Leading International Marathi News Daily

शनिवार, २८ फेब्रुवारी २००९

व्यापार-उद्योग

शाश्वत ऊर्जानिर्मितीसंबंधी पुण्यात आंतरराष्ट्रीय प्रदर्शन ३ मार्चपासून
व्यापार प्रतिनिधी: शाश्वत ऊर्जानिर्मिती क्षेत्रातील उद्योगांचा देशातील पहिला आंतरराष्ट्रीय मेळावा ठरणाऱ्या ‘रिन्युटेक इंडिया २००९’ प्रदर्शनाचे आयोजन दि. ३ ते ५ मार्च ०९ दरम्यान चिंचवड येथील ऑटोक्लस्टर एक्झिबिशन सेंटर येथे आयोजित करण्यात येत आहे. एमसीओ विनमार्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या भारत-जर्मनी संयुक्त प्रकल्पातर्फे आयोजित होणाऱ्या या महामेळाव्यामध्ये भारतासह जर्मनी, इंग्लंड, ऑस्ट्रिया, अमेरिका इ. देशांतून ४० हून अधिक कंपन्या बायोमास, केबल्स अँड अ‍ॅक्सेसरीज, कोटिंग सिस्टिम्स, पाईप्स अँड फीटिंग्ज, माहिती प्रणाली, ल्युब्रिंकटस परफॉर्मन्स टूल्स, शाश्वत ऊर्जा पर्याय, सौरऊर्जा, वॉटर हिटर्स, पवनऊर्जा इ. क्षेत्रातील आपली उत्पादने व सेवा प्रदर्शित करणार आहेत.
या तीन दिवसांच्या शाश्वत ऊर्जा महामेळाव्याचे उद्घाटन विनय कोरे, शाश्वत ऊर्जामंत्री (रिन्युएबल एनर्जी) महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते होणार आहे. रिन्युटेक इंडिया २००९ मध्ये जर्मन राज्य नॉर्थ ऱ्हाइन वेस्टफालिया (एनआरडब्ल्यू) तील संपूर्ण ऊर्जास्रोत हाताळणारी एनर्जी एजेन्टर, युके ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट प्रमोशनचे शिष्टमंडळ व नायजेरियाच्या पर्यावरण व सौरऊर्जा मंत्रालयाचे अधिकृत प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

‘बीएसए ग्रुप’चा ‘हुबर्ट एब्नर इंडिया’शी करार
व्यापार प्रतिनिधी: ‘बीएसए ग्रुप’ने हुबर्ट एब्नर इंडियाशी करार केला आहे. या करारावर ‘बीएसए ग्रुप’चे अध्यक्ष बाळासाहेब कदम व ‘एचई’च्या व्यवस्थापक सुझान एब्नर यांनी नुकत्याच सह्य़ा केल्या.
‘एचई इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ ही ऑस्ट्रियाच्या ‘हुबर्ट एब्नर वेरलॅग्ज जीएमबीएच’ने भारतात संयुक्तपणे प्रवíतत के लेली कंपनी आहे. ती आता ‘बीएसए ग्रुप’च्या सहकार्याने पुण्यात कार्यरत झाली आहे. ‘बीएसए ग्रुप’ व ‘एचई इंडिया’ परवाना पश्चात चालक प्रशिक्षण कार्यक्रम राबवत असून, चारचाकी वाहनांच्या चालकांना बचावात्मक वाहन चालविणे व रस्ते सुरक्षासंबंधी शिक्षण देत आहेत. असे प्रशिक्षण कार्यक्रम विकसित करण्याचा व राबवण्याचा ‘एचई’ला गेल्या तीस वर्षांपासून अधिक काळ अनुभव आहे. संवादात्मक अध्ययनप्रणालीच्या विकासात ही कंपनी प्रवर्तक असून, ऑस्ट्रिया व जर्मनीसारख्या देशांतील बाजारपेठेत आघाडीची आहे. यासंदर्भात बोलताना बाळासाहेब कदम म्हणाले की, चालकांसाठीचा प्रशिक्षण कार्यक्रम पुण्यासारख्या शहरात अपरिहार्य आहे, कारण आपल्या रस्त्यांवरील वाहतुकीची स्थिती आता अधिकाधिक गुंतागुंतीची होत आहे. प्रत्येकाला रस्ता वापरण्याचा समान हक्क असला तरी वापरणाऱ्यांची वर्तणूक विविध प्रकारची असते. कार, ट्रक, बस, सायकली, स्कूटर्स, मोटारसायकली, रिक्षा आणि पादचारी यामुळे रस्त्यांवर गर्दी असते. त्यातही सिग्नलचे उल्लंघन करणे, नियम तोडणे, वाहतुकीच्या चिन्हांकडे दुर्लक्ष करणे, वेग कमी करण्याचा सिग्नल असतानाही वाहन वेगाने दामटणे, किरकोळ ते प्राणघातक अपघात, इजा होणे हे नित्याचेच होऊन बसले आहे. आमच्या प्रशिक्षण कार्यक्रमात रस्त्यावरील सिग्नल, चिन्हे व पट्टे लक्षात ठेवणे, इतर वाहनचालकांबरोबर जबाबदारीने रस्त्याचा वापर करणे, धोक्याचे भान ठेवणे, ताणतणाव व मद्यपानाचा वाहन चालवण्यावर होणारा परिणाम हे विषय शिकविले जातात.

व्यापार संक्षिप्त
‘सिंगापूर टुरिझम बोर्डा’तर्फे ‘फ्लाय ऑन अस’ मोहीम
व्यापार प्रतिनिधी: सध्याच्या आव्हानात्मक काळात सिंगापूरमधील पर्यटन क्षेत्राला उभारी देण्याच्या हेतूने सिंगापूर टुरिझम बोर्डाने (एसटीबी) नऊ कोटी सिंगापूर डॉलर खर्चाचा ‘बिल्डिंग ऑन अ‍ॅपॉच्र्युनिटीज टू स्ट्रेंग्दन टुरिझम’ (बूस्ट) हा कार्यक्रम जाहीर केला आहे. हा कार्यक्रम सिंगापूर पर्यटनात महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या देशांत राबविला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून एसटीबीने भारतात ‘फ्लाय ऑन अस’ ही मोहीम सुरू केली आहे.

‘मॅक्स न्यूयॉर्क लाइफ’तर्फे ‘स्मार्ट मूव्ह इंटर्नशिप प्रोग्रॅम’
व्यापार प्रतिनिधी: विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना उत्पन्न मिळवण्याची संधी देण्याच्या हेतूने ‘मॅक्स न्यू यॉर्क लाइफ इन्शुरन्स’ कंपनीने ‘स्मार्ट मूव्ह इंटर्नशिप प्रोग्रॅम’ हा राष्ट्रीय पातळीवरील उमेदवारी कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यासाठी प्रारंभी कंपनीने इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाशी (आयजीएनओयू) सहयोग केला असून, या विद्यापीठाच्या दहा हजार विद्यार्थ्यांना इंटर्नशिपची संधी देऊ केली आहे.
या कार्यक्रमात इच्छुक विद्यार्थ्यांना आयुर्विमा, मॅक्स न्यू यॉर्क कंपनी व तेथील भरतीप्रक्रियेबाबत तीन दिवसांचे व्यापक प्रशिक्षण दिले जाईल. शिक्षणाच्या प्रारंभीच्या टप्प्यातच मिळालेले हे ज्ञान विद्यार्थ्यांना व्यावसायिक करीअरसाठी उपयुक्त ठरेल. प्रशिक्षित विद्यार्थी एजंट सल्लागार नियुक्त करू शकतील.

सिया आर्ट ज्वेलरीचे पुण्यात स्वतंत्र दालन
व्यापार प्रतिनिधी: ज्वेलरी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध नाव असलेल्या सिया आर्ट ज्वेलरीने आपल्या गुणवत्तेमुळे आणि स्टाईलमुळे फॅशन विश्वात वेगळे नाव कमावले आहे. कलात्मक दागिन्यांच्या क्षेत्रात २५०० कोटींचा व्यवसाय करणाऱ्या सियाने आता आपले पंख अधिक विस्तारण्याचे ठरविले आहे. सिया लाइफस्टाइल प्रा. लि.चे सीईओ जतीन छाडवा म्हणाले, की येत्या सहा महिन्यांत आम्ही बंगलोर, दिल्ली, पुणे, मुंबई या शहरांमध्ये नव्या शाखा सुरू करण्याचे ठरविले आहे. निवडक मॉलमध्येही आम्ही आमच्या ब्रॅण्डनेममध्ये कक्ष सुरू करणार आहोत. येत्या दोन वर्षांत २५ हजार चौ.फूट क्षेत्रफळाचे ५० आऊटलेट्स आम्ही उघडणार आहोत. येत्या अडीच वर्षांत १०० कोटींपर्यंत व्यवसाय करण्याचा आमचा मानस आहे. या विस्तारासाठी भारतभर फ्रँचायसी नेमल्या जाणार आहेत. ते म्हणाले, की २०११पर्यंत आम्ही आमची उत्पादने ३०० दुकानांमधून विक्रीस ठेवणार आहोत. यासाठी २०१५ पर्यंत आणखी १५० दुकाने आणि उलाढाल १००० कोटींपर्यंत नेण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.