Leading International Marathi News Daily

शनिवार, २८ फेब्रुवारी २००९

अग्रलेख

शंखातुर परिवार

 

१४व्या लोकसभेने निरोप घेतला आणि १५ व्या लोकसभेची तजविज करण्यासाठी पक्षनिधीच्या कोटींच्या थैल्या जमा करण्याचे सत्र सुरू झाले आहे. गेल्या काही निवडणुका, कोणता पक्ष सत्तेवर येईल, कोणती आघाडी यशस्वी ठरेल यापेक्षाही अधिक चर्चा होते आहे ती लालकृष्ण अडवाणी आणि शरद पवार या दोन इच्छुकांच्या महत्त्वाकांक्षांची. देशाच्या राजकारणात उतरलेल्या नेत्याने पंतप्रधान होण्याची स्वप्ने पाहण्यात काहीच गैर नाही; परंतु अलीकडे या दोन्ही नेत्यांनी तेवढे एकच स्वप्न पाहायचे ठरवून बाकीची सारी कामे बाजूला ठेवून दिलेली आहेत की काय असे वाटते. अडवाणींना एकेकाळी भाजपचे ‘लोहपुरुष’ म्हटले जात होते. आता भाजपमधले ‘लोह’ संपले असून, रामदेव बाबांच्या सल्ल्याने ‘पालकाचा रस’ पिण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. मुळात लोकसभेच्या निवडणुकांचे ढग दाटून आल्याबरोबर आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण हे जाहीर करण्याची भाजपला नेहमीच घाई असते. भाजपकडून याचे वर्णन ‘पूर्वनियोजित रणनीती’ असे केले जाते; परंतु प्रत्यक्षात जे काही दिसते त्याला मात्र ‘बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी’ असे म्हणायची वेळ येते. आतापर्यंत अडवाणींच्या ‘पंतप्रधान रथ यात्रे’च्या मार्गात वाजपेयींचा ‘अडथळा’ लागत असे, या वेळी तो ‘स्पीडब्रेकर’ मोदींचा लागला. भाजपने आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करताक्षणी मोदींचे नाव एका गटाने पुढे केले. अखेर, मोदी हे उत्तम पंतप्रधान होऊ शकतील, अशी प्रशस्ती खुद्द अडवाणी यांनाही द्यावी लागली. या वर्षी तर अडवाणी आणि त्यांच्या चाहत्यांची मन:स्थिती ‘अभी नही तो कभी नही’ अशी ‘शेंडी तुटो वा पारंबी’ पठडीतली आहे; परंतु त्यात येत असलेली विघ्ने पाहता शेंडी तुटण्याचीच शक्यता अधिक वाटते आहे. अडवाणींच्या मनसुब्याला पहिला तडा गेला तो शिवसेनेच्या ‘नरो वा कुंजरो वा’ भूमिकेने. हिंदुत्ववादाच्या मुद्दय़ावर शिवसेनेचा पाठिंबा भाजपने गृहीत धरला होता; परंतु मनसेच्या आंदोलनामुळे सेनेला मराठीचा मुद्दा पुन्हा एकदा घासून पुसून टेबलावर ठेवावा लागला आणि सेनेची ही कमकुवत स्थिती पाहून शरद पवारांनी आपल्या सैन्याची जमवाजमव करून त्यांना नेमके खिंडीत गाठले. नरेंद्र मोदींच्या हिंसक हिंदुत्वावर शिवसेनेचे लेबल लावून यापूर्वी बाळासाहेब ठाकरेंनी त्यांचे महाराष्ट्रात वेळोवेळी स्वागत केले आहे; परंतु गुरुवारी मोदींच्या ज्या दोन सभा महाराष्ट्रात झाल्या त्यात त्यांनी शिवसेनेचे नावदेखील उच्चारले नाही आणि सेनेनेही मोदींच्या आगमनाला किंमत दिली नाही. त्यापूर्वी लालकृष्ण अडवाणी यांची मुंबईत सभा झाली, त्यात पक्षाच्या निवडणूक निधीत भले १२ कोटींची भर पडली असेल, हिंदुत्वाचे शंख मात्र वाजलेच नाही. युद्ध सुरू होत असल्याचा पुकारा आणि इशारा शंखध्वनीद्वारा देण्यात येत असे असा उल्लेख पुराणांमध्ये आहे. वातानुकूलित मोटारीला रथाचे स्वरूप देऊन हिंदुत्वाची झूल पांघरण्याची अडवाणींना मोठीच हौस. त्यांनी निवडणूक प्रचारासाठी सुरुवात करताना ‘रणशिंग’ फुंकण्याचा अक्षरश: प्रयत्न केला. त्यांनी गालात हवा गोळा करून शंख फुंकण्याचे केलेले सर्व प्रयत्न वाया गेले. त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी तो शंख घासून-पुसून पुन्हा त्यांच्या हाती दिला; परंतु त्या ‘शंखा’ने काही आपला असहकार सोडला नाही. शेवटी शंख नुसताच तोंडाला लावून ‘शंखध्वनी’ झाल्याचे लटके समाधान पदरात पाडून घेण्यात आले. यापुढे असे काही करण्यापूर्वी शंखाचा ‘पूर्वमुद्रित ध्वनी’ सीडीवर घेऊन ठेवण्याची काळजी त्यांनी बाळगली पाहिजे. भाजपची सर्वच कामे अगदी ‘पूर्वनियोजित’ असतात त्यामुळे यावर कोणी आक्षेप घेण्याचेही काही कारण नाही. प्रचारमोहिमेच्या प्रारंभालाच अडवाणींना जो अपशकून झाला त्याचा परिणाम पुढेही जाणवतच आहे. दिल्लीत एनडीएच्या बैठकीनंतर काही निवडक पत्रकारांना भोजनासाठी आमंत्रित करण्यात आले. अर्थातच जे ‘निवडक’ ठरले नाही त्यांनी दुसऱ्या दिवशी अडवाणींच्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार घातला. अडवाणी पत्रकारांची वाट पाहत आहेत आणि भाजपचे पदाधिकारी पत्रकारांच्या नाकदुऱ्या काढत आहेत, असे दृष्य अनेकांनी पाहिले. अडवाणी हे मावळलेल्या लोकसभेचे विरोधी पक्ष नेते होते; परंतु १४ व्या लोकसभेत खऱ्या अर्थाने विरोधकाची भूमिका मार्क्‍सवाद्यांनी बजावली असे आता स्पष्ट झाले आहे. म्हणजे भाजप हा जरी स्वत:ला राष्ट्रीय पातळीवरील प्रमुख पक्ष समजत असला तरी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात धोरणात्मक भूमिका घेऊन त्यांना कोंडीत पकडण्याचे काम त्याला करता आलेले नाही. याचा अर्थ, एकदा सत्तेची चव चाखल्यावर विरोधी बाकांवर बसण्याची भाजपची मानसिकता आता राहिलेली नाही. राजकारणाचा खेळ खऱ्या अर्थाने मानसिक पातळीवर खेळला जात असतो, असे म्हणतात. १४ व्या लोकसभेच्या शेवटच्या दिवशी अडवाणी यांचा निरोप घेताना सोनिया गांधींनी धूर्तपणे त्यांना फार महत्त्व देण्याचे टाळले आणि ‘माइंड गेम’मध्ये त्यांच्यावर कुरघोडी केली, असे म्हणता येईल. अर्थात अडवाणींच्या वाटेवर फक्त विरोधकांनीच काटे पेरून ठेवले आहेत असे नव्हे. भाजपची सूत्रे आता तरुणांकडे गेली पाहिजेत, असा पद्धतशीर प्रचार काही नेते करीत आहेत. संघानेही अडवाणींचे जीना प्रकरण तात्पुरते अडगळीत टाकले असले तरी ते विस्मरणात ढकलून दिलेले नाही. प्रकृती अस्वास्थ्यामुळे वाजपेयी नेतृत्वपदाच्या वादापासून दूर आहेत, असे सर्वसाधारणरीत्या समजले जात असले तरी ते शांतपणे बसलेले नाहीत, असे मानणाराही एक वर्ग आहे. नेत्याच्या महत्त्वाकांक्षेला बळ पुरवायचे असेल तर त्याच्या नेतृत्वाबद्दल पक्षात विश्वास हवा आणि पक्षसंघटनेवर त्याचा वचक हवा. या दोन्ही पातळींवर अडवाणींची स्थिती काही अनुकूल वाटत नाही. बाळासाहेब ठाकरेंनी अडवाणींसाठी मातोश्रीचे दार उघडले नाही हे त्याचेच द्योतक आहे. ‘मातोश्री’चे दार पूर्वपरवानगी घेऊन ठोठावले नाही, असा खुलासा सेनेने केला आहे. खरेतर भाजपने सेनेला गृहीत धरले होते आणि अडवाणी यांनी इच्छा व्यक्त केल्यावर बाळासाहेब भेटीला नकार देणार नाहीत, असे त्यांना वाटत होते. असे असले तरी या भेटीची ‘पूर्वपरवानगी’ मागून उलट सेनेलाच अडचणीत आणण्याची खेळी भाजपला करता आली असती; परंतु भाजपचे नेते विरोधकांवर ‘दहा लाखांचे’ फुटकळ आरोप करण्यात अधिक रस घेत आहेत. पवारांच्या राजकारणाची एक पूर्वापार पद्धत आहे, त्याला अनुसरून त्यांचे राजकारण सुरू आहे. म्हणजे आपण पंतप्रधान व्हावे यासाठी व्यूहरचना करता करताच ते अडवाणी होऊ नयेत यासाठीही डावपेच करीत असतात. ‘पवारांचे फार मनावर घेऊ नका, मी शाळेत असल्यापासून पवार पंतप्रधान होणार असल्याची चर्चा ऐकतो आहे,’ असा टोला गोपीनाथ मुंडेंनी भले मारला असेल, युती तुटली तर गोपीनाथरावांचे काही खरे नाही. पवारांच्या खेळीमुळे युतीविषयी संभ्रम निर्माण झाला आहेच, शिवसेनेतील अंतर्गत कुरबुरीही चव्हाटय़ावर आल्या आहेत. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या गुप्त भेटीच्या वृत्ताने शिवसैनिक गोंधळात पडले आहेत. अडवाणींनी पंतप्रधानपदासाठी गणित मांडताना महाराष्ट्रातून २० ते २५ खासदारांची कुमक गृहीत धरली असेल. त्या अपेक्षांना पवारांनी सुरुंग लावला आहे आणि त्या सुरुंगाचा स्फोट वाचविण्याएवढी ताकद भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये नाही. नरेंद्र मोदींच्या सभांना भलेही गर्दी होईल. पण मोदींच्या हिंदुत्वाला शिवसेनेची भगवी वस्त्रे नसतील तर महाराष्ट्रात त्यांचा फार उपयोग होणार नाही. शंख वाजविणे आणि शंख करणे ही दोन विरुद्ध टोके झाली. अडवाणींचा शंख वाजला तर नाहीच, ‘शंख करणाऱ्यांची’ मात्र त्यांच्या पक्षात कमी नाही. तेव्हा सध्या नुसतेच ‘गाल फुगवून’ शंख ध्वनींचा ‘रेकॉर्डेड साऊण्ड’ ऐकविण्याचे दिवस आहेत हे अडवाणींना कळले असेलच! अवघा संघपरिवार ‘शंखातुर’ झालेला आहे परंतु शंखात फुंकर भरण्याएवढा जोर भाजपात आजघडीला तरी दिसत नाही.