट प्रस्ताव ऐकून थोडं हसून म्हणाला, ‘हो, जाऊ या नं. तू म्हणशील, तर त्या दिवशी पंढरपूरलाही जाऊ आणि अमरकंटकलाही जाऊ. पण मला एक सांग की, पंढरपूरच्या विठ्ठलाचा आणि नर्मदा परिक्रमेचा काय संबंध? नाही- म्हणजे कार्तिकीच्या दिवशी जेव्हा लोक विठ्ठलाच्या देवळात पोचतील तेव्हा आपण अमरकंटकला पोचण्यामागे नेमकं लॉजिक काय?’ मी काहीशी निरुत्तर झाले. खरंच, काय लॉजिक लावत होते मी? पंढरपूरचा विचार तर दिवसभरात एकदाही माझ्या मनात आला नव्हता. मग आत्ताच काय हे? काय संबंध पंढरपूरचा नर्मदेशी? वारीमधील चालणं आणि परिक्रमेचं चालणं- एवढंच साध्यम्र्य? की त्यापलीकडे काही? उत्तर मलाही सापडेना. निरुत्तर होताच मी हुकूमाची राणी बाहेर काढली- ‘नसेलही काही संबंध; मी म्हणते म्हणून जाऊ!’ माझी समजूत काढत मित्र म्हणाला, ‘जाऊच गं आपण. त्यात काहीच प्रॉब्लेम नाही. पण मला वाटतं, आताच आली आहेस बाहेरून, तर जेवून विश्रांती घे आता. बोलू मग.’
‘हौऽऊ.’ माझ्याही नकळत माझ्यातलं नर्मदेचं पाणी बोलून गेलं. मी नर्मदेत सामावत होते, की नर्मदा माझ्यात?
फोन बंद झाला. दुपारी ज्या तटस्थपणे मी नर्मदेकाठी वाहणारं जीवन पाहत उभी होते, त्याच तटस्थपणे, पण आश्चर्यानं आता मीच माझ्याकडे वळून पाहिलं. खरंच, काय संबंध मी लावत आहे नर्मदेचा आणि पंढरीच्या विठ्ठलाचा? मलाही कळत नाही. असा खोलवर कुठेतरी काही अर्थ आहे, की त्या दोन सुटय़ा घटना आहेत? तसा आपल्या आयुष्यातील एका क्षणाचा दुसऱ्या क्षणाशी काय संबंध असतो? पाण्याच्या एका थेंबाचा दुसऱ्या थेंबाशी काय संबंध? वाहणारी नदी एक असते, तसेच आपल्या आयुष्यातील क्षणांमधून वाहणारे आपण एकच असतो. एवढंच काय ते! बाकी प्रत्येक घटना सुटी असते. प्रत्येक दिवस सुटा. स्वतंत्र!
रात्री बिछान्यावर पडले तरी पाण्याची मोहिनी डोळ्यांवरून कमी होईना. नर्मदेचं निळं, विशाल पात्र आणि पाण्यावर उठणारे विलोभनीय तरंग. दोन डोळे अपुरे पडावे असं रूप. हेच अपुरेपण मी यापूर्वी कधी पाहिलं होतं? ताण देऊन मी आठवू लागले. इंद्रायणीकाठी देवळात? दिवसभराच्या ताणानं मेंदू शिणला होता. डोळ्यांवर झोप दाटून येऊ लागली. वाटलं, जाऊ दे. प्रत्येक गोष्टीत कार्यकारणभाव शोधण्याचा अट्टहास तरी माणसानं का ठेवावा? हिमालयातली गंगा उठून नर्मदेत स्नान करायला येऊ शकते, तर कार्तिकीला पंढरपूरच्या वारीची सांगता नर्मदेच्या अमरकंटकला करण्याचा प्रस्ताव मी मांडला, तर काय हरकत आहे? मनातल्या विचारांना दूर सारत मी बिछान्यात कूस बदलली. थंडीच्या लाटेखाली उबदार पांघरुणात अधिकच आत घुसले. डोळे मिटले, तर बुधनीच्या जंगलात झाडावरून वाळलेली पानं पडावीत, तसा पाखरांचा थवा जमिनीवर सांडला. नर्मदेकाठी विठ्ठल अवतरला. निळे सावळेसे झाले.
राणी दुर्वे
ranidurve@hotmail.com