Leading International Marathi News Daily

शनिवार, २८ फेब्रुवारी २००९

निसर्गाचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी आपले वय, प्रतिष्ठा, समाजातील स्थान हे सर्व विसरून डोंगरदऱ्यातील भटकंतीसारखा सोपा मार्ग नाही. त्यानुसारच सिंहगडापासून सुरुवात करत राजगड, तोरणा, लिंगाणा व शेवटी शिवछत्रपतींची राजधानी ‘रायगड’ यांस वंदन करायचे ठरते. अवघ्या चार दिवसांत पाच किल्ले. या मार्गावर कुठेही मोठे गाव नाही. काही छोटय़ा वस्त्या व धनगरांची घरे आहेत.
या ट्रेकचा मार्ग अतिशय खडतर व शारीरिक क्षमतेचा ‘कस’ काढणारा आहे. सकाळच्या चहासकट नाश्ता व जेवण वेळेवर मिळेल याची शाश्वती नाही. स्नानांची सोय नाही; शौचकुपांचा तर प्रश्नच नाही. त्यामुळे सवंगडय़ांची निवड करताना एकच सोपा निकष ठेवला होता, पाठीवर भरपूर वजन घेऊन; दऱ्या-डोंगरातून रोज १२/१४ तास चालू शकतील असे गडी. एअर इंडियामधील प्रशांत खानविलकर, बी. एम.सी.मधील आर्किटेक्ट अपर्णा भट्ट, अंबरनाथमधील प्रतिष्ठित असे डॉ. जयराज भालेराव, डेंटल मेडिकल स्टुडंट अक्षय मुळे, मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये कार्यरत अनुजा चव्हाण, गृहिणी व लघू उद्योजक अनघा लेले, तसेच अमित कुलकर्णी व सुनील जोशी असे एकूण नऊजण सह्यभ्रमण करण्यास सज्ज झाले. पहिला दिवस : अगदी रामप्रहरी सकाळी चार वाजता आम्ही जीपने अंबरनाथहून निघालो. एक्स्प्रेस-वे मार्गे सकाळी ८.०० वाजेपर्यंत सिंहगडचा पायथा म्हणजे ‘आतकरवाडी’ पर्यंत येऊन पोहोचलो. आतकरवाडीच्या तीन किलोमीटर अलीकडे गोळेवाडीपासून गाडी रस्त्यानेही थेट सिंहगडावर जाता येते. पण आता आपला तो मार्ग नाही. जीपगाडी सोडून दिली व ‘हर हर महादेव’ म्हणत गड चढायला सुरुवात केली. दोन तासांमध्ये; डोणजे दरवाजातून सिंहगडावर पोहोचलो. या गडाचे पूर्वीचे नाव कोंढाणा; कोंढाणा हे नाव कौंडिण्य ऋषींच्या नावावरून रूढ झाले. गडावर कौंडिण्येश्वराचे देवालय असून, नरवीर तानाजी मालुसरे यांचे अतिशय सुंदर असे स्मारकही आहे. ‘गड आला पण सिंह गेला’ अशा शब्दात शिवछत्रपतींनी त्यांचा गौरव केला, म्हणूनच या गडाचे नाव ‘सिंहगड’ झाले. हे सर्व आठवत तानाजी मालुसरे यांना आदरपूर्वक प्रणाम केला आणि पुढे राजगडच्या दिशेने निघालो.

‘अ क्युरिअस केस ऑफ बेंजामिन बटन’
‘जसजशा मी या डायऱ्या वाचत गेले, तसतशी माझा बाप असलेल्या या २३ वर्षांच्या मुलाच्या मी प्रेमात पडत गेले’- असं एक अतिशय हृदयस्पर्शी विधान डॉ. अलैडा चे गेवारा हिनं केलं आहे. अलैडा हीचे गेवारा यांची कन्या. अर्नेस्टो चे गेवाराची हत्या करण्यात आली त्या वेळी ती होती जेमतेम सहा वर्षांची. १९६७ साली चे गेवाराची हत्या करण्यात आली तेव्हा तो होता ३९ वर्षांचा. त्याच्या ‘मोटरसायकल डायरीज’ पुस्तक रूपात प्रसिद्ध झाल्या १९९३ मध्ये. त्याचं संपादन करताना, ८० च्या दशकाच्या उत्तरार्धात अलैडानं त्या प्रथम वाचल्या होत्या, त्या वेळची तिची ही भावना आहे. आपल्या वर्तमान वयासकट अलैडा भूतकाळाची सफर करीत आपल्या वडिलांच्या वयाच्या २३ व्या वर्षांकडे पाहते. काळाचं अंतर पार करण्याची ही असोशी मला विलोभनीय वाटते. वॉल्टर सेलेस या दिग्दर्शकानं या पुस्तकावर चित्रपट केला. अलैडाचं वर दिलेलं विधान वाचताना मनात असंही येऊन जातं की, चित्रपटाचं सादरीकरण अलैडाच्या या विधानापासूनही सुरू करता आलं असतं..! हे आठवायला कारण घडलं ‘द क्युरिअस केस ऑफ बेंजामिन बटन’ हे! सिनेमाचं माध्यम भूल पाडतं त्याची जी अनेक कारणं आहेत, त्यातलं एक कारण म्हणजे स्थळाच्याच नव्हे तर काळाच्याही सीमा पुढे-मागे ओलांडून जाण्याची आणि त्याही दृश्य स्वरूपात म्हणजे प्रत्यक्षाभासाच्या रूपात ओलांडून जाण्याची या माध्यमाची क्षमता. तशीच फँटसीला प्रत्यक्षाभासात उतरवायची त्याची क्षमता. एच. जी. वेल्सनं १८९५ मध्ये ‘टाइम मशीन’ या कादंबरिकेच्या रूपात मांडलेल्या या कल्पनेवर चित्रपट निघाले, टीव्ही मालिका आल्या त्या या माध्यमाची ही ताकद ओळखून तिचा वापर करीत. अशीच एक विज्ञान काल्पनिका एका चिनी चित्रपटात पाहिली होती. दोन वेगवेगळ्या टाइम झोनमध्ये जगणारी दोन माणसं एकमेकांच्या प्रेमात पडतात. ही कल्पना आधी गमतीदार वाटली तरी नंतर त्यांच्या दरम्यानचं हे काळाचं अंतर असहाय्यतेची कासावीस करणारी भावना निर्माण करते.